रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

**वह्राड निघालंय हैदराबादला...**

वह्राड निघालयं हैद्राबादला ........जवळ आलं म्हणता म्हणता,परितोषचं लग्न अवघ्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपलं.मात्र वह्राडा बरोबर निघणा- या मंडळींची बसल्या ठिकाणीच त्रेधातिरपीट उडायला लागली.लग्नघरी फोन वरून प्रश्नांची सरबत्तीच मंडळींकडनं होऊ लागली.कोणी विचारले,सोबत काय काय ठेवायचे?तर कोणी कार्यालयात कमोड ची व्यवस्था आहे ना?काहींनी रिझर्वड् बोगी एसी आहे का? की आम्ही पांघरायला ब्लॅकेट्स घ्यावित? तर काहींनी आम्ही नावच दिलेले नाही पण जागा मिळेल काय?आहेराचे काय करावयाचे?असे मजेशीर प्रश्न केले.....ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी हैद्राबादला वह्राड घेऊन जाणारी रेल्वेची बोगी अज्ञा धारक विद्या-था प्रमाणे शिस्तीत फलाटावर उभी होती. बिचारी थंडीत कुडकुडत आपली दारं खिडक्या कडेकोट बंद करत...अख्ख्या नातेवाईकांमध्ये सर्वदूर पर्यंत चर्चिला गेलेलं हे परितोष आणि नयन चे लग्न जणू गहन असा आंतरराष्ट्रीय विषयच बनला होता.अर्थातच परितोष म्हणजे देशोदेशी फिरणारं ( अभ्यासाच्या निमित्ताने ) एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वच बनले आहे अशीच प्रत्येकाची धारणा.एवढा देखणा,हुशार मुलगा ,त्या त्या देशात स्वतःच्या अस्तित्वाची चुणूक दाखवणारा परदेशी मॅडमच्या प्रेमा बिमात न पडता चक्क स्वदेशी मुलीशी ते पण पारंपारिक पध्दतीने लग्न करतोय  म्हणजे काय! चर्चा तर होणारच ना! तशीच ती नव-या मुलाच्या वडिलांकडून रेल्वेच्या रिझर्वेशन साठी, विचारणा तीन महिन्यांपुर्वीच झाली तेंव्हा पासूनच चालू झालेली. आणि वह्राडी मंडळींच्या तोंडात  बोटं घालण्याची पाळी आली.....चर्चेला उधाण न आले तरच नवल होते. जणू मंडळींना आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा प्रबंधच सादर करायचाय..... .मग काय मुलगा एवढा देखणा ,हुशार असतानाही भारतीय मुलीशीच लग्न करतोय हे ऐकून व-हाडी मंडऴी मोठ्ठया प्प्रश्नार्थक चिन्हाची टोपी घालून वावरत होती मंडऴी .....तर लग्नाला वह्राडा बरोबर बोगीतून येण्याचे आमंत्रण आले आणि काय आश्चर्य ! हौशे,गौशे,नवशे अशा सर्वांनी क्षणाचाही विलंब न लावता आमंत्रणाचा स्विकार केला.....त्यात अगदी पाच वर्षांच्या मुला पासून ते पंच्याऐंशी वर्षां पर्यंतची मंडळी होती.त्यात प्रथमच रेल्वेने प्रवास करणार्या ईशान पासून ते चला तेवढाच बदल म्हणणारी जेष्ठ मंडळी ही होती खरे तर मनातून एवढा प्रवास ,थंडी ,दगदग झेपेल का?अशा शंकांनी घर केलेले असताना सुध्दा ते तयार झाले होते.कारण इतर सोबत असणार्यांची साथ भक्कम आहे हे ते जाणत होतेच....या शिवाय हैद्राबादला येवून एकात एक दोन कामं साधणारीही मंडळी होती, तर आमच्या सारखी गेट टुगेदर आणि सहलीचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असणारीही मंडळी होतीच.अर्थातच यांपैकी प्रत्येकाच्या अंतःकरणाचा मजबूत धागा लग्नघराशी जुळलेलाच होता.म्हणूनच लग्नाला जाण्याची ही ओढ पुढे खेचत होती....बोगीच्या  कॅपॅसिटी एवढी मंडळी जमली होतीच ........रेल्वे रूट वरची बरीचशी मंडळी एकत्रितपणे लग्नाच्या निमित्ताने एकत्र सहलीचा आनंद घेणार आहेत म्हटल्यावर पूणे,मुंबई,लातूर या बाजूची माणंसं थोडी खट्टू झालीच. आम्हाला असा काही फोन नाही असे म्हणताना एवढी छान कौटुंबिक सहल आपण 'मिस ' करत आहोत याचेच दुःख जास्त डोकावत होते..... परस्पर लग्नाला येण्यासाठीचे आमंत्रण होतेच त्यांना.......गाडी मध्ये काय मज्जा केली म्हणून सांगता वह्राडी मंडळींनी........कितीतरी वर्षानंतर असा वह्राडा बरोबर जाण्याचा योग आला होता.तो सा-यांनाच रोमांचित करत होताच.काही जणांनी याचा हिशेब लवला तर काहींनी केवळ गप्पा गोष्टी करत प्रत्येकाशी संवाद साधत हितगुज साधले.प्रत्येक ठिकाणावरून चढणार्या मंडळींचे स्वागत सुहास्य मुद्रेने पूर्विच असणारी मंडळी करत होती.औरंगाबाद पासून निघालेली बोगी नांदेड पर्यंत पूर्ण फुलून गेली माणसांनी...त्यात बर्याच वर्षांनी दोन जीवःश्च कंठःश्च मित्र मनसोक्त गप्पांमध्ये रंगली होती तर दोन मैत्रीणी किती तरी वर्षांनी भेटल्या होत्या.आते मामे भावंड लहानपणी च्या सुरेख आठवणींमध्ये रमले होते तर काही मंडळी गाणी गात मनोरंजन करत होती.युवा मंडळी कानात दोन वायरी घालत आपल्या आवडीच्या गाण्यांचा आस्वाद घेत होती...जेष्ठ मंडळी आराम करत करत या सार्या गोष्टी न्याहाळत अधनं मधनं सहभाग घेत होती.निघाल्या पासून खाण्याची तर नुसती चंगळ चालू होती .आयोजकांनी चोख नियोजन ठेवली होती.स्टार्टस् मध्ये चिवडा लाडू काय चहा काय तर नाश्त्याला उपमा काय रंगत आणली या पदार्थांनी....खाणं होई पर्यंत पेंगणारी मंडळी नंतर मात्र जोमाने गप्पांशी हातमिळवणी करू लागली.असे चालू असताना नवरदेव बिचारा स्वच्छता अभियानाचा कोणाकडूनही अपमान होता कामा नये या साठी हातात कचर्याची बॅग घेऊन बोगीभर फिरत होता.......तोंडात गोडवा आणि वागण्यात कमालीचा साधेपणा घेऊन वावरणारा हाच मुलगा उत्सव मुर्ति आहे यावर विश्वास बसत नव्हता.उद्या लग्न आहे पण हा तर आपला लहानपणीचाच प-या असे मनामध्ये उद्गार उमटत होते .....आमचे उतरण्याचे ठिकाण जवळ आले तसे वरमाईला सुचना झाल्या,'विहिणबाई,तू आधी समोर जा,गुळाची ढेप पावला खाली आल्या शिवाय पाय ठेऊ नकोस.......' अहो पण हे एवढे होई पर्यंत गाडी थांबणार होती का.....स्वागताला गाड्या घेऊन आलेल्या मुलीकडच्या मंडळींनी आणखी तासाभराचा बस चा प्रवास आहे सांगितल्यावर थोडी कासकुस करत मंडळी बस मध्य विराजमान झाली .प्रचंड रहदारीतून वाट काढत बस ने आम्हाला हैद्राबाद दर्शन घडवले अन काय ! हॉटेलला पोहोंचल्यावर स्नॅक्स आणि चहा घेऊन तरतरीत झालेली मंडळी रात्री च्या कार्यक्रमा साठी फ्रेश होऊ लागली......आम्ही निश्चित स्थळी पोहोंचण्या आधीच मुली कडची वह्राडी मंडळी येऊन बसली होती आणि नियोजीत संगीत सभेला नेमकीच सुरुवात झाली होती.प्रसन्न अशा संगीतमय वातावरणात लग्नाची सिमंतिनी वगैरे गोष्टी असतात किंवा राहिल्या याची आठवणच झाली नाही कुणाला.......व्हिडिओ शुटिंग आहे रांगोळ्या आहेत मग सिमंतिनी चेच वावगे का?असा एक क्षीण स्वर उमटला पण त्याकडे लक्षच नव्हते कोणाचे.....नाद माधुर्याने भारलेल्या वातावरणात नव-या मुलीच्या नयन तिचे नाव ,हिच्या मुखातून 'जागु मै सारी रैऽऽऽना बलमा हे शब्दसूर बाहेर पडले आणि सर्वच मंडळी खिळून राहिली जागेवरच.......एक पट्टीची उदयोन्मुख गायिका आपल्या कुटुंबाचा एक सदस्य बनत आहे याचा अभिमान वाटला.नावा प्रमाणेच पाणीदार लोचनाची ही मुलगी आपल्या कलेच्या,हुशारीच्या आणि लावण्याच्या सौंदर्याचा सोज्वळ पणा जपणारी अशी पहिल्याच भेटीत भावली प्रत्येकाला......दुसर्या दिवशी ठरल्या वेळेला ठरल्या ठिकाणी आपल्या माणसांच्या साक्षीने,अगदी साध्या अशा पारंपारिक वेशभुषेत कमीत कमी संख्येतील आभुषणांचा स्विकार करत,फुलांच्या, शुभेच्छांच्या रुपातील अक्षतांच्या बरसाती मध्ये , नैसर्गिक हिवराईच्या सान्निध्यात परस्परांच्या गळ्यात वरमाला टाकत आयुष्य भराची साथ करण्यासाठी कटिबध्द झाले..........कोणताही भपकेबाज पणा,भडकपणा,माना पानाचे रुसवे फुगवे,अनावश्यक रिती रिवाज,आहेर देणे वा घेणे,वरात ,त्यातील कर्कश्श आवाज या सा-याना  डावलत पण आवश्यक परंपरांचे, विधींचे  सादरीकरण अगदी मोजक्याच पण या सोहळ्याचा मुळ गाभा जपत,कोणत्याही पारंपरिक विचारांच्या समाज वर्गाला न दुखावता पार पडलेला हा विवाह सोहळा नक्कीच लक्षवेधी ठरला.आदर्श ठरला आणि एका नवीन पध्दतीला जन्म देऊन गेला असेच म्हणावेसे वाटते..अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणा-या दोन्ही कुटुंबांचे मनःपुर्वक अभिनंदन  करत याच आनंदाच्या संगतीने नवरदेव नवरी सह संपूर्ण वह्राड परतीच्या प्रवासा साठी स्टेशनवर आले .आमची येतानाची तीच बोगी आमच्या स्वागतासाठी हात जोडून सज्ज होती आम्हाला सामावून घेत तिने प्रवासही चालू केला.....एक नवीन नातं जोडत ,नव्या नवरीला घेऊन कृतकृत्त्य झाल्याची भावना मनी वसवत....... .

                नंदिनी म.देशपांडे
nmdabad@gmail.com

🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋🚋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा