रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

गौरींचा निरोप समारंभ...

गेली तीन दिवस घरोघरी चालू असणारा गौरी आवाहन आणि पुजनाच्या सोहळ्याची आज सांगता....
        आपल्या घरी आलेल्या गौरींना सजवून तीन दिवस तिच्याशी हितगुज साधणारी गृहलक्ष्मी आज स्वतः  सात्विक सौंदर्यानं उजळून निघते...चेहर्‍यावर प्रसन्न हसरे भाव, मनात समाधानाचे तेज, घरात मांगल्याची शिंपण आणिक दारात रंगारंगांची सुरेख रंगावली मांडत आपल्या प्रसन्नमुखाने सुवासिनींना हळदी कुंकुंवाच्या निमित्ताने आपल्या गौराईंचा थाट बघण्यासाठी आमंत्रित करते...
     गौरीच्या रुपाने आलेल्या माहेरवाशिणींना आज निरोप द्यायचा आहे...आपली लेक लग्नानंतर पाहूणी म्हणून आलेली असताना तिला कुठे ठेवू अन कुठे नको असेच प्रत्येक आईला वाटते...पण ती चार दिवस मानाने आणि यथोचित पाहुणचाराने जेंव्हा तिच्या सासरी निघते तो क्षण खरे तर संमिश्र भावनांनी भारलेला...
        गौरीही लेकीचंच रुप घेऊन आलेल्या असतात...त्यांना निरोप तर द्यावा लागणारच ना...
      तिच्या सांगाती देण्यासाठी केलेले फराळाचे पदार्थ, खिरापत  प्रसाद म्हणून सुवासिनींना देताना या आईरुपी गृहिणीचा चेहरा कृतार्थ भावनेने ओतप्रोत असतो...गौरीचं - लेकीचं कौतूक इतरांकडून ऐकताना तिला गगन ठेंगणे न झाले तरच नवल!
     आपल्या लेकीचं परिपूर्ण रुप ती गौरींच्या माध्यमातून न्याहाळते...या घरची लक्षमी ही दिल्याघरी खूप सुखात नांदो, मुलाबाळांच्या गराड्यात राहो आणि भरभराटीने समृध्द होवो हिच मनोमन ईच्छा असते या गृहलक्ष्मीची...
      तिच्या येण्याने भरुन राहिलेले आपले माहेरही तिच्या पदस्पर्शाने आणि तिच्या वावरण्याने सदा आनंदी, समाधानाने, समृध्द होत राहो...धनधान्याच्या राशीं नेहमीच घरात नांदत्या राहोत...तिच्या मनातील समृध्द भाव आणि तृप्तता आपल्या माहेरावर कायमच परावर्तित होत राहो....दोन्ही घरी अशीच संपन्नतेने, कृतार्थतेने नटलेली राहोत अशीच मनीषा प्रत्येक आईची असते...
      जिथली वस्तू तेथेच शोभून दिसते तद्वतच माहेरघरी आलेली लेक चार दिवस पाहूणी म्हणूनच शोभून दिसते...तिचं खरं वैभव तिच्या सासरी वाट बघत आहे आणि आज आपल्याला तिला निरोप द्यायचाय हे ठामपणे मनाला समजवतानाची घालमेल चेहर्‍यावर उमटू न देता, सुवसिनींबरोबर कौतुकात मग्न अशी गृहलक्ष्मी आज थोडी हुरहुर घेऊन आपल्या गौरींनाही निरोप देते...अगदी हसतमुखाने तृप्ततेने आणि समाधानाने...तिच्याकडून पुढच्या वर्षी येण्याचे आश्वासन  घेत....
      असा हा गौराईंचा पुजन पाहूणचाराचा सांगता समारंभ थाटातच पार पडतो आणि नव्या जोमाने घरातील प्रत्येक घटकाला नवीन उर्जा,नवी उमेद आणि नवीन धनधान्यच्या राशींची घरघरांत उधळण करतो...
नकळत शब्द ओठी येतातच ते म्हणजे,

सर्व मंगल मांगल्ये 
शिवे सर्वार्थ साधके 
शरण्ये त्रिबंके गौरी 
नारायणी नमोस्तुते ॥

   ©️नंदिनी म.देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा