शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

*आमचा भिशी कट्टा*

*आमचा भिशी कट्टा*❄❄❄❄❄❄

      "अहो,आज आमची भिशी आहे हं. दुपारी तीन वाजता. मी आज जेवणासाठी फक्त कुकरला वरण भात लाविन किंवा नुसतीच भाजी पोळीच बनविन बरं का.हो आणि तुम्ही तसे असालच घरी त्या वेळी, नव्हे,रहाच. किंवा वेळेवर याच घरी. आणि मला सोडवून या ठरलेल्या ठिकाणी.आणि हो, जाताना आणखी दोन मैत्रिणींना पण सोबत न्यायचं आहे...."
     दर महिन्यात आमच्या भिशीच्या दिवशीचा हा ठरलेला संवाद. खरं म्हणजे,स्वयंपाकाला शॉर्टकट, नटण्या मुरडण्याची एक चांगली संधी, छान छान साड्या नि ड्रेस घालण्यासाठी मिळालेलं एक निमित्त, आणि हो, याच निमित्ताने एवढ्या सार्या मैत्रिणींच्या मध्ये हवा तेवढा आवाज काढत हास्याच्या फवार्यांमध्ये परस्परांची फिरकी घेत, कौतुक करत शुभेच्छा अभिनंदन यांची देवाणघेवाण करण्यासाठी चालून आलेली एक पर्वणीच असते ही आम्हा सर्व सख्यांसाठी.
      सार्यांचेच नवरोबा,मुलं,मुली,सुना अगदी नातवंडंही आली त्यात.या सगळ्यांनाच हे माहित असते की, आजचा हा भिशीचा दिवस म्हणजे खास आमचाच असा हक्काचा दिवस आहे आणि त्यात कोणीही ढवळाढवळ करुच शकत नाही असा जणू अलिखित नियमच बनलेला असतो.या अख्ख्या दिवसाचे "सेलिब्रिटी" म्हणून आम्ही मिरवत असतो.मग सांगा, आहे की नाही आमचा हक्काचा असा हा 'मज्जा'करण्याचा दिवस!
       संसाराच्या रहाटगाड्यात तरुण पणापासून ते आता आज्जी बनण्याचे वय येईस्तोवर आमची साथ करणार्या या 'भिशीला' चालू होऊन, काहीच दिवसात तब्बल अठ्ठावीस वर्षे पुर्ण होत आहेत.याचा आम्हा सख्यांना अभिमान वाटतो.
     कर्तव्य आणि जबाबदारी यांची ओझी सांभाळत, सुरुवातीला उत्साहाने पदार्थ घरीच बनवून साजरी होणारी भिशी,आता मात्र एका दिवसाचे मस्त हॉटेलिंग आणि एन्जॉयमेंट या थांब्यावर येऊन धडकली आहे.होय, कारण वयोमानानुसार जबाबदार्यांचे हस्तांतरण घरातील इतर सदस्यांकडे झालेले आहे.शारिरीक कार्यक्षमता सुध्दा पुर्विएवढी राहिलेली नाहीए.आपसुकच हा हॉटेलिंगचा पर्याय समोर आल्यास त्यात नवल ते काय!
  ‌  गेल्या अठ्ठावीस वर्षांत भिशी आहे तेथेच राहिली.बदलीच्या निमित्ताने बरेच सदस्य नाईलाजाने भिशी सोडून गेले.नवीन आलेले सदस्य तिने हर्षोल्हासाने आपल्यात सामावून घेतले.किंबहुणा जुने सुध्दा संधी मिळताच पुन्हा भिशीत दाखल झाले.सार्याच सख्या त्यांचे भरभरुन स्वागत करत असतात हे विशेष.
      अशी छोटेखानी सुरू झालेली, पण विस्तारत तब्बल चाळीस मैत्रीणींना आपल्यामध्ये सामाऊन घेत चालू असणारी ही भिशी, मनापासून प्रत्येक मैत्रिणींच्या मुलामुलींचे,लेकजावयाचे, नातवंडांचे कोड कौतुक त्यांचा साखरपुडा, लग्नसमारंभ, डोहाळ जेवण , बारसं, वाढदिवस,यांच्या निमित्ताने करावयास उताविळ झालेल्या असतात सर्वजणी.याच निमित्ताने सासूबाईंच्या रुपात लगबग करण्यात मग्न असणार्या आपल्या सखीच्या आनंदात सहभागी होत,विलसत जाणार्या तिच्या चेहऱ्यावरील समाधानाच्या परिपुर्णतेचे सौंदर्य कौतुकाने टिपत,खेळकर पणाने आपले योगदान देतात.    गम्मत वाटली ना,'योगदान'असा भारदस्त शब्द वापरला म्हणून.हो ना बायका म्हणजे एकमेकींची उणी दूणी काढत गॉसिपिंग करणार्या वगैरे वगैरे असे  पुर्विपासूनचे गैरसमज आमच्या सख्यांनी पार पुसून टाकले आहेत. 'सार्यांचे नवरोबा एकाच क्षेत्रातील'या संकल्पनेतून एकत्र आलेल्या या मैत्रिणी, बोलताना'अॉफिस'या विषयाला आसपास सुध्दा फिरकू देत नाहीत कधी.केवळ आणि केवळ निखळ,निर्मळ मैत्री, मैत्रीची ओढ,वय विसरुन दंगामस्ती करण्याची एक नामी संधी आणि मन निरोगी सशक्त बनण्याचं एक चांगले टॉणिक याच दृष्टिकोनातून या भिशी कडे बघतात आणि जीवनातील हसर्या क्षणांचा आनंद पुर्वक आस्वाद घेतात.
        पैसे जमा करणे हा विषय खूपच गौण आहे आमच्या भिशीत.प्रत्येकीची गाठभेट घेत, संवाद साधत, सुखदुःखाची देवाणघेवाण करत मनं हलकी हलकी बनवण्यासाठी मिळालेली एक हक्काची जागा व्यासपीठ आहे हे सार्या मैत्रिणींचे.
  ‌‌    या व्यासपीठावर नवनव्या मैत्रिणी एका घट्ट अशा अदृश्य नात्यात  ,जे रक्ताच्या नात्यापलिकडचे आहे,त्यात बांधली गेली आहेत.ही अशी नाती कशा पध्दतीने उमलवत,फुलवत ठेवायची? प्रत्येकीने त्यातील सुगंधाचा दरवळ वाटत वाटत आसमंत भारून टकायचा आणि असे करत असतानाच हा सुवासिक दरवळ आपल्या अंत:करणाच्या कुपित कायमच कसा साठवून ठेवायचा?या सर्व गोष्टी आमचा भिशी समुह शिकवतो सख्यांना.
       याच दिवशी वेगवेगळे खेळ आयोजित करत मिळवलेली बक्षिसं या दिवसाची रंगत आणखीनच वाढवतात.आमचे संक्रांत या सणाचे हळदी कुंकू दणक्यात साजरे होतेच.आम्ही,हुरडा,लग्न समारंभ वगैरे निमित्ताने छोट्या छोट्या सहलींचा पण आनंद घेत असतो.
‌‌.     अशी आहे ही आमची भिशी नावाची खरी मैत्रीण.एकाच छताखाली सार्यांना एकत्र आणणारी,एका अलवार पण विश्वासाच्या बंधामध्ये बांधून ठेवत मानसिक स्तरावर आमची काळजी घेणारी आणि पुढील महिन्यात केंव्हा येईल?याची वाट बघावयास लावणारी एक परिपूर्ण सखी.
      आमच्या या सखीस, तिच्या अठ्ठावीसाव्या वाढदिवसासाठी खूप मन:पुर्वक शुभेच्छा.दिवसागणिक आमची ही मैत्रिण, अशीच फुलत,बहरत,दरवळत,बागडत,कायम स्वरुपी सशक्तच राहो या साठी ईश्वर चरणी प्रार्थना.अर्थातच याच साठी आमच्या सार्या सख्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.

अॅड.नंदिनी म.देशपांडे.

औरंगाबाद.

💃💃💃💃💃💃
.

1 टिप्पणी: