चोचले जिव्हेचे.
उखरी
चुली मधील निखऱ्यावर छान फुललेली उखरी त्यावर टाकलेला तुपाचा गोळा वितळून घरंगळत ताटभर पसरत जावा...तो ताटात वाढलेल्या भुरक्यात,लोणच्यात मिसळू नये यासाठी आपली होणारी त्रेधातिरपिट....मध्येच तुपाने माखलेली दोन बोटं चाटणं... अणि उखरी गरम आहे तोवर संपवणं....गट्टम करणं.....
होते थोडी तारांबळ आपली,पण आहाहा!एकदा जिभेवर घास ठेवला रे ठेवला की,ही होणारी तारांबळ कुठच्या कुठे पळून जाते....ऊलट दुसरी गरमागरम उखरी केंव्हा एकदा पानात पडते आपल्या याची वाट बघत असतो आपण....
उखरी,पानगा अशा वेगवेगळया नावानं प्रचलीत असणारा हा आपला एक पारंपारिक पदार्थ....नाश्त्यासाठी पोटभरीचा.... शिवाय पौष्टिकपणा सोबत ठेवणारा...जेवणातही हमखास चालेल असा...पण बरं का,ही उखरी अशीच कोरडी कोरडी तूप,भुरका,लोणचं, आणि शेंगदाण्याची चटणी अशीच खाण्यात गम्मत आहे... म्हणूनच ती जेवणात नको वाटते...
आधुनिक काळात निखाऱ्यांवर भाजलेली उखरी खाणं दुरापास्तच.पण,लोखंडी झाऱ्यावर गॅसच्या फ्लेमच्या मध्यम आचेवर ती बनवता येते...थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालून दुधात घट्ट भिजवलेल्या कणकेची हातावर थापून बनवलेली उखरी चवदार लागते....छानशा भाजलेल्या उखरीचा स्वाद जिभेला कशी भुरळ घालतो ते कळतही नाही.... त्यामूळे करावयास थोडं पेशन्स लागलं तरीही बदल म्हणून आठवड्यातनं एकदा अगदी चालण्यासारखं आहे....
मी करत असते नेहमी अशी उखरी,पण लहानपणी आजोळी आजीज्या हातच्या खाल्लेल्या चुलीतील निखाऱ्यावर बनवलेल्या पानग्याची आजही आठवण येतेच येते....
*नंदिनी म.देशपांडे*.
😋😋
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा