घर म्हणून....
अगं पमा, पोळ्या अगदी मोजूनच कर हं....एखादी जरी उरली तर अक्षरशः टाकून द्यावी लागते...डस्टबीन मध्ये, नको वाटते गं अन्न असं टाकून देणं....
हे माझं दररोजचं ठरलेलं वाक्य सकाळी पमा पोळ्यांना आली म्हणजे....
ताई, असू द्या एखादी जास्त, घर म्हणून असावी...तिचंही हे ठरलेलं वाक्य मला मुःखपाठ झालं होतं...
या वाक्यासरशी मी कितीदा तरी जुन्या आठवणींत पोहोंचत असायची....
"भरल्या घरात अन्नाचे डबे कधीच रिकामे असू नयेत...घरम्हणून थोडे अन्न तरी शिलकीत हवेच...पैपाहूणा केंव्हाही येतो एखाद्या माणसाचं अन्न असावंच...अचानक आलेलं एखादं माणूस संपादायला हवं दररोजच्या आपल्या स्वयंपाकात..."
माझी मोठीआई, (आजी)नेहमी सांगायची असे...
ते अन्न नीट ठेवले जायचे दुसरे दिवशी घरकाम करणारी मावशी आनंदाने घरी घेऊन जायची ...नाहीतर आल्या आल्या नाश्ता करुन मग कामाला लागायची....वाया जात नसायचं हे नक्की....
आईचा पण हात मोठाच होता स्वयंपाकात...भट्टी चालू असताना कितीही जणं आले तरी काही कमी पडायचं नाहीच...उलट प्रत्येकाला जेऊन जाण्याचाच अग्रह असे तिचा...जेवण करुन तृप्त झालेला पाहुण्यांचा चेहरा बघून आईला फार समाधान वाटायचे...आता वाटतं खरंच, आईच्या हाताने कितीतरी अन्नदान घडले...पदरी साचलेले तेच पुण्य तिला शेवटी कामाला आले असणार नक्कीच....
माझ्या सासुबाई, कायम चार माणसांच्या घरात राबणाऱ्या...स्वयंपाक गृहाच्या सर्वेसर्वा...खेडे गावात बारा बलुतेदारांपैकी दररोज कुणी ना कुणीतरी वाढण घेऊन जावयास यायचेच...या माऊलीने कधीच कोणाला विन्मुख पाठवल्याचे मला आठवतच नाही...
उलट आनंदाने अन्नदान करत कृतकृत्य भाव विलसत असायचा त्यांच्या चेहर्यावर!
उरलेच अन्न तर सकाळी गायींच्या गोठ्यात जायचे...पण वाया अजिबात नाही...
काटकसरीने संसार करत उभ्या केलेल्या आमच्याही संसारात कधी कोणता पाहूणा उपाशीपोटी किंवा अर्धपोटी राहिल्याचे स्मरत नाही...
"अतिथी देवोभव" या मंत्राचे पुरस्कर्ते आम्ही, प्रत्येकाचा साग्रसंगीत पाहूणचार झाला पाहिजे याच संस्कारात दोघेही वाढलेलो....अन्नधान्याची कायमच बरकत असायची...
उरलं शिळं तर स्वतः खाण्याची किंवा कुणाच्या तरी मुखात जावे अन्न, ही मनोवृत्तीत जोपासत ,अन्नापेक्षा काही मोठे नाहीच ही भावना बाळगणारे आम्ही...वाया कसे जाऊ द्यावे वाटेल?
पण हल्ली कितीही कमी करा उरतच थोडंतरी...आता पुर्विसारखा गोठा नसतो दारी... प्रसंंगी घरकाम करणारी मावशी आपण आपल्या पंक्तीला घेऊन बसतो,आपण जेवावयास...उरलेलं घेऊन जाता का?म्हणण्यासाठी जीभही रेटत नाही...का म्हणून त्यांना शिळं विचारावं हा प्रश्न आपल्याच मनात उभा रहातो...बाहेर शब्द पडणं केवळ अशक्य...मग वाया जातंचं...
कधी कधी आपण आपल्या ताटात वाढून घ्यावं, कारण आपलं ठेवणं अगदीच व्यवस्थित असतं, अगदी फ्रीज मध्ये वगैरे....पिझ्झा, बर्गर, पाव हे विकत आणून खाण्याचे पदार्थ किती दिवसाचे शिळे असतात कोण जाणे?हा विचार डोक्यात घोळतोच अशा वेळी...त्या पेक्षा कालचीच बनवलेली पण नवा अवतार धारण केलेली आपली फोडणीची पोळी काय खमंग आणि चवदार लागते!तोंडाला चव आणते बापडी, तिला शिळी कशी म्हणणार?
रात्रीच्या वेळी कधीतरी झोपच येत नाही...बहुदा जेवण लवकर झालेलं असतं...मग रात्री भुक लागल्या सारखी वाटते, उरलेली एखादीच दुधपोळी कुस्करून खाल्ली की भुक शमते आणि झोपही शांत लागते....
कधी कधी घरात डायबेटिस चा पेशंट असेल तर त्याला रात्री बेरात्री शुगर कमी झाल्याचेही लक्षात येते, पटकन उरलेली एखादीच पोळी साखरअंबा,जाम, लोणचं, किंवा तूप साखर यांच्या सलगीने रोल करुन खाल्ल्यास केवढा तरी आराम मिळतो....अशा वेळी लक्षात येतं हे "घरम्हणून" असावं घरात याला केवढा अर्थ आहे!
हे केवळ अन्नाच्या बाबतीत...पण एकूणच घरातील डब्यांमधील चीज वस्तू कधीच अगदीच संपवून टाकू नयेत, घरम्हणून पुनःश्च आणेपर्यंत थोड्या तरी असूच द्याव्यात डब्यात हे आईचं वाक्य कायम स्मरणात आहे आजही..."नाही नाही" असे कधी म्हणू नये आणि दुसऱ्या पुढे हात पसरायची वेळ येऊ देऊ नये हेच एका उत्तम
गृहिणीच्या यशस्वीतेचं गमक आहे यावर माझाही विश्वास आहे हे मात्र खरे...
तुम्हाला काय वाटते?
©️नंदिनी म. देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा