मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

नॉर्थ ईस्ट थ्री सिस्टर्स सहल.

🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री. 
             सिस्टर्स सहल 🎍

©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे. 
तेजपूर --- दिरांग.

    आसाम मधलं तेजपूर हे ठिकाण, म्हणजे, अरुणाचल प्रदेशात प्रवेश करताना प्रवासाचे ठराविक अंतर पार करत; आराम करण्यासाठी एक सोयीचे ठिकाण... याच दृष्टिकोनातून हा मुक्काम होता आमचा...अर्थातच आल्हाददायक निसर्ग, थंडगार वाहती हवा, आणि सोबतीला पर्वतीय रांगांच्या महिरपी....असे सारे असेल तर माणसाला प्रवासाचा कंटाळा आणि शीण दोन्हीही येत नाही...निसर्गा चे अवलोकन करणं हा छंद असेल जवळच तर अशी भटकंती म्हणजे दुग्धशर्करा योगच!

    तेजपूर ते दिरांग या प्रवासात मात्र आपण आता पहाडांच्या वरच्या भागावर जात आहोत याची जाणीव होऊ लागली...आता पर्यंत च्या प्रवासात लांबून वळसा घालावयास लावणारी वळणं आता मात्र आपला व्यास कमी कमी करत चालली होती...तापमानात घटही कमालीची लक्षात येत होती...
हिमालयाच्या हिमाच्छादित रांगा जवळपासच असाव्यात याचे ज्ञान मनाला आणि वृत्तींनाही जाणवत होते...नव्हे, आता तर हिमाच्छादित शिखरं दृष्टिक्षेपात येऊन अंगावर रोमांच उभे राहू लागले...
    काळ्याशार पहाडांवर शुभ्र बर्फाच्या कणांनी, तुकड्यांनी रेखाटलेली सुंदर रांगोळी म्हणजे त्या अंबराच्या स्वागतार्ह, पाहूणचारासाठी या अवनीने स्वतःच्या हाताने रेखाटलेली सुंदर नक्षीदार रांगोळीच असा भास होत होता....
हा दिवस दिरांग च्या सान्निध्यात घालवला आम्ही...
प्रत्येक हॉटेलच्या परिसरात फुलांचे वैविध्य, त्यांचे रंग आणि रचना मनाला मोहवत असायची...प्रत्येक फूल डोळ्यात आणि फोटोतून जपण्याचा मोह खरोखरच अनावर होत असायचा...

   अरुणाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश आहे...येथे भारतीय सैन्य दलाच्या परवानगीशिवाय आपण या भुमीवर प्रवेश करु शकत नाही...
ठिकठिकाणी भारतीय सैन्यदलाचे रेजिमेंट्स आपल्याला दिसून येतात...भारतीय जवान पावलापावलावर तळ ठोकून आपल्या भारतीय सीमेचं संरक्षण करत असतानाचे दृश्ये दिसत रहातात...हे बघून आपला उरही अभिमानाने भरून येतो, आणि आपले मन अगदी नकळत त्यांचे आभार मानू लागते...
 आम्ही महाराष्ट्रीयन आहोत म्हटल्यावर,प्रवेशालाच एक सैनिक आमच्याशी मराठीत संवाद साधत होता..'मी लातूरचा आहे' असे त्याने म्हणताच,कृतकृत्य झाल्यासाखे वाटले...बुलढाण्याच्या एका सैनिकानेही मुद्दाम आपली महाराष्ट्रीयन ओळख सांगितली आणि आम्हाला फार आनंद वाटला...त्यालाही आमच्याशी बोलून छान वाटत आहे हे लक्षात आले आमच्या..

  दिरांग वरुन तवांगला जातानाच्या  प्रवासाच्या रस्त्यात आम्ही 500 वर्षे जुनी असणारी मॉन्स्ट्री (भगवान गौतम बुध्दांचा मठ) बघितला...
    किंबहूणा अरुणाचल प्रदेश हा भव्य दिव्य मॉन्स्ट्रीजचा प्रदेश आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....
  भगवान गौतम बुध्दांचा वास या भुमीला सदैव शांती, प्रेम, आस्था बहाल करतो...एका बाजूला निसर्गाचे विराट रुप, स्वर्गाच्या स्पर्शाला आसुसलेले प्रचंड मोठे हिमाच्छादित शिखरं...आणि दुसरीकडे मॉनस्ट्रीजचे पावित्र्य यांचा सुंदर मिलाफ साधून ताठ मानेने ऊभा असणारा हा प्रदेश...
बौध्द धर्माची विलक्षण छाप जपणारा असाच आहे...
ठिकठिकाणी शांतीचा संदेश देणाऱ्या पताका फडकावत संदेश देत रहातो...
एकापेक्षा एक भव्य दिव्य मॉन्स्ट्रीज, त्यात असणारे,गौतम बुध्दांचे भव्य पुतळे आणि समानतेचा संदेश देणारी त्यातील अनेकविध गोष्टी, वस्तू, तेथील प्रचंड मोठे ध्यान मंदीर आणि मनाला मिळणारी शांतता हे सारंच अद्भुत आहे हे जाणवत रहातं...
  अशा कितीतरी मॉन्स्ट्रीज ना आम्ही भेटी देवून मःशांती अनुभवली या प्रदेशात! प्रत्येक मठातील स्वच्छता, रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांची जोपासना आणि रचना हे सारंच अप्रतिम होतं!

      सेलापास....
    -----------------

तवांगच्याच या रस्त्यामध्ये "सेलापास" नावाचे एक सरोवर आहे...1962 च्या भारत चीन युध्दात सेला नावाच्या मुलीने भारतीयांच्या विजयासाठी फार महत्वाची भुमिका(मदतनीस म्हणून)
बजावली होती...
तिच्या स्मरणार्थ भारत सरकारने बनवलेले हे सरोवर आहे...
   तवांगची ही भुमी हे युध्द चालू असतानाची साक्षिदर आहे...युध्द यशस्वीपणे पेलत, विजयश्री आपल्याकडे खेचून आणली तेच हे 'तवांग' होय....
      सेलापास या सरोवराने तवांगला उर्वरीत भारतभुमीशी जोडून ठेवलेले आहे...म्हणूनही हे सेला पास....
निसर्गाचा अप्रतीम अविष्कार असणारा सेला लेक अक्षरशः आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो...दुतर्फा शुभ्रतेने नटलेले हिमपर्वत....संपूर्ण पणे गोठून पाणेरी कडक बनलेला चकचकीत पृष्ठभाग म्हणजेच सेला लेक होता..
अगदीच अवर्णनीय होतं हे सारंच...या ठिकाणी ऑक्सिजन चे प्रमाण कमी असते म्हणून बऱ्याच  लोकांना त्रास होऊ शकतो...पण आम्हाला तसे काही जाणवले नाही...याच निसर्गरम्य परिसरात किततरी वेळ रेंगाळत आम्ही आमचे पॅक लंच उघडले आणि मनसोक्त पिकनीक साधून घेतली...

    भारत-चीन युध्दात फारच महत्वाची जबाबदारी पार पाडत शहिद झालेले कॅप्टन जसवंत सिंह यांच्या स्मरणार्थ ऊभे केलेले एक अनुपमेय  मेमोरियल बघण्याचा योगही याच तवांगने घडवून आणला...
"जसवंत घर" असे त्याचे नाव...
प्रत्येक भारतीयाचे स्फुर्तीस्थान असणारे हे ठिकाण... आम्ही विनम्रपणे अभिवादन करत जसवंत सिंहाचे मनोमन आभार मानले...शुध्द हवेवर ऊंच फडकणार्या आपल्या तिरंग्याला आणि जसवंत सिंहांच्या स्मृतिंना जयहिंद करत आम्ही  तेथून निघालो...
   
   महाराष्ट्रभर कडक उन्हाळा असताना आम्ही मात्र थंडीमध्ये कुडकुडत त्या रात्री गरम पांघरुणात लपेटून निद्रादेवीच्या स्वाधीन झालो..

     प्रसन्न सकाळी भरभरुन मोकळा श्वास घेत आम्ही दुसरे दिवशी तवांग शहरात असणाऱ्या जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सुंदर मॉन्स्ट्रीला भेट दिली...18 फुट ऊंच असणारा भगवान गौतम बुध्दांचा 
भव्य पुतळा कुठूनही लक्ष वेधून घेत होता...सभोवती असणाऱ्या हिमालयाच्या रांगा आपल्या भोवती फेर धरुन आनंदाने नाचत आहेत असा भास होत होता...या अवनीचे अतीसुंदर रुप आपण जवळून न्याहाळत आहोत ही भावना मनातून कृतज्ञता व्यक्त करत आहे या निसर्गा प्रती... हे समाधान घेऊनच अख्खा दिवस तवांगच्या रम्य सान्निध्यात राहिलो आम्ही.... त्याच सायंकाळी,तवांग वॉर मेमोरियल येथेच नितांत सुंदर असा लाईट अँड साऊंड शो बघितला....
राष्ट्रध्वजाला वंदन करत राष्ट्रगीत गायले आणि तवांग च्या भुमीचे आभार मानत दुसरे दिवशी सकाळी तेथून पुढच्या प्रवासासाठी म्हणजे बोंम्डिला या गावी जाण्याची परवानगी घेतली...

  तवांग --- बोंम्डिला.
-------------------------

   दोन दिवस मस्तपैकी तवांग हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण अनुभवले आणि तिसरे दिवशी बोम्डिला या गावी जाण्यास निघालो आम्ही....प्रवास 175 कि.मी.चा, बऱ्या पैकी मोठे अंतर कापायचे होते...कोणताही त्रास होऊ नये आणि कंटाळवाणाही होऊ नये याची भरपूर काळजी घेण्यात येत असे...
मुळात मेघालय आणि अरुणाचल प्रदेशाची सहलीचा हेतूच निसर्गाच्या सान्निध्यात अगदी समरसून रहाणे, अनुभवणे आणि आनंद मिळवणे हा होता....अशा निसर्गात भटकंती कोणाला आवडणार नाही!!...शिवाय रस्ते एकदम छान होते...अगदीच काही ठिकाणी काम चालू असल्याने अगदी थोडी गैरसोय व्हायची पण अगदीच नगण्य अशीच...
     गाड्या आरामदायक होत्या, चालकही चांगले होते आणि नागमोडी चालीने प्रवास करण्यास मज्जा येत होती...
   
      तवांगहून बोम्डिला शहरी जाताना रस्त्यात "गँगॉंग अन् गमपा"
या ठिकाणी अति सुंदर असा "नुरांन्ग"
नावाचा अती उत्कृष्ट निसर्गाविष्कार आम्ही बघितला...हा एक डोळ्याचे पारणे फेडणारा सुंदर धबधबा आहे...
ऊंचावरुन वेगाने खाली पडणारे शुभ्रफेसाळ पाणी, आसमंतात आपले तुषार उडवत आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करतात...या धबधब्याच्या अगदी पायथ्याशी जाऊन उभे रहाण्यात आणि हा थंडगार शॉवरबाथ घेणं एक अविस्मरणीय अनुभव आहे...
हेच फेसाळलेले पाणी खाली पडून नदीमध्ये एकरुप होऊन आपला प्रवाह शांत करते...नयनसुख काय असतं ते प्रत्यक्षात अनुभवायलाच हवं...
    सेला लेक ज्या प्रमाणे सेला नावाच्या मुलीच्या स्मृती जपण्या साठी तयार झालाय... 
अगदी त्याच कार्यात (युध्दजन्य परिस्थितीत) सैनिकांना मदत केली म्हणून सेलाचीच मैत्रीण,नुरांग् हिची आठवण म्हणून या धबधब्याला "नुरांग्न वॉटरफॉल" असे नाव देण्यात आले आहे...
बराच वेळ रेंगाळत या धबधब्याचा आनंद अनुभवला आणि आम्ही बोम्डीलाच्या दिशेने प्रयाण केले...

    बोम्डिला शहर प्रवेशाच्या अगोदर आणखी एका बौध्द मठाला भेट दिली...
   दिवसभराच्या प्रवासाने आरामाची आवश्यकता आहे ही जाणीव करवून दिली आणि यथेच्छपणे रात्रीचे जेवण घेऊन आम्ही  निद्रेच्या स्वधिन झालो...थंडीचा कडाकाही काहीसा कमी झालेला होता....सकाळी पुनः कझिरंगाच्या प्रवासासाठी सिध्द व्हायचे होते आम्हाला...

बोम्डीला--काझीरंगा .
   दुसरा दिवस आमच्या सहलीच्या शेवटचा टप्पा ठरणार होता...बोम्डिला ते काझिरंगा हा सहा तासांचा प्रवास करुन आम्ही आसामच्या काझीरंगा या जुन्या आणि मोठ्या अशा राष्ट्रीय पार्क मध्ये प्रवेश केला....
पार्क असले तरीही एक मोठे शहरच होते हे!फार मोठा परिसर या पार्क च्या रुपाने पालथा घालण्याची संधी मिळाली आम्हाला....
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे पार्क एप्रिल च्या शेवटा पर्यंतच पर्यटकांसाठी खुले असते...
  मे पासून आसामात पावसाळा चालू होतो...ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी वाढते आणि सारं जंगल तिच्या पाण्याने व्यापून जाते...एप्रिल च्या शेवटी तेथे असणारे प्राणी, पक्षी डोंगराळ भागाकडे कूच करतात...
 काझिरंगा नॅशनल पार्क मध्ये कायम दलदल असण्याचे हेच खरे कारण आहे....
मार्च च्या शेवटीही जंगलामध्ये भरपूर पाण्याचे साठे असल्याचे दिसून आले...
   हे जंगल फारसे दाट नसावे असे वाटते....पण गेंडे आणि हत्ती यांची बरीच वर्दळ असणारे हे ठिकाण आहे...
   आमचे मुख्य आकर्षण होते ते  म्हणजे हत्तीवर स्वार होऊन जंगलात सैर करुन येणे...
      दुसर्‍याच दिवशी भल्या पहाटे आम्ही हत्तीच्या सफारीसाठी जंगलात पोहोचलो...माहूत आपले हत्ती घेऊन तयारच होते...
अंबारीवजा बेंचेस ची व्यवस्था स्वार होण्यासाठी हत्तीच्या पाठीवर होती...बसे पर्यंत थोडी भिती वाटली...पण मग मात्र निश्चिंतपणे मुक्त सैर केली जंगलात...या एक दीड तासाच्या सफारीवर असताना आम्हाला बरेचसे गेंडे, हत्तीचे कळप, हरीण, सुसर असे प्राणी दिसले...
रानरेडे, आणि काही पक्षी एवढीच काय ती संपत्ती दिसली जंगलाची,पण आमची नजर वाघोबाचा वेध घेत होती...पण शेवटी भ्रमनिरासच झाला..हा अनुभव मात्र मजा चाखून गेला आम्हाला...
     दुपारच्या सत्रात जीप सफारी केली...तेंव्हा तरी दिसेल काही असे वाटले, पण छे!एखाद दुसर्‍या गेंड्या शिवाय काहीही दिसले नाही...

      याच परिसरात असणाऱ्या ऑर्चिड पार्क मध्ये मात्र फार उपयुक्त माहिती मिळाली आणि एकाहून एक सुंदर सुंदर ऑर्चिड्सचे रंग, गंध आणि प्रकार अगदी जवळून बघितले...एवढी सारी फुले बघून मन हर्षोल्हासित झाले आणि काझीरंगाला भेट देण्याचे सार्थक वाटले....
  या शिवाय कॅक्टस गार्डन मध्ये कॅक्टस च्या कधीही न बघितलेल्या कितीतरी जाती बघावयास मिळाल्या...अक्षरशः आचंबित व्हायला झाले....
    याशिवाय थोडीफार खरेदीही झालीच... आसामच्या बिहू नृत्याची आणि त्या मागील हेतू विषयी माहिती देत ह्या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण खास आम्हा पर्यटकांसाठी हॉटल मध्ये आयोजित करण्यात आले होते...या सर्वांचा आनंद घेत आमचा मुक्काम आम्ही काझीरंगा परिसरात केला....निसर्गाशी हितगुज मनाला आनंद दायक वाटले...पण रात्री आणि सकाळी पाऊसाने मस्त जोरदार हजेरी लावत सलामी दिली आम्हाला....पण तारांबळ उडवली नाही मात्र....

काझीरंगा--गोवहाटी 
-------------------------

सकाळी पावसातच काझीरंगाचा निरोप घेऊन आम्ही गोवहाटीसाठी प्रवास चालू केला....
 प्रवेशालाच ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात  एका बेटावर असणाऱ्या
 "उमानंदा " या अती प्राचीन महादेव  मंदिराला भेट देवून त्या शिवशंभो ला नमस्कार घातला...
जाता येता छोटासा बोटीचा प्रवास करुन घेतलेले दर्शन, व्दारकेच्या बेट व्दारकेची आठवण देऊन गेला....
खरं म्हणजे या रात्री आमचे ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर क्रुझ डिनर ठरलेले होते....पण नेमके याच दिवशी आसामचे मुख्यमंत्री शहरात येणार होते आणि याच क्रुझवर त्यांच्या डिनरचे आयोजन केलेले होते....सहाजिकच आम्हाला माघार घ्यावी लागली...
आम्ही आपले छानपैकी हॉटेल डिनर एन्जॉय केले आणि सकाळी परतीचे वेध घेत निद्राधिन झालो...

   हा आमचा सहलीच्या निरोपाचा दिवस होता...शुचिर्भूत होऊन नाश्ता आटोपला आणि गोवहाटीत असणाऱ्यां कामाख्य देवीच्या दर्शनासाठो सज्ज झालो....
साडेतीन पीठापैकी एक असणारं हे एक जागृत शक्तीपीठ आहे...मंदीरात गर्दी बरीच होती...अगदी गावातच असणारं पुरातन मंदिर,कोणतेही मंदिर असू द्यात, तेथील चित्र नेहमीच जसं असतं तसंच सारं सारं होतं येथेही....
मुखदर्शन घेऊन आम्ही देवीला मनोमन नमस्कार केला आणि सहलीची सांगता केली....
दुपारी दोन वाजेपर्यंत एअरपोर्ट गाठावे लागणार होते....तत्पुर्वि सर्वांनी एकत्रित जेवणाचा अस्वाद घेत परस्परांचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गावरच्या विमानात स्वार होऊन परतीचा प्रवास चालू केला...
आमचे विमान सर्वांत शेवटी रात्री दहा वाजता होते...
एअरपोर्ट वर बराच वेळ गर्दी ला न्याहाळत अवलोकन केले....
छोटेसेच होते एअरपोर्ट पण संपूर्ण देशाच्या प्रमुख शहरांशी जोडला गेलेले होते हे शहर!त्या मूळे गर्दी भरपूरच होती आणि विमानांची ये जा सुध्दा खूप मोठ्या प्रमाणावर होती येथे...
     ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने टेक ऑफ केले आणि सहलीला जाताना पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सोबत घेऊन गेलेलो आम्ही,सहलीहून येताना मात्र काळ्याभोर आभाळात आकाशगंगा आणि कितीतरी लखलखतं चांदणं सोबत घेऊन चाललो होतो....
    फाल्गुनाच्या परतीचा काळ होता तो...चांदोबा मात्र गडप होऊन गेले होते या काळ्या आभाळाच्या पोटात....पुन्हा नव्याने, नव्या रुपात लवकरच प्रकटण्यासाठी.....
आम्हीही अडीच तासाचा विमान प्रवास आणि त्या नंतर पाच तासांचे मार्गक्रमण करत सुर्योदयाच्या साक्षीने आमच्या घरी परतलो....
जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही सहलीला, पण आपल्या घराची ओढ मात्र कायम आपली सोबत करत असते आणि आल्या नंतर "आपले घर ते आपलेच घर....त्याची सर नाहीच कशालाच.."
हा विचार येतोच येतो.....

समाप्त....
दि. 23-4-2022.


🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २७ मार्च, २०२३

कवितेची कविता.

कविता⚘
*******************
 मनीच्या कल्पनांना. 
   शब्दरुपी पंख 
  फुटतात 
  गूज एखादे मनात
  रुजते अन् 
  अंकूरते
  सौंदर्यदृष्टिला 
  कल्पनेचा बहर येतो 
  उपमा अलंकार 
  मनावर राज्य 
  करु लागतो 
  आठवांची मखमल 
  शब्दशिंपण घालते 
  अशावेळी अवचितच 
   मनात काव्य
   विलसत जाते 
   काव्याचं 
   विलसत जाणं
   जेंव्हा शब्दांनी
   पुलकित होतं 
   तेंव्हा आणि 
   त्याच क्षणी  
  कविता प्रसवते 
  शब्दफुलांची 
  गुंफण होऊन 
  कागदावर उतरते 
  काव्याविष्काराची 
  ही सुंदर वीण 
  रुंजी घालत असते 
  वाचक तिला 
  मनाच्या गाभार्‍यातून 
  वाचत जातो 
  कवीयत्रीचं मन 
  अशा वेळी 
  काव्यशिल्प साकारल्यानं 
  हर्षित होत जातं....

आज २१ मार्च, 
कविता दिनाच्या 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

©️ नंदिनी म. देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १३ मार्च, २०२३

पुस्तक परीक्षण.

पुस्तकाचे नाव: 

द सायलेंट स्टाॅर्म.
लेखक - नारायण कुडलीकर.

      काहीच दिवसांपूर्वी नव्यानेच प्रकाशित झालेलं हे पुस्तक....पुस्तकाचे लेखक श्री नारायण कुडलीकर, यांच्या कुटुंबाशी आमचे फार पुर्विपासूनचे कौटुंबिक नातेसंबंध.....
त्यांनी मला स्वतः आवर्जून घरी आणून दिलेलं हे पुस्तक....मला म्हणाले,तू वाच आणि मला प्रतिक्रिया पाठव कसे वाटले पुस्तक याची......

     पूर्विच वाचनासाठी हाती असलेले पुस्तक संपवून मी लगेच "द सायलेंट स्टाॅर्म" वाचावयास घेतलं,आणि काय सांगू!वाचून पूर्ण होईपर्यंत जीवाला चैन पडेना... दररोजच्या दैनंदिनीतून वेळ मिळेल तसे तीन दिवसांत वाचून काढले मी हे आणि पूर्ण झाले की मोठ्ठा उसासा सोडला अगदी नकळतपणे....

   मला ऐकून माहिती असलेली  आलेल्या या वादळाशी या सर्वांनी दिलेली झुंज, पण "द सायलेंट स्टॉर्म" वाचल्या नंतर आपण या लढाईचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत असे वाटावयास लावणारे हे शब्दांकन....
  ‌ 
    आता प्रतिक्रिया लिहावयाची....खरंच काय लिहू? कसे लिहू?असे झाले अगदी...इतर पुस्तकांसारखे परीक्षण लिहिण्याच्या पलिकडचे आहे हे द सायलेंट स्टॉर्म....जेथे नियतीनेच आयुष्याच्या सारीपाटावर एवढी कठिण परिक्षा घेतली,त्याचे मी बापडी काय परीक्षण करणार आणि लिहिणार!

     हे खरं म्हणजे लेखकाच्या भावविश्वाचे,पुस्तक रुपात व्यक्त झालेले एक मनोगत आहे...साध्या सरळ माणसाच्या आयुष्यात ध्यानीमनी नसताना दबक्या पावलांनी एखादं वादळ यावं आणि हळू हळू त्याने अख्खं वर्षभर याच व्यक्तीच्या, त्याच्या कुटुंबाच्या भोवती घोंघावत राहावे...साऱ्या कुटुंबाच्या मानसिक, शारीरिक क्षमतेची परीक्षा घ्यावी आणि अत्यंत पराकाष्ठेचे प्रयत्न करत, या सर्वांनी मिळून हे वादळ परतवून लावावं....
     ते परतवताना स्वतःलेखकाच्या आणि त्यांच्या कुटुबीयांची होणारी मानसिक,भावनीक घालमेल...त्यांनी दाखवलेली कमालीचा खंबीरपणा, सकारात्मकता,जिद्द आणि त्यासाठी लागणारे प्रचंड मनोबल, ईश्वरावरची त्यांची  श्रध्दा,प्रेमाच्या,मैत्रीच्या,आणि रक्ताच्या नात्यांची ही वास्तव कहाणी आहे....
     देवानेही एखाद्याची किती परीक्षा बघावी आणि परिक्षार्थीने प्रचंड मनोधैर्य सांभाळत त्यात यशस्वी व्हावे...त्या यशाची ही खरी कहाणी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही....

     आयुष्याच्या एका वळणावर नियतीने घेतलेल्या परीक्षेची द सायलेंट स्टॉर्म ही, प्रत्यक्ष परीक्षा चालू असतानाचे  अप्रत्यक्ष वर्णन... पण वाचकाला वाचताना खिळवून ठेवणारे...पुढे काय झाले असेल?याची उत्कंठा सतत जागृत ठेवणारं, अप्रतीम शब्दांकन....
    लेखकाच्या मनाने घेतलेल्या ध्यासाची,पत्नीप्रेमाची,संसाररथाचे एक चाक खोल गर्तेत अडकले असेल तर, त्या चाकाला सर्वशक्तीनिशी वर उचलून सुरक्षित ठेवण्यामागचे अत्यंत भावस्पर्शी मनोगत आहे हे पुस्तक....
    लेखकाने आयुष्याच्या एका टप्प्यावर दिलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची द सायलेंट स्टॉर्म ही यशस्वीपणे सोडवलेली उत्तरपत्रिका असेच वर्णन मी करीन ह्या पुस्तकाचे....

     कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कधीही असे निर्णायक क्षण येऊ शकतात...पण आलेल्या परिस्थितीला,आपल्याच सहचारिणीच्या बाबतीत आलेल्या गंभीर आजारपणाला जीद्दीने आणि अत्यंत सकारात्मकतेने,यत्किंचितही मनोधैर्य खचू न देता यशस्वीपणे कशी मात करावी?याचा पाठ घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे हे पुस्तक...
     
    आपल्या पत्नीच्या गंभीर आजारावर मात करत असताना कौटुंबिक सदस्यांपासून ते डॉक्टर मंडळींपर्यंत ज्यांचा म्हणून सहभाग लाभला त्या सर्वांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणारं हे एक मनोगत...
     
    वाचताना पूर्णपणे गुंतून जात भावूक बनत जातो वाचकही....आणि हिच लेखकाच्या लेखणीची ताकद आहे हे मान्य करावेच लागते.... पुस्तक वाचत असताना...
    घरातील एखाद्या सदस्याच्या बाबतीत गंभीर आजारपण आलेलं असताना समयसुचक वृत्ती जोपासत  योग्य निर्णय भराभर घेणं कसं गरजेचं आहे,आणि अशा आजारांनी येण्यापूर्वी पेशंटला दिलेले पुर्वसंकेत गंभीरपणे हाताळण्याची  किती गरज असते, 
  या सर्व बाबींचा उहापोह द सायलेंट स्टॉर्म या पुस्तकात आहे...
  वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने लिहिलेले नसेल तरीही आपल्या माणसाच्या (पेशंटच्या) उद्भवलेल्या गंभीर आजारपणावर वैद्यकीय उपचार करताना,पेशंटचा काळजीवाहक म्हणून भुमिका बजावताना घ्यावयाची काळजी, डॉक्टरांच्या सुचनांचे काटेकोर पालन,पेशंटच्या खाण्यापिण्याच्या औषधांच्या वेळा,पेशंटची शारीरिक स्वच्छता करण्याची पध्दत,पेशंटचा व्यायाम या सर्वच गोष्टींची इत्यंभूत माहिती आपल्याला अचूक मिळेल असे हे पुस्तक होय..
 ‌एकूणच हे पुस्तक अतिशय वाचनीय बनले आहे...

     पुस्तक पुर्ण वाचले आणि मनोमन लेखक श्री नारायण कुडलीकर यांच्या अथक प्रयत्नांना सलाम करत, सौ.अलका ताईंना,उदंड उदंड आयुष्याचं दान मागण्यासाठी ईश्वरासमोर हात जोडले... प्रार्थनेसाठी अलगद ओठांवर शब्द उमटत गेले....

    श्रीकांत उमरीकर यांच्या जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशनाखाली प्रकाशित झालेलं हे द सायलेंट स्टॉर्म पुस्तक निश्चितच वेगळ्या धाटणीचं,पण मार्गदर्शक असं एक चांगलं पुस्तक किंवा छोटी कादंबरी आहे...
     श्री नारायण कुडलीकर यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी तोंड दिलेल्या या वादळातून सहीसलामतपणे त्यांची अर्धांगिनी बाहेर पडली आणि ती सुखरुप आहे यासाठी या सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा....

©️ नंदिनी म. देशपांडे.
मार्च,१०,२०२३.

🌹🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, ७ मार्च, २०२३

पुस्तक परीक्षण.

पुस्तक परीक्षण.
*************
        ©️ नंदिनी म.देशपांडे.
               दि.४मार्च,२०२३.

       पुस्तकाचं नाव:

नयनरम्य नॉर्वे. 
लेखिका:
मंगला आसोलेकर-देशपांडे.

   ‌ "नयनरम्य नॉर्वे" हे पुस्तक हाती आलं आणि त्याचे विलोभनीय रुप बघून केंव्हा एकदा वाचून काढेन असे झाले होते अगदी... पुस्तक कोरं करकरीत असताना वाचण्यातील मजा काही वेगळीच असते...
   ‌सामान्यपणे कुठलेही ‌पुस्तक हे घरातील एखाद्या जेष्ठ व्यक्तीला किंवा आदरयुक्त व्यक्तीला समर्पित करण्याचा प्रघात असतो.पण हे पुस्तक लेखिकेनं आपली छोटीशी नात अवंती हिला समर्पित केलंय हे या पुस्तकाचे वेगळेपणच म्हणता येईल....
    ‌‌ 
    एकूण १८ प्रकरणांत गुंफले गेलेले हे पुस्तक संमिश्र साहित्य प्रकारात मोडेल असे माझे मत आहे...सुरुवातीची आणि शेवटची काही प्रकरणं लेखिकेच्या प्रवासवर्णनपर लेखनाचा प्रत्यय वाचकाला करवून देतात तर,काही प्रकरणं नॉर्वेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समाज जीवनावर शब्दलालित्याने प्रकाश टाकतात आणि बरीचशी प्रकरणं ही नॉर्वे या देशाच्या पर्यावरणाचा आणि तेथील निसर्गाचा इत्यंभूत आढावा घेताना दिसतात...
        
    स्वतःलेखिकेच्या पहिल्या विमानप्रवासाचा अनुभव निश्चितच वाचकालाही त्यांच्या पहिल्या विमानप्रवासाचा अनुभव मनात ऊभा करतो....
   
    "‌डिफेन्स एक रोमांचक अनुभव", हे प्रकरण या पुस्तकाचा गाभा म्हणता येईल असेच झाले आहे... खरोखरच हा डिफेन्स चा अनुभव आपणही प्रत्यक्ष हजर राहून अनुभवत असल्याचा भास होत रहातो वाचताना...यामूळे नकळतपणे आपल्या देशातील उच्च शिक्षणाची पध्दती आपण या डिफेन्स पध्दतीशी तौलनिक दृष्टीने पडताळून बघू लागतो...
   लेखिकेच्या मुलाचा नॉर्वे मध्ये शिकावयास जाण्याचा उद्देश सार्थकी लागलाय हे वाचकालाही मनोमन पटत जातं,आणि परितोषच्या पाठीवर वाचकांची शाबासकीची थाप पडते....माझ्या मते येथेच हे पुस्तक लिहिण्या मागचा हेतू साध्य होत आहे याची जाणीव होत जाते...
   ‌
     जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात उद्भवली तशीच परिस्थिती कोविड काळात या ही देशात उद्भवली याचे इत्यंभूत वर्णन या पुढच्या प्रकरणात वाचावयास मिळते..
पण खरं म्हणजे या काळात तेथे लांबलेलं वास्तव्यच या पुस्तक लिखाणा मागची प्रेरणा ठरलं हे प्रांजळपणे लेखिकेने बरेचदा नमुद केलंय...या कारणाने का असेना पण नॉर्वे या युरोपीय देशाची सविस्तर माहिती देणारं मराठी भाषेतलं कदाचित पहिलं पुस्तक मंगला आसोलेकर देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलं आहे....

      नॉर्वे या देशाच्या निसर्गाने लेखिकेच्या मनावर जादू केली आहे.तेथील संपूर्ण वास्तव्यात तिच्यावर हा निसर्ग गारुड करुन होता.ठिकठिकाणी आणि वारंवार याचा प्रत्यय वाचकाला येत रहातो...त्यांचे मन जणू फुलपाखरू होऊन या निसर्गाचा आस्वाद घेत रहाते आणिक नकळतपणे काव्यमय होऊन तिला निसर्ग दृश्यांच्या अनुषंगाने ठिकठिकाणी विविध कवींच्या काव्यपंक्तींच्या उपमा सहजपणे सुचत जातात...
   मुळातच लेखिकेला अध्यापनाचा दांडगा अनुभव आहे...संस्कृत आणि मराठी भाषेवर चांगलेच प्रभुत्व असून त्यांचेे वाचनही भरघोस आहे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत रहाते...
       
     प्रत्येक विषय अगदी सविस्तरपणे मांडण्याची लेखिकेची शैली त्यांच्या अध्यापन कलेतून आली असणार हे सुद्धा सतत जाणवत रहाते.
परिणामी हे त्यांचे पहिलेच पुस्तक असेल असे अजिबात वाटत नाही.
    
    लेखिकेनं आपल्या नयनरम्य नॉर्वे या पुस्तकातून नॉर्वे या देशाचा इतिहास,भगोल, सामाजिक -सांस्कृतिक‌ ,पध्दती,चालीरीती,किंबहूणा तेथील शैक्षणिक, आर्थिक पध्दतींचा, खाद्यसंस्कृती विषयीचा आणि अगदी तेथील रोजगाराच्या संधी,करप्रणाली,आरोग्यविषयक सोयी सुविधा यांचाही सविस्तर उहापोह केला आहे...
     शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नव्यानेच या देशात जाताना तेथील माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल असेच आहे.

    वृध्दांच्या निवाऱ्याचा प्रश्न तेथील शासन किती गांभीर्याने आणि काळजीने हाताळते यावर टाकलेला प्रकाश अनुकरणीय आहे....तसेच व्यायाम,त्याचे विविध प्रकार,समुद्री आणि बर्फावरील खेळ यांचे बाळकडू बालकांना कसे लहानपणापासून दिले जाते,पर्यावरणाशी समायोजन साधण्याची हातोटी कशी कुंटुंबाकडूनच शिकवली जाते याचाही सविस्तर आढावा लेखिकेनं घेतलेला दिसून येतो...
    
     आपल्याकडे 'घर पहावे बांधून' असे म्हणतात, तर नॉर्वेमध्ये 'घर पहावे घेऊन'
अशी उक्ती असावी असे वाटते...घर घेण्याची तेथील पध्दत बरीच क्लिष्ट पण स्पष्ट असल्याचे लक्षात येते...
     
   ‌हे पुस्तक वाचताना वाचकही तेथील व्यवस्थेचा आणि आपल्या देशातील व्यवस्थेचा नकळतपणे तौलनिक विचार करु लागतो...पण माझ्या मते,आपल्या देशाचे आकारमान,लोकसंख्या यांचा विचार करता बऱ्याच मर्यादा येऊ शकतील त्यामूळे शक्य होईल का हे?अशी शंका डोकावते मनात....
     
    शेवटच्या दोन तीन प्रकरणात लेखिकेनं प्रत्यक्ष भेट देवून केलेलं पर्यटन स्थळांचं आणि निसर्गाचं वर्णन वाचकालाही आभासी दर्शनाचा प्रत्यय आणून देण्यात यशस्वी झालयं....
  ‌ माणसाची निसर्गाशी बांधलेली नाळ आणि बांधिलकी मुलांच्या बाल्यावस्थे पासूनच कशी जपायला हवी याचे विवेचन फारच प्रभावीपणे मांडले आहे....

    एकूणच पुस्तकाची मांडणी,बांधणी,त्यातील सुंदर छायाचित्रे,लेखिकेची विषय मांडण्याची शैली,संदर्भसुचीचा उल्लेख वाचकाला "नॉर्वे" या छोट्याशा युरोपीय देशाचे मनोरम्य दर्शन घडवण्यात यशस्वी झाले आहे असेच म्हणावेसे वाटते...
    अभंग प्रकाशनाने साहित्य क्षेत्रात आणलेले, मंगला आसोलेकर -देशपांडे यांचे हे पहिले पुस्तक.एक लेखिका म्हणून मी, या पुस्तकाचे मनभरुन स्वागत करते आणि पुढच्या लेखनासाठी मंगला आसोलेकर-देशपांडे यांना शुभेच्छा देते....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

रोज डे.

🌹*गुलाब*🌹

रहातो जरी 
काट्यांच्या सहवासात.....

असतो कायम ठेवून 
अस्तित्वाचे मृदूपण....

सदा सौंदर्याने परिपूर्ण 
बहरत बहरत....

निर्भेळ आनंदाची 
करुन काट्यांना पखरण....

सुगंधाची उधळण करत
हरखून जातो मनोमन....

होतो मनस्वी कृतार्थ
 प्रेमाच्या या विश्वात....

प्रेमी जेंव्हा मागतात 
मागणं आपल्या प्रेमाचं....

करुन माझी देवघेव
कटिबद्धता साधतात मनात....

आपलेच प्रतिबिंब न्यहाळत
परस्परांच्या डोळ्यात....

तेंव्हा होतो विराजमान
प्रत्येकाच्या हृदयात....

मीच तो उमलणारा
 कळीपाकळीतील गुलाब.....

मीच तो हसणाराही
ललनांच्या गालात....

काट्यांचे मानत धन्यवाद....
 आनंदाला बहर आणतो घराघरांत....

©*नंदिनी*
फेब्रू.७,२०१९.

🌹🌹🌹🌹🌹

रोज डे.

🌹*गुलाब*🌹

रहातो जरी काट्यांच्या सहवासात.....

असतो कायम ठेवून अस्तित्वाचे मृदूपण....

सदा सौंदर्याने परिपूर्ण बहरत बहरत....

निर्भेळ आनंदाची करुन काट्यांना पखरण....

सुगंधाची उधळण करत
हरखून जातो मनोमन....

होतो मनस्वी कृतार्थ प्रेमाच्या या विश्वात....

प्रेमी जेंव्हा मागतात मागणं आपल्या प्रेमाचं....

करुन माझी देवघेव
कटिबद्धता साधतात मनात....

आपलेच प्रतिबिंब न्यहाळत
परस्परांच्या डोळ्यात....

तेंव्हा होतो विराजमान
प्रत्येकाच्या हृदयात....

मीच तो उमलणारा कळीपाकळीतील गुलाब.....

मीच तो हसणाराही
ललनांच्या गालात....

काट्यांचे मानत धन्यवाद....

 आणतो आनंद बहराला घराघरांत....

©नंदिनी देशपांडे.
फेब्रू.७,२०१९.

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

शुभारंभ.

*शुभारंभ*

 ।गणपती बाप्पा मोरया।
शुभ+आरंभ=शुभारंभ.
     कोणत्याही,अगदी छोट्याशा पण महत्वाच्या कामाची सुरुवात आपण ज्या क्षणापासून करतो तो त्या विशिष्ट कामाचा शुभारंभ असतो,असे आपण मानतो..
काम महत्वाचे असते म्हणून सुरुवातही शुभ मुहूर्तावर, शुभहस्ते आणि शुभदिनी व्हायला अशी आपली अंतरिक इच्छाही असतेच हो ना?
    ‌‌तर असा हा शुभारंभाचा क्षण आपण साजरा करतो..
आपल्या हिंदू संस्कृतीत या क्षणाला फार महत्त्व आहे...
कोणी श्रीफळ फोडून,कुणी छोटी मोठी पुजा घालून तर कोणी एखाद्या विशिष्ट दिनाचे औचित्य साधून हा शुभारंभाचा योग साधत असतो....
पण खरं सांगावयाचे झाले तर, कोणत्याही कार्याच्या शुभारंभाला माणसांच्या घोळक्या शिवाय शोभा नाही असेच म्हणावे लागते....
 शुभारंभी कुटुंबातील सारे उपस्थित असावेत ही मनोधारणा असणं अगदीच रास्त आहे..
       म्हणूनच शुभारंभ दणक्यात करण्याची प्रथा पडली असावी असे वाटते..
शुभारंभाचा घाटच मुळी घातला जातो,तो आपण करत असलेल्या कामाची वाच्यता चार माणसांत होऊन त्याला प्रसिद्धी मिळावी,त्याचे कौतूक व्हावे आणि समाजाने याची दखल घ्यावी यासाठी...
'शुभारंभ' ही संकल्पना म्हणूनच सामाजिक आहे.
       हे लक्षात घ्यावयास हवे की, शुभारंभ हा केवळ चांगल्या,समाजहिताच्या आणि सकारात्मक भावनेने केलेल्या कामाचाच झाला पाहिजे तर आणि तरच ते काम लोकांची वाहवा मिळवेल.
       हल्ली शुभारंभाला उद्घाटन समारंभ असेही संबोधले जाते...पण शुभारंभ हा पारंपरिक शब्द कसा भारदस्त आणि ईश्वरी वरदहस्त सवे घेऊन आल्या सारखा वाटतो... म्हणून तर आरंभ देवतेची, विघ्नहर्त्याची पुजा या प्रसंगी घालतात याला नक्कीच पुष्टी मिळते....
   ‌‌चला तर सख्यांनो,उत्तरायणाच्या साक्षीने आपणही मरगळ झटकू या आणि नव्याने लेखनाचा श्रीगणेशा करुन शुभारंभ करु या.

©️नंदिनी म.देशपांडे.
जाने.१९,२०२३.
🌹🌹🌹🌹🌹