*आठवणीतील दिवाळी*
कोजागिरी पौर्णिमेला आटवलेल्या मधूर दुधाची चव जिव्हेवर रेंगाळत असतानाच हळूहळू हवेतला बोचरा थंडावा कांतीवर शिरशीरी घेवून येतो.....ही शिरशीरी जणू काही "दिवाळी जवळ येत आहे आता'', असा सांगावाच घेऊन आलेली असते.
दिवाळी दरवर्षीच येते.पण प्रत्येक दिवाळीच्या आठवणींची एक खास साठवण मनामध्ये होत जाते,ती त्यातील विशेष गोष्टींमूळे....
माझ्या लहानपणापासून च्या आठवणीतील दिवाळीत दरवर्षी वेगळ्या चवीचे,वेगळ्या पध्दतीनं आणि नाविण्यपूर्ण
फराळाचे पदार्थ बनवणं आणि त्याची ताजी ताजी चव आम्हा सर्वांना चाखावयास लावणं ही आईची एक मनस्वी आवड होती.... चार-पाच दिवसांपूर्वि पासूनच करंजी,अनारसा,साटोरीलाडू, शंकरपाळी, भाजणीची चकली,शेव आणि कधी कधी अगदी फेणी सुध्दा आपल्या हाताने बनवायची आई.... सर्वांत शेवटी विविध प्रकारचे खमंग चिवडे बनायचे या सर्वांच्या सुवासाने दिवाळी उंबरठ्या पर्यंत आल्याची वर्दी मिळायची....
धन त्रयोदशीला दिवे लावत मांगल्यपूर्ण वातावरणात उंबरठा ओलांडत घरात आलेल्या दिवाळीचं भरभरुन स्वागत व्हायचं....
नर्कचतुर्दशीला सुर्योदयाच्या अगोदरचे अभ्यंग स्नान हा आमच्यासाठी एक शाही थाटच असायचा...
लहानपणीची दिवाळी खूप आठवण देऊन जाते ती आईने स्वतः तिच्या हाताने केलेल्या सुगंधी तेलाच्या, केसांसह सर्वांगाला केलेल्या हलक्याच पण हव्याहव्याशा मसाजा मूळे....
आईचा अंगावरुन फिरणारा मुलायम प्रेमळ स्पर्श फार हवाहवासा तर वाटायचाच पण आपल्याच उदरातून जन्मलेलं हे छोटंसं पाडस मोठं होताना बघत,त्याला आपल्या स्पर्शानं न्हाऊ घालत तिला होणारा मनस्वी आनंद,कौतूक आईच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना बघणं हा एक खूप मोठा आनंददायी सोहळाच असायचा....
आईच्या या स्पर्शासाठी आपलाही रोमरोम आसूसलेला आहे ही जाणीव मनाच्या एका हळव्या कप्प्यात लपून बसलेली असायचीच....
दरवेळी,"तुझी कांती किती मऊ मुलायम!जणू लोण्याचा गोळाच!" हे वाक्य आईच्या तोंडून ऐकण्यात परमानंदाचं सुख मिळायचं...
माझ्या लग्नानंतरही आईची ही परंपरा खंडित झाली नाही कधी.....
लग्नानंतरही मी अगदी दर वर्षी दिवाळीत आईकडे जायची....आमच्या घरी लक्ष्मीपुजन नाही,म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून आमची दिवाळी माझ्या माहेरी, आईच्या साग्रसंगीत कोड कौतूकात साजरी होत असायची....
"तू आल्याशिवाय आम्हाला दिवाळी वाटेलच कशी?" असे म्हणत केलेला आईबाबांचा अग्रह आम्हालाही मोडवायचा नाहीच....
कांही वर्षांनी आम्ही तीघं भावंड एकाच शहरात रहावयास आलो आणि मग मीच आईच्या या परंपरेत थोडासा बदल करुन तिलाही कसा आराम मिळेल ? याकडे लक्ष देऊ लागले....पण फराळाचे पदार्थ बनवणं आणि जेवणाची लज्जत वाढवणं याची मक्तेदारी मात्र तिने स्वतःकडेच ठेवलेली असायची....
आपल्या लेकीला दोन बोट का असेना पण तेल लावण्यासाठी अगदी पाच मिनिटं तरी एवढ्या पहाटे पण माझ्या घरी येवून जायचीच आई.....
खरंच,आईनं केलेलं हे कौतूक हवहवंसं असं लाखमोलाचं असतं प्रत्येक स्त्री साठी....
कितीही प्रकाशमान अशी विद्यूत रोषणाई केलेली असली तरीही शांत सोज्वळ अशा तेवत्या पणत्यांच्या दिव्यांच्या लख्ख उजळपणाची सर कशालाही नसते ना, तसंच असतं आईच्या कौतूकभऱ्या नजरेचं सौंदर्य तिच्या लेकीसाठी....
आज आईला जाऊन साडेचार वर्षे झाली आहेत.सभोवती कितीही गोतावळा असेल,कितीही फराळ पक्क्वानांच्या राशी असतील आणि कितीही झगमगाट असेल तरीही तिच्या सहवासात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची सर आज काही केल्या येत नाही आणि दर वर्षी दिवाळी आली की, आईसाठी मनाचा हळवा कप्पा आपसूकच हलकासा ओला होऊन जातोच हे नाकारता येणार नाहीच....
©
नंदिनी म.देशपांडे
ऑक्टो.२६,२०१९.
💥💥💥💥💥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा