रविवार, २८ जानेवारी, २०१८

***शब्द***

*शब्द*

🌿 प्रेम या शब्दा प्रमाणेच अडीच अक्षरी पण ,प्रचंड ताकदीची असणारी 'शब्द' ही संकल्पना . शब्द, हा सकारात्मक सामर्थ्याने आेतप्रोत भरलेला , तर याच सकारात्मक शक्तीच्या हातात हात घालून वावरताना दिसते नकारात्मक शक्ती सुध्दा  शब्दांमधून....

      एखादा शब्द दुःखीताला दिलासा देवून जातो , आणि एखादा व्यक्तीच्या वर्मीच घाव घालतो . त्याच्या ह्रदयाची शकलं शकलं करतो . कांही शब्द मनावर हळूवार फुंकर घालतात तर काही मनावर कायम आेरखडे उमटवतात ....

      कांही जण दिलेला शब्द प्रयत्न पुर्वक पाळतात तर कांही जण न जागण्यासाठीच शब्द देतात....पर्यायाने शब्दाला जागतो तो प्रामाणिक तर दिलेल्या शब्दाची खिल्ली उडवणारा व्यक्ती खोटा ठरतो.....

         एखाद्याच्या जिव्हेवरचा शब्द खरा होतो , तो तत्त्वनिष्ठ ,या उलट शब्दाला न जुमानणारा कृतघ्न म्हणून गणला जातो....
    
     शब्द वैभवाने श्रीमंत व्यक्ती ,प्रतिभावान तर दुर्बल शब्दवैभव ठेवणारा व्यक्ती कमनशीबी .....

      व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणी प्रमाणे ,काही जण शब्दांना जपून वापरतात , कारण त्यांना शब्दांच्या धारदार पणाच्या वृत्तीची आोळख असते , तर अशा प्रकारची आेळख नसणार्या व्यक्ती ,शब्दांना मुखा बाहेर सोडतात ते ,एखाद्या बाणासारखे ,एखाद्याचे मन विदीर्ण करण्या साठीच....

      शब्दांचा उपयोग फुलां सारखा करणारे आत्मसंतोषी प्रवृत्तीचे असतात तर , शब्द काट्या प्रमाणे पेरणारी माणसं विघ्नसंतोषी असतात असे म्हटले जाते.....

       कांही जण तर शब्दांशिवाय सुध्दा खूप काही सांगून जातात .....

     तात्पर्य , एकदा तोंडून बाहेर पडलेला शब्द फिरुन पुन्हा येत नाही , एखाद्याला शब्दातून धिर देता आला नाही तरी बेहत्तर , पण तो वाक् बाणा सारखे फेकू नयेत
हेच खरे.......🌿

    नंदिनी म.देशपांडे .
आॅगस्ट,२०,२०१७.
औरंगाबाद.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा