शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

स्वागत सोनेरी पहाटेची.

फुलांनी प्याली पहाटेची आभा सोनेरी
हसली सोनकिरणं त्यामधून साजिरी
भाळलं गोड हास्यावर गुलाबी फुल  देखणं
हलकेच चुंबीत भाळीला कोमल पाकळीनं
घेतलं त्यानं सामावून आपल्यात अलगद
होऊन कुंकुम तिलक उठून राहिलं हसत.

नंदिनी.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

बहुरंगी पुष्पमेळा.

बहुरंगी फुलांचा मेळा
भास्कराच्या स्वागताला
अधिर जाहला स्पर्शावाला
रवीकिरणाच्या सान्निध्याला

बहुरंगी या फुलांमधूनी
बहुढंगी ती पानं हसली
हरित कणांचे अर्घ्य देऊनी
पर्णिका मनातून तृप्त जाहली

पानाफुलांच्या मुखकमलातूनी
तृप्तीचे तव पाट वाहती
धन्य जाहली अवनी बघूनी
वसंत हसला कणाकणातूनी

बहरु लागली तरुवेलीही
नवचैतन्य सोबतीने घेऊनी
पक्षीही आळवती सुरांतूनी
गोड मधुर तो पावा ओठी.

*नंदिनी*

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

पुष्प कविता.

हिरव्या हिरव्या कोंदणात
   अवतरली आभ्रकाची फुलं
हसून प्रसन्न स्वागताला
जाहली होऊन सज्ज

  शंखनाद सोबतीला
जल तरंग उठवती
शुभ्रतेच्या प्रकाशानं
आसमंत उजळती

उजळल्या दाही दिशा
उजळले अंबर
आदित्याच्या तेजाला
दिले सृष्टिने समर्पण

सुगंधाच्या कुपीतूनी
सुवास मंद शिंपिती
वाऱ्यासवे झुळूकीतूनी
भारुन टाकती दिशा दिशा

समर्पण सृष्टिचे 
कणकणातून बहरले
पानेफुले तरुवेलीतून
जीवाजीवांत नाहले

धन्य झाली वसुंधराही
समाधानानं तृप्त
ऊभी धरणीमाय अधिर
वसंतोत्सवाच्या सन्मुख.

*नंदिनी*

🌹🌹

पुष्परचनेवर आधारीत कविता.

उंच भरारी घेऊन अलगद
उमलवूनी नाजूक पाकळ्या सुंदर
हसले गाली फूल अवचित
करुनी साजरा साज शृंगार 

गळा वैजयंती नाजूक सोनेरी
हिरवे कोंदण सजलंय भारी
गुलबक्षी पेहराव देखणा लेवूनी
सजली अहा किती फुलराणी

 हासलं चांदणंं सांडून रुपेरी
उमटवूनी गराऱ्यावर नाजूक नक्षी
लगबग चाले किती‌ फुलराणीची 
स्वागता भृंगराजाच्या उभी गोजिरी.

*नंदिनी*

🌹🌹🌹🌹

श्रध्दांजली...

आज,निसर्गही मलूल झालाय... हिंगणघाट च्या"त्या"मुलीचा अतिशय दुःखद, क्लेशकारक अंत झालाय....काय चूक होती त्या मुलीची? केवळ तो "नालायक" मुलगा तिला आवडत नव्हता, तिनं नकार दिला म्हणून?मुळात आपण कोणत्या माणसा बरोबर आयुष्यभर रहावयाचं हे ठरवण्याचा तिचा मुलभूत अधिकार होताच....ती सज्ञान मुलगी सद्सद्विवेक बुध्दीने वागणारीच असावी....त्या मुलाच्या वागण्याच्या पध्दती वरुनच तिनंं आपला नकार दिलेला असावा...नकार देण्यासाठी याशिवाय इतरही भरपूर कारणं असू‌ शकतातच ना....
पण म्हणून असा माथेफारु पण पणा....
आपण सर्वजणही याच समाजाचा एक भाग आहोत....केवळ ऐकायचे,टिव्हीवर बघायचे आणि सोडून द्यायचे का?अशा माणूसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपलीही काही जबाबदारी आहेच ना....
आपल्याच घरातूनच अशा प्रकारच्या जबाबदारीची जाणीव आपण आपल्या मुलांना करवून द्यावयास हवी...नैतिकतेचे धडे गिरवण्याची सुरुवात मूळी सर्वांत प्रथम‌ घरातूनच केली जाते....
मुलांना मागेल ती गोष्ट अगदि आणूनच द्यावयासच हवी हा अट्टहास मुलाचाही नसावा आणि पालकांचाही....
मुलांना नकार पचवता यावयास हवा.कोणताही नकार सकारात्मकतेनं घ्यावययस हवा याचे संस्कार बाळकडू त्याला सर्व प्रथम घरातूनच मिळत असततात....
मुख्य म्हणजे त्याला आपल्या जवळ असणाऱ्या सद्सद्विवेक बुध्दीचा उपयोग कसा करावा? याचे पाठ घरातून सुरुवात करत द्यावयास हवेत
तर आणि तरच आपण थोडी का होईना समाज ऋणाची उतराई करण्याचा प्रयत्न केलाय असं मनाला वाटेल...
अशा पिडितांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे...केवळ मेणबत्त्या दिवे लावून मोर्चे काढून आणि कायदा हातात घेऊन काहीच होणार नाही...
तो नराधम तर फाशीच्याच शिक्षेच्या काबील आहे...त्याला ती कायद्याच्या चौकटीत नक्कीच मिळेल पण अशा प्रवृत्ती उद्भवूच नयेत यासाठी कुटुंब,समाज,शाळा कॉलेज पासूनच संस्कार फार महत्वाचे आहेत....ते पाल्यांवर करणं हे प्रत्येकाचचं कर्तव्य आहे...
त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली...

नंदिनी.

😢

सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा.

*आण्णा काका अन् प्रभा काकू*

 मंगल दिन आज
 सोनियाचा आला ।
      रंगला सोहळा 
सहस्त्र चंद्रदर्शन अन्
   अमृतमोहोत्सवाला ।।

  तेजःपुंज दाम्पत्य 
  बैसले सिंहासिनी ।
 उत्सव मूर्ती‌ प्रभा                                  काकूंसह
मूर्ती आण्णा काकांची भारदस्त साजिरी  ।।

 ही लक्ष्मी नारायणाची              जोडी अविरत ।
    असते करीत सतत        प्रेमाची बरसात ।
 स्नेह सावली आप्तांची
बनत.

साऱ्यांचीच ही स्नेह सावली।
  आनंदे क्षण वेचती                     भरभरुनी
कौतुकाच्या वर्षावी सदा हासतमुख जोडी ही देखणी

स्पर्श ममतेचा पाठीवरी
    मुलायम फिरे
     उभयतां करवी
निरपेक्ष प्रेमाचा सागर                   अव्याहत
वाहतसे यांच्या रंध्री ।।

स्नेह सावलीने यांच्या
मिळे आधारवडाची थंड दाट छाया ।
तृप्त लोचने निरखिती
भुषण आप्तजनांचे करीती ।। 

 आनंद मुर्तींची जोडी
जणू खाणच 
ही आशिर्वादांची ।
घालिती सडा अंगणी यशस्वीतेच्या मार्गावरुनी ।।

भरभरुन मुखी त्यांच्या
प्रेमळ आश्वस्त संवाद वसशी।
यथार्थ दिलासा सदा 
आम्हा आप्त स्वकियास
   देती ।।

चालतं बोलतं विद्यापीठ आण्णा काका आमचे असती ।
कुलगुरुचे पद भुषवी
प्रभा काकू विव्दान   विदूषी।।

अभिमान यांचा असे आम्हा आप्तांना ।
 लावी छंद जीवा
 या पितृतुल्य जोडीच्या सहवासा रमण्या ।।

आशिर्वाद रुपी फुलांची
अशीच पखरण त्यांनी करावी ।
अन् उधळलेली फुलं
सारखी मनात आम्ही
मिरवती ठेवावी‌।।

उदंड आयुष्य 
     लाभो उभयता
ईश्वर चरणी प्रार्थना मनस्वी।
 फुलं शतायुषाची वाहण्या 
आस ही आहे सर्वस्वी।।

हृद्य सोहळा शतायुषाचा
पुनःश्च घडवूनी आणा देवा ।
ईच्छा ही आमच्या मनीची आपण पूर्ण करावी देवा पूर्ण करावी देवा।।

© *नंदिनी म. देशपांडे*.

🌹🌹🌹🌹

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

चोचले जिव्हेचे.

चोचले जिव्हेचे.

     उखरी

   चुली मधील निखऱ्यावर छान फुललेली उखरी त्यावर टाकलेला तुपाचा गोळा वितळून घरंगळत ताटभर पसरत जावा...तो ताटात वाढलेल्या भुरक्यात,लोणच्यात मिसळू नये यासाठी आपली होणारी त्रेधातिरपिट....मध्येच तुपाने माखलेली दोन बोटं चाटणं... अणि उखरी गरम आहे तोवर संपवणं....गट्टम करणं.....
     होते थोडी तारांबळ आपली,पण आहाहा!एकदा जिभेवर घास ठेवला रे ठेवला की,ही होणारी तारांबळ कुठच्या कुठे पळून जाते....ऊलट दुसरी गरमागरम उखरी केंव्हा एकदा पानात पडते आपल्या याची वाट बघत असतो आपण....
     उखरी,पानगा अशा वेगवेगळया नावानं प्रचलीत असणारा हा आपला एक पारंपारिक पदार्थ....नाश्त्यासाठी पोटभरीचा.... शिवाय पौष्टिकपणा सोबत ठेवणारा...जेवणातही हमखास चालेल असा...पण बरं का,ही उखरी अशीच कोरडी कोरडी तूप,भुरका,लोणचं, आणि शेंगदाण्याची चटणी अशीच खाण्यात गम्मत आहे... म्हणूनच ती जेवणात नको वाटते...
     आधुनिक काळात निखाऱ्यांवर भाजलेली उखरी खाणं दुरापास्तच.पण,लोखंडी झाऱ्यावर गॅसच्या फ्लेमच्या मध्यम आचेवर ती बनवता येते...थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालून दुधात घट्ट भिजवलेल्या कणकेची हातावर थापून बनवलेली उखरी चवदार लागते....छानशा भाजलेल्या उखरीचा स्वाद जिभेला कशी भुरळ घालतो ते कळतही नाही.... त्यामूळे करावयास थोडं पेशन्स लागलं तरीही बदल म्हणून आठवड्यातनं एकदा अगदी चालण्यासारखं आहे....
मी करत असते नेहमी अशी उखरी,पण लहानपणी आजोळी आजीज्या हातच्या खाल्लेल्या चुलीतील निखाऱ्यावर बनवलेल्या पानग्याची आजही आठवण येतेच येते....

 *नंदिनी म.देशपांडे*.

😋😋