शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

सोरटी सोमनाथ.

*सोरटी सोमनाथ*

सौराष्ट्र सोमनाथंच  श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्ययिन्यां महाकाल ओमकारम मल्लेश्वरम्। परल्या वैजनाथंच  डाकिन्यां भीमाशंकरम्।  वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे। हिमालये तु केदारं
घृष्णेशं शिवालये ।।

पवित्र अशा बारा ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक मनात सारखा रुंजी घालत होता, जेंव्हा आम्ही द्वारका नगरी चा निरोप घेऊन सौराष्ट्रातील सोमनाथा च्या वाटेवर गाडीत बसून धावू लागलो. द्वारके हुन सोमनाथाकडे जाताना आपण आता हळूहळू समुद्रसपाटीच्या समिप जात आहोत, याची वर्दी हवेतील दमटपणा आणि खाऱ्या पाण्याचा एक विशिष्ट वास आपल्याला देत आहे, असे लक्षात आले,
   
    आमच्या या प्रवासात मार्गावर पोरबंदर या शहराला भेट दिली. पोरबंदर हे शहर, श्रीकृष्णाचा बाल पणीचा मित्र, सुदामा यांचे जन्मस्थान.सुदामाचे छोटेसे मंदिर येथे बघावयास मिळते.या परिसराला 'सुदामपुरी', असे संबोधले जाते.

    या शहराची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे, राष्ट्रपिता महात्मा गांधींचेही हे जन्मगाव. त्यांचे निवासस्थान गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी बाजाराला लागूनच आहे.आज जुन्या पद्धतीच्या रचनेने युक्त असे तीन-चार खोल्यांचे हे छोटेखानी घर बघताना, महात्मा गांधी यांच्या बाबत इतिहासात सांगितलेले अनेक प्रसंग आपण वाचले आहेत याची आठवण होते. त्यांच्या जन्माच्या वेळी साक्षीदार असणारी ती खोलीही खास आठवण म्हणून आज दाखवली जाते पर्यटकांना.

याच मार्गावर "भालका तिर्थ",हे ठिकाण बघण्याचे प्रचंड कुतूहल होते आमच्या मनात! तुम्ही म्हणाल येथे काय असे विशेष होते? पण खरंच,महाभारताच्या दृष्टीने आणि कृष्ण अवताराच्या दृष्टिने या जागेला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. भालका तीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी एकशे पंचवीस वर्ष आयुष्य लाभलेल्या श्रीकृष्णांचा वध झाला ते ठिकाण.आश्चर्य वाटलं ना कि देवांनाही मृत्यू असतो हे ऐकून! त्यांचाही वध होऊ शकतो याचे!पण, दुर्दैवाने हे सत्य आहे. जरा नावाच्या एका पारध्याने आपला बाण श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्यावर मारला. केवळ अनाहूतपणे ही कृती या पारध्याकडून घडली. पण ती श्रीहरीचा प्राण घेऊन गेली,असेच म्हणावे लागेल.
  श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली दुपारची वामकुक्षी घेत होते. एका पायाच्या गुडघ्यावर दुसऱ्या पायाचा तळवा टेकवून पहुडलेल्या स्थितीत ते असताना, जणू काय हे हरिणच आहे.असे समजत लांबून या पारध्यानं हरणाची शिकार करण्यासाठी म्हणून बाण मारला.तो नेमका श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्यात  घुसला आणि श्रीकृष्ण गतप्राण झाले. याठिकाणी आजही त्या झाडाचे अवशेष दिसून येतात. त्या जागेवर कृष्णाची त्याच अवस्थेत झोपलेली मूर्ती आपण बघतो. जणू हा सारा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर तरळून जातो.
   देवांचा अंत घडून आलेलं भालका तीर्थ पाहून क्षणभर मन हेलावून जातं.

 यानंतर आम्ही भारतमाता मंदिराला भेट दिली.अगदी ओसाड ठिकाणी,जिथे फारशी वर्दळही नाहीए,अशा ठिकाणी एका भव्य हॉल मध्ये हे मंदिर आहे.माझ्या कल्पने नुसार तेथे आपल्या भारत मातेची मूर्ती असावी असे वाटले होते.पण तसे नव्हतेच.तेथे सिमेंटच्या असंख्य उंचच उंच खांबावर,भारतमातेच्या उदरात जन्म घेतलेल्या असंख्य सत्पुरुषांच्या आणि विदुषींचे मोठी मोठी पेंटिंग्ज आहेत.ते बघून अभिमानाने आपला ऊर भरुन येतो.
त्यात आपले ज्ञानेश्वर माऊली आणि जिजाऊ पण आहेत.ह्या सर्वांची चित्र रुपानं होणारी ओळख मनावर कोरली जाते कायमची.या शिवाय याच ठिकाणी खाली जमिनीवर प्रचंड मोठा असा भारत मातेचा नकाशा, सिमेंटच्या सहाय्याने कायम स्वरुपी बनवलेला आहे.त्यामूळे भारत मातेच्या कानाकोपऱ्याची आपल्याला पटकन ओळख होते.खूपच सुंदर ठिकाण आहे हे.पण येथे पर्यटकांची फारशी वर्दळ दिसत नाही याचे शल्य वाटले मनाला.

    सायंकाळच्या सुमारास समुद्राच्या काठाकाठाने आपण सोरटीसोमनाथ या शिवालयाच्या सानिध्यात पोहोचलो. हे लक्षात आलं. 
   सोमनाथ,
 बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले असणारं असं खूप प्राचीन, सागराच्या संगतीनं, या निसर्गाचं, हवामानाचं, एवढेच नव्हे तर, काळाच्या ओघात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या राजसत्ता, त्यांच्या राजकारणाचे अर्थकारणाचे आणि समाजकारणातील चढ उतारांचे चटके या दोघांनी सहन केलेले. यांच्या घणाघाताने तावून सुलाखून निघालेल्या या सागर लहरींनी आणि मंदिराच्या एका एका पाषाणाने ढाल बनवून या शिवलिंगाची प्राणपणाने जपवणूक केली. त्याच्यावर कोणतीही आंच येऊ न देता त्यांच्या देवत्वाचं संरक्षण केलं. म्हणूनच आपण सर्वजण आज मोठ्या भक्तिभावाने या सोमनाथा समोर नतमस्तक होऊन चार क्षण मनःशांती मिळवत कृतकृत्य होतो. प्राचीन मंदिर थोडेसे अलीकडे, हेमाडपंथी असून त्यात तळमजल्यावर  मन प्रसन्न करणारी शिवपिंड आहे कालांतराने अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असे इतिहास सांगतो.

 सागराच्या समीप असणारे सोमनाथाचे मंदिर बांधले ते सोनेरी पाषाणात! हे अतिशय भव्यदिव्य स्वरूपात बांधलेलं आहे. १९५१ साली स्थापन झालेल्या या मंदिरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.पश्चिमेच्या सागर किनाऱ्यावर वसलेले हे देवालय, तीर्थक्षेत्र अतिशय रम्य आणि अप्रतिम आहे. मंदिराच्या भिंतीवरून सागर लाटा न्याहाळताना आपण कितीतरी वेळ उभे आहोत हे लक्षातही येत नाही!जणू काही या मंदिराच्या वैभवशाली इतिहासाची कहाणी सागर आपल्याला कथन करतो आहे असं वाटत रहातं.
   सायंकाळी मंदिराच्या गाभाऱ्यात होणाऱ्या आरती चा महिमा काय वर्णावा !भव्यदिव्य स्वरूपात होणारी आरती बघताना आपण भक्तिरसात न्हाऊन निघतो. त्यानंतर मंदिराच्या आवारात मंदिरावर दाखवण्यात येणारा साऊंड आणि लाईट शो केवळ अप्रतिम!मंदिराची गाथा आपण याच वास्तूच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकत आहोत ईतपत भास व्हावा असे आपण यात रममाण होऊन जातो. हा सारा इतिहास ऐकून आपण अक्षरशः भारावून जातो. पुन्हा एकदा या ठिकाणाला भेट देण्यासाठी यावयास हवेच. ही ईच्छा मनोमन व्यक्त करतो आणि तेथे मिळणारा चुरम्याच्या लाडूचा मधुर प्रसाद जिभेवर ठेवतो...

© 
*नंदिनी म. देशपांडे*

✴️✴️✴️✴️✴️✴️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा