रविवार, २ ऑगस्ट, २०२६

गीताचे रसग्रहण.

डाव मांडून भांडून
मोडू नको

आणले मी तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर
ओढू नको

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्रज्योती रसाचे
रुपेरी फुगे
फुंकणीने फुगा हाय
फोडू नको

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार
तू घातला
हार हासून घालून
तोडू नको

काढले मी तुझे नाव
तू देखिले
आणि माझे पुढे नाव
तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको

#आठवणीतील कविता#

    किती किती विनवणी आहे या शब्दांमध्ये!किती आर्जवं आहेत...एका पतीनं आपल्या संसार मोडावयास निघणाऱ्या पत्नीसाठी....
या गीतातील शब्दा शब्दांमधून या गीतातील नायकाचा (पतीचा)सच्चेपणा जाणवत जातो...
   
    दोघांनी मिळून आनंदानं थाटलेल्या संसारातून त्याची पत्नी,निघून जाण्याचं ठरवते....संसाराचा डाव मोडू बघते,त्या वेळी हा पती आपल्या पत्नीला त्या सुरुवातीच्या साऱ्या आनंदमय गोष्टींची मुद्दाम आठवण करुन देत असतो....

पती तिला एक एक आठवण सांगताना म्हणतो,संसारातली प्रत्येक वस्तू,तुझ्याच पसंतीनं मी आणलेल्या आहेत...त्या साऱ्यांना घेऊन आपण संसार मांडलाय आणि हे सारं तुझंच असताना तू दूर करु नकोस...

प्रिये,तुला मी सारी सुखं उपलब्ध करुन दिली आहेत...
ह्या सुखांना कवींनी दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या चमकत्या फुग्यांची (झाड) उपमा दिली आहे....पण हे सारं तूच तुझ्या हातानं उध्वस्त करु नकोस...

आपण दोघांनी मिळून उभं केलेल्या गोकुळाचा
(संसार)सखा,सोबती तूच मला कौतुकानं बनवले आहेस,माझ्या गळ्यात वरमाला घालत तू माझी निवड कौतुकानं केली आहेस आणि आता तोच हार (संसार)सोडून तू अशी जाऊ नकोस...

आपल्या लग्नात मीच तुझे नाव देवापुढे लिहून तुला माझी अर्धांगिनी बनवले आहे...तू पण तुझ्या नावापुढे माझे नाव लावत, मला तुझा पती म्हणून स्विकारले आहेस,ते वाचताना तू लाजतही होतीस आणि तेच माझे नाव असे पुसून टाकून जाऊ नकोस....असा मांडलेला संसार भाझ्याशी भांडून तोडू नकोस....

गर्भितार्थानं किती आशयघन असं हे गाणं आहे... लहानपणापासून रेडिओ वर लागलेलं कानावर पडणारं हे गाणं मला त्यातील अर्थही कळत नव्हता पण तरीही आवडायचं...सूर, ताल,लय साऱ्याच बाबतीत सरस असणारं म्हणूनही असेल कदाचित...पण नंतर त्यातला अर्थ समजत गेला आणि हे तर तसं बघितलं तर,मनाला क्लेश करणारं गाणं आहे हे लक्षात आलं...
      या गाण्याचे गीतकार कवी ना.घ. देशपांडे....यांच्याच गावी,मेहकरला वास्तव्याचा योग आला आणि मग त्यांची रचलेली सारीच गाणी आवडू लागली....

नागोराव घनःश्याम देशपांडे.ना.घ.देशपांडे या नावानं मराठी माणसाला परिचित आहेत...
आपलं,एल.एल.बी.
करुन त्यांनी नंतर 'वकिली' व्यवसाय म्हणून स्विकारला...पण बी ए.चं शिक्षण चालू असताना त्यांनी,
"शिळ"ही त्यांची पहिली कविता लिहिली...त्यांच्याच वर्गमित्राने ती गायली आणि ती लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द झाली...अगदी कविता वाचनाचे कार्यक्रम होऊ लागले...नंतर ती ध्वनिमुद्रित केली गेली आणि येथूनच मराठी मध्ये भावगीतांची परंपरा सुरू होत नावारुपाला आली....
या अर्थानं कवी ना.घ.देशपांडे भावगीतांचे जनक ठरले असे म्हणता येईल...

नंतरच्या काळात त्यांच्या हातून बरंच मोठं काव्यलेखन होत अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले...ललित लेखनही झालं...
त्यांच्या खूणगाठ या काव्यसंग्रहास ')साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला....

साहित्यिक कारकिर्दी शिवाय त्यांनी ईतरही अनेक क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान दिले आहे....
१९०९मध्ये जन्मलेल्या या कलासक्त व्यक्तिमत्वाचं २०००साली निधन झालं....पण त्यांच्या कवीता,गीतं,त्यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था वगैरे अनेक गोषटींमधून ते कायम आठवणीत राहिले आहेत...
अंतरीच्या गुढ गर्भि,
शीळ, मन पिसाट माझे अशी अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत...
बाबुजींनी गायलेली ना घं ची गाणी तर अप्रतीमच!
त्यांपैकीच एक हे काव्य जे नंतर गाण्यात रुपांतरीत झालं....
डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको
डाव मोडू नको.

काव्य वाचा आणि गीतही ऐकाच...

©️नंदिनी म. देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

https://youtu.be/wgdacZ9fd98

रविवार, २१ जून, २०२६

बाबा.

बाबा.
माझा जन्मदाता तुम्ही
माझा पिता तुम्हीच 
तुम्हीच माझा पहिला 
सखा अन् मित्रही तुम्हीच 
ईवल्याशा पायांना दिलात
चालविताना आधार तुम्हीच 
माझ्या आयुष्याचा
आधारवडही तुम्हीच 
तुम्हीच माझी प्रेरणा, 
तुम्हीच माझा मार्गदर्शक 
तुम्ही कायमच हितचिंतक 
बाबा,
तुमच्या शिवाय 
नाही मनाला दिलासा 
आठवणींचे काहूर देते 
 समज मनाला आणि 
सांगत रहाते नेहमीच 
सोबतच आहात तुम्ही 
   बाबा,
आशिर्वादाच्या रुपाने 
प्रेरणेच्या रुपाने अन् 
संस्कारांच्या रुपाने 
तुमची ही सोबतही 
आहेच मोलाची फार 
आदर्शांवर चालताना 
आम्हाला दिलासा 
मिळतो छान....
पितृदिनी आज 
प्रकर्षाने आठवण आली 
अन् लेखणीतून भावनांना 
कागदावर उतरवत गेली...
🙏🏻🙏🏻
ॲड. नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹

रविवार, १४ जून, २०२६

हिल्स ऑफ कर्नाटका.

लेखिका--
ॲड.नंदिनी देशपांडे. 
---------------------------
कुर्ग 
    भारतातील कर्नाटक, राज्य हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिने बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. आपण पर्यटन म्हणून भ्रमंती करावयाची ठरवली तर, ते टप्प्याटप्प्यानेच केले जाते. 
      विजापूर चा गोलघुमट फार पूर्विचबघितलेला...
पण हम्पी बदामी,
आयहोळे पडट्कल,येथील ऐतिहासिक ठेवा बघण्याची सुप्त ईच्छा दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आणि ईतिहासाच्या असंख्य खूणा डोळ्यात आणि त्यानंतर शब्दरुपाने साठवून ठेवल्या...कधीही आठवण झाली की,वाचनानंदातून पुनःश्च 
प्रत्यय घेण्यासाठी.असो 
      हा उन्हाळा आपल्या महाराष्ट्रात खूपच कहर करुन जातोय.
कोस्टल कर्नाटकाचे सौंदर्य तर अवर्णनीयच!स्वच्छ खळाळत्या बीचेसवर आणि धार्मिक अधिष्ठानाच्या बैठकीवर पेललेला हा प्रदेश कोणत्याही माणसाच्या मनाला भुरळ पाडेल असाच आहे. 
    आपल्या महाराष्ट्रात या वर्षी ऊन्हाने कहर केलाय. तेवढेच एखादा आठवडा थोडं थंड भागात वास्तव्यास जाण्याचे मनात घोळत असतानाच, पर्वतीय कर्नाटक कुर्ग भागात जाण्याचे आम्ही ठरवले. आणि भर मे मध्ये 
कुर्ग प्रांताचा तेथील निसर्गाचा आणि तेथील
प्राचीन मंदिरांच्या शिल्पकलेचा मनभरुन आस्वाद घेतला. जमतील तेवढे हे शिल्पसौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवून घेतले...
सुरुवातीलाच जाताजाता मैसूरचा सुप्रसिद्ध राजवाडा बघितला...
त्यातील भव्यदिव्य अशी दालनं,त्यातील पुरातन वस्तू, उंची वस्त्र, आणि या 
राजवाड्याचं सौंदर्यपूर्ण वास्तूकलेचं अप्रतिम उदाहरण बघून अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटतं आपल्या.
 या राजमहालाचं अंतर्गत सौंदर्य जेवढं अप्रतिम होतं तेवढंच त्याच्या बाहेरचा विशाल असा परिसर विविध पानंफुलझाडं, हिरवळ आणि स्वच्छतेनं चमचमत होतं..
      मैसूरहून कुर्गच्या मडीकेरीचा प्रवास सुखद झाला. जंगल परिसरात आपण लवकरच पोहोंचणार याचे संकेत रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या मोठे मोठे वृक्ष देत होते...
आम्ही उतरलेलं "होमस्टे" चा 'फील' येणारं रिसॉर्ट अगदी छानच होतं...
नाश्ता,जेवण चवदार, चविष्ट आणि अगदी गरमागरम असायचा. शिवाय टेबलवर सर्व्ह करण्याच्या पध्दतीमूळे ऐतं मिळाल्याच्या आनंदात दोन घास जास्तच जेवण जायचं. 
पण निसर्गाच्या सान्निध्यात असणारं आणि निसर्गाशी अगदी जवळून संवाद साधता येणारं हे रिसॉर्ट मनाला भावलं खूप...
विस्तीर्ण परिसरात भरपूर भटकंती साधत वेगवेगळी मसाल्यांची झाडं आणि कॉफीच्या बागा यथेच्छ न्याहाळता आला. 
   कुर्ग हा कर्नाटकातील डोंगराळ भागातील एक स्वतंत्र विभाग आहे. जो काही जिल्ह्यांचा आहे. या प्रांतातील घरांची रचना बघून थोडी सिमल्याची आठवण झाली. वेगवेगळ्या उंचीवर वसलेली घरं रात्रीच्या अंधारात लाईटच्या प्रकाशात डोळ्यांना लुभावत होते. 
एकूणच मेडीकेरीहून आमचा लवकर पाय निघत नव्हता हे ही तेवढेच खरे...
     मेडीकेरी येथून हसन साठी निघालो आम्ही आणि रस्त्यात असणार्या
कुशल नगर येथील भारतातील सर्वात मोठ्या असणार्या मॉनेस्ट्री पैकी दुसर्‍या क्रमांकाची तिबेटियन मॉनेस्ट्री 
बघितली...अरुणाचल प्रदेश आणि भुतानमधील बघितलेल्या मॉनेस्ट्रीजचे चित्र डोळ्यांत पक्के होऊन बसलेले त्या मानाने आपल्या भारतातील ही मॉनेस्ट्रीचा परिसर भरपूर गर्दीने व्यापलेला जाणवला...
     हसन हे कर्नाटकातील एक जिल्ह्याचे ठिकाण.हा कुर्ग विभागातच आहे. 
होयसाळा व्हिलेज रिसॉर्ट मध्ये मुक्काम करत आम्ही 
पहिल्या दिवशी उंचावर असणाऱ्या एका डोंगरमाथ्यावर कावेरी नदीचे उगमस्थान बघितले. 
त्या दिवशी वातावरण फारच अल्हाददायक होते. उंचावर असल्यामूळे ट्रेकिंग झाले. त्यात दाट धूके आणि दवाचा हलकासा शिडकावा भर उन्हाळ्यात अंगात शिरशिरी आणत होता...निसर्ग अतिशय सौंदर्यपूर्ण भासत होता...या रमणीय वातावरणातून बाहेर पडूच नये असेच कोणालाही वाटणे अगदीच सहाजिकच होते....असो. 
तेथून खाली उतरत गेलो की खाली एक प्राचीन ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेतले.मंदिर जरी शिवाचे आहे तरी त्याचा वरचा आणि कळसाचा भाग हिंदू मंदिरांसारखं नसून गोलघुमटासारखी रचना आहे. ईस्लामिक शक्तींचा प्रकोप मंदिरावर होऊ नये म्हणूनच त्या वेळी ही रचना जाणीवपूर्वक केलेली असावी असा एक मतप्रवाह आहे...
    जवळच कावेरी नदी, कन्निका नदी आणि सुज्योती नदी या तिघींचा संगम होतो ते ठिकाण बघितले...भरपूर पण संथ वाहात अंसणारे थंडगार पाणी स्पर्शून मन उल्हासित झालं..डोळ्यांना सुखावह थंडावा मिळाला.
खरं म्हणजे, उन्हाच्या काहिलीतून चार आठ दिवस थंड निसर्गाच्या सान्निध्यात जीवाला आराम मिळावा यासाठी या सहलीचे आयोजन केले आम्ही पण मला ऐकून वाचून माहिती मिळालेले हळेबिडू आणि बेलूर येथील अप्रतिम शिल्पकलेने समृध्द अशी दोन मंदिरं प्रत्यक्ष बघण्याचा योगही याच सहलीने आणला. आणि डोळ्यांचे पारणे फिटले. ही 
मंदिरं आम्ही भर दुपारी उन्हात निरखली,या विशाल परिसरात संपूर्ण पाषाणाची मंदिरं ,नव्हे खालची जमीनही पाषाणच.पण त्या शिल्पांना बघून उन्हाचे बसलेले चटके जाणवलेही नाहीत!

     हळेबिडू 

    हळेबिडू ,म्हणजे, तूटफूट केलेले.अल्लाउद्दीन खिलजीच्या सरदाराने दोन वेळेला चाल करत या मंदिराची शिल्प बरीच तोडून फोडून विध्वंस केला म्हणून या मंदिराला "हळेबिडू",(विध्वंस झालेले गाव)असे नाव पडले. 
   होयसाळा राज्याची बाराव्या शतकातली हे राजधानीचे ठिकाण. होयसाळा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे आणि ऐतिहासिक स्तरावर जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेली ही मंदिरं. 
ही दोन्ही शिवाला समर्पित 
 आहेत.एक होयसाळेश्वर आणि दुसरे केदारेश्वर. 
 हे मंदिर बांधण्यासाठी शंभरहून अधिक वर्षे लागली. अकराव्या शतकात चालू झालेले बांधकाम बाराव्या शतकात पूर्ण बांधून झाले. पण पूर्ण झाले असे म्हणता येत नाही कारण दोनही मंदिरांवर कळस नाही. कदाचित मुघलांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठीही ही योजना असावी असे वाटते. 
   मंदिराच्या बाह्य भागावर पुराणातील, रामायण महाभारतातील अनेक प्रसंग कोरुन ठेवलेले आहेत.या शिल्पकलेला तोडच नाही!शिल्पकाराच्या पाच पिढ्या हे बनवण्यात खर्ची पडल्या असे सांगितले जाते. 
   नृत्यांगनांचे कौशल्य दाखवणार्‍या निरनिराळ्या मुद्रा, असंख्य देवता,सैन्यदळ,हत्तींचे वैविध्यपूर्ण भावछटा ई.अनेक अनेक ऐतिहासिक नोंदी आपल्याला दिसून येतात या ठिकाणी!ही मंदिरं आहेत तेथे जागेवरच कोरली गेली आहेत. गुरुत्वाकर्षणाचा नियम बाजूला सारुन आपली खालून वर निमुळती होत जाणारी अफाट उंचीचा दीपस्तंभ हे एक येथे एक आश्चर्यकारक उदाहरण आपल्याला थक्क करते. अक्षरशः हा स्तंभ खालून जमिनीला टेकलेला नाही..
            
 बेलूर.

        बेलूर ही पण अकराव्या शतकात होयसाळा राज्याची राजधानी होती. हे मंदिर विष्णूवर्धन नावाच्या मूळचा जैन धर्मिय असणाऱ्या पण कालांतराने विष्णूभक्त झालेल्या राजाने वेगवेगळ्या ठिकाणांहून शिल्पकारांना आमंत्रित करुन निर्माण केलेले विष्णूचे मंदिर आहे. 
 याचे वेगळेपण म्हणजे, शिल्पकारांनी मंदिराचे निरनिराळे भाग आपल्या गावी बनवले आणि ते येथे येवून व्यवस्थित इंटरलॉक पध्दतीने बांधणी करत बसवलेले आहेत!शिल्पकलेचे आणि शिल्पकारांचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. शिवाय त्यावर चित्रकार जशी चित्राच्या खाली आपली सही करतो तश्या सह्या कोरुन ठेवलेल्या दिसतात. 
     हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक ठेव्यात स्थान मिळवून बसले आहे. 
     आंतर्बाह्य छतापासून पायापर्यंत अप्रतिम नमुने येथे बघावयास मिळतात. यातून आपली प्राचीन संस्कृती, समाजिक, आर्थिक, राजकीय ऐतिहासिक माहितीचे हे अक्षरशः भांडार आहे. 
आखीव रेखीव,नजाकतीने परिपूर्ण आणि मानवी भावभावनांच्या सुंदर अविष्काराने नटलेले शिल्पसौंदर्य शब्दात वर्णन केवळ अशक्यच!
     हे मंदिर अनेक कोनांच्या चांदणीकृत उंच पायावर ऊभे आहे. 
     हल्ली येत असणाऱ्या आणि पाश्चिमात्यांच्या नावावर खपवली जात असणारे कितीतरी वेशभुषेचे प्रकार, उदा. 
वनपीस, मीडी, नाईट गाऊन, स्विमिंग सूट, शर्टपॅन्ट, वगैरे वगैरे. त्याच प्रमाणे निरनिराळी केशरचना किंबहूणा स्रीयांचे त्यावेळीही युध्दकार्यात भाग घेतल्याचा इतिहास, त्या काळचे घोडदळ, पायदळ या साऱ्या साऱ्या गोष्टींची ऐतिहासिक नोंद येथे बघावयास मिळते. 
प्रत्यक्ष तेथे जावून भेट देवून आणि गाईड च्या सहाय्याने वेळ काढून बघावे असेच हे सौंदर्य कितीही वेळेला बघितले तरीही समाधान होणार नाही असेच आहे!
आवश्य मुद्दामहून बघावा असा हा ठेवा खूपच किंमती आणि मौल्यवान आहे आणि तो आपल्या देशात आहे हे बघून एक भारतीय म्हणून आपली मान अभिमानाने उंचावते नक्कीच. 
🌹🌹🌹🌹

रविवार, १२ एप्रिल, २०२६

आशाताई भोसले...

आशा भोसले,
या भारतमातेच्या उदरी जन्म घेतलेलं एक अलौकिक सुरांचं व्यक्तिमत्व!
     विविध भाषांतून तब्बल 12000 च्या वर गाणी गायलेली!
    मराठी भाषेविषयीच बोलायचं झालं तर, बालगीतं, भावगीतं, भक्तीगीतं, लावण्या,लोकगीतं, चित्रपट गीतं आणि नाट्यगीतं सुध्दा!
       सुरांच्या विश्वातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व!
त्यांच्या आवाजाला-सुराला
चौफेर वक्राकार फिरवण्याची कला त्यांना देवानं जन्मतःच बहाल केलेलं एक लेणंच...
आवाजातील नजाकत भावनांचे अविष्कार आणि स्पष्ट शब्दोच्चार सारंच आचंबित करणारं...
   आशाताईंचं साधं बोलंणं सुध्दा किती गोड!ऐकतच रहावं असं वाटणारं...
त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नाही पण विविध माध्यमांतून त्यांना ऐकणं ही सुध्दा एक सुंदर सुरीली पर्वणीच असते हे निश्चित...
    लता/आशा या बहिणींच्या काळात आपला जन्म झाला आणि 
अगदी बालवयापासून आपण यांना ऐकतोय, ऐकत आलोय हे खरोखरंच आपलं परम भाग्यच!
त्यांच्यातील विनम्रता, साधेपणा आभासी पध्दतीने का होईना पण अनुभवलाय आपण...
खरंच, स्वतःच्या संघर्षमय आयुष्यातून आपली वाट धुंडाळत आपलं असं खास 
अढळ स्थान निर्माण करणं,ते ही त्या वेळच्या परिस्थितीत...
हे सारं विलक्षणच!

*मी मज हरपून बसले गं 
*केंव्हा तरी पहाटे 
*चांदण्यात फिरताना 
*जीवलगा राहिले रे दूर 
*कानडाऊ विठ्ठलू 
*परवशता पाश दैवे ज्यांच्या
*शुरा मी वंदिले 
*युवतीमना 
*कठिण कठिण 
*उषःकाल होताहोता 

ही आणिक आणखी कितीतरी आवडीची गाणी !
अशा सर्वस्पर्शी भावनांच्या आवेगात गाणारा सुरीला गळा आज लौकिक अर्थाने लुप्त झाला असेल तरीही, त्यांनी त्यांच्या आयुष्यभराची आपल्या गोड, जादुई स्वरांची, सुरांची पुंजी आपल्यासाठी 
ठेवली आहे...आपले सर्वांचे सांस्कृतिक विश्व,आपली श्रवण क्षमता समृध्द करुन ठेवली आहे...
आशाताईंना मनःपुर्वक शतशत धन्यवाद तर आहेतच.🙏🏻🙏🏻
त्यांचा हा सुरेल ठेवा कायमच आमच्या मनाचा 
ठाव घेत रहाणार आहे...
आणि म्हणूनच आशाताई, तुम्ही आहात तुमच्या आवाजातून आम्हा सर्व रसिक श्रोत्यां सोबत...

तुम्हाला त्रीवार विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻

नंदिनी देशपांडे. 
🌹🌹