मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

चोचले जीव्हेचे!😋

चोचले जीव्हेचे.😋

"कंटाळा आलाय ती बटाट्याची भाजी,ते आलू पराठे आणि तो बटाटेवडा खाऊन खाऊन....आता ना एक महिना तरी मी अजिबात हात नाही लावणार त्या बटाट्याच्या पदार्थांना",...."मी पण आणणारच नाही आता बटाटे मंडई मधून...."
 हे असे संवाद अगदी घडतातच एखादी पर्यटन टूर करुन आले की....कधी एकदा घरी पोहोंचतो आपल्या,नी कधी एकदा गरमा गरम खमंग पिठलं भात खातो आपण असं वाटतंच वाटतं अगदी....
किती तरी दिवसांत जीव्हेला चवदार अन्न मिळालेलंच नाहीए...हे खाऊन तोंडाची गेलेली चव परत येते हा ठाम विश्वास असतो‌च असतो आपल्याला... 
अस्सल महाराष्ट्रीयन डिश ही कोणालाही प्रेमात पाडणारी....
पण,पिठलं त्यातही टोमॅटोचं, थोडसं आंबूस थोडं पातळसर गरम वाफाळलेल्या मऊसूत भातावर तूपाचा गोळा टाकून खाण्यापेक्षा कधी कधी खमंग ‌पिठल्यातला शिजवलेला भातच जिव्हेला मोहात पाडतो मला तरी....एकत्रित शिजवल्यामूळे तो एकजीव बनत आणखी चवदार लागतो....तो रसरशीत पिठल्यातला भात टोमॅटो हिंग,जिरं युक्त असा आणि वरतून लोणकढ्या तूपाची धार,सोबतीला ठेचा,कच्चे शेंगदाणे,कांदा असेल तर अशा गरम गरम पदार्थाची चव काय व्दिगुणित होते म्हणून सांगू!....
वा!व्वा! आठवड्यातून एकदा तरी रात्रीच्या जेवणासाठी ही डिश बनवायलाच हवी....अशीच प्रतिज्ञा नक्कीच घेतली जाईल घराघरांतून....बघा तर एकदा चव घेऊन....

*नंदिनी म.देशपांडे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा