गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

व्दारका.

*द्वारका*

अहमदाबाद मधील वास्तुकलेचं आणि कोरीव शिल्पकलेचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेत, दुसऱ्या दिवशी सकाळीच पोटपूजा करुन आम्ही,त्या जगदीशाच्या 'द्वाराच्या' दिशेने, द्वारकेच्या दिशेने प्रयाण करते झालो.

    रामेश्वरम बघितले ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच. पण दोन वेळेला तीन महासागरांच्या सान्निध्यात राहून 'तो' निसर्ग अनुभवता आल्याचे समाधान मिळाले!

 उत्तरांचल केले ते सुद्धा हिमालयाच्या सानिध्यात रहाण्याच्या ओढीने!तेथील भव्यदिव्य निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी!पण या अन्वये, दोन पवित्र धामा चे दर्शन घडलंयं आपल्याला! ही जाणीव   आत्ता, म्हणजे द्वारकेशाला सन्मुख जाताना प्रकर्षाने होऊ लागली होती. 

   आपल्या भारतीयांची ही श्रद्धास्थानं. ती आम्ही प्रत्यक्षात अनुभवत आहोत,त्या समोर जाऊन हात जोडत समाधानानं त्यांच्यासमोर लीन होत आहोत,ही भावना खूपच सुखावह नी कृतकृत्य करणारी अशीच होती! कधीही जाणीवपूर्वक मनीमानसी न ठरवता, आपण परमार्थाच्या वाटेवरुन पर्यटनही साधतोआहोत,याचा अलौकिक आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.गुजरात सारख्या नर्मदेच्या पाण्यानं व्यापून असणाऱ्या संपन्न प्रदेशातून प्रवास करत करत आनंद लुटणं, ही एक छान संधी होती आम्हासाठी!

     अहमदाबाद ते द्वारका हा आठ एक तासांचा प्रवास. खूपच आल्हाददायक होता. रस्त्याचे रुपडे छानच. चार आणि सहा लेन्स असणारे भव्य रस्ते. टापटीपपणा असणारे. शिवाय रस्त्यांच्या दुतर्फा लांब पर्यंत कापसाची, भुईमुगाची,तीळ, बाजरी यांच्या जोडीला तांदूळ, ज्वारी यांची शेतं.दर दहा दहा किलोमीटर अंतरावर मोठी जलाशयं! कुठं तलावाच्या रुपात तर कुठे विहिरींच्या रुपात! पाण्याची वानवा कुठेच दिसत नव्हती.ठिकठिकाणी धरणही आपली उंची मान वर करुन दाखवत होती. खळाळून वाहत वाहत नर्मदा मातेच्या रुपानं निसर्गानं भरभरुन दान घातलंयं या भूमीला. त्यामुळे डोळ्यांना सगळीकडेच प्रसन्नतेची बिछायत घातलेली आहे, लक्षात येत होतं.

    जाताना वाटेमध्ये विरपुर या छोट्याशा गावातील जलाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गुजरातमध्ये साऱ्या ठिकणी त्यातही मंदिरांमध्ये स्वच्छतेचे व्रत काटेकोरपणे पाळलं जातं.याचे ठिकठिकाणी दाखले मिळत होते.जलाराम मंदिर गावठाणातच आहे. हे मंदिर आपल्या शिर्डीच्या साईबाबां प्रमाणेच सत्पुरुष होऊन गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ कधीकाळी बांधलेलं. हे जलाराम मंदिर, बर्‍यापैकी मध्यम आकाराचं.वीरपूर हे गाव येथील जलाराम मंदिरामूळे मोठ्या वर्दळीचं बनलं होतं.        

    जलाराम नावाचे सदगृहस्थ, मोठे दानशूर आणि सत्पुरुष होऊन गेले .या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे सकाळी आठ वाजेपर्यंतच दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भावीकासाठी प्रसाद म्हणून मोफत जेवण बनवलेलं असतं.पण,एकदाच सकाळी बनवलेलं हे जेवण, दिवसभरात कितीही मोठ्या संख्येत भाविक आले तरीही अजिबात कमी पडत नाही! हे आश्चर्यच! अन्नपूर्णेचा भरभरून वरदहस्त लाभलाय या शहराला, मंदिराला!

     साधारण सायंकाळ होण्यापूर्वी आमचा द्वारकेत प्रवेश झाला. रानातून चारुन परतत आपल्या गोठ्याकडे रमत-गमत जात असतानाची किती तरी गायी वासरं दिसत होती. हे चित्र कितीतरी वर्षानंतर डोळ्यांना अनुभवयास मिळत होतं! द्वारकेत प्रवेश करताच गोकुळात प्रवेश केल्याची जाणीव  मनस्वी सुखावून गेली! गावातील रस्त्यांवर भरपूर मोठ्या प्रमाणावर आपल्या देशी गायी वासरं यांची गर्दी दिसत होती. गावही आपल्या पुरातन खुणा सांभाळत व्दारकेशाला अंगाखांद्यावर खेळवत आहे.असं वाटत होतं! नंदलालाच्या कुमारवयातील आणि तरुणपणातील वास्तव्याचं हे शहर! साक्षात श्रीकृष्णाच्या शहरामध्ये आपण पाऊल ठेवलं आहे. साक्षात परमेश्वराचा वास असणारं कृष्णमय झालेलं  असं हे शहर! प्रत्यक्ष द्वारकाधीशाच्या सान्निध्यात आपण दोन दिवस राहणार आहोत! ह्या कल्पनेनंच मन प्रफुल्लित बनलं होतं.

     गावात प्रवेश करताच त्याच्या मंदिराचा कळस दिसला. आणि आपोआप हात जोडले गेले.दुसऱ्या दिवशी सकाळीच मंगल आरती साठी मंदिरात पोहोचायचे आहे. या ओढीनं डोळ्यांवर निद्रेचे पांघरुण घेत झोपी गेलो आम्ही.

     गुजरातच्या मुख्य देवस्थानाच्या मंदिरांमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या मंगल आरती चे फार महत्त्व आहे.नव्हे, या आरत्या म्हणजे,तेथील देवतांचे दिपसोहळेच म्हणता येतील! पहाटेच शुचिर्भूत होऊन सूर्योदयाच्या आत, आम्ही जवळच असणार्‍या द्वारकाधीशाच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो.पवित्र आरतीचा सोहळा बघण्यासाठी भाविकांनी बरीच गर्दी केलेेली होती.मंदिराच्या गाभार्‍यात मूर्तिला सालंकृत सजवून   असंख्य दिव्यांच्या साह्याने भव्यतेचे दर्शन देणारी आरती केली जात होती!ही आरती म्हणजे आपल्या डोळ्यांना आणि मनाला सुखावून टाकणारा एक उत्कट क्षण असतो! मंगलमय वातावरणात टाळ,झांज, घंटांच्या नादात भगवंताची स्तुती सुमनं, गीत, आरत्या म्हटल्या जातात. त्यावेळी माणूस भगवंतावर स्थिरावलेली आपली नजर तसूभरही हलू देतत नाही.चित्त प्रसन्न होऊन वृत्ती भक्तिमय होऊन जातात. आरती संपेपर्यंत आपण भगवंताच्या समोर, त्यांच्या सानिध्यात आहोत ही जाणीव खूप ऊर्जा देऊन जाते! आरतीच्या वेळी मंदिरात खूप गर्दी होती प्रत्येकालाच आपण हा सोहळा 'याची देही याची डोळा', बघावा अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण, प्रत्येक जण भक्तिरसात न्हाऊन निघालेला असतो.त्यामुळे गर्दीची कोणीही पर्वा करत नाही.या गर्दीचे शक्य तेवढे नियोजन करत शांतता आणि शिस्त राखण्याचे काम मंदिर प्रशासनाकडून बऱ्यापैकी चोख बजावले जाते.

व्दार कहॉं?व्दार कहाॅं?(भगवंताचं)असा प्रश्न विचारत विचारत आपल्या जिवलग मित्राला भेटावयास येणार्‍या सुदाम्यानं व्दारके मध्ये पाऊल ठेवले.भगवंताला, द्वारकाधीशाला, आपल्या मित्राला भेटण्याची ओढ त्यांना अनावर झालेली होती. म्हणूनच या शहराला "द्वारका"(व्दार कहाॅं चा अपभ्रंश)हे नाव पडलं. असेच सांगितले जातं. हे मंदिर म्हणजे 
द्वारकाधीशाच्या दरबाराचे ठिकाण होय. येथून सारा राज्यकारभार श्रीकृष्ण भगवान चालवत असत.
 पण त्यांच्या कुटुंबासमवेत रहावयाचे ठिकाण, घर मात्र 'बेट द्वारका' या ठिकाणी होतं.आजही हे ठिकाण, ही वास्तू जतन करुन ठेवलेली आहे. 

   जवळच असणाऱ्या बेट द्वारकेला मात्र थोडा गाडीचा व पंधरा मिनिटांचा बोटीचा प्रवास करुन जावे लागते. समुद्रात असणारे बेटच ते! आपला मित्र, सुदामा जेंव्हा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेत आले,तेंव्हा, भगवान श्रीकृष्ण आपल्या राहत्या घरी, त्यांना रहावयास घेऊन  आले.त्यांना काही दिवस ठेवून घेत,त्यांचा यथोचित सत्कार पाहूणचार मोठ्या आनंदानं केला भगवंतानं! ही अनोख्या मित्रप्रेमाची विशिष्ट खूण, जागा या घरात आजही जपून ठेवलेली आहे.गावातच, वस्तीत असणारं ही घरवजा मंदिराची मोठी प्रसन्न वास्तू आहे.भगवंताची पायधूळ लागलेल्या या पवित्र वास्तूला, आपलाही पदस्पर्श घडणं म्हणजे केवढा भाग्याचा क्षण! ही भावना मनात रुंजी घालत राहते. प्रत्येक जण आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याच्या आनंदानं भरुन पावल्याच्या समाधानात असतो. 

व्दारकेशाच्या राजवाड्याला,राहत्या घराला भेट दिल्यानंतर 'नागेश्वर' नावाच्या ज्योतिर्लिंग असणाऱ्या मंदिराला आम्ही भेट दिली. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आपल्या औंढा नागनाथाचा नागेश्वर आहे .असे आपण मानतो. पण गुजरातमध्ये हाच नागेश्वर 'ज्योतिर्लिंग' म्हणून गणला जातो. मंदिराची भव्यता डोळ्यांचे पारणे फेडते. यानंतर बघितलेले २५०० वर्षे जुने असणारे, पण बाराव्या शतकात पुनर्निर्माण केलेले रुक्मिणी मातेचे मंदिर. त्यावरील देव देवतांची शिल्पे कोरीवकाम बघण्यासारखे आहे. रुक्मिणी मातेचा कुमकुम प्रसाद घेत समाधानानं आपण बाहेर पडतो. 
 
    व्दारकेत फिरत असताना ठिकठिकाणी लोण्या सह दही विकणारे गवळी पावलोपावली दिसतात. अगदी माफक दरात ते असे दही विकतात. तेंव्हा आपण महाराष्ट्रात एक लिटर दुधासाठी पन्नास-साठ रुपये मोजतो.हे शल्य वाटल्यावाचून राहत नाही.द्वारकेत पाऊल टाकता क्षणीच दिसून आलेल्या भरपूर संख्येतील गायींचे गुपित हे शुभ्र पांढरे लोणी बघून पटकन लक्षात आले. व्दारकेशाच्या समोर उभे राहून, सायंकाळी पुन्हा एकदा पवित्र अशा मंगल आरतीचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवला.

    द्वारकाधीशाची मूर्ती छोटीशीच पण नटखट चेहऱ्याची आहे असा भास होत होता.कृष्ण भगवान बालवयातील नसून कुमार अवस्थेतील तरुणपणातील आहेत हे पटकन लक्षात येत होतं! काळ्या  पाषणाच्या या मूर्तीला विविध रंगांच्या वस्त्रांनी, अलंकारांनी सजवलेलं होतं. मुर्ती मोठी लोभस दिसते ही! गदाधर आणि चक्रधर  भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडून टाकतो अगदी!दर्शन झाल्यानंतर मिळणाऱ्या लोणी आणि साखर या प्रसादानं आत्मा तृप्त होतो.व्दारकेशाला  डोळ्यात भरभरुन साठवून घेत, त्रिवार नमन केलं.आणि दुसऱ्या दिवशी सोमनाथाच्या दर्शनासाठी निघण्याची तयारी आम्ही करू लागलो....

*नंदिनी म.देशपांडे*.
    औरंगाबाद.

👑👑👑👑👑👑

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा