सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

**आत्मशोध एक निकड**

"आत्मशोध एक निकड"
        
      जंकफुड मुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न जेवढा गहन बनलाय तेवढाच गहन प्रश्न त्यांच्या एकटेपणातून निर्माण होणार्या मानसिक आरोग्याचा बनलाय असे वाटू लागले आहे....खेळण्या बागडण्याच्या कोवळ्या वयात मुलांना वैफल्यग्रस्तपणा येणे या साठी बर्याच अंशी परिस्थितीती कारणीभूत असावी हे विचाराअंती बरेचदा जाणवते.....हम दो हमारे दो किंवा हमारा एक अशा चौकोनात किंवा त्रिकोणात बंदिस्त झालेली मुलं ,आईबाबांच्या पोटापाण्यासाठी म्हणण्या पेक्षा महत्वाकांक्षी पण अनावश्यक गरजा आणि स्वतःच्या करिअरच्या अत्यंतिक आधिन होण्याच्या हव्यासापायी पोटच्या मुलांचे आकाश मात्र छोटे करू पहाताहेत अशी शंका बळावते.....आपल्या व मुलांच्याच सुखासाठी पैशामागे आणि वेळेच्या मागे धावण्याच्या शर्यती मध्ये आपल्या कडनं मुलांच्या काही अपेक्षा असतील याचा विचार त्यांच्य मनाला शिवत नसेल का?असे वाटते कधी कधी.....सभोवतीची परिस्थीती बघता,एक तर छोटे कुटुंब त्यात मुलांवर टाकलेली नाना बंधनं.....अमक्याशी बोलू नको,तमक्याशी दोस्ती करू नको,इकडे तिकडे जाऊ नको अशा सुचना भरीसभर कोवळ्या वयाकडून आईबाबांच्या एवढ्या अवाजवी अपेक्षा आणि महत्वाकांक्षा असतात की,आपण हे नाही करू शकलो मग मुलांकडून झालेच पाहिजे....या सबबी खाली पैशाच्या जोरावर त्याला भारंभार क्लासेस लावावयाचे....त्यात त्याचा एकटेपणा घालवणे या पेक्षा तो कायम एंगेज रहात तो स्पर्धेच्या तोंडघाशी कसा पडेल हाच दृष्टिकोण जास्त दिसतो असेच म्हणता येईल....या सर्व कोंडीत आपल्या मुलाचे मानसिक स्वास्थ्य खरंच आरोग्यपूर्ण आहे काय?याचा विचार करावयास ना आईला वेळ ना बाबांना....त्यातही पुन्हा सुट्टीच्या दिवशी त्याला कुठेतरी लॉंग ड्राईव्ह वर नेऊन आणले,एखादा मुव्ही दाखवून आणला किंवा हॉटेलिंग वा एखादे पिकनीक अरेंज केले की आपले आपल्या पाल्याप्रति कर्तव्य संपले असे गैरसमज करून घेणारे आईबाबा,स्वतः साठी आणि पतिपत्नी या नात्या साठी स्पेस राखून ठेवत शिलकीत राहिलेला वेळ मुलांसाठी अशी भुमिका घेत आपल्या कर्तव्य पुर्तिची धन्यता मानतात.....पण मुलांना केवळ बाहेरच नेत,त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत आणि आवडीची खरेदी करत आधुनिक लाईफ स्टाईल बहाल करत आपण फार आदर्श पालक बनलो आहोत या निव्वळ पोकळवास्यातून बाहेर पडण्याची गरज आज कटाक्षाने निर्माण झाली आहे .....हीच खरी अपेक्षा मुलांची आज आईबाबांकडून आहे हे पुर्ण सत्य आहे असे वाटते.....मुलांच्या भावविश्वात डोकावून बघणारे पालक किती असतील आज हे तेच जाणोत.....मुलांना केवळ आईबाबांचा पैसा,सुखसोयी,हिंडणे,फिरणे,हॉटेलिंग,मुव्ही,खरेदी हेच नकोय तर तुमचा वेळ,सुसंवाद,प्रेम,वात्सल्य,वात्सल्याचा कुरुवाळ,यांचे खरे भुकेले आहेत आजची मुलं....किंबहुणा आईबाबां प्रमाणेच त्यांना आपल्या इतरही नात्यांकडून आजीआजोबा,काकाकाकू,मामामामी,आत्यामामा,मावशीकाका ,बहिणभाऊ वगैरे नत्यांतूनही त्यांना हीच आस असते हे अगदी नैसर्गिक आहे....असा वात्सल्याचा शिडकावा आणि मनमोकळा संवाद मुलांना मिळू लागला म्हणजे त्यांचे बाल्य आत्मिक समाधान आणि परिपूर्ण विश्वासाच्या भक्कम पायावर उमलत जाते....ते सुदृढ व प्रगल्भ बनत जाते....पैशांपेक्षा आपली जिव्हाळ्याची माणसं त्याला बहुमोल वाटू लागतील आणिआत्मविश्वास वाढू लागेल....कारण असे झाले तर त्याच्या मनातील असुरक्षिततेची असणारी भावना मनातून पळ काढेल.....आपल्या माणसांजवळ ते मुल यथायोग्य व्यक्त होऊ लागेल....भविष्यात एक यशस्वी,होतकरुत,परिपूर्ण व्यक्ती बनण्यास फार आवश्यक असते हे .....मुलांच्या मनात निर्माण होत जाणार्या मानसिक नैराश्याचे सावट नकळतपणे त्याच्या शरिर स्वास्थ्यावर परिणाम करु लागते....यातून त्याचा आतताईपणा किंवा स्वतःला संपवण्याच्या कृति व वृत्ती यांना मागे खेचण्याची खरी मोठी जबाबदारी आता पालकांची आहे....त्यांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करत मुलांच्या मानसिकतेला सशक्त बनवत उदयोन्मुख पिढीचा आधारस्तंभ बनलेच पाहिजे असे म्हणावेसे वाटते......

नंदिनी म.देशपांडे.
जुलै,18,2017.

nmdabad@gmail.com

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा