"आत्मपरिक्षण"
*****************
'आत्मपरिक्षण' उच्चारताच खूपच जड आणि भव्य दिव्य असा शब्द वाटतो ना हा ! पण असे अजिबातच नाही हं .....शब्दशः अर्थ ,स्वतःच स्वतःचे केलेले मुल्यमापन .आणखी सोप्पा शब्द सेल्फ असेसमेंट !विचारात पडलात ना ? अहो,खूपच आवडेल तुम्हा प्रत्येकालाच हे काम...... आपल्या स्वतःच्याच तर संदर्भात करावयाचे आहे ते ....दुसर्या कुणाचे मुल्यमापन करावयाचे म्हटले तर बरेच जोखिमीचे काम आहे हे.....आपली अक्षरशः कसोटीच ठरते ती.....पण छे ,मी तर असे म्हणेन की,खरी कसोटी व जोखिम आत्मपरिक्षण करतानाच असते.....कारण येथे परिक्षार्थी आणि परिक्षक दोन्ही भुमिकेत आपणच असतो ना !
खरंच प्रत्येकाला कधी ना कधी , आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ,वळणावर ही कसोटीची वेळ येतेच येते.....खरे म्हणजे अशी वेळ येण्याची वाटच का बघावी ? ती येण्या पुर्विच आपण असे आत्मपरिक्षण का करू नये ?
'करावे तसे भरावे'हा नियतीने घालून दिलेला नियम लक्षात घेता , काहीही करण्यासाठी आगोदर पाऊल उचलण्या पुर्वि आपल्याला त्याचे काय काय परिणाम भोगावे लागतील , याचा सारा सार विचार केला तर, आपले आयुष्य केवढे सुखावह होईल नाही ? एखाद्याकडे बोट दाखवताना बाकीची चार बोटे आपल्या दिशेने वळलेली आहेत याचे भान प्रत्येकाने ठेवले तर.....तर जगातील कलहांचे प्रमाण किती तरी कमी होईल हे निश्चित .....
आत्मपरिक्षण साध�ताना , आपल्याला ते तटस्थततेच्या भुमिकेतून साधता यायला हवे.....हिच तर खरी कसोटी आहे....हे करत असताना आपल्या हातून झालेल्या चुकांवर साळसुदपणे पांघरुण घालण्याच्या मुळ मानवी प्रवृत्तीलाच बगल द्यावी लागते ना ! बरं दुसर्या कोणी आपल्या चुका सांगाव्यात तर ,आपल्या आत्म सन्मानाला जोरदार ठेच बसते ...... सांगणारा लगेच शत्रु पक्षात जावून बसलाच म्हणून समजा.....
त्याच मुळे आत्मपरिक्षण ही संकल्पना उदयाला आली असावी असे वाटते .......
दुसर्यांचा आत्मसन्मान जपण्या साठी आपल्या कडे जर कोणी बोट दाखवण्या अगोदर , किंबहुना आपण कळत न कळत पणे केलेल्या चुका सुधारण्या साठी ,त्यातून काही तरी बोध घ्यावा या साठी प्रत्येक व्यक्तीला आत्मपरिक्षण करण्याची खूप आवश्यकता आहे असे वाटते . ही कला एकदा आपल्याला साधली तर, निसर्गाच्या सर्वांत बुध्दिमान प्राण्यांच्या पंक्तीत , ज्याचे नाव 'माणूस' असे आहे ,त्याच्या पंक्तीत आपण जाऊन बसतो , नव्हे जाऊनच बसलो आहोत याची नक्कीच प्रचिती येते....कारण या वर्गात जाऊन बसण्या साठी सद्सद्विवेक बुध्दिची कास धरावी लागते.....आणि ती केवळ माणूस या प्राण्या जवळच आहे हे विसरुन चालणार नाही होय ना ?.....
नंदिनी म. देशपांडे .
nmdabad@gmail.com*
🌹🌹🌹
🙎🏻♂🙎🏻🙎🏻♂🙎🏻🙎🏻♂🙎🏻🙎🏻♂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा