रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

गानसम्राज्ञीला विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏

स्वरसूर सम्राज्ञी, गानकोकिळा, गानसरस्वती, भारतरत्न,
भारतमातेच्या पोटी जन्म घेतलेले एक अनमोल रत्न,भारतीयांचा आत्मा, संगीत क्षेत्रातील ध्रुव तारा अशी किती किती म्हणून उपाधी द्यावित असे एक स्वतःच्या अथक परिश्रमातून स्वतःला घडवलेल्या हे सुवर्ण झळाळी असणारे अनोखे व्यक्तिमत्व, आज शरीर रुपाने लूप्त झाले...त्या ईश्वराच्या दरबारात सुरांचा दरबार भरवण्यासाठी आज लता दिदी जात्या झाल्या असेच म्हणावे लागेल...
    भावनांच्या वैविध्याने ओतप्रोत स्वरांनी, भारतीय मनामनांवर किंबहूणा संपूर्ण जगावर आपल्या स्वरांचे अधिराज्य गाजवणारा हा आवाज ज्याची तुलना भारताचे नंदनवन कश्मीरशी केली जाते असा हा अलौकिक गोडवा असणारा स्वर आज हरवला....खरंच मन सैरभैर झालं काही क्षण... काहीच सुचलं नाही...हे वास्तव स्विकारावयास मन अजिबात धजावत नाहीए...दिदींच्या बाबतीत हे असे कधीतरी घडणार असं कधीच वाटत नव्हतंच...त्या कायम अमरच रहाणार स्वररुपाने आणि शरीररुपानेही हे सतत असंच वाटायचं...आणि आज अचानक ही बातमी येऊन ह्रदयाला विदीर्ण करत गेली...
    स्वरांच्या राज्यात अढळ स्थान असणारा हा चिरंतन आवाज या पृथ्वीतलावर तिच्या अस्तित्वा पर्यंत असणार आहे...
पण लतादिदी,अख्ख्या भारतीयांच्या लतादिदी आज नाही राहिल्या हे मान्य करावयास मन तयार होत नाहीए...
   पण आपले दुर्दैव आणि आज ही बातमी ऐकावी लागली...
     लता दिदींना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रध्दांजली...

-नंदिनी म.देशपांडे.

🙏🌹🙏🌹🙏

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

प्रेमळ प्रेमलताई.

*प्रेमळ प्रेमल*   
      *ताई*
**************

   प्रेमल ताईची ही प्रतिमा बघितली आणि, तिच्या मला आठवतात तशा म्हणजे, ती बहूतेक चाळीशीत असावी, तेंव्हापासून च्या प्रतिमा, डोळ्यासमोर येत राहिल्या....
    गोरी गोरीपान, पातळ जीवणी,गोल चेहरा, नाजूक बांधा असणाऱ्या प्रेमल ताईचं पहिलं आपत्य,जयाताई आज सत्तरीत आहे!
परभणीला दरवर्षीच दोन तीन वेळेला तरी तिची चक्कर असायचीच.... निळकंठराव भावजींसोबत...
    तिचं माहेर आणि आजोळ दोन्ही परभणीतच, त्यामूळे माहेरी आली की आजोळी एकदोन दिवस मुक्काम असायचा तिचा...
बाप्पांची नात, त्यांच्याच सारखी कांती आणि रुपातलं साम्य!
     तिच्या आईला,अंबुताईला आपण कोणीच बघू शकलो नाही पण, वडिल दिगंबरराव लोहगांवकर मामा आपण सर्वांनीच बघितलेले...बाप्पांचे सर्वांत जेष्ठ जावई...तेही अतिशय देखणे आणि तजेलदार कांतीचे होते...
    प्रेमल ताई,मी बघते तशी नऊवारी पातळातच दिसली नेहमीच....नेसतेही छान ती;आणि कोणताही रंग तिला शोभूनच दिसतो....  त्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलायचं...आजही ती वयाच्या 87+मध्येही स्वतःच्या हाताने नऊवारच नेसते आणि सुंदर दिसते!

     प्रेमल ताई  खरं म्हणजे बाप्पांची  नात...अंबुताई नावाच्या सर्वांत जेष्ठ मुलीची मुलगी!ही अंबुताई बाप्पा आणि त्यांची पहिली सहचारीणी कृष्णाबाई हिची मुलगी....
या नंतर कृष्णाबाई लवकरच जात राहिल्या म्हणून त्या काळच्या समाज रुढी नुसार बाप्पांचं दुसरं लग्न,आहिल्या म्हणजे मोठीआईशी झालं....पहिली कृष्णाबाई म्हणून मोठीआई उमरीकरांच्या घरी प्रवेशताच आहिल्येची 'कृष्णाबाई' झाली...
आणि लोहगांवकर मामी ज्यांना आपण सारे ओळखतो ती आपली आत्याच म्हणजे, प्रेमल ताई ला जन्म दिलेल्या आत्या च्या जागेवर नव्याने लग्न होऊन आलेली आत्या...मामींचे खरे नाव मला आजही माहित नाही पण आपली मुलगी अंबुताईच्या जागेवरची ती आपलीच अंबुताई, या नात्यानं मोठी आई बाप्पा तिला 'अंबु' बोलवायचे...
तिनेही कधीच ती त्यांना दोघांना किंबहूणा आपल्या सर्वांनाच,म्हणजे आम्हाला आत्याचे आणि बहिणीच्या मुलींना भाच्यांचे प्रेम दिले...आई,बाबा आणि आम्हालाही त्यांचा फार लळा होता...
    प्रेमल ताई आपली सर्वांत मोठी कझिन....म्हणजे जयाताई आणि तिचे भावंडं आमची भाच्चे मंडळी!पण भाच्यां पेक्षा मावशा मामा कितीतरी लहान म्हणून तिला ताईच म्हणतो आम्ही! 
   प्रेमल ताईने जयाताई मार्फत सांगितलेल्या दोन गम्मतशीर आठवणी....
     सिंधू आणि शरयू
आत्या त्यांच्या बरोबर प्रेमल ताई यांना बाप्पांनी शाळेत घातलं होतं आणि या तीघीही पडदा लावलेल्या रिक्षात बसून शाळेत जात असत....

   दुसरी आठवण म्हणजे, (गोदावरी) आत्यांचं लग्न झालेलं होतं....
त्यानंतर सिंधू आत्या,शरयू आत्या आणि त्यांची ही भाच्ची प्रेमल जवळजवळ एकाच वयोगटातल्या,तिघीही लग्नाळू वयाच्या अर्थात त्या काळातल्या...म्हणजे 72 ते 75 वर्षांपूर्विचा काळ तो! या तीघी साधारण नऊ ते बारा या वयोगटातील असाव्यात त्या वेळी...
 तर ,सिंधू आत्याला बघण्यासाठी स्थळ आलं की बाप्पा या तीघींनाही तयार व्हावयास सांगत,आणि तिघींनाही बघण्याचा कार्यक्रम व्हायचा....जिला पसंती आली तिचे हात पिवळे करायचे हा हेतू ठेवून!

     प्रेमल ताईचे मामा म्हणजे आमचे बाबा....तिच्या लग्नात बाबा पाचसहा महिन्यांचे होते...नवर्या मुलीला बोहोल्यावर चढताना नवरीचा मामा तिच्या मागे ऊभा लागतो....अशी आपल्याकडची पध्दत असते...
तिच्या मागे मामा म्हणून बाबा ऊभे होते पण बाप्पांच्या कडेवर!
     आहे की नाही सारेच गमतीशीर...आज आपल्याला वाचून आश्चर्य वाटतं पण या पिढीने हे सारं अनुभवलंयं....या पिढीच्या प्रेमलताई , नलू आत्या आणि त्या खालोखाल कुंदा आत्या ही मंडळी सहज बोलण्यातून या गमती आजही सांगत असतात...त्यातून आपल्याला त्या काळच्या सामाजिक चालीरीती लक्षात येतात...काळ केवढा बदललाय याची प्रचिती येते...
     अशी कितीतरी पावसाळे बघितलेल्या या व्यक्ती म्हणजे अनुभवांचं शहाणपण आणि आठवणींचं भांडार घेऊन आपल्या सहवासात आज आहेत याचं खरोखर अप्रुप आणि भाग्य वाटायला हवं ना आपल्याला!त्यांच्या अनुभवांची शादोरी खूप काही शिकवून जाते आपल्याला...
    आज प्रेमलताई मुलं,नातवंड,पतवंड अशा भरगच्च गोकुळात वास्तव्यास असते, आणि गम्मत म्हणजे तिची पतवंडही लवकरच लग्नाळू वयाचे होतील...
खापरपणती जावाई आणि तिचे मुलही बघेल ही निश्चित....
असेच घडो आणि तिने शतायुषाचा उंबरठा पार करो हिच मनोमन ईच्छा येथे व्यक्त करते आणि माझी लेखणी थांबवते आता...
   
©️ 
*नंदिनी म.देशपांडे*.
दि.3-1-2022.
🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, १ जानेवारी, २०२२

🌹नव्याचे स्वागत🌹

🌹नव्याचे स्वागत 🌹

     कित्ती पटकन संपल्यासारखे वाटले नाही हे 2021वर्ष! या विश्वावरच्या मानवजातीचे आयुष्य ढवळून टाकणारे वर्ष. असेच याचे सिंहावलोकन केल्यास  म्हणता येईल...सर्व म्हणजे अगदी सर्वच पातळ्यांवर या वर्षाने आपला चांगला-वाईट, मनाला विषण्णता आणण्यात ठसा उमटविला....त्यात वयाचे बंधन नव्हते की, गरीब-श्रीमंतीचे...कोणत्याही देशाच्या सीमांची बंधनं नव्हती की कोणत्याही जाती धर्माची....एक विषाणू आला....त्याने आपले परिणाम दाखवण्यास सुरुवात केली...हळू हळू पाय पसरत प्रसार गती वाढवली, नंतर वेगवेगळी रुपं धारण करत मानवाच्या जीवाशी खेळला...अगदी खेळण्यांसारखा...आधाशासारखी माणसं त्यानं अक्षरशः गिळली.... त्याने कित्तेक घरं दुःखात ढकलली, कित्तेक पोरकी केली आणि कित्तेकांच्या तोंडचा घासही काढून घेतला...
    एखादं तुफान यावं आणि त्यात वाताहात होऊन होत्याचं नव्हतं व्हावं ह्याचा अनुभव माणसानं याच वर्षात अनुभवला...
     मुलांचं बाल्य सुकवलं, त्यांच्या शिक्षणात असंख्य अडथळे निर्माण केले..."घरातच रहा" ही शिकवण यानंच दिली...चार भिंतींचे महत्व आणि डोक्यावर छप्पर असणं किती गरजेचं आहे याची प्रचिती आली...
     कोरोनाच्या या थैमानानं माणसाला पैसा हेच सर्वस्व नाही...आणि तो कितीही मोठ्या प्रमाणात असेल जवळ,  तरीही त्याने सर्वच गोष्टी मिळत नाहीत याची जाणीव झाली....
या आणि आणखी कितीतरी गोष्टी माणसाच्या जीवनावर परिणाम करवून गेल्या त्या याच वर्षात...
    अशा साऱ्या नकारात्मक गोष्टींप्रमाणेच काही चांगल्या सकारात्मक बाबींचीही महती पटली आपल्याला ती म्हणजे,आरोग्याची काळजी घेणं...माणसामाणसांतील माणुसकी जपणं, "एकमेका सहाय्य करु..." ही उक्ती प्रत्यक्षात उतरवणं....नात्यांचे महत्व जाणत त्यांची वीण घट्ट करणं एवढचं नव्हे तर एकत्रीत रहाण्याने मनाला मिळालेली उभारी टिकवून ठेवणं...
    नाण्याच्या चांगल्या वाईट दोन्ही बाजूंचा फार जवळून अनुभव घेत,संपूर्ण मानव जात यात तावून सुलाखून निघाली ती याच वर्षात, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही निश्चित....

     पण तरीही नव्याची ओढ, नव्याची उत्सुकता आणि नव्यातील नाविण्य हे ही लुभावते, खुणावतेच की माणसाला...
निसर्गानेच शिकवलेला हा उपदेश माणूस कधीही विसरला नाही, विसरणारही नाहीच...नदी जशी आपल्या मार्गाने, एका दिशेने पुढे पुढे वाहत जाते...वाहता वाहता निसर्गातील इतर घटकांचा होणारा परिणाम स्विकारत स्विकारत अविरतपणे, तसेच काळाचेही आहेच...तो कोणासाठी थांबणार नाही...पुढे सरकताना आपल्यालाही पुढे ढकलत नेतच असतो.... तो कसा व्यतित करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याची त्याची पध्दत....पण सरत्या वर्षात मिळालेल्या अनुभवांच्या शहाणपणाचं गाठोडं मात्र आपण कायम जवळ बाळगावं...न जाणो त्यातील कोणता केंव्हा उपयोगी पडेल...
   
     उद्या उगवणारे सुर्यनारायण या अवनीवरील प्रत्येक घटकासाठी नक्कीच सुखी, संपन्न, आरोग्यपूर्ण आयुष्याचा आणि शांततेचा मार्ग आखत आखत अवतरतील अशी आशा व्यक्त करु या सारे जण... आणि एवढ्याशा विषाणूची पाळंमुळं खणून काढत फेकून देण्यात आपण सारेच जण जरुर यशस्वी होऊ या...
     आज संपणाऱ्या 2021 या वर्षाला हसत निरोप देऊन, 
2022 या वर्षात प्रवेशताना 'हम होंगे कामयाब' असा नारा देऊ या...

आपल्या सर्वांना, नवीन वर्षात प्रवेशासाठी मनभरुन शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन. 🌹

©️ 
नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

नाना,एक देवमाणूस.

*नाना-एक देवमाणूस*
*********
    
    खूप दिवसांचं ठरवत होते,आपल्या नानांचं व्यक्तीचित्र शब्दांत मांडू या...पण या अख्ख्या महिन्यात कमालीची धावपळ झाली आणि राहून गेलं....आज प्रयत्न करते...
    माझा नोव्हेंबर मध्ये वाढदिवस आला की नानांची मला फार प्रकर्षाने आठवण येते...माझी भेट झाली की, अगदी हमखास ते माझ्या जन्माच्या वेळी त्यांची झालेली फजीती मोठ्या कौतूकाने सांगत आणि त्या वेळी त्यांना झालेले मानसिक क्लेश जणू ते आत्ताच अनुभवून आले आहेत असे वाटत असे....त्यांच्या चेहर्‍यावर....
     "नाना",श्री विश्वंभरराव निटूरकर मामा म्हणजे, आमच्या आक्का (गोदावरी)आत्याचे येजमान....उंचे पुरे धिप्पाड, छान कमावलेली शरीरयष्टी!दोन्ही गालांवर आणि हनुवटीवर मोठ्या खळ्या!मला आठवतात तसा जाड भिंगांचा गोल काळ्या फ्रेमचा चष्मा,विपूल काळा कुळकुळीत केशसंभार, सावळ्या रंगाला शोभेल असा पांढरा शुभ्र कुर्ता आणि शुभ्र पांढरं धोतर आणि डोक्यावर काळी टोपी असा पेहराव! त्या काळचा अधुनिक आणि नीटनेटका म्हणावा असाच अगदी...
     आक्का आत्यांचे लग्न झाले तेंव्हा त्या नऊ वर्षांच्या होत्या हे ऐकण्यात आहे...पण नानांचे वय किती असावे?याचा काही अंदाज सांगितला नाही कोणी त्यांचासोबतचाफोटोहा लग्नानंतर काहीच दिवसात काढलेलाआहे.....या वरुन त्यांचे वय सधारण सतरा अठरा वर्षे असावे....मुरली दादा सांगू शकेल...
     अत्यंत लाघवी, नितांत प्रेमळ आणि मायाळू कधीही कुणाला दुखावणार नाहीत असा स्वभाव आणि बोलताना कायम "माय "हा प्रेमभरा शब्द मुखातून बाहेर आला की समजावे हे नानाच होत!
     एकत्र कुटुंबात मधले,बहुतेक हे दोन नं चे भाऊ...त्या मूळे व्यावहारिक जबाबदारी अशी काही नसावी त्यांच्यावर....
मोठेभाऊ आणि नानांच्या पाठचे भाऊ हुशार म्हणून आर्थिक व अगणीत असणारी सांपत्तिक जबाबदारी सांभाळण्याचीही जबाबदारी या दोन भावांवरच...हे सारं आत्याच्या बोलण्यात यायचं...शेताची जबाबदारी असावी नानांवर असे वाटते......
   जगरहाटी प्रमाणे कालौघात भावाभावांच्या वाटण्या झाल्या तेंव्हा मोठ्या भावा शिवाय न करमणारे नाना, जेवणाचं ताट घेऊन भावाच्या पंक्तीला येऊन बसायचे, असे आत्या सांगतात...
   नानांच्या या अतिशय साध्या, सरळ, निर्मळ मनाच्या, आत्यांना लटका राग येत असे कधी कधी, आणि "ह्यांना काही कळत नाही, भोळा सांभ आहेत अगदी" असे आत्या म्हणायच्या...
    आत्यांची बोलण्याची ढब बघून आम्हाला हसू यायचं...
     मला नाही वाटत नाना कधीच कोणावर रागावले असतील!
    सासुरवाडीला, परभणीला आले तरीही जावयासारखे कधीच वागले नाहीत...आईबाबांना ते नेहमीच वडलां समान होते...बाबांवरही मुलासारखेच प्रेम करायचे आणि आईला 'माय दुर्गा' असेच संबोधायचे...
     माझ्या जन्माच्या वेळची गम्मत सांगते हं आता...त्यांच्या बाबतीत घडलेली...
     नोव्हेंबर महिना, थंडी मी म्हणत होती, आमावस्येची रात्र,त्यातही उगवत्या सुर्याला ग्रहण लागलेला दिवस होता तो...
माझ्या आईला प्रीमॅच्यूअर लेबर पेन्स चालू झालेल्या, अचानक सुरु झालेला त्रास बघून सारेच भांबावलेले गोंधळलेले...
      पहाटे चार पाच वाजता परभणीच्या सरकारी दवाखान्यात आईला  ॲडमीट केलेलं...सोबत मोठीआई, बाबा, कुमारकाका आणि नाना...
सगळे जेंट्स बाहेर ऊभे माझ्या आगमनाच्या प्रतिक्षेत ! खूप थंडी...बाहेर पटांगणात इतर पेशंट्चे नातेवाईक गच्च पांघरुणात झोपलेले...अशा वेळी अंधार असताना, एका पांढर्‍या रंगाच्या मोठ्या धोंड्याजवळ नाना लघुशंकेसाठी गेले...आपला कार्यभाग आटोपून ते वळले एवढ्यात ताड ताड फटाके फुटावेत तश्या शिव्या एक बाई नानांना घालत होती...त्यांचा जीव अगदी अर्धमेला झालेला...कारण 'तो' मोठा 'धोंडा' नसून एक पांढर्‍या रंगाचे पांघरुण पांघरत झोपलेली बाई होती...नानांना अंधार असल्याने हे काही दिसलं नाही आणि लक्षातही आलं नसावं....हे फटाके फुटत असतानाच थंडीचा चहा घेण्यासाठी आणि माझ्या जन्माची बातमी देण्यासाठी कुमारकाका नानांना शोधत तेथे पोहोंचले आणि हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला...
   ईकडे नात झाल्याचे समजल्या बरोबर घरी बाप्पांच्या आनंदाला पारावार राहिला नाही...तेवढ्यात, "दे दान सुटे ग्रीह्राण", असे म्हणत दारावर दान मागावयास आलेल्या लोकांना, बाप्पांनी, खुंटीला अडकवलेला जावयाचा (नानांचा) काळा कोट दान करुन टाकला...घालण्यासाठी म्हणून कोट कुठे गेला?अशी विचारणा नानांनी करताच बाप्पा म्हणाले, तुमचा होता का?मी दान करुन टाकला...हे ऐकले आणि नानांनी आपल्याच कपाळावर हात मारुन घेतला आणि गप्प राहाले बिचारे नाना....काय करतील?सासर्यांना जाब कसा विचारावा?
    अशी सारी त्यांच्या झालेल्या फजीतीची आठवण मला डोळ्यासमोर बघताच त्यांना हमखास व्हायचीच, आणि नाना केवालवाणा चेहरा करत, अगदी विनोदी ढंगाने ती कथन करायचे!आम्हा सर्वांची मात्र हसून हसून मुरकुंडी वळायची!
    असे आमचे नाना, आजही त्यांची प्रकर्षाने आठवण येते...अशी प्रेमळ माणसं आपल्या आयुष्यात आली,त्यांचा थोडाफार सहवास मिळाला आणि आयुष्य समृध्द होत गेलं, याचा मनस्वी आनंद वाटतो आज!
ति.स्वरुप नानांना विनम्र अभिवादन करत मी येथे थांबते आता...🙏🙏

©️ सौ.नंदिनी म. देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

पवशी.

ओळखलंत का मला मंडळी? माझी आठवण येते का कधी कुणाला?जरासा ताण द्या तुमच्या
स्मरणशक्तीला!अगदी, बालपणात जा म्हणजे येईल माझी सय!
    अहो, माझ्याशिवाय गृहिणीचं पान हालत नसे...स्वयंपाक चालू करण्या अगोदर माझ्याशी संवाद अनिवार्य च असायचा!
छोटीशी जागा व्यापणारी मी, पण पटदीशी मदतीसाठी तत्पर असायचीच!साऱ्या स्वयंपाकघरभर भिरभिरती नजर असायची माझी. बाजारातून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्यांवर विशेष नजर ठेवून असायची मी... आणि कुठलीही भाजी आणि मी आमच्यात आडवा विस्तू जात नसे कधीच...'विळ्या भोपळ्याचे नाते', 
ही म्हणही माझ्याच स्वभावाचा परिपाक!चांगला किंवा वाईट?हे ज्याचे त्याने ठरवावे....चांगले मानाल तर जेवणात भाजी खाल आणि वाईट मानाल तर भाजीशिवाय जेवाल!ठरवावे ज्याने त्याने...
  मला मात्र खूप आठवण येते हो, आजही....कुठे तरी कोपर्‍यात  आहे माझे अस्तित्व शिल्लक!पण वय झाल्यासारखी पडून रहाते आपली....कोणाला तरी कधीतरी आठवण होईल माझी या आशेवर...कधी कधी वाटतं, दुर्मिळ वस्तूंच्या यादीत माझी रवानगी होऊन काचेच्या कपाटात जागा मिळेल कदाचित!
   कैरीचा,लिंबाचा आंबटपणा, भेंडीचा चिकटपणा, भोपळ्याचा कडकपणा, मिरचीचा तीखटपणा आणि 
आवळ्याचा तुरटपणा,कारल्याचा कडवटपणा आणि फळांचा गोडवाही सगळ्यांच्या सगळ्या तर्‍हा, स्वभाव फार जवळून अनुभवलंय मी!
माझ्या सर्वात जास्त आवडीचं ओलं नारळ बरं का... माझ्या बोटांवर नाचवत नाचवत  त्याचा अख्खा चव काढण्याची किमया मला साध्य करता यायची!
     आता "मात्र गेले ते दिन गेले",असंच म्हणावे लागते...
 येतील का परत फिरून गेलेले ते दिन?कठिण वाटतंयं सारंचं...असो...पण झालीच कधी आठवण माझी तर नक्कीच आवाज द्या,असेल त्या कोपर्‍यातून लगेच येईन तुमच्या मदतीला धावून!आजही त्राण आहे बऱ्या पैकी माझ्यात...पण तुमच्यात आहे आहे का बघा तरी बसण्याचा त्राण?तेच आजमावून बघा अगोदर आणि मग मला बोलवा.....
    अरे,हो विसरलेच मी माझे नावच सांगावयाचं राहून गेलं...जुन्यांना, आडजुन्यांना माहित असेल कदाचित पण नव्यांना मात्र माझी ओळख करवूनच द्यायला हवी....माझे नाव ना,'विळी' विदर्भात मला,'पावशी' म्हणतात...
दोन्हीही नावं माझ्या आवडीचीच!

©️
*नंदिनी म. देशपांडे*

🌹🌹🌹🌹

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

बालकदिन

बालपण

आपल्याच बालपणात पुन्हा फिरुन डोकावताना....

   वाटतं,पुनःश्च
   लहान व्हावं...
    अवती भोवतीचा
   स्वच्छंदीपणा आणखी
   एकदा अनुभवावा...

    निरागस प्रश्नांची
     मौक्तिक माला 
    अविरत ज्यपावी...

    फुलपाखरू होऊन
     उंच उंच उडावे
     परि बनून आनंदाने
    खूप खूप बागडावे....

   भातुकलीच्या खेळात,
    बाहुला बाहूलीचे
    लगिन लावावे...

  लुटूपूटूचा स्वयंपाक
   साग्रसंगीत बनवून
 जेवणावळी
घलाव्यात....

 पावसात भिजत चिंब
कागदाची नाव
पाण्यावर सोडावी...

  चॉकलेटचे बांधावेत ईमले
      टपाटप टाकत टापा
    घोड्यावर घ्यावी रपेट....

मामाचं पत्र,आंधळी 
     कोशिंबीर,शिवनापाणी 
आणि
लपाछपी खेळत खेळत
दमून जावं....

बाबांच्या हातून घास
   घेत गोड खाऊचा
  आईच्या तोंडून गोष्ट
   ऐकावी हिरकणीची....

 होताच रात्र,
  पदराच्या पांघरुणात
   आईच्या कुशीत
   झोपावं गुडगुडुप्प
   झोपावं गुडगुडुप्प...

© 
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

दिवाळीचा निरोप एक हुरहुर.

आली आली दिवाळी आली, म्हणत म्हणत आजच निरोप घेऊन निघून गेलेली दिवाळी आपल्याला कितीतरी सकारात्मक उर्जा बहाल करवून गेलीए, ही जाणीव आज मनाला झाली...
गतस्मृतिंना उजाळा देत, माहेरच्या आठवणीत आईच्या स्मृतांना स्मरत त्या जागवत गेली...
नवीन आठवणींची दुलई मनावर घालत मानसिक ऊब देऊन सांगता होणारी ही दिवाळी म्हणजे आपली जवळची सखीच जणू!
आपल्या सहवासात चैतन्याने न्हाऊ माखु घालणारी,कितीतरी मनोकामनांचा नैवैद्य स्विकारणारी अशीच....
माणसाच्या वागण्या बोलण्यात सकारात्मक वृत्तींना खतपाणी घालत जाणारी,ती हिच दिवाळी...
अंतःकरणात प्रेम माया, वात्सल्य, भक्तीरस यांना सवे घेऊन येणारी ती हिच दिवाळी!
   या दिपोत्सवाच्या मंद प्रकाशात तेजाळत जाणारी मनं, आपल्याला मिळालेल्या समाधानाचे तेज चेहर्‍यावर विलसत ठेवते...आपल्या देहबोलीतून प्रकट होत जाते...
    लक्ष्मीच्या रुपाने आगमन करणारी ही दिवाळी पक्वान्नांच्या  पंक्तींचा थाट करते...फराळाच्या पदार्थांची मांदियाळी सजवते...रंगावलींचा गालिच्या ची बिछायत घालते... घराचे सुशोभीकरण करत मनाचे सुशोभीकरण साधते...
शरदाच्या चांदण्या शिंपवत हवेतील गारव्याचे मोरपीस अंगावर फिरवते आणि रोमांचित करते...ऋतूबदलाची वर्दीही देऊ करते...
    अशा या हव्याहव्याशा मैत्रीणीने आज निरोप घेतला आणि 
लगबगीला मंदावलेपण आलं जरासं...
गेल्या काही दिवसांत अपूर्ण राहिलेली निद्रादेवी आपल्या डोळ्यांचा ताबा घेतीए असं जाणवत राहिलं...आणि एखाद्या मोठ्या कार्यानंतर मांडववारं
लागणं काय असतं? हे लक्षात आलं...
पण हे मांडव वारं नव्हे तर नवीन स्वप्न, योजना यांना आकारण्या साठी घेतलेला अल्पविराम आहे असे मनानं समजावलं....

  ©️
नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹