*निवृत्त न्यायमूर्ती श्री* *प्रभाकरराव उमरीकर*
कायद्याचा सातत्याने अभ्यास हा ज्यांचा ध्यास,कायदेविषयक ज्ञान सतत अपडेट ठेवणं हा ज्यांचा छंद, येईल त्याला कायदेविषयक निकोप सल्ला देणं ही ज्यांना आवड आणि कायदेविषयक चर्चेमध्ये हिरीरीनं भाग घेणं यात ज्यांचा आनंद, असे एक व्यक्तीमत्व म्हणजे, निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री प्रभाकरराव आनंदराव उमरीकर....
19 ऑक्टो.1944 रोजीचा यांचा जन्म...मुळचे परभणीचे रहिवासी,पण कालांतराने औरंगाबादेत स्थायिक झालेले कायदेक्षेत्रातील एक निष्णात ज्ञानभांडार....
7 नोव्हेंबर,2022 रोजी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली....
दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्हीही क्षेत्रात सारख्याच परिपूर्णतेने न्यायदान करणं हा यांचा हातखंडा होता...
वकिली व्यवसायात वडिलांच्या,आनंदराव उमरीकर यांच्या नंतरची ही दुसरी पिढी...
औरंगाबादच्या एम.पी.लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीला तीन वर्षे वकिली व्यवसाय केला आणि नंतर सात वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत राहिले...
श्री प्रभाकरराव उमरीकर यांची त्यानंतर न्यायाधीश पदी नेमणूक झाली आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या गावांत/शहरांत न्यायदानाचे पवित्र कार्य पार पाडत राहिले....
कितीही क्लिष्ट खटले असतील तरीही आपल्या सूक्ष्म अभ्यासूवृत्तीने त्यांनी दाव्यांचे निकाल दिले आहेत...दावा दिवाणी असो किंवा फौजदारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकले, की लगेच डायसवरच (कोर्टहॉल) मध्येच, न्यायपत्राचे डिक्टेशन देत संदर्भित खटल्याचा निकाल देणं ही यांची खैसियत होती...
अतिशय मोजक्या न्यायाधिशांना जमणारी ही गोष्ट प्रभाकरराव उमरीकर यांनी आपल्या कार्यकाळात एका व्रतस्थ न्यायाधिशाप्रमाणे पाळली होती...
कितीतरी वकिल मंडळी, न्यायाधीश मंडळी एखाद्या कायदेविषयक क्लिष्टते संदर्भात यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अगदी हक्काने येत असत...यथायोग्य मार्गदर्शन करत,ते प्रत्येकास उत्साहाने कायदेविषयक सल्ला देत...त्यातील बारकावे समजाऊन सांगत...कोणीही कधीच विन्मुख होऊन परतत नसे...
त्यांनी न्यायदान केलेले आणि अपिलात (उच्च न्यायालयात) दाखल झालेल्या सर्वच खटल्यांचा निकाल कायमस्वरुपी जसा आहे तसाच रहात असे...
केवळ एका दाव्यात दिलेला निकाल उच्च न्यायालयात फेटाळला गेला, पण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळून जिल्हा न्यायालयात झालेला निकालच कायम ठेवला होता...ही आठवण सांगताना त्यांना आपण न्यायक्षेत्रात दिलेल्या सेवेबद्दल कृतकृत्यतेची भावना वाटत असे...
कित्तेक बार मधील वकिल मंळींनी श्री प्रभाकरराव उमरीकर यांनी दिलेल्या निकालपत्रांचे पुस्तक बनवून, न्यायालयाच्या वाचनकक्षात अभ्यासासाठी ठेवले आहेत....
वकील मंडळींमध्ये त्यांची प्रतिमा "एक रेडी रेफरन्सर" अशी केली जायची...
कायद्याचा अतिसूक्ष्म अभ्यास करत कायदा कोळून प्यालेले न्यायाधीश ही त्यांची ख्याती अवघ्या महाराष्ट्रात आहे...
आज ते आपल्यात नाहीत तरीही त्यांच्या निकालपत्रांच्या पुस्तकाच्या रुपाने कायमच कायदेक्षेत्रात वावरणार आहेत हेच खरे....
निवृत्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिवंगत श्री प्रभाकरराव उमरीकर,यांना सात जानेवारी रोजी या जगातून एक्झिट घेऊन दोन महिने होतील...त्यांना विनम्र अभिवादन. 🙏🙏
©️
ॲड.नंदिनी म.देशपांडे.
nmdabad@gmail.com
9422416995.
🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा