फुलांचा हार
-‐------------------------------
आहाहा! किती सुवासिक, नाजूक शुभ्रफुले गुंफली आहेत ही...अगदीच ताजी ताजी....सारखं हाताळून खराब हण्याची भिती वाटते...असाच सारखा बघत रहावा असे वाटते...
पण याकडे बघत असताना कितीतरी विचार मनात येवून गेले...
खरं म्हणजे हा सुंदर हार देवघरातील देवाच्या तसवीरीवरच जास्त शोभून दिसेल...मध्यभागी केशरी फुलांचे पदक आणखी सौंदर्य खुलवत जाते आहे...देवाच्या मुर्तीच्या गळ्यात विषेशत्वानं खुलेल हा हार!असो...
एखाद्या नवपरिणीतेच्या केसांमध्ये माळून याच हाराची हेतूच बदलेल नाही का?नव्हे तो केसांत गजरा म्हणून छानसा मिरवेल...
लाजत मुरकत आपलं आरसपाणी सौंदर्य बहराला आलंयं याची जाणीव तिला करवून देईल...
पण जर हार एखाद्या पुढार्याच्या किंवा उत्सव मुर्तीच्या गळ्यात गेला, तर मात्र अजून एक अर्थ घेऊन येईल, ज्याला सत्कार, कौतूक असे म्हणता येईल....
हाच हार शुभमंगल प्रसंगी नवरा नवरीच्या गळ्यात पडतो, आणि दोघेही परस्परांच्या गळ्यातील ताईत कधी बनून जातात त्यांनाच समजत नाही...आहे की नाही गम्मत!
पण असाच हार एखाद्या व्यक्तीच्या फोटोला घातलेला असेल तर एकदम संदर्भच बदलतो...
यामागचा हेतू आणि उद्देश दोन्हीही पापणीच्या कडा ओलावणारे....
एखाद्या यंत्रावर, वस्तुंवर, असेच काहीसे घाालेले हार मात्र उद् घाटनाचा,नवेपणाचा आपला बाझ सांभाळून असतात...तर....
घरांवर सणावाराला लावलेले हार उत्सवी वातावरण सोबत आणतात...सार्या घराला आनंदी उत्साही बनवतात...
आणि....आणि.... हाराने जर सरणावरच्या निर्जीव कलेवरावर जागा शोधली तर...तर.
....निःशब्द व्हायला होते...काय बोलणार....
तर अशा प्रकारे हार फुलांचाच असतो, तो कधी मनात भक्तीभाव निर्माण करतो, कधी प्रणय भावना जागृत करतो तर कधी कधी कौतुकाची थाप पाठीवर देतो....हाच हार नवरा बायकोची लग्नगाठ बांधतो तर
कधी उत्सव, उत्साह यांना मनसोक्त दाद देतो तर
कधी आठवणींच्या मोरपिसारा फुलवतो...तर तर कधी मनातील व्याकुळता हुरहुर यांचे प्रतिक बनतो...
" हार " (फुलांचा)अशा पधादतीने संदर्भाने आपला हेतू बदलतो भावनांचा आदर करत स्वतःचे अस्तित्व जपून असतो...आणि लोकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करतो...
हार एकच तरीही संदर्भाचे कोंदण लागले की आपल्या मनातील भावनांना वाट करवून देतो....अशी बहुपदरी ख्याती सांभाळत आपले महत्त्व कायम ठेवतो तो असाच फुलांचा हार असतो....काय खरे आहे ना?
©️नंदिनी म.देशपांडे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा