*सुख म्हणजे नक्की काय असतं*
सुख म्हणजे नक्की काय असतं?अहो हे काय विचारणं झालं ! सुख असं कधी शब्दात व्यक्त करता येतं का? ही काही मूर्त स्वरुपात दाखवण्याची वस्तू का आहे! जी हातात घेऊन दाखवता येईल आणि ही काही प्रत्येक व्यक्ती जवळ अगदी सारखीच, सारख्याच प्रमाणात असते ! असेही नव्हेच.
सुख म्हणजे काय तर ही प्रत्येकाने मनातून जाणून घेण्याची अशी एक मानसिक कल्पना आहे असेच मी म्हणेन.ती व्यक्तिसापेक्ष अशीच एक भावना, मानसिक कल्पना आहे.
सुख हे स्थळ,काळ,परिस्थिती काही प्रमाणात आपली किंवा त्या संबंधित व्यक्तीची आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता इत्यादींवर अवलंबून असू शकते.पण ही पुर्णपणे माणसाच्या मनात घर करून राहिलेली मानसिक कल्पनाच होय,हे नक्की.
वयानुरूप या संकल्पनेविषयी प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच चित्र बनत जातं. ही सुखाची संकल्पना मनात तयार होत असताना नक्कीच स्वानुभवाची सभोवतालच्या परिसराची आणि आपल्या आर्थिक परिस्थितीच्या जाणिवेचा विचार यामागे केलेला असतोच.
प्रत्येकाची सुखाची कल्पना जेवढी माणसाच्या अनुभवावर ठरत जाते, तशीच ती समाधानी वृत्ती, आनंदी वृत्तीशी, आवडीनिवडींशी एकरुपकत्व साधते.
आपण छोटे असतो तोपर्यंत आई-वडील घरातील मोठी माणसं यांच्या छायेखाली अगदी सुरक्षित असतो. आपले पुरवले जाणारे लाड, तोंडातून बाहेर पडल्याबरोबर मान्य केली जाणारी आपली मागणी, बालहट्ट यांची पूर्तता होणं, हिच प्रत्येक बालकाची आपल्या स्वतःबद्दल असणारी सुखाची कल्पना असते. वाढत्या वयानुसार प्रत्येकाचीआपल्या वैचारिक पातळीचा, निरीक्षणाचा आणि कल्पनाशक्तीचा परिघ सुद्धा विस्तारत जात असतो. आणि त्यानुसार सुखाच्या संकल्पनेतही बदल होत जातो. त्या त्या वयातील आवश्यक त्या सोयी सुविधा आवश्यक बाबी प्राधान्यक्रमाने प्राप्त होत जाणे, यातच माणूस आपले समाधान,पर्यायाने सुख शोधू लागतो.
सुख आणि समाधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरु नये. प्रत्येकाच्या मनातील सुखाची कल्पना ही ज्याच्या त्याच्या समाधानाच्या संकल्पनेवर अवलंबून असतेच. समाधान हे आपल्या मानण्यावर असतं. शेवटी,रहावयास उत्तम घर,खाऊन पिऊन सुखी,चांगली नोकरी किंवा व्यवसाय तसेच अंथरुण बघून पाय पसरण्याची आपल्यातील प्रवृत्ती, मुलांना यथायोग्य शिक्षणाच्या संधी, आपल्या कल्पना चित्रात रेखाटल्या नुसार चाललेला संसार वगैरे गोष्टींची परिपूर्णता किंवा मुबलकता ही एखाद्याची सुखाची कल्पना असते. ती त्याला भरभरुन समाधान देऊन जाते. अशा व्यक्तीच्या कल्पनेतील सुखाची व्याख्या,सुख सुख म्हणजे काय? तर हेच उपरोक्त सर्व बाबींची परीपूर्तताच !
कधीकधी काही लोक सुखाची कल्पना किंवा सुखाची व्याख्या करताना आपल्या श्रीमंतीचा मापदंड लावतात. जेवढी जास्त आर्थिक सुबत्ता तेवढं जास्त सुख असे विचार करणारी माणसं खरंच सुखी असतील का? हा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. अशा लोकांनी अंतर्मुख होऊन सुखाची व्याख्या करावयास शिकले पाहिजे. सुख आणि श्रीमंती, आर्थिक श्रीमंती यांची जवळीक असू शकते पण पूर्णपणे सलगी असेलच असे अजिबात नाही.कधी कधी काही लोकांची सुखाची कल्पना ही, त्यांच्या महत्वकांक्षेशी नातं सांगत असते. अशा व्यक्तीच्या बाबतीत मात्र समाधानाची व्याप्ती फार विस्तृत असते. आपल्या महत्त्वाकांक्षेचा परमोच्च बिंदू गाठल्याशिवाय अशा व्यक्तींना समाधान प्राप्त होत नाही. म्हणूनच तो स्वतःला 'पूर्णपणे सुखी आहे मी',असेही मानत नाही. सुखप्राप्तीसाठी त्याची सारखी धडपड सातत्याने चालू असते
काहीजण सुखाची कल्पना ही सभोवताली दिसणाऱ्या परिस्थितीशी, वातावरणाशी तुलना करत ठरवत असतात. सभोवताली दिसणार्या परिस्थिती पेक्षा आपल्या परिस्थिती मध्ये कमालीची सकारत्मकता असेल तर, आपसूकच माणूस आपल्या स्वतःला इतरांपेक्षा 'मी नक्कीच सुखात आहे', असे मानावयास लागतो. आपल्या भारतीयांमध्ये आपल्या कौटुंबिक आयुष्याच्या समाधानावरही सुखाची कल्पना निश्र्चित केली जाते.आपलं कौटुंबिक आयुष्य जेवढं सामंजस्याचं, खेळीमेळीचं , मानसिक प्रगल्भतेनं समृद्ध असणारं, तेवढं आपलं सुखही अधिक समृद्ध असं म्हटलं तर काहीच वावगं नाही.
लग्न होऊन सासरी जाणाऱ्या लेकीला
"जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा",
असाच आशीर्वाद आई देत असते. एकदा मुलगी व्यवस्थित तिच्या संसारात रममाण झाली की हिच मुलगी,
" घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात।माहेरी जा सुवासाची कर बरसात।
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात।
आई भाऊसाठी परी मन खंतावतं। "
असं म्हणून आपल्या माहेरी निरोप पाठवते ही आपली गाण्यातून व्यक्त झालेली सुखाची परंपरा.
संसारातील सुखाची दालनं ही "तडजोड" नामक चावीने खुली होत जातात.हे वास्तव सत्य आहे. शेवटी दोन भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या, दोन भिन्न व्यक्तींच्या सहजीवनाने माणसाचा संसार सुरु होत असतो. अशावेळी मतभिन्नता असणे अपरिहार्य आहे. पण दोघांनीही (पती-पत्नी) यांनी सामंजस्याने चर्चा करून आपल्या सुखाच्या कल्पनेचं चित्र रंगवलं,त्याच्या कक्षा निश्चित केल्या तर, आणि सहमतीने दोघांनीही परस्परांच्या विचारांचा आदर करत तडजोडीचे तंत्र अंगीकारले, तर दुःखाची सावली सुद्धा त्यांच्यावर पडणार नाही. हे मात्र खरे ! म्हणूनच आयुष्यात तडजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हणावसं वाटतं.
शेवटी आपलं सुख हे आपलीच कृती, वर्तन यावर उभं असतं. सर्वसमावेशक विचार करुन त्याची उभारणी पक्क्या पायावर उभी करणं यातच माणसाचं खरं कसब आहे.
आपल्या सुखाच्या कल्पना ठरवताना त्याची सीमारेषा आखून घेताना प्रत्येकाने "ऐकावे जनाचे करावे मनाचे", या तत्त्वाचा अंगीकार करावयास हवा असे वाटते.सुख सुख म्हणजे काय? तर दुसरं काही नसून आपला, "कम्फर्ट झोन"होय. यातून मिळणारा आपल्या मनाचा आनंद, समाधान आपल्याला प्राप्त होणारी मानसिक शांतता,सुरक्षितता आर्थिक सुबत्ता या साऱ्या बाबींचा एकत्रितपणे आपल्या आयुष्यावर पडणारा सकारात्मक परिणामच. तो केवळ आपल्यालाच जणवू शकतो. ही अशी जाणीव विस्तारत जाताना माणूस आपल्या आयुष्यात येणारे सुखाच्या, आनंदाच्या, समाधानाच्या परिपूर्ती चे कितीतरी क्षण टिपत टिपत एकत्रित साठवून ठेवतो. आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षाला, त्या सर्वांमधून घेतलेल्या आस्वादाला, त्यांच्या गोड आठवणींना, आणि आठवणींच्या साठवणीलाच तर सुख असे म्हणतो. म्हणूनच म्हणावसं वाटतं,
" सुखाचे क्षण,
टिपत टिपत जाताना
ठेवा आनंदाचा
वाटत वाटत जावा ।
समाधानाच्या, हिंदोळ्यांवर
स्वार होत असताना
परिपूर्तीचा आस्वाद घ्यावा ।
गंध हा परिपूर्णतेचा
नकळत माझाच श्वास बनावा
नकळत माझाच श्वास बनावा ।
©
नंदिनी म. देशपांडे.
मो.क्र. ९४२२४१६९९५.
email :
nmdabad@gmail.com
🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा