शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

घटस्थापना.

॥ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥*
 *घटस्थापना, व शारदीय नवरात्रौत्सवाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.
🌹🌹

       🌹घटस्थापना🌹

  आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाचा शुभारंभ.ऋतू बदलाच्या संधीचा दिवस. पावसाळ्याची सांगता होऊन हिवाळ्याची चाहूल लावणारा हा उत्सव. निसर्गातही सर्वदूर उत्साह आणि तजेलदार प्रासन्य भारलेलं असतं या वेळी.सृष्टिला आलेला बहर अगदी वरच्या समेवर असतो असे म्हणावयास हरकत नाही. 
     अशाच काळात घटस्थापनेचा दिवस उजाडतो. ईश्वरी शक्तीच्या स्त्रीरुपाचं पुजन, तिच्या शक्तीरुपाचा गौरव, सन्मान करण्याचा, दहा दिवस साजरा होणारा,तिच्या जागरासाठी प्रार्थना करण्यासाठीचा हा एक उत्सव. 
घरोघरी धार्मिक अधिष्ठानावर विराजमान होणारं हे जगदंबेचं रुप घरभर मांगल्याची शिंपण करत ,भक्तीभावाची पेरणी करतं ,आणि संपन्नतेचं स्वागत करत आगमनीत होतं. 
   माझ्या बालपणापासूनच्या आठवणींची जुडी सोबत घेऊन येतो हा सण.  
  
     काळ्याभोर मातीमध्ये गोलाकार गहू पेरत त्यावर विराजमान मंगल कलश आणि त्यात नऊ दिवसांसाठी घटी बसलेलं साडेतीन पीठापैकी एक देवीचं रुप! किती मनोहर दिसतं हे सौंदर्य. कलेकलेनं वाढत जाणारं पेरलेलं धान्य हिरवाई मध्ये बसलेली आणि फुलांनी सजलेली देवीची मुर्ती किंवा टाक, वरतून तिच्यावर सोडलेलं फुलाचं तोरण आणि शेजारी अखंड शांतपणे तेवत असणारी तेलाची समयी,हे सारंचं मनाला शांती देणारं एक ध्यानमंदीर केंव्हा बनून जातं ते आपल्यालाही कळत नाही. 
    या उत्सवातली माझी सर्वात आवडती गोष्ट कोणती असेल तर ती  सायंकाळच्या आरतीचा कार्यक्रम!
तल्लीन होत,टाळ्यांच्या तालात परस्परांचे सूर जुळवून अगदी ठेक्यावर सामुहिक पणे म्हटल्या जाणार्‍या देवीच्या आरत्या. 
     त्या बालवयात भक्तीरसाची आवड मनात निर्माण होण्यासाठी या आरत्यांचा फार मोठा वाटा आहे असेच म्हणेन मी.

    या आरत्या दरवर्षी उत्साहाने म्हणत म्हणत हळू हळू त्यांचा अर्थही समजू लागला त्या बालवयात. त्यातील गेयते मूळे गाण्याची आवड निर्माण झाली आणि प्रत्येक स्री ही शक्तीरुपीणी आहे याची खुणगाठ मनाशी बांधली गेली.ती या मुळेच. 
    मला आठवतं तसं पुजा वगैरे करण्याचा पूर्ण चार्ज आमच्या घरात माझ्या आईकडेच असायचा. अतिशय श्रध्देने आणि भक्तीभावाने आई स्वतः हे सारंच आवडीने करायची.,त्या वेळी माझी आई खरोखरच मला साक्षात देवीचं रुप वाटायची. तिचा कणखरपणा, तिच्या चेहर्‍यावर असणारं तेज, तिचा भोळाभाव,तिचा निर्धार हे सारंच निराळं वाटायचं. ईश्वरासमोर लीन होत "काही चुकलं असेल तर माफ कर गं अंबाबाई ",म्हणत तिला हात जोडणं अणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी आशिर्वादाचं पाठबळ असू दे म्हणणं, हे सारं मी अगदी जवळून बघितलंयं म्हणूनच माझ्याही मनात या श्रध्देचं घर बांधलं गेलं. कुठे तरी लीन होत काही क्षणांची मनःशांती मिळवण्यासाठी एखादे स्थान असणं फार गरजेचं असतं दैनंदिन आयुष्यात. ते म्हणजे आपले देवघर. यावर विश्वास रुजत गेला तो याच वेळी. या सर्वांचे मुळ या श्रध्दायुक्त भावनेने साजऱ्या होणाऱ्या नवरत्रौउत्सवात तर आहे ही जाणीव दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी होतेच. आणि तिच्या अंबाबाई समोर दोन हात जोडून प्रसन्न पणे उभी असलेली आईची मुर्ती डोळ्यासमोर येतेच येते अगदी आवर्जुन,आणि मी दोघींसमोरही नतमस्तक होते.🙏🙏

 नंदिनी म.देशपांडे. 
घटस्थापना, २०२१.

🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा