*सफर स्वर्गभूमीची*
लेखिका-
नंदिनी म.देशपांडे
ठरल्या प्रमाणे सकाळी अकरा वाजता मुंबईहून निघालेले आमचे विमान धरती वरील स्वर्गाच्या काश्मीरच्या दिशेने झेपावले.अत्यंतिक औत्सुक्य असणार्या या सफरीचा आनंद विलक्षणच होता.मागील तीन तास विमानाच्या खिडकीतून बाहेरच्या सौंदर्याचा वेध घेत असलेले माझे डोळे,प्रवासाच्या शेवटच्या अर्ध्या तासात ,अतिशय ताठ मानाने सतर्कतेने भारत मातेचे संरक्षण करणार्या हिम पर्वतांच्या रांगा बघत विस्फारू लागले.आहाहा!! काय अप्रतीम सौंदर्य होते ते या अवनीचे!चकाकदार धवल रंगाच्या या रांगा म्हणजे आपल्या भारत मातेसाठी निसर्गाने बहाल केलेली तटबंदीच आहे याची खात्री पटली.निसर्ग नावाच्या शक्तीला आपोआप हात जोडत नमन केले.हिमालय पर्वतांची पहिली ओळ बघितली आणि 'आनंद गगनात न मावणे' म्हणजे काय याची अनुभूती मिळाली.केंव्हा एकदा या स्वर्गीय भूमीवर पाय ठेवू आणि तिचा मुलायम स्पर्श अनुभवू असे झाले होते.
बरोबर चार तासांनी आमचे विमान ,नंदनवनाचे प्रवेशव्दार असणार्या श्रीनगर या एअर पोर्टवर येऊन दाखल झाले.स्वर्ग भूमीच्या जमिनी वरील मातीचा टिळा मस्तकी लावण्याचा मोह अनावर झाला म्हणून मातीला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले,तर कसचे काय?हिमाच्छादित पर्वत रांगांच्या प्रेमरूपी ओलाव्याने वसुंधरेला गच्च लपेटून बसली आहे ती,याची जाणिव झाली. श्रीनगरला पाऊल ठेवता क्षणीच ही खरोखरच श्रीं ची,ईश्वराची भूमी आहे म्हणून तर अभिमानाने हे शहर 'श्रीनगर' अशी आपल्या नावाची ऐट मिरवत आहे असे वाटून गेले.या शहराच्या दल लेक या स्वप्नवत वाटणार्या दुनियेची पहिली भेट घेतली.किंबहुणा दोन दिवस आम्ही येथे मुक्कामच ठोकला. अख्खे दोन दिवस पाण्यावरच तरंगत्या हाऊस बोट मध्ये रहाण्याचा अनुभव काही औरच होता. वर्षानुवर्षे पाण्यावर तरंगणार्या या बोटींच्या आत,पाण्याचा एकही थेंब शोधूनही सापडत नव्हता.या मध्ये असणारी सोय तर एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशी होती.शिवाय आपल्या संस्कृतिची परंपरा जोपासणारी सुध्दा होती.ठिकठिकाणी लाकडी नक्षीदार कोरीव कामाचे,कश्मीरी कशिद्याचे मनमोहक सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडत होते.महागड्या नि तेवढ्याच कष्टाने बनवलेल्या गालिचांवर पाय ठेऊन चालणे फारच जीवावर येत होते.पण त्यांचा मुलयम स्पर्श हवाहवासा असाच होता.एखाद्या नववधूला सजवावे अशी या बोटींची सजावट दर्शनी भागातच डोळ्यात भरत होती. बोटीच्या बाल्कनीवजा जागेत बसून समोरचा मनोहरी देखावा आजमावा असेच वाटत होते. लेकवर सर्वत्र शिकारेच शिकारे होते. आपल्या रस्त्यांवर जसे रिक्षा, टॅक्सिज,बाईक्स तसे तेथे शिकारे हेच दळण वळणाचे मुख्य साधन होते.हिमाच्छादित पर्वत रांगांमधून वितळलेल्या बर्फाच्या पाण्याने तयार झालेला हा लेक तेथील बाजार पेठेचे मुख्य ठिकाण होते.या विस्तीर्ण लेक वर ही बाजारपेठ तरंगत्या बोटींमधून होती,पण आतील शॉप मध्ये प्रवेश केल्या नंतर आपण पाण्यावर तरंगणार्या दुकानात आहोत हे सांगितल्या शिवाय खरे वाटत नाही.चांगली तीन चार तासांची सफर करत पाण्यावरील शॉपिंग आणि त्यावरुन दिसणार्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद आम्ही भरपूर लुटला.
श्रीनगर साईड सिन्स बघताना तेथील शंकराचार्य मंदिर या ६,५०० फूट उंचीवरच्या हिंदू मंदिराला भेट दिली.गाभार्यातील भव्य महादेवाची पिंड व मंदिराची षटकोणी आकारातील हेमाडपंथी रचना बघून तेथे चढतानाची अनुभवलेली दमछाक पार विसरायलाच झाली.एकाच अखंड पाषणात कोरलेल्या या मंदिराची स्थापत्य कला वाखाणण्या सारखी आहे.छोट्या गाड्यांमधून होणारा येथला प्रवास आम्हाला निसर्गाचे अति सुंदर ,भव्य ,दिव्य व तेवढेच प्रसन्न रुप अखंड न्याहाळत बसावे अशीच सुचना देतोय आणि हवे मधील गारवा, मनाचे चैतन्य फुलवत निसर्गाच्या सान्निध्यात रहावयास खूणवत होता सारखा.
'बागांचे शहर'अशीही श्रीनगर या शहराची ख्याती आहे.सिझनल फुलणारे ट्यूलिप गार्डन तर सर्वश्रुत आहेच.एकच महिन्यासाठी बहरलेली शेकडो प्रकारची ट्यूलिपची रंगीबेरंगी फुलं मनाला भुरळ घालतात. अशा ताज्या टवटवीत फुलांच्या संगतीने फोटो काढण्याचा मोह न झाला तरच नवल! आपल्याला माहित नसणार्या रंगांचाही नव्याने शोध लागलाय ,अशी जाणिव करून देणारी ही मोहक बाग बघण्यात वेळ कसा संपतो हे कळतही नाही.
जहॉंगीर आणि नूरजहॉं यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या शालिमार बागेच्या विस्तीर्ण परिसरात दर्शनी भागातच, आयाताकृति आकाराच्या वास्तु रचनेचे चित्र, दहा रुपयांच्या जुन्या नोटेवर छापलेले आहे, हे नोट बघितल्या नंतर लक्षात येते आपल्या.
निशाद गार्डन आकारमानाने थोडे लहान पण बारा स्तराच्या उंचीनुसार बनवलेले आहे.यांची तुलना बारा राशींशी केलेली आहे असे मानले जाते.अर्थातच या बागेमध्येही वेगवेगळ्या झाडांबरोबर फुलांच्या झाडांची रेलचेल आहे.
गोल्डन किंवा चिनार आयलंड म्हणजे जहाँगीर राजाने खास ईराण मधून सुवर्ण मुद्रांच्या मोबदल्या मध्ये चिनार वृक्षाची चार रोपटी आणून या भूमीत रुजवली,जोपासली ती जागा.विशाल असूनही नाजूकपणा जपणार्या या वृक्षांना बघून आपल्या पिंपळाच्या झाडाची आठवण होते.नुरजहाँ रुसल्यानंतर जेंव्हा या झाडांखाली येऊन बसायची त्या वेळी याच झाडाच्या पानांवर लिहून ती राजाला संदेश पाठवायची अशी मजेशीर कथा या बाबतीत सांगितली जाते.हाच हिरवा गार वृक्ष जून जुलै महिन्यात संपूर्ण पणे पिवळसर किंवा सोनेरी पानांचा बनतो ,म्हणूनच या झाडाला गोल्डन ट्री असेही म्हणतात.
श्रीनगरहून उगवत्या सुर्याच्या साक्षीने आम्ही बसने ८, ७५० फूट उंचीवर असणार्या गुलमर्ग या सौंदर्य स्थळाकडे निघालो.गुलमर्ग म्हणजे फुलांचे शहर.जुन जुलै नंतर येथे सर्वत्र फुलेच फुले दिसतात.एप्रिलच्या मध्यावर मात्र , आम्हाला पांढरा शुभ्र चकाकी असणारा हातात घेऊन बघितल्यास अगदी हलका हलका वाटणारा आणि चालताना कमालीचा कसरत करावयास लावणारा असा बर्फच बर्फ दिसला. जागोजागी साठलेला हा बर्फ आम्हाला गुलमर्गच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी खुणावत होता.चार पाच तासांचा हा प्रवास खूपच विलोभनीय होता.रस्त्याच्या दुतर्फा उंचच उंच झाडी,पांढर्या दुधाळ फुलांनी बहरलेल्या सफरचंदाच्या बागा,भाताची शेतं,केशराचे मळे.या हिवराईला अनिमिष नेत्रांमध्ये किती किती साठवून ठेवावे असे झाले होते.
जगातील दुसर्या क्रमांकाच्या उंचीवरुन आॅपरेट होणार्या केबल कार मध्ये बसणे हे गुलमर्ग चे आणखी एक मुख्य आकर्षण होते.'गंडोला'असे नामकरण झालेल्या या ठिकाणाहून केबल कार चा प्रवास दोन टप्प्यांत होता.१०,०५०फुटांवरील पहिल्या फेजवर जाताना खूपच मजा वाटते.बर्फाचेच पहाड,सभोवती सर्वत्र बर्फच बर्फ त्यावर डौलात उभे असणारे हिरवी गार अणुकुचिदार पानांची झाडं अहाहा!! आपण स्वर्गात तर जात नाही आहोत ना!असा भास होणारा हा प्रवास.थोडावेळ या फेजवर घालवत स्किईंगची मजा घेत गरमागरम कॉफीची लज्जत अक्षरशःअवर्णनीयच.नजरेच्या चौफेर बाजूने बर्फाचेच जंगल बघून तो बघण्या बरोबरच त्यात खेळण्याचीही आपली आयुष्यभराची आरमान फिटली असे वाटले.
अनुकूल हवामानामूळे १३,५००फूट उंचीवरील सेकंड फेज वरही जाता आले.येथे जात असताना मात्र उरात धडकी भरत होती.आपोआपच ईश्वराचे नामस्मरण मुखा बाहेर पडू लागले.पोटातही कालवा कालव चालू झाली.कारण,या प्रवासात कुठेही जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा लवलेशही दिसत नव्हता.पर्वत राजींवरचे वृक्षही गायब होते.आपण परतून पुन्हा येऊ का?अशी पालही मनात चुकचुकत होती.पण या फेज वर पाऊल टाकले आकाश आणि बर्फाचे पर्वत यांचे सुंदर मिलन हाच तर खरा स्वर्ग असे क्षणभर जाणवले.या ठिकाणी मात्र हातपाय बधिर करणारी थंडी,पुढे पाऊल टाकले तर घोट्या पर्यंत आत फसण्याचे भय.यामूळे हालचाल करणे दुरापास्तच होते.बर्फा मध्ये एकाच ठिकाणी उभे राहून हे बर्फाळ विश्व मन आणि डोके यात शक्य तेवढे साठवून ठेवावे एवढेच वाटले.
श्रीनगर ते गुलमर्ग हा प्रवास करताना रस्त्या मध्ये कश्मिरी लोकांचं कलासक्त मन त्यांच्या हस्तकलांच्या वस्तूंचे प्रदर्शन करणारं हातमाग सेंटरला भेट दिल्या नंतर दिसून आलं.येथेच सर्व प्रथम आमची काश्मिरचे पारंपारिक पेय 'काव्हा' याच्याशी ओळख होऊन चवही चाखली.आणि तिकडे मुक्कामी असे पर्यंत आम्ही चक्क या पेयाच्या प्रेमातच पडलो.संगम या गावामध्ये बॅट फॅक्ट्रीला भेट हा सुध्दा एक अविस्मरणीय प्रसंग होता.'वेलू'या वृक्षापासून बनवलेली क्रिकेटची बॅट जगप्रसिध्द आहे.दोन हजारांपासून पण्णास हजारां पर्यंत असणारे हे बॅटचे विश्व आमच्या साठी खूपच नवखे होते.जगात केवळ दोन ठिकाणीच अशा बॅट्स बनवल्या जातात.एक इंग्लंड आणि दुसरे कश्मीर.
गुलमर्गवरून पहेलगामला येताना प्रचंड उत्सुकता होती. अनंतनाग जिल्ह्यात येणारे निसर्गसौंदर्याने नटलेले ७ हजार २00 फूट उंचीवरचे आणि आमरनाथ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर लागणारे पहिले गाव म्हणजे 'पहेलगाम'. काश्मीरला नंदनवन का म्हणतात ते प्रत्यक्ष बघितल्यानंतरच समजते. देवांना पडलेले सुंदर स्वप्न साक्षात उतरवण्यासाठी अवनीवरील काश्मीरची निवड केली असणार.
पहेलगाम येथील चहूबाजूंनी पहाड आणि हिरवीगर्द वनराई. तसेच रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, खळाळणा-या नद्यांचे स्वच्छ गार पाणी बघून यावरचा विश्वास दृढ होतो. पिक्चर्सच्या शूटिंगसाठी अप्रतिम असे ठिकाण असणा-या याच गावालगत आरू व्हॅली जेथे कर्मा पिक्चरचे, तर बेताब पिक्चरचे शूटिंग झालेली बेताब व्हॅली ही अतिशय नयनरम्य ठिकाणं आहेत. येथून जवळच अमरनाथला जाणा-या दोन मार्गांपैकी चंदनवटी हा एक मार्ग आहे. सगळीकडे बर्फच बर्फ आणि हिमाच्छादित पहाडांचा आत्यंतिक उतार यामुळे चालताना अक्षरशः त्रेधातिरपीट उडते. बर्फात पाय फसला तर सहज घोट्यापर्यंत आत जाईल एवढ्या जाडीचा तेथे बर्फ होता.
पहेलगाम ते जम्मू या प्रवासात अवंतीपूर येथे भगवान विष्णूंच्या मंदिराचे भग्नावशेष, जे मंदिर इ.स.८५३ ते ८७२ या काळात होऊन गेलेल्या अवंती वर्मा नावाच्या राजाने बांधलेले होते. पण कालौघात भूकंपाच्या हाद-याने ते जमिनीच्या आत गाडले गेले होते. या मंदिराचे उत्खनन करावयास बराच मोठा कालावधी लागला होता,अशी माहिती मिळाली.
ट्रीपचा शेवटचा टप्पा म्हणजे जम्मू ते कटरा. श्री वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी घेउन जाणारा हा नयनरम्य असाच प्रवास होता.अत्यंत यशस्वीपणे अरूंद अशा नागमोडी वळणांचे चढण चढत आम्ही घेतलेले वैष्णोदेवीचे दर्शन मनाला प्रसन्न करत किती सुखावून गेले असेल याचे वर्णन शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मातेकडे डोळेभरुन बघताना तिच्यासमोरून हालूच नये असेच वाटत होते.
अशा पध्दतीने अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेली काश्मीर टूर खूपच आनंद देऊन गेली. कश्यप राजाने तपश्चर्या करून या ठिकाणची उंची शंकराचार्य हिलपर्यंत खाली आणली म्हणून या प्रदेशाला काश्मीर हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनाने सांगता करीत परतीच्या प्रवासासाठी विमानात बसलो. पुन्हा एकदा खिडकीतून हिम शिखरांना सलाम करत त्यांचे आपल्यावर असणा-या ऋणासाठी कृतद्न्यता व्यक्त करत करत मुंबईला केंव्हा पोहोचलो हे समजलेही नाही.
nmdabad@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा