काल आमच्या काही मैत्रीणींच्या गप्पा चालू होत्या,शिक्षक दिन असल्याने ओघानेच त्या विषयावर गाडी आलीच...आमच्या लहानपणीच्या आठवणींना, त्यातही शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही शाळेत केलेल्या धम्माल गमती जमती सांगताना प्रत्येकजण भरभरुन बोलत होती..
आजच्या दिवशी,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला नमस्कार करत, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं,सर्व शिक्षकवृंदांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेणं...त्यांच्या कौतूकाची नजर आपल्यावर पडली की, चेहरा खुलून जाणं हे सारं आठवलं...
याच दिवशीची आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे, आम्हा विद्यार्थ्यांकडून "स्कूल डे " साजरा होत असे...
एवढा एक दिवस आम्ही विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या भुमिकेत प्रत्यक्ष वावरत शाळेचा प्रत्येक विषयाचा तास वाटून घेत असू....काय मज्जा यायची! आपला तास पार पडेपर्यंत जाम टेन्शन असायचं...पण छान वाटायचं...बरंच काही शिकावयास मिळायचं, बरेच अनुभव मिळायचे आणि मुख्य म्हणजे,आमचा आत्मविश्वास वाढावयास मदत होऊन आत्मभान यायचे...आत्मसन्मान साधला जायचा...
हे झालं आमच्या पिढीचं बालपण!खरोखरच आदर्श ठरावेत आणि आदर्शाच्या मार्गावरुन बोट धरुन चालवणारे होते त्यावेळचे बहुतांशी शिक्षक वृंद...अत्यंत साधेपणात मुर्तीमंत सात्त्विकता,विद्यार्थ्यांप्रति अत्यंत जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात त्यांची तळमळ त्यांच्या धाटणीचे कौशल्य या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यां साठी अनुकरणप्रिय असायच्या...
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण संस्कार असायचा...त्याची किंमत शब्दांत किंवा पैशात होणं अगदीच दुरापास्त होतं....शिकवणी किंवा ट्यूशन हे आज असणारे परवलीचे शब्द अर्थशून्य होते....
मुळातच शिक्षकीपेशाला,त्यांच्या संस्कार वर्गांना आणि विद्यादानाच्या त्यांच्या निष्ठेला कोणताही पर्यायच असू शकत नव्हता...
शिक्षकांचे अध्यापन कौशल्य एवढ्या प्रचंड ताकदीचे होते,की त्यांच्यामुळे संबंधित शाळेचे नाव भरभराटीला यायचे...
खरोखर नतमस्तक व्हावेसे वाटते ते अशा शिक्षकांसमोर!
धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी असे समजले जाणाऱ्या पिढीचे आम्ही विद्यार्थी...आम्हाला याचा सार्थ अभिमान आजही वाटतो आणि म्हणूनच आम्हा मैत्रीणींच्या गप्पांनाही कढ येत गेला या विषयावर बोलताना अगदी!
ओघानेच आजच्या शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा आणिक शैक्षणिक पध्दतींवरही नकळतपणे प्रकाशझोत पडत गेला...आज विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालक हे तीनही या शैक्षणिक क्षेत्राचा अनिवार्य भाग आहेत...
पूर्विच्या काळी पाल्याच्या कौतुकासाठी किंवा त्याच्या तक्रारी साठीच कधीतरी पालकांना शाळेत बोलावले जायचे...पण हल्ली पालकांची आर्थिक संपन्नता आजमावणे हाच एकमेव उद्देश ठेवत पाल्याच्या अगोदर पालकाची मुलाखत होते...पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा शाळेचे नाव/ इतर सोयी बघून मुलाला शाळेत घालतात...अध्यापन कौशल्यावर आधारित शिक्षक निवडण्यापेक्षा 'डोनेशन' म्हणून जास्तीत जास्त 'दाम'देणारा गृहस्थ शिक्षक म्हणून नेमला जातो...
मुल्याधिष्ठित नेमणुकी ऐवजी आणि शिक्षणा ऐवजी, गोंधळाधिष्ठित वातावरणात शाळेला सुरुवात होते...भपकेबाज पणावर गुणांपेक्षा कितीतरी भर असतो बर्याच शाळांचा....अगदी बोटावर मोजण्या इतपतच शाळा किंवा शिक्षकही औषधाला उरले आहेत...
मग अशावेळी "आडातच नाही तर पोहोर्यात कसे येणार"?अशी सारी परिस्थिती दिसते...
मुळात शिक्षकांना प्रशिक्षित करुन मुल्ये काय असतात?गुणाधिष्ठित शब्दाचा नेमका अर्थ, संस्कार आणि त्याचे सामाजिक स्थान, भाषा, व्याकरण,भाषेची शुध्दता म्हणजे काय?किंवा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वर्तन म्हणजे काय? शिकवावयास हव्या, तरच त्यांचे योग्य परावर्तन मुलांच्या मनावर पडेल...
याचा अर्थ सरसकट असेच नाहीत असे अजिबात नाही पण यांचे प्रमाण मात्र नगण्यच असावे असे आज चित्र दिसते....शिवाय आपली संपूर्ण शिक्षण पध्दती ही "कोचिंग क्लासेस ",नामक वाळवीने पोखरुन निघाली आहेत...पैसा फेकला की कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते ही भावना वाढीस लागून शाळा ही केवळ परीक्षाकेंद्रेच आहेत की काय?असे खरे वाटणारे विदारक सत्य आहे दिसून येते.....
आपल्या पाल्यांना (चांगले)?
शिक्षण देण्याच्या आणि भारंभार क्लासेस लावण्याच्या नादात पालक म्हणजे पैसा कमावणारी सजीव यंत्र, पाल्य म्हणजे मान हलवणारी बैलं आणि शिक्षक म्हणजे शाळेतील एक शोभेची वस्तू किंवा शिकवणे सोडून इतर भारंभार कामं कागदावर दाखवत निधी जमवणारे मशीन बनले आहे या कणभरही अतिशयोक्ती वाटू नये ही आजची शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका....
का म्हणून कोणाला आजच्या शिक्षक दिवसाचे महत्व वाटावे?
का म्हणून या दिनाचे सोहळे साजरे व्हावेत?
एकूण या पध्दतीतील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
अगदी मोजक्या म्हणता येतील अशा काही शाळा आजही आपली पत टिकवून आहेत त्यात भरपूर वाढ होणं फार गरजेचं आहेच...
शिक्षणाचं बाजारीकरण थांबवून त्याला प्रेम वात्सल्याचं खतपाणी घालत जिव्हाळ्याची भावना
मनापासून अर्पण करतील यातील सारे घटक तर, या क्षेत्रातील चमचमणारे तारे हे हिर्यांच्या लखलखीने तेजाळून निघतील असे नक्कीच म्हणावेसे वाटते...
शिक्षक दिन.
सप्टेंबर.5,2023.
©️ नंदिनी म. देशपांडे.
औरंगाबाद.
🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा