*उत्सवप्रिय वसुंधरा*
वैशाख वणव्यात तप्त झालेली अवनी आपली क्षुधा शमवण्यासाठी आकाशातील मेघांना सादच घालते आहे असे वाटते जेंव्हा आपण आरती प्रभूंच्या ,ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना.....या ओळी एेकतो किंवा गुणगुणतो.....आपली सखी,अवनी हिच्या या विनवणीला प्रतिसाद देत महा कवी कालिदासाच्या जयंतीला सोबत घेऊन आषाढ अवतरतो....तो आपल्या बरोबर धो धो पावसाच्या मोठ्या मोठ्या सरी घेऊनच.....जेष्ठाच्या एखाद्या शिडकाव्याने न शमलेली अवनीची आस या आषाढ सरींनी मात्र तृप्ततेचा श्वास घेत स्वच्छ न्हाऊनच निघते.....स्वतः बरोबरच आपल्या अंगा खांद्यावर खेळणार्या संपूर्ण सृष्टिला सुध्दा यात न्हाऊन निघण्याचा मनमुराद आनंद देत, सगळीकडे चैतन्य पेरत जाते.....आषाढातील अविरत बरसणार्या या सरींना आपल्या उदरात गडप करत ही अवनी जणू नवनिर्मिती साठी सज्ज आहे मी.....अशी घोषणाच देत आहे असे चित्र तयार होऊ लागते, तेंव्हा जेष्ठ कवी,ना.धो.महानोर यांच्या कवितेच्या ओळी,'या नभाने या भुमीला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे....आठवल्या शिवाय रहावत नाहीत.... असे चित्र साकारू लागते ना लागते तोच .....अवनीने पसरवलेल्या हिरव्या गार मखमली गालिचावर मोठ्या झोकात पण हळूवार पाऊले टाकत नाचत बागडत संपूर्ण सृष्टिला तरल बनवत ,आवतरतो तो श्रावण....आणि सहज सुचतात बालकवींच्या कवितेच्या आेळी,श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,क्षणात येते सरसर शिरवे , क्षणात फिरुनी उन पडे . . . श्रावण जणू विडाच घेऊन येतो अवनीच्या सृष्टि सौंदर्याला व्दिगुणित करण्याचा.....आपल्या वैविध्यपूर्ण छटांनी या सृष्टिला अविरत सौंदर्याने नटवतो.....अवनीला कधी हिरव्या पोपटी हिवराईची पैठणी नेसवत त्याला उन्हाच्या चंदेरी सोनेरी रंगाची महिरप देत काठांना खुलवतो आणि अशा या भरजरी पैठणीच्या पदराला श्रावण सरींच्या हर्षोल्हासात दंग होऊन नाचणार्या मोरपिसार्याच्या नाजूक नक्षीने सजवतो...श्रावण आला की,हिरवी पिवळी पाने,रंगीबेरंगी फुले,फुलपाखरे अवनीवर फेर धरत नाचू लागतात.झाडे आणि वेली आकाशाकडे झेप घेऊ पहातात. निर्झर ठिकठिकाणी आपले लोभसवाणे रुपडे दाखवत नादमय स्वरात अवनी च्या पायांवर लीन होताना दिसतात.......नद्या स्वच्छंदपणे खळखळून वाहत्या होतात.....उन्हाचा सावली आणि पावसाशी चालू असणारा लपंडाव चांगलाच रंगलेला असतो......तर मध्येच केंव्हा तरी इंद्रधनुची सप्तरंगी कमान आकाशाला सुरेख तोरण बांधताना दिसते.....आकाशही अवखळपणाने कधी आकाशी,कधी निळेशार तर कधी निळेभोर कधी नारिंगी कधी सोनेरी तर मध्येच तांबडे आणि जांभळे असे नयनरम्य रंगांनी सजते....वैशाखात तप्त असणारा तेजोनिधी श्रावणात मात्र प्रेमळ होतो आणि सायंकाळी निरोप घेताना जणू लखलखता सोनगोळाच बनून अंबराची आभा वाढवतो.....हलका थंडगार रानवारा पानापानांशी सलगी करत फुलांचा सुवासिक दरवळ आसमंतात पसरवतो.......निसर्गाचा दिमाख वाढवणारा असा हा श्रावण परोपकारी वृत्ती जोपासत ,अन्नदानाचे पुण्य पदरात पाडून घेत,अध्यात्माच्या आणि धार्मिक व्रत वैकल्याच्या अधिष्ठानावर विराजमान होतो.वातावरणात मांगल्य आणि पावित्र्याची भरभरून उधळण करतो .माहेरवाशिणींना माहेरी जाण्यासाठी उद्यूक्त करतो नि भुतदयेचा मंत्र देऊन नात्यांमधील ओढ निर्माण करतो.......प्राणी मात्रांवर प्रेम करावयास सांगतो......निसर्गाचं आणि अवनीचं हे निरनिराळ्या आभुषणांनी नटलेलं सुंदर रुपडं बघून नकळतपणे कवी कुसुमाग्रजांना या सुंदर काव्यपंक्ती आठवल्या असाव्यात नक्कीच....."हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला....तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघात लावित सोनेरी निशाणे आकाश वाटेने श्रावण आला.... लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपीत श्रावण आला... इंद्रधनूच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. "...
अॅड.नंदिनी देशपांडे.*
nmdabad@gmail.com
☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा