सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

बागेश्री.

दररोज सकाळी उठल्याबरोबर सर्व प्रथम माझ्या अंगणातील छोट्याशाच बागेवर, त्यावर फुललेल्या फुलांवर नजर टाकणं, ती कौतुकानं न्याहाळणं हा हल्ली माझा छंदच झालाय. उठल्याबरोबर अशी विविध रंगी प्रसन्न फुललेली, पाकळीपाकळीतून विस्तारत जाणारी फुलं,हिरवीगार पानं बघितलं की, आपलं मनही कसं प्रसन्न होत जातं...त्या फुलांसारखंच!त्यावर उडणाऱ्या फुलपाखरांसारखं स्वच्छंद विहारही करु लागतं. त्यात या वर्षी पाऊसही मस्त पडतोय!प्रत्यक्ष आभाळातून होणाऱ्या जलाभिषेकाची सर इतर कोणत्याही पध्दतीने पाणी टाकून यायचीच नाही. 
   खरे तर मी स्वतः  प्रत्यक्ष नर्सरीत जाऊन माझ्या आवडीची, रंगांची फुलांच्या वैविध्याने नटलेली काही रोपटी विकत घेऊन आले.या शिवाय विविधरंगी पानांची,आकारात वैशिष्ट्य असणारी हिरवीगार पानं असणारी झाडंही माझ्याच आवडीने आणलेली. 
     सारीच रोपटी छानपैकी रुजत मस्त फुलताना बघणं आणि ती फुलत असताना त्याच्या वाढीकडे लक्ष देणं तेवढंच आनंद दायक आहे.त्यातही आपण स्वतः जोपासना करत आहोत आपल्या हाताने, आणि त्या बागेला आलेला बहर बघणे हा अनुभव म्हणजे आईने आपल्या बाळाच्या वाढीकडे कौतुकाने बघण्यासारखे आहे. तोच निर्भेळ नितळ अनुभव मिळतो आपल्याला आपल्या बागेकडे बघून. 
   पण असे असतानाही कौतूक जास्त होतं ते त्या गुलाबराजाचंच!
तसं रोपटं फार काही छान वगैरे असं नसतं,  पण पालवी फुटायला लागली नवीन की, नव्या पाहूण्याच्या आगमनाची वर्दी घेऊन येते ती पालवी लगेच मन म्हणतं. दररोज तिचं निरिक्षण करत एक छोटीशी कळी दृष्टिस पडली की जीव हरखून जातो अगदी. मग अशा अनेक कळ्या निरखत, आकाराला येत त्यातून बाहेर पडणारं तिचं गोड हसरं रुप किंचित स्मित करत करत पाकळी पाकळीतून वाढत हासत पुर्ण फुलात रुपांतरीत होतानाच्या पुर्ण प्रवासातील नाना कळांचं एक वेगळंच सौंदर्य दिसतं मनाला. पहिलटकरणीच्या तेजस्वी चेहर्‍यावर दिसतं ना अगदी तसंचं!
     कळीच्या या बदलणार्‍या प्रत्येक रुपाचं बदलतं सौंदर्य फोटो मध्ये कैद करुन ठेवणंही तेवढेच आनंददायक!
इतर फुलांच्या बाबतीत घडत नाही असं काही. इतर फुलं ही पुर्ण फुलल्या नंतरच त्यांचं सौंदर्य मनात भरतं, आणि फोटोत कैद होतं तेही कधीच कधी. पण गुलाबाच्या फुलांची बातच काही वेगळी. After all The Rose is The King of flowers!

©️ नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा