सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

**प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच**

"  प्रश्न आणि प्रश्नच  "

   गेल्या आठवड्यात चार दिवसच काय ते आमचे इंटरनेट अॅक्टिव्हेट करणारे मॉडेम कांही कारणाने बंद पडले होते.....मग काय,किती मोठ्ठे गेले ते चार दिवस ! बाप रे !हातात मोबाईलचे वारंवार घेणे नाही,कोणाला मेसेजेस पाठवणे आणि येणे नाही,चॅटिंग नाही....काय करावे ? काही सुचतच नव्हते.....बरं घरांत कोणाशी गप्पा मारण्याची सवयही राहिलीच नाही या मोबाईल मुळे....प्रत्येकालाच वेळ कसा घालवावा हा फार मोठा प्रश्न मनाची चुळबुळ वाढवताना दिसत होता....आपल्याला कोणी तरी घनदाट जंगलात बसवले आहे की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली त्या चार दिवसांत.....अगदी जनसंपर्कच नाही अहो अप्रत्यक्ष जनसंपर्क म्हणते आहे मी....हो ना कारण हे सोशल मेडिया काय आले आणि सगळी जणं एवढे त्याच्या आहारी गेले आहेत की,प्रत्यक्ष भेटी गाठीतून क्षेमकुशल विचारावेत,किंवा त्यांच्या प्रति आपल्या असणार्या भावना प्रत्यक्ष व्यक्त कराव्यात हेच खूप जण विसरून गेले आहेत....नव्हे,परस्परांशी भेटून कृत्रिम नाटकी चेहरे आणि त्यावरचे अभिनय बघण्या पेक्षा न च बघितलेले बरे अशीही परिस्थिती डोकं वर काढून वावरताना दिसते कुठे कुठे....हा भाग वेगळा,म्हणूनच सुचक लिखाणातून ईमोजींच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त करत बोलते होण्यातच धन्यता मानणारे  खूप सापडतात हल्ली....हे मात्र अगदी खरे....वेळेचा अभाव हेही एक कारण आहेच म्हणा...पण वेळ काढून मुद्दाम सदिच्छा भेट घेणे या प्रकाराला चांगलीच कात्री लागलेली दिसते.... कधी कधी वाटते माणसांमाणसांतील परकेपणाची दरी खूपच झपाट्याने वाढते आहे का?या इंटरनेट मूळे......नात्यांमधील आेलावा कमी होऊ बघत तर नाहीए ना?भावनांचं बाजारीकरण फार होतंय का?......असे एक ना दोन तर किती तरी प्रश्न विचार करणार्याच्या समोर उभे ठाकतात....त्यांना योग्य तो न्याय मिळेल का?हा ही एक मोठा प्रश्नच आहे. माणसाचा प्रॅक्टिकल अॅटिट्यूड जरा जास्तच वाढला आहे.....जाणवते आहे, हे वास्तव.....आधुनिक तंत्रज्ञानाने आपली हर एक प्रकारे आपण प्रगती साधत आहोत पण भावनिक पातळीवर अधोगतीला तोंड देत आहोत का? .....प्रकर्षाने असे आता वाटू लागले आहे....एकमेकां मधील भावनिक समरसता कमी होतेय का?नाते कोणतेही असो,प्रत्येक नात्याचे विशिष्ठ असे भावनांचे कोंदण असतेच ना.....
थोडक्यात काय परस्परांशी व्यक्त होत असताना शब्दांची वानवा नाही पण वाचा बसली आहे की काय?अशी परिस्थिती मात्र निर्माण झाली आहे हे खरे.....
एक मजेशीर अनुभव सांगते या ठिकाणी....परवा असेच वॉक घ्यावा म्हणून बाहेर पडले मी . पायी चालल्या शिवाय आजुबाजुचे चांगले निरिक्षण होत नाही असे मी मानते....बाहेर गेल्यानंतर रस्त्यात बरेचसे चेहरे दिसले ......एक चेहरा खूपच आेळखीचा वाटत होता....पण काही केल्या नाव लक्षात येत नव्हते ..... समोरचा चेहरा सुध्दा आेळख देईना.....विचारशक्तीला ताण देत शेवटी अती ताणले तर तुटेल हे समिकरण आठवत विचारालाच निरोप दिला....त्या नंतर दोन दिवसांनी सहज म्हणून एफ बी वर फ्रेंड लिस्ट बघितली .....आणि एकदम क्लिक झाले त्यादिवशी बाहेर जाताना दिसलेला चेहरा आणि हा अप्रत्यक्ष संवाद साधणारा चेहरा एकच तर आहे की.....उलट अप्रत्यक्ष संवादातच खूप जुनी आेळख असल्याचा भास झाला.....आणि प्रत्यक्ष भेट एवढी अनोळखी...? काय म्हणावे या सर्व प्रकाराला ?
सोशल मेडियाच्या या कृत्रिम धाग्यामूळे तयार झालेली मैत्री चिवट की प्रत्यक्ष संवादा अभावी दूर  सरकणारी मैत्रिची भावना चिवट....असा प्रश्न आज राहून राहून मनाला सतावतोय....पण समाधान देणारे ठोस उत्तर काही मिळत नाहीए ......

अॅड.नंदिनी देशपांडे.©

nmdabad@gmail.com

आॅगस्ट 2,2017.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

1 टिप्पणी: