रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

पवशी.

ओळखलंत का मला मंडळी? माझी आठवण येते का कधी कुणाला?जरासा ताण द्या तुमच्या
स्मरणशक्तीला!अगदी, बालपणात जा म्हणजे येईल माझी सय!
    अहो, माझ्याशिवाय गृहिणीचं पान हालत नसे...स्वयंपाक चालू करण्या अगोदर माझ्याशी संवाद अनिवार्य च असायचा!
छोटीशी जागा व्यापणारी मी, पण पटदीशी मदतीसाठी तत्पर असायचीच!साऱ्या स्वयंपाकघरभर भिरभिरती नजर असायची माझी. बाजारातून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्यांवर विशेष नजर ठेवून असायची मी... आणि कुठलीही भाजी आणि मी आमच्यात आडवा विस्तू जात नसे कधीच...'विळ्या भोपळ्याचे नाते', 
ही म्हणही माझ्याच स्वभावाचा परिपाक!चांगला किंवा वाईट?हे ज्याचे त्याने ठरवावे....चांगले मानाल तर जेवणात भाजी खाल आणि वाईट मानाल तर भाजीशिवाय जेवाल!ठरवावे ज्याने त्याने...
  मला मात्र खूप आठवण येते हो, आजही....कुठे तरी कोपर्‍यात  आहे माझे अस्तित्व शिल्लक!पण वय झाल्यासारखी पडून रहाते आपली....कोणाला तरी कधीतरी आठवण होईल माझी या आशेवर...कधी कधी वाटतं, दुर्मिळ वस्तूंच्या यादीत माझी रवानगी होऊन काचेच्या कपाटात जागा मिळेल कदाचित!
   कैरीचा,लिंबाचा आंबटपणा, भेंडीचा चिकटपणा, भोपळ्याचा कडकपणा, मिरचीचा तीखटपणा आणि 
आवळ्याचा तुरटपणा,कारल्याचा कडवटपणा आणि फळांचा गोडवाही सगळ्यांच्या सगळ्या तर्‍हा, स्वभाव फार जवळून अनुभवलंय मी!
माझ्या सर्वात जास्त आवडीचं ओलं नारळ बरं का... माझ्या बोटांवर नाचवत नाचवत  त्याचा अख्खा चव काढण्याची किमया मला साध्य करता यायची!
     आता "मात्र गेले ते दिन गेले",असंच म्हणावे लागते...
 येतील का परत फिरून गेलेले ते दिन?कठिण वाटतंयं सारंचं...असो...पण झालीच कधी आठवण माझी तर नक्कीच आवाज द्या,असेल त्या कोपर्‍यातून लगेच येईन तुमच्या मदतीला धावून!आजही त्राण आहे बऱ्या पैकी माझ्यात...पण तुमच्यात आहे आहे का बघा तरी बसण्याचा त्राण?तेच आजमावून बघा अगोदर आणि मग मला बोलवा.....
    अरे,हो विसरलेच मी माझे नावच सांगावयाचं राहून गेलं...जुन्यांना, आडजुन्यांना माहित असेल कदाचित पण नव्यांना मात्र माझी ओळख करवूनच द्यायला हवी....माझे नाव ना,'विळी' विदर्भात मला,'पावशी' म्हणतात...
दोन्हीही नावं माझ्या आवडीचीच!

©️
*नंदिनी म. देशपांडे*

🌹🌹🌹🌹

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

बालकदिन

बालपण

आपल्याच बालपणात पुन्हा फिरुन डोकावताना....

   वाटतं,पुनःश्च
   लहान व्हावं...
    अवती भोवतीचा
   स्वच्छंदीपणा आणखी
   एकदा अनुभवावा...

    निरागस प्रश्नांची
     मौक्तिक माला 
    अविरत ज्यपावी...

    फुलपाखरू होऊन
     उंच उंच उडावे
     परि बनून आनंदाने
    खूप खूप बागडावे....

   भातुकलीच्या खेळात,
    बाहुला बाहूलीचे
    लगिन लावावे...

  लुटूपूटूचा स्वयंपाक
   साग्रसंगीत बनवून
 जेवणावळी
घलाव्यात....

 पावसात भिजत चिंब
कागदाची नाव
पाण्यावर सोडावी...

  चॉकलेटचे बांधावेत ईमले
      टपाटप टाकत टापा
    घोड्यावर घ्यावी रपेट....

मामाचं पत्र,आंधळी 
     कोशिंबीर,शिवनापाणी 
आणि
लपाछपी खेळत खेळत
दमून जावं....

बाबांच्या हातून घास
   घेत गोड खाऊचा
  आईच्या तोंडून गोष्ट
   ऐकावी हिरकणीची....

 होताच रात्र,
  पदराच्या पांघरुणात
   आईच्या कुशीत
   झोपावं गुडगुडुप्प
   झोपावं गुडगुडुप्प...

© 
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

दिवाळीचा निरोप एक हुरहुर.

आली आली दिवाळी आली, म्हणत म्हणत आजच निरोप घेऊन निघून गेलेली दिवाळी आपल्याला कितीतरी सकारात्मक उर्जा बहाल करवून गेलीए, ही जाणीव आज मनाला झाली...
गतस्मृतिंना उजाळा देत, माहेरच्या आठवणीत आईच्या स्मृतांना स्मरत त्या जागवत गेली...
नवीन आठवणींची दुलई मनावर घालत मानसिक ऊब देऊन सांगता होणारी ही दिवाळी म्हणजे आपली जवळची सखीच जणू!
आपल्या सहवासात चैतन्याने न्हाऊ माखु घालणारी,कितीतरी मनोकामनांचा नैवैद्य स्विकारणारी अशीच....
माणसाच्या वागण्या बोलण्यात सकारात्मक वृत्तींना खतपाणी घालत जाणारी,ती हिच दिवाळी...
अंतःकरणात प्रेम माया, वात्सल्य, भक्तीरस यांना सवे घेऊन येणारी ती हिच दिवाळी!
   या दिपोत्सवाच्या मंद प्रकाशात तेजाळत जाणारी मनं, आपल्याला मिळालेल्या समाधानाचे तेज चेहर्‍यावर विलसत ठेवते...आपल्या देहबोलीतून प्रकट होत जाते...
    लक्ष्मीच्या रुपाने आगमन करणारी ही दिवाळी पक्वान्नांच्या  पंक्तींचा थाट करते...फराळाच्या पदार्थांची मांदियाळी सजवते...रंगावलींचा गालिच्या ची बिछायत घालते... घराचे सुशोभीकरण करत मनाचे सुशोभीकरण साधते...
शरदाच्या चांदण्या शिंपवत हवेतील गारव्याचे मोरपीस अंगावर फिरवते आणि रोमांचित करते...ऋतूबदलाची वर्दीही देऊ करते...
    अशा या हव्याहव्याशा मैत्रीणीने आज निरोप घेतला आणि 
लगबगीला मंदावलेपण आलं जरासं...
गेल्या काही दिवसांत अपूर्ण राहिलेली निद्रादेवी आपल्या डोळ्यांचा ताबा घेतीए असं जाणवत राहिलं...आणि एखाद्या मोठ्या कार्यानंतर मांडववारं
लागणं काय असतं? हे लक्षात आलं...
पण हे मांडव वारं नव्हे तर नवीन स्वप्न, योजना यांना आकारण्या साठी घेतलेला अल्पविराम आहे असे मनानं समजावलं....

  ©️
नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

🌹महिलक्ष्मी पुजन.🌹

🌹सोनपावली लक्ष्मीचे
          आगमन.🌹

भादव्यात गं सखे आल्या आल्या गौराई।
गणपतीचा हा थाट होई दिवे लखलखती।
हे असं कोणतं तरी , प्रत्येक मराठी महिन्याच्या वैशिष्ट्यांसह गायलं जाणारं गाणं आम्ही फार लहानपणी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायलं होतं...आज राहूनराहून ते सारखं आठवतंयं...

महालक्ष्मी पुजन झालंयं ना आजच ....

 महालक्ष्मीचा सण,भव्य दिव्य, घवघवीत आणि मांगल्य सोबत आणणारा,घराघरात माणसांची वर्दळ घडवणारा  स्नेहबंधनात बांधून ठेवणारा असा हा भक्तीभाव श्रध्देचा विलक्षण योगायोग!

सासू सुनेच्या नात्यात समन्वय साधणं, जावाजावांच्या नात्यात प्रेम निर्माण करणं, गौराई बनून आल्या महालक्ष्मी, तर माहेरवाशीण मुलीला माहेराची ओढ लावणारं, अशीही काही  वैशिष्ट्यं या पारंपारिक खानदानी सणाचे....

आज बरेच ठिकाणी ह्या सणाला अधुनिकता स्पर्शत जाऊन उत्सवाचे स्वरुप प्राप्त झालेले दिसते आहे...

महालक्ष्मी, वर्षातून तीन सलग दिवसांची लांबी घेऊन येतो हा सण रुपी उत्सव, पण हिची रुपंही किती अनेकविध!
आश्चर्य वाटतं, ती कोणत्याही रुपाने येऊ देत आपल्या घरी, पण तिचे तितक्याच श्रध्दाळू भावनेनं आणि उत्साहानं स्वागत होतं प्रत्येक घराघरांतून...

कुंभाराने बनवलेल्या गोलाकार सुगड्यांच्या रुपात त्या अवतरु देत किंवा 
शाडूच्या बनलेल्या मुखवट्यांच्या रुपात...

सुगड्यांच्या रुपानं येणार्या लक्ष्मीच्या रुपाला रंगवून दरवर्षी नाक कान, डोळे यांची कलाकुसर करुन त्या रेखीव बनवण्यात घरातील गृहिणीची कला आणि कसब पणाला लागायचे पुर्वि...पण हल्ली त्या कायमस्वरुपी रंगवून घेतल्या जातात...

शाडूची बनवतानाही कलाकाराच्या कलेचे कसब त्या लक्ष्मीच्या मुद्रेबरोबरच त्या घरच्या गृहलक्ष्मीलाही प्रसन्न करत जाते...
गृहलक्ष्मी जणू लक्ष्मीचं रुप धारण करुन घरात वावरते!

अगदीच अलिकडच्या काळात तर हे मुखवटे अगदीच सजीव वाटावेत एवढे बोलके बनवले जातात...

काही घरात पितळी धातूचे कणखर रुप घेऊन येतात या महालक्ष्मी,तर कोकणात काही ठिकाणी खड्यांच्या रुपात अवतरतात...
शाळिग्राम रुपी विष्णूदेवतेची विष्णूपत्नी खड्यांचे रुप धारण करत लक्ष्मीच्या रुपात घरात प्रवेशत असावी...

धान्याच्या राशीरुपाने काही घरात या लक्ष्मीला पुजले जाते...धनधान्य समृध्दीचे प्रतिक असणारी ही लक्ष्मी खरोखर भरभरुन दान देत असणार यात शंकाचनाही...

लक्ष्मीचे रुप कोणतेही असो, ती प्रत्येक घराला  मांगल्याने, 
प्रसन्नतेने व्यापून टाकते....
सुखसमृध्दीची पखरण करते आणि स्नेहभावाचा
आदरसत्कार करत,नात्यांच्या धाग्यांना परस्परांत घट्ट गुंफून ठेवते...

सोनपावली आलेली लक्ष्मी जेष्ठेच्या घरी कनिष्ठेला आमंत्रण देते...लेकीबाळींना माहेरपण घडवते 
घरांघरांत चिवचिवाट
आणते...माणसांनी घरं फुलून येतात....
हसर्‍या खेळत्या वृत्तींना उधाण आणतात....
पक्वान्नांची आरास सजवतात, फुलाफुलांचा सुगंध पसरवत ठेवतात... 
धुप, दिप कर्पुराचा दरवळ घरात रेंगाळत ठेवतात...
गणपती बाप्पाला पुढे पाठवून देत 
"आम्ही लवकरच येत आहोत"
 असा सांगावा पाठवतात...

तीन दिवसांच्या या भरगच्च सणात महालक्ष्मीच्या रुपात तीन निराळ्या कळांचा भास नकळतपणे होत रहातो...

आगमनीत होतात तो पहिला दिवस. अगदी नवपरिणीत युवतीचे तेजाळ आनंदी,हसरी मुद्रा असते तिची या दिवशी!

दुसरा दिवस लक्ष्मीपुजनाचा. प्रसन्न असे सालंकृत नटून थटून तृप्तीचा आनंद घेवून मिरवणारे मंगल रुप!

तिसरा दिवस निरोपाचा अर्थात विसर्जनाचा. माहेरपणाला आलेली एखादी  सासुरवाशीण,सासरला जाण्याची ओढ जशी तिला स्वस्थ बसू देत नाही, पण माहेरचा विरहही  किंचित औदासीन्य आणतो तिच्या चेहर्‍यावर! असा भास निर्माण करणारं हे रुप!
आपल्यालाही हुरहुर लावणारं...

काही ठिकाणी सोबत समोर पाठवलेल्या गणपतीबाप्पाला जाताना सोबत घेऊन जाते ही गौराई, तर काही ठिकाणी बाप्पाला आपल्या आजोळी आणखी काही दिवस ठेवून जाते...
त्यामूळे मनाला लागलेली ही हुरहूर थोडी हलकी होते...

थोडक्यात सुख, समृध्दी, प्रासन्य,मांगल्य म्हणजे आणखी काय हो!ही सारीच त्या लक्ष्मीची रुपंच!
या सर्वांसोबत हातात हात घालत श्रध्दा आणि भक्तीभाव सुध्दा प्रकट होतो त्यावेळी नक्कीच त्या घरात लक्ष्मी नांदते तिचा कायमच वास तेथे रहातो...यापेक्षा मोठे वरदान आणखी कोणते?
   
खरंए आपली प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा, काळ कितीही बदलला असेल तरी हवीहवीशी अशीच आहे...तिच्या रुपवैभवात,साजरीकरणात काळानुरूप बदल घडवले जात असतीलही, पण त्यामागचा भोळा भाव मात्र स्थिरच आहे,तो कायमच स्थीर रहाणार यात शंकाच नाही...
शेवटी काय तर 
संतांनीही उक्ती सांगून ठेवली आहेच की, 
"भाव तेथेच देव."

 🙏🌹🙏

©️ 
*नंदिनी म. देशपांडे.*
🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

कृष्णसखा....

श्रीकृष्णा, आयुष्यातील कितीतरी आठवणींना तू सोबत केलीएस अगदी
बालवयापासून.... काळ्याशार मातीतून साकारलेले तुझे रुप,कृष्णाने जणू आपल्याच घरात जन्म घेतलाय,असेच भासवायचा...मन मोहवूनच टाकायचा...गोकुळ आष्टमीच्या दिवशी  आजीने आणि तिच्यानंतर आईने साकारलेले गोकूळ, मला तुझ्या अंगणी खेळायला येण्यासाठी खुणवायचे...
मग एकदाचा तू अवतरलास, कृष्णजन्म झाला आणि खमंग सुंठवडा हातावर प्रसाद म्हणून मिळाला की पुढचे चार आठ दिवस आपली गट्टी अशी काही जमायची ना खेळताना!गोकुळातील गवळणी, बलराम, सारेच सामील व्हायचे..
रांगत रांगत जाऊन मिश्किल भाव दाखवत दही,लोणी खाणारे तुझे चित्रातील बाळरुप हातात घेऊन कुरवाळण्याचा मोह तर कितीदा झाला म्हणून सांगू!
शालेय वयामध्ये कोपलेल्या ईंद्रदेवाला शह देत अख्खा पर्वत निश्चलतेने आपल्या करंगळीवर पेलणारा तू,आमचाच सवंगडी कान्हा व्हायचास...त्या पर्वताखाली आम्हालाही आसरा देत आहेस अशीच जाणीव द्यायचास... 
     तारुण्यात प्रवेश करताना, तुझे बासरी वाजवणारे सावळे,सुंदर मनोहर, निर्मोही रुप कायम मनात भरुन असायचे...शांत, शीतल निर्मळ प्रेमानं ओतप्रोत भारलेला तुझा चेहरा मनात कायम रुंजी घालायचा... 
मनरमणा, 
होळीचा रंग खेळताना तू सतत सोबत करायचास...
आणि त्यानंतर संसार मागे लागला...कोणत्याही अडचणीत तूच डोळ्यासमोर यायचास सखा बनून...आजही येतोस...योग्य मार्गदर्शन करतोस आणि पुढे चालायला शिकवतोस....शंख,चक्र, गदा पद्म हातात घेवून समोर दिसणारे तुझे प्रसन्न रुप क्षणात हसू आणते ओठावर आणि निर्धास्त करते...
कधी व्यंकटेशाच्या रुपात, कधी विठ्ठलाच्या रुपात कधी नारायणाच्या रुपात तर कधी विष्णूच्या रुपात भेटायवयास येतोस तू.
देवघरातील लंगडा बाळकृष्ण तर कायमच हसरी सोबत करतो...त्याचा अवतोभोवती असणारा वास सतत दिलासा देत रहातो...तू आहेस पाठीशी ही जाणीव फारच अश्वासक वाटते...सगळी संकटं पेलण्यास तू आहेस समर्थ, मग कशाला हवाय किन्तु मनात !
तुझा मधूर पावा ऐकत सुमधुर संगीत ऐकण्याची जाण निर्माण केलीस ती तूच...
  निसर्गात पानाफुलांच्या रुपात रंगीबेरंगी फुलातून तूच तर हसत खेळत असतोस...वार्‍या सवे डोलतोस आणि पक्ष्यांच्या सुरातून गोड पावा वाजवत रहातोस...केवढा तरी आधार, उभारी देत असतोस मनाला आणि चैतन्य खेळवतोस शरीर रुपी या माणसाच्या नश्वर देहात!
किती तुझे उपकार किती तुझी रुपं आणि किती तुझी ती  किमया!आमच्या अख्ख्या आयुष्याला प्रेरणा देण्यासाठी,भावनांचा समतोल साधण्यासाठी तू अवतार घेत रहातोस वेळोवेळी! वेगवेगळे 
असाच सोबत कर रे राजसा...
🙏🌹🙏

 ©️
नंदिनी म. देशपांडे .
कृष्णाष्टमी ,२०२१.
🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बालपण आणि नागपंचमी.

*बालपणीची नागपंचमी*🐍

   नागपंचमी झाली आईचीही सय आली आणि बालपणातल्या किती तरी नागपंचमींची आठवण जागवत गेली, नव्हे ताजीच झाली...
अगदी आठ नऊ वर्षाची होते मी, तिसरी चौथीत असेल...दर वर्षी नागपंचमीला आई आम्हा भावंडांना नवीन कपडे शिवून घ्यायची...त्या वेळच्या नवीन फॅशनचा!
आणि अगदी पारंपारिक पध्दतीने हा सण साग्रसंगीत  साजरा व्हायचा...
माझ्यासाठी लाल रंगाचा पांढरी लेस लावलेला प्लेन पाकिजा शिवला होता त्या वर्षी...
आजही लख्ख आठवतोय...
नागाचे चित्र असलेल्या पुठ्ठ्याच्या वहीची खरेदीही झाली...त्या पूर्वि दोन दिवस बारीक पानांची मेंदीची झाडं मैत्रीणींनी मिळून शोधत शोधत त्याची पानं आणून झाली होतीच....ती पाटा वरवंट्यावर वाटून मेहंदी भिजवणे त्यात कात, चुना मिसळून...आणि दोन्ही हातांवर रात्री झोपताना लेप फासणे, शिवाय यावर थोडे सुकल्या नंतर कपडयाने तळहात बांधून झोपणे असा कार्यक्रम असायचा...
सकाळी तेल लावून हात धुतले की लालेलाल हात बघून स्वतःचेच कौतूक वाटायचे!
    शाळेत नवीन कपडे, नव्या बांगड्या, नवे कानात, गळ्यात, हातावर मेहंदी आणि सजून धजून स्वारी शाळेत निघायची...आठवणीने नागाच्या पुठ्ठ्याची वही सोबत घेऊन...
मग शाळेत या पुठ्यावरच्या चित्राची पुजा म्हणून तीन तीन वेळेला पाया पडले जायचे!
   त्या दिवशी अर्धीच शाळा असायची, घरी आईने कागदावर पेनाने काढलेल्या नागोबाला नमस्कार होत असे आणि मग उकडीचे दिंड, ढोकळा यावर जेवणात ताव मारला जायचा...
   दुपारी वाड्यात गारुडी यायचा नागोबा त्याच्या गोल झाकणाच्या परडीतुन हळूच डोकावत हळू हळू वळवळत बाहेर यायचे...किती दूर उभे असायचो आमही मूले!मनातील भितीचे साम्राज्य डोळ्यात मावायचे नाही!
कोणी तरी मावशी, काकू समोर जाऊन त्याला हळदी कुंकू वहायच्या आणि दूधाची छोटी वाटी त्याच्या समोर ठेवायच्या...गट्टम करायचा ना तो क्षणात!
आणि मग दिवसभर काय दोन तीन  दिवस उंबराच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर उंच उंच झोके घेत मज्जा चालायची! आम्ही मुलीच नव्हे तर वाड्यातील सर्वच स्त्रियाही बालिकाच बनायच्या!
हळू हळू पानांच्या मेंदीची जागा मेंदीच्या पावडरने घेतली, काडीने हातावर डिझाईन आले,मग तीच जागा मेंदीच्या कोनाने घेतली....
झाडावरच्या झोक्याची जागा परसातल्या झूल्याने किंवा झोपाळ्याने घेतली....जेवणात दींड ऐवजी ईडली,उखरी आली आणि नागोबाची गच्छंती होऊन कायम ते चित्रातच जाऊन बसले...
  सासरी आल्यावर सासुबाईंकडनं  नागपंचमीचा एक दिवस अगोदरचा धान्य उपवास समजला...त्या दिवशी चीरणं,आणि विंचरणं हा प्रकारही बंद असतो हे समजलं...माहेर घरच्या लेकीचं कौतूक असतं, बहिणीनं भावाला दूधलाह्या भरवायच्या असतात हे सारं समजलं...त्या साठी गावातल्या नणंदबाई यायच्या...
    हल्ली तर काय हे 
सुध्दा हळू हळू लोप पावत चाललंयं...ती पिढीही, तो साग्रसंगीतपणा आणि तो मेन्यूही...
कुणाला हे सारं करण्यासाठी वेळही नाही, अशा औपचारिकपणाची आवश्यकता वाटतही नाही....
पण आमच्या पिढीजवळ त्या आठवणींचा खजिना आहे...तो सांगावासा वाटला म्हणून हा प्रपंच!
    हल्ली मात्र निसर्गाचा श्रावणात असणारा उल्हासितपणा, वृत्तींची तरलता, आणि प्राणीमात्रांविषयी सहानुभूतीपूर्वक दृषटकोन यांविषयी मनात वाटणारी प्रगल्भता पूर्णपणे वाढलेली आहे...हे ही नसे थोडके!हो ना? बस आता थांबते...🐍

©️ 
*नंदिनी म.देशपांडे*
नागपंचमी, २०२१.
औरंगाबाद. 
🌹🌹🌹🌹🌹
.

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

"व्रतबंध संस्कार".

*व्रतबंध संस्कार*
****************
   हिंदू धर्मात माणसाच्या जन्मानंतर शेवटापर्यंत त्याच्यावर सोळा संस्कार केले जातात...त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कोणता तरी एक ठराविक संस्कार केला जात असावा असा माझा अंदाज आहे...
    त्यातीलच एक 'व्रतबंध'संस्कार....
या मागचे धार्मिक अधिष्ठान थोडे बाजूला सारुन आपण या संदर्भात सामाजिक दृष्टिकोनातून विचार करु या...
    
व्रतबंध संस्कार हा सामान्यपणे मुलाच्या आठव्या वर्षी केला जातो...
बाळ बर्‍यापैकी मोठं होऊन आपली कामं ते या वयात करु लागते...म्हणजेच ते आईवडिलां पासून थोडे वेगळे झालेले असते.
या वयात ते स्वतंत्रपणे बसून दिलेला अभ्यास करु शकते,शिकण्याची कला त्याला अवगत होऊ लागते...त्याच्या भविष्याच्या वाटचालीतील हा एक फार महत्वाचा पहिला टप्पा होय...
   आपण स्वतंत्रपणे काही गोष्टी करु लागलो आहोत याचा मनस्वी आनंद त्याला होतो आणि,"मी आता मोठा झालोय," असे तो सांगू लागतो...

  व्रतबंध हा संस्कार विवाहविधीशी साधर्म्य सांगणारा...यात वडिल आणि मुलगा या दोहोंचा विवाहच लावला जातो...म्हणजेच, वडिल आणि मुलगा यांच्यात या टप्प्यावर मैत्रीचे नाते निर्माण होणे अपेक्षित आहे...मुल मोठं झालंयं, त्याला आता हात धरुन किंवा धाकधपाटा देऊन शिकवणं गरजेचं नाही तर त्याचा चांगला सहकारी बनत त्याला सुचना,मार्गदर्शन करत शिकावयास लावणं होय...
गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेण्यासाठी त्याला गुरुकुलात पाठवण्याची तयारी हा व्रतबंध संस्कारा मागचा दुसरा एक हेतू...याचाच अर्थ, वयाच्या या टप्प्यावर मोठ्या होत जाणाऱ्या मुलाला स्वावलंबन आणि समायोजनाचे धडे गिरवत गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची मुभा देणे होय...
म्हणूनच व्रतबंध संस्कार फार महत्वाचा मानला जातो....
आज आमच्या नात्यातील एका आठ वर्षीय बालकाचा व्रतबंध संस्कार पार पडला,आणि माझे मन या मागच्या सामाजिक पार्श्वभूमीचा नकळत आढावा घेऊ लागले...
शैक्षणिक शिखराची एक पायरी चढण्याची तयारी म्हणजे व्रतबंध असेही म्हणता येईल....

    आणखी एक महत्वाचे म्हणजे, 'व्रतबंध' याचा अर्थ एखाद्या नियमाशी बांधून घेणे...तो पालन करण्यात सातत्य टिकवणे...
व्रत म्हणजे,
स्विकारलेल्या नियमांचे,तत्वांचे सातत्याने पालन करणे,आणि हे पालन करण्यासाठी आपण बांधिल असल्याची जाणीव या वयात मुलांच्या मनात रुजवणे होय...
म्हणूनच योग्य त्या वयात योग्य तो संस्कार होणे केंव्हाही चांगलेच...

©️
नंदिनी म.देशपांडे. 
७,ऑगस्ट, २०२१.
🌹🌹🌹🌹🌹