सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

**व्हेलेंटाईन@50**

*🌹🌹व्हेलेंटाईन@50.🌹🌹     

                    गेल्या दोन चार वर्षां पासून,अहो म्हणजे स्मार्ट फोन हातात खेळू लागल्या नंतरच वेगवेगळे डे काय असतात ते उमगु लागले आहे.....नाही तर कोणता तरी डे पार पडून गेल्यानंतरच पेपर वाचल्या नंतर कळायचे...पण हल्ली हातातील या खेळण्यामूळे असे वैशिष्ट्य पुर्ण डे जवळ येत आहेत याची वर्दी खूप दिवस पुर्विच मिळू लागलीय.व्हॉट्स अॅप आणि फेस बुक अगदी एखाद्या प्रामाणिक मदतनीसा सारखी या साठी कायम तत्पर असतात बिचारे..... आता हेच बघा ना,आज काय तो व्हेलेंटाईन डे का काय आहे म्हणे ! त्या आगोदर सलग चार पाच दिवस आणखी कोणते रोज,चॉकलेट,प्रपोज वगैरे वगैरे डेज साजरे केले जातात हे याच मदतनीसांनी सांगितले.....पण हे खरेच साजरे होत आहेत  की फोनवर मेसेजेस चे नुसतेच पेव फुटले आहेत ,अशी पाल मनात चुकचुकत होती. आजच्या तरुणाईकडे निरखून पाहिले ,त्यांचे ते भन्नाट वेगाने गाड्यांवरुन हिंडणे,हसणे खिदळणे बघितले आणि त्यांनी ते खरेच साजरे केलेच आहेत यावर विश्वास बसला.....व्हेलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा,आकंठ प्रेमात बुडून रहाण्याचा अर्थातच आपल्याच प्रेमाच्या माणसाच्या असा आम्हा पन्नाशी नेमकीच ओलांडलेल्या माणसांना थोड्या फार प्रमाणात ऐकून समजलेला अर्थ ! हो ना ,कारण असं एखादाच दिवस प्रेम व्यक्त करतात आपल्याच आवडत्या व्यक्तीजवळ आणि इतर दिवस मात्र प्रेमाची ही नदी काय आटत असते का? अशी एक प्रांजळ शंका बिचारी डोकावली मनात..... कारण आपल्या आवडत्या म्हणजेच आपल्या आयुष्यभर साथ करणार्या जोडीदारा वरच केली जाते अशी प्रेमाची भानगड असा आमच्यावर असणारा आजवरचा संस्कार! बाकी नात्यां बद्दल वाटतो तो जिव्हाळा.एवढीच माहिती आम्हाला.....दोघांनीही परस्परांवर आजीवन प्रेम केलेच पाहिजे,याच परिघात अडकून पडलेलो आम्ही, सारे अरेंज मॅरेज असताना सुध्दा एकमेकांच्या स्वभावातील गुणदोषां सहित प्रगाढ प्रेम करणारी पिढी आमची.....चार चौघात प्रेम व्यक्त करताना केवळ चोरटे नयन बाण ,अगदीच झाले तर थोडा शाब्दिक खट्याळपणा एवढं चालू शकतं या मर्यादेत वावरणारे आम्ही लोक.अशा एखाद्या दिवशी शब्दातून कृतित व्यक्त व्हायचं असतं प्रेमाला घेऊन त्याचे प्रदर्शन मांडत,हे वास्तव न पचवू शकणारं दोरखंडात जखडलेलं आमचं  प्रेम.....पण आजच्या तरुणाई कडे म्हणा किंवा गोदामातून सांडत आलेले हे मेसेजेस वाचून आपणही थोडंसं उछृंकुल वागावे का ? कधी तरी असा आपल्याच आंर्तमनाला कौल मागणारे आम्ही,बाकी काही नाही तरीआपले दोघांचेच एकत्र फोटो तरी शेअर करावेत अशी ईच्छा नकळत पणे होतेच आमच्या मनांची आणि मग अशा औचित्याने डिपि वरचे फोटो तरी बदलले जातात किमान..... दूर कुठे तरी फिरायला जाणे वगैरे तर मनाच्या अवती भोवती सुध्दा फिरकत नाही कधी, ती तहान फोटो वरच भागवली जाते म्हणा ना!आम्हाला आपलं एकच माहित नवर्या बरोबर प्रेमाच्या गोष्टी या एकांतातच असतात असे नाही झाले तर दोघांच्याही डोक्यावर परिणाम झाल्याचा भास होतो इतर बघणार्यांना.... असा असतो आमचा व्हेलेंटाईन डे!अहो नवर्याने प्रेमाने चुकून गजरा आणलाच कधी तर आपल्याच स्वतः च्याच हाताने माळणे केसांत हा सुध्दा मोठ्ठा अपराध मानणार्या आम्ही.....त्याच्याकडे एखादा प्रेमळ कटाक्ष टाकण्या खेरीज कोणताही पराक्रम न करणारी आमची पिढी.....पण हल्ली सभोवतीचे वातावरण,मेडीया,किंवा मुलांच्या आग्रहा खातर्  मनात कॉम्प्लेक्स आल्यामुळे म्हणा,पण हल्ली आमच्या मनातही वर्षानुवर्षे कोंडत ठेवलेले दोघांचेही प्रेम थोड्या प्रमाणात तरी व्यक्त करावे असे वाटू लागले आम्हाला हे ही नसे थोडके.....आपण खूपच गावंढळ आहोत असे म्हणत कोणी बोट दाखवू नये अशी माफक ईच्छा ठेवत बदलत्या प्रवाहात सावकाश झोकून देत नाईलाजाने सामील होण्याची धडपड आमची यामागे, दुसरे काय!!म्हणूनच आम्हीही अपरिहार्य पणे एखादी पायरी चढत असतो तरुणाई बरोबर आणि हा डे साजरा केल्याचे फार मोठे समाधान चेहर्यावर मिरवतो.......अशा दिवसाची एखादी भेट द्यायची असते परस्परांना हे सुध्दा तरुणाईनं सांगितलेलं ,पण आत्ता पर्यंत त्याचे सर्वस्व माझे आणि माझे सर्वस्व त्याचे असेच मानणारे आम्ही भेट म्हणून द्यावयास शिलकीत काही राहिलेलंच नाही तर द्यावे काय?असा प्रश्न पडलेलं मन आमचं.अख्खं आयुष्यच प्रेमाची भेट म्हणून बहाल केलेलं मग वेगळे पणा मुळी उरतोच कुठे?अशा औपचारिकते शिवाय जपलेलं आमचे हे प्रेम........आज व्हेलेंटाईन डे ची माझ्या नवर्याने कोणतीच किमती वस्तू भेट म्हणून दिली नाही किंवा छानसा ड्रेस गिफ्ट केला नाही तसेच कॅंडल लाईट डिनर नाही म्हणून याच खास दिवशी नवर्याशी भांडून अबोला धरणारी तरुण तरुणी बघितली की वाटतं खरंच यांचं प्रेम आहे एकमेकांवर?का केवळ आभासच आहे यांच्यातील प्रेमात?खरे काय नि खोटे काय यांचा मागोवा घेण्यात आमची मात्र कसोटी लागते.....तिच्या प्रियकराने नवर्याने तिला अमुक अमुक दिले,तु काय आणले?अशी तुलना होतानाचे चित्र बघितले की वाटतं आमच्या पिढीने नवरा बायको म्हणून केलेले आणि त्याच नात्यात प्रियकर प्रेयसी या ही भुमिकेत शिरुन केवळ शारीरिक आकर्षणाला न भुलता मनाने मनाशी साधलेलं निःशब्द एकरुपकत्व हेच तर खरं प्रेम.प्रगल्भ प्रेम.जे जबाबदारी आणि कर्तव्य यांच्याशी बांधिलकी जपत अखंडपणे वाहत रहाणारं......दिवसभराच्या निरिक्षणातून हा निघालेला निष्कर्ष बघितला आणि समर्पणाच्या कृतार्थ भावनेने दोघांनाही सुखाची शांत झोप केंव्हा लागली ते कळलंही नाही......

   *नंदिनी म. देशपांडे*

nmdabad@gmail.com

♥♥♥♥♥♥♥♥♥♥

३ टिप्पण्या: