सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

कृष्णसखा....

श्रीकृष्णा, आयुष्यातील कितीतरी आठवणींना तू सोबत केलीएस अगदी
बालवयापासून.... काळ्याशार मातीतून साकारलेले तुझे रुप,कृष्णाने जणू आपल्याच घरात जन्म घेतलाय,असेच भासवायचा...मन मोहवूनच टाकायचा...गोकुळ आष्टमीच्या दिवशी  आजीने आणि तिच्यानंतर आईने साकारलेले गोकूळ, मला तुझ्या अंगणी खेळायला येण्यासाठी खुणवायचे...
मग एकदाचा तू अवतरलास, कृष्णजन्म झाला आणि खमंग सुंठवडा हातावर प्रसाद म्हणून मिळाला की पुढचे चार आठ दिवस आपली गट्टी अशी काही जमायची ना खेळताना!गोकुळातील गवळणी, बलराम, सारेच सामील व्हायचे..
रांगत रांगत जाऊन मिश्किल भाव दाखवत दही,लोणी खाणारे तुझे चित्रातील बाळरुप हातात घेऊन कुरवाळण्याचा मोह तर कितीदा झाला म्हणून सांगू!
शालेय वयामध्ये कोपलेल्या ईंद्रदेवाला शह देत अख्खा पर्वत निश्चलतेने आपल्या करंगळीवर पेलणारा तू,आमचाच सवंगडी कान्हा व्हायचास...त्या पर्वताखाली आम्हालाही आसरा देत आहेस अशीच जाणीव द्यायचास... 
     तारुण्यात प्रवेश करताना, तुझे बासरी वाजवणारे सावळे,सुंदर मनोहर, निर्मोही रुप कायम मनात भरुन असायचे...शांत, शीतल निर्मळ प्रेमानं ओतप्रोत भारलेला तुझा चेहरा मनात कायम रुंजी घालायचा... 
मनरमणा, 
होळीचा रंग खेळताना तू सतत सोबत करायचास...
आणि त्यानंतर संसार मागे लागला...कोणत्याही अडचणीत तूच डोळ्यासमोर यायचास सखा बनून...आजही येतोस...योग्य मार्गदर्शन करतोस आणि पुढे चालायला शिकवतोस....शंख,चक्र, गदा पद्म हातात घेवून समोर दिसणारे तुझे प्रसन्न रुप क्षणात हसू आणते ओठावर आणि निर्धास्त करते...
कधी व्यंकटेशाच्या रुपात, कधी विठ्ठलाच्या रुपात कधी नारायणाच्या रुपात तर कधी विष्णूच्या रुपात भेटायवयास येतोस तू.
देवघरातील लंगडा बाळकृष्ण तर कायमच हसरी सोबत करतो...त्याचा अवतोभोवती असणारा वास सतत दिलासा देत रहातो...तू आहेस पाठीशी ही जाणीव फारच अश्वासक वाटते...सगळी संकटं पेलण्यास तू आहेस समर्थ, मग कशाला हवाय किन्तु मनात !
तुझा मधूर पावा ऐकत सुमधुर संगीत ऐकण्याची जाण निर्माण केलीस ती तूच...
  निसर्गात पानाफुलांच्या रुपात रंगीबेरंगी फुलातून तूच तर हसत खेळत असतोस...वार्‍या सवे डोलतोस आणि पक्ष्यांच्या सुरातून गोड पावा वाजवत रहातोस...केवढा तरी आधार, उभारी देत असतोस मनाला आणि चैतन्य खेळवतोस शरीर रुपी या माणसाच्या नश्वर देहात!
किती तुझे उपकार किती तुझी रुपं आणि किती तुझी ती  किमया!आमच्या अख्ख्या आयुष्याला प्रेरणा देण्यासाठी,भावनांचा समतोल साधण्यासाठी तू अवतार घेत रहातोस वेळोवेळी! वेगवेगळे 
असाच सोबत कर रे राजसा...
🙏🌹🙏

 ©️
नंदिनी म. देशपांडे .
कृष्णाष्टमी ,२०२१.
🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बालपण आणि नागपंचमी.

*बालपणीची नागपंचमी*🐍

   नागपंचमी झाली आईचीही सय आली आणि बालपणातल्या किती तरी नागपंचमींची आठवण जागवत गेली, नव्हे ताजीच झाली...
अगदी आठ नऊ वर्षाची होते मी, तिसरी चौथीत असेल...दर वर्षी नागपंचमीला आई आम्हा भावंडांना नवीन कपडे शिवून घ्यायची...त्या वेळच्या नवीन फॅशनचा!
आणि अगदी पारंपारिक पध्दतीने हा सण साग्रसंगीत  साजरा व्हायचा...
माझ्यासाठी लाल रंगाचा पांढरी लेस लावलेला प्लेन पाकिजा शिवला होता त्या वर्षी...
आजही लख्ख आठवतोय...
नागाचे चित्र असलेल्या पुठ्ठ्याच्या वहीची खरेदीही झाली...त्या पूर्वि दोन दिवस बारीक पानांची मेंदीची झाडं मैत्रीणींनी मिळून शोधत शोधत त्याची पानं आणून झाली होतीच....ती पाटा वरवंट्यावर वाटून मेहंदी भिजवणे त्यात कात, चुना मिसळून...आणि दोन्ही हातांवर रात्री झोपताना लेप फासणे, शिवाय यावर थोडे सुकल्या नंतर कपडयाने तळहात बांधून झोपणे असा कार्यक्रम असायचा...
सकाळी तेल लावून हात धुतले की लालेलाल हात बघून स्वतःचेच कौतूक वाटायचे!
    शाळेत नवीन कपडे, नव्या बांगड्या, नवे कानात, गळ्यात, हातावर मेहंदी आणि सजून धजून स्वारी शाळेत निघायची...आठवणीने नागाच्या पुठ्ठ्याची वही सोबत घेऊन...
मग शाळेत या पुठ्यावरच्या चित्राची पुजा म्हणून तीन तीन वेळेला पाया पडले जायचे!
   त्या दिवशी अर्धीच शाळा असायची, घरी आईने कागदावर पेनाने काढलेल्या नागोबाला नमस्कार होत असे आणि मग उकडीचे दिंड, ढोकळा यावर जेवणात ताव मारला जायचा...
   दुपारी वाड्यात गारुडी यायचा नागोबा त्याच्या गोल झाकणाच्या परडीतुन हळूच डोकावत हळू हळू वळवळत बाहेर यायचे...किती दूर उभे असायचो आमही मूले!मनातील भितीचे साम्राज्य डोळ्यात मावायचे नाही!
कोणी तरी मावशी, काकू समोर जाऊन त्याला हळदी कुंकू वहायच्या आणि दूधाची छोटी वाटी त्याच्या समोर ठेवायच्या...गट्टम करायचा ना तो क्षणात!
आणि मग दिवसभर काय दोन तीन  दिवस उंबराच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावर उंच उंच झोके घेत मज्जा चालायची! आम्ही मुलीच नव्हे तर वाड्यातील सर्वच स्त्रियाही बालिकाच बनायच्या!
हळू हळू पानांच्या मेंदीची जागा मेंदीच्या पावडरने घेतली, काडीने हातावर डिझाईन आले,मग तीच जागा मेंदीच्या कोनाने घेतली....
झाडावरच्या झोक्याची जागा परसातल्या झूल्याने किंवा झोपाळ्याने घेतली....जेवणात दींड ऐवजी ईडली,उखरी आली आणि नागोबाची गच्छंती होऊन कायम ते चित्रातच जाऊन बसले...
  सासरी आल्यावर सासुबाईंकडनं  नागपंचमीचा एक दिवस अगोदरचा धान्य उपवास समजला...त्या दिवशी चीरणं,आणि विंचरणं हा प्रकारही बंद असतो हे समजलं...माहेर घरच्या लेकीचं कौतूक असतं, बहिणीनं भावाला दूधलाह्या भरवायच्या असतात हे सारं समजलं...त्या साठी गावातल्या नणंदबाई यायच्या...
    हल्ली तर काय हे 
सुध्दा हळू हळू लोप पावत चाललंयं...ती पिढीही, तो साग्रसंगीतपणा आणि तो मेन्यूही...
कुणाला हे सारं करण्यासाठी वेळही नाही, अशा औपचारिकपणाची आवश्यकता वाटतही नाही....
पण आमच्या पिढीजवळ त्या आठवणींचा खजिना आहे...तो सांगावासा वाटला म्हणून हा प्रपंच!
    हल्ली मात्र निसर्गाचा श्रावणात असणारा उल्हासितपणा, वृत्तींची तरलता, आणि प्राणीमात्रांविषयी सहानुभूतीपूर्वक दृषटकोन यांविषयी मनात वाटणारी प्रगल्भता पूर्णपणे वाढलेली आहे...हे ही नसे थोडके!हो ना? बस आता थांबते...🐍

©️ 
*नंदिनी म.देशपांडे*
नागपंचमी, २०२१.
औरंगाबाद. 
🌹🌹🌹🌹🌹
.

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

"व्रतबंध संस्कार".

*व्रतबंध संस्कार*
****************
   हिंदू धर्मात माणसाच्या जन्मानंतर शेवटापर्यंत त्याच्यावर सोळा संस्कार केले जातात...त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कोणता तरी एक ठराविक संस्कार केला जात असावा असा माझा अंदाज आहे...
    त्यातीलच एक 'व्रतबंध'संस्कार....
या मागचे धार्मिक अधिष्ठान थोडे बाजूला सारुन आपण या संदर्भात सामाजिक दृष्टिकोनातून विचार करु या...
    
व्रतबंध संस्कार हा सामान्यपणे मुलाच्या आठव्या वर्षी केला जातो...
बाळ बर्‍यापैकी मोठं होऊन आपली कामं ते या वयात करु लागते...म्हणजेच ते आईवडिलां पासून थोडे वेगळे झालेले असते.
या वयात ते स्वतंत्रपणे बसून दिलेला अभ्यास करु शकते,शिकण्याची कला त्याला अवगत होऊ लागते...त्याच्या भविष्याच्या वाटचालीतील हा एक फार महत्वाचा पहिला टप्पा होय...
   आपण स्वतंत्रपणे काही गोष्टी करु लागलो आहोत याचा मनस्वी आनंद त्याला होतो आणि,"मी आता मोठा झालोय," असे तो सांगू लागतो...

  व्रतबंध हा संस्कार विवाहविधीशी साधर्म्य सांगणारा...यात वडिल आणि मुलगा या दोहोंचा विवाहच लावला जातो...म्हणजेच, वडिल आणि मुलगा यांच्यात या टप्प्यावर मैत्रीचे नाते निर्माण होणे अपेक्षित आहे...मुल मोठं झालंयं, त्याला आता हात धरुन किंवा धाकधपाटा देऊन शिकवणं गरजेचं नाही तर त्याचा चांगला सहकारी बनत त्याला सुचना,मार्गदर्शन करत शिकावयास लावणं होय...
गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेण्यासाठी त्याला गुरुकुलात पाठवण्याची तयारी हा व्रतबंध संस्कारा मागचा दुसरा एक हेतू...याचाच अर्थ, वयाच्या या टप्प्यावर मोठ्या होत जाणाऱ्या मुलाला स्वावलंबन आणि समायोजनाचे धडे गिरवत गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची मुभा देणे होय...
म्हणूनच व्रतबंध संस्कार फार महत्वाचा मानला जातो....
आज आमच्या नात्यातील एका आठ वर्षीय बालकाचा व्रतबंध संस्कार पार पडला,आणि माझे मन या मागच्या सामाजिक पार्श्वभूमीचा नकळत आढावा घेऊ लागले...
शैक्षणिक शिखराची एक पायरी चढण्याची तयारी म्हणजे व्रतबंध असेही म्हणता येईल....

    आणखी एक महत्वाचे म्हणजे, 'व्रतबंध' याचा अर्थ एखाद्या नियमाशी बांधून घेणे...तो पालन करण्यात सातत्य टिकवणे...
व्रत म्हणजे,
स्विकारलेल्या नियमांचे,तत्वांचे सातत्याने पालन करणे,आणि हे पालन करण्यासाठी आपण बांधिल असल्याची जाणीव या वयात मुलांच्या मनात रुजवणे होय...
म्हणूनच योग्य त्या वयात योग्य तो संस्कार होणे केंव्हाही चांगलेच...

©️
नंदिनी म.देशपांडे. 
७,ऑगस्ट, २०२१.
🌹🌹🌹🌹🌹

मंगळवार, १३ जुलै, २०२१

तात्यासाहेब देशपांडे.

दोन तीन दिवसांपूर्वीच फादर्स डे पार पडला...प्रत्येकाने तो आपल्या वडिलांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत, साजरा केला...
काकांविषयी व्यक्त व्हावं असं आवर्जुन वाटायचं माझ्या मनाला,काका,माझे सासरे,म्हणजे माझ्यासाठी पित्यासमानच...यांच्या विषयी व्यक्त होण्यास वाटलं,  हे निमित्त अगदी योग्य आहे 

   केवळ वर्ष दिडवर्षेच काय तो त्यांचा सहवास लाभला मला त्यांचा...वाटलं असे कितीसे ओळखतो आपण त्यांना? पण मधुकरच्या बोलण्यातून येत असणाऱ्या त्यांच्याविषयीच्या संदर्भाने मग मी एक आठवणींची मालिका मांडत गेले....
     काका, म्हणजे स्व.श्री भुजंगराव संतुकराव उमरजकर देशपांडे. जन्म.१९०७ चा ...
माझे हे सासरे.... त्यांच्या शेंडेफळ आपत्याचे लग्न झाले, म्हणजेच मधुकर आणि मी विवाहबंधनात बांधले गेलो, तेंव्हा आमच्या काकांचे वय होते, ७८ वर्षे....
लग्नानंतर गावी गेले असताना चार आठ दिवस आणि ते आमच्या बदलीच्या गावी जेमतेम महिनाभर राहिले असावेत एवढाच काय तो माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष सहवास!
      त्यांचे आईवडिल लवकरच गेलेले, आत्याने (वैधव्य आलेल्या)या दोन भावंडांना सांभाळले...आमच्या घरी राहून त्यांचे पालनपोषण केले...शेती बघितली...
    काकांना गावात सारेजण 'तात्यासाहेब' या नावाने संबोधत....
तात्यासाहेबांनी त्या काळात नववी पर्यंत शिक्षण घेत शेतीकडे लक्ष द्यावयास सुरुवात केली....आपल्या शिक्षणाला पूर्णविराम देत,शहरात शिकावयास न जाता घराच्या कारभाराची जबाबदारी स्विकारली...

   तात्यासाहेबांना गावातील पोस्टाचे, (पोस्टमास्तर) चे काम मिळाले...नोकरी म्हणून नव्हे पण काही अंशी मानधन मिळायचे त्यांना यातून...पोस्ट खात्याकडून विचारण्यात आल्या नंतर त्यांच्या विनंतीला मान देत,काकांनी गावात पोस्टाची सोय होईल लोकांसाठी, या हेतूने हे काम घरीच करावयाचे पण आनंदाने स्विकारले...
      त्या वेळी सहा पैशांना एक पोस्टकार्ड होतं, असे चार पोस्टकार्ड घेतल्यानंतर एखाद्या ग्राहकाने पंचेवीस पै. दिल्यास, राहिलेला एक पैसाही काका ग्राहकाला परत करत असत!
त्यामूळे घरी येणाऱ्या लोकांचा राबता वाढला...

    काकांना,धार्मिक ग्रंथ पठणाचा नाद होता...ओसरीवर त्याचे नियमित पणे काही वेळ हे वाचन पठण चालू असायचे...आपल्या कानावरही हे पडेल या निमित्ताने अनेक जण येवून बसत ओसरीवर....
    एक अतिशय तत्त्वनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व, एक सोज्वळ देवमाणूस अशी त्यांची गावभर ओळखली जाणारी प्रतिमा होती...
    गाव तसे छोटेसेच. फार पूर्वी दवाखान्याची सोय नव्हती,पण लोकांची तात्यासाहेबांवर फार श्रध्दा. एखादी अडलेली पहिलटकरीण असेल तर आमच्या काकांना ही लोक नदीवर घेऊन जायची पाण्याची घागर त्यांच्या स्वहस्ते भरून आणत, पहिलटकरीणीच्या अंगावर ओतायला लावायचे लगेच ह्या बाईची प्रसुती होऊन तिला वेदना मुक्ती मिळायची असा गावकऱ्यांचा विश्वास होता...

    उममरज आमचे गाव...मन्याड नदी वाहते आमच्या गावातून....नळाची सोय नव्हती त्या वेळी, पुरुष माणसं नदीवर अंघोळीला जायचे आणि येताना पिण्याच्या पाण्याची लगड  घेऊन यायचे हा शिरस्ता होता...
  
काकांच्या प्रामाणिकपणाची
साऱ्या पंचक्रोशीत ख्याती होती...आसपासचे लोक बाहेरगावी जाताना स्वतःच्या घरातील किंमती ऐवज, पैसा अडका काकांच्या स्वाधीन करुन जायचे!आपण केंव्हाही परतलो तरी, जसाच्या तसा सारा ऐवज आपल्याला लगेच परत मिळतोच असा लोकांना गाढ विश्वास होता त्यांच्यावर....

  दिसायला देखणे, मध्यम उंचीचे, गोरेप्पान काका अत्यंत शिस्तीचे होते....सकाळी अगदी हलकी न्याहरी आटोपून देवपुजा,गड्याने शेतातून आणलेल्या पळसाच्या पानाचे दररोज थोडे द्रोण पत्रावळी बनवून ठेवणे, शेतामध्ये जाऊन येणे, पोस्टाचे काम बघणे, आल्या गेलेल्यांची व्यवस्थित विचारपूस करणे, पाहूणे आले तर त्यांचा आदर सत्कार करत,त्यांना पाहूणचार करणे ,दररोज मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन येणे..आणि सायंकाळी सायंप्रार्थना आटोपत  अगदी वेळेच्या वेळी 
मोजकाच आहार घेणं असा त्यांचा दिनक्रम असायचा...
वर्षातून दोन वेळेस तरी लेकीबाळी माहेरपणाला आणणे...दिवाळी आणि उन्हाळ्यात...
जावयांचा मानसन्मान, नातवंडांच्या सहवासात रमणं हे सारं त्यांना आवडत असे...
   बाजारहाट करण्यासाठी जवळच्या तालूक्याच्या ठिकाणी पायी किंवा बैलगाडीने जावे लागायचे....
सारा प्रपंच आवश्यक त्या गरजा पूर्ण करत पण काटकसरीनं, व्यवस्थित रीती रिवाजानं सणवार साजरे करत, कुलधर्म कुलाचाराचे आचरण करत कोणाचेही मिंधेपण न स्विकारता अगदी स्वाभिमानाने चालवला त्यांनी....केवळ शेतीच्या उत्पन्नावर!
सहा आपत्यांचे शिक्षण,लग्नकार्य, त्यांची बाळांतपणं सणवार यथोचित केले...
गाठीशी रोकड रक्कम नसायची पण अडल्या नडल्या परिस्थितीत लोकांना, नातेवाईकांना शेतमालाच्या रुपाने मदत द्यायचे....
मधुकरचे सारेच शिक्षण घरापासून लांब राहून झाले...त्याला नियमीत पत्र लिहून त्याची खुशाली विचारत.. येणाऱ्या सणवारांची माहिती द्यायचे...
व्यवहारात अगदी चोखपणा बाळगला काकांनी...
भावाने जरी तिकीट काढले असेल कधी बसचे,तर त्यालाही घरी आल्यानंतर लगेच तिकीटाचे पैसे चुकते करत ते!
   मला आठवतं, आमच्या लग्नाच्या वेळी उमरजहून औरंगाबाद येथे येण्यासाठी बसभाडे रु.पाच हजार माझ्या बाबांनी देऊ केले होते....साडेचार हजारच लागले, 'हे उरलेले पाचशे रु.' असे म्हणत बाबांनी नको म्हणत असतानाही त्यांनी ती पाचशे रु.ची रक्कम परत केली होती...

मला प्रथम बघितले त्यांनी होणारी सून या दृष्टिकोनातून... आणि पहिला प्रश्न विचारला, 'आम्ही खेडेगावात रहाणारी माणसं, निमित्तानं चार दिवस आलीस, पोरी गावी,तर करमेल तुला?"आणि "भाकरी खाणारे आम्ही, ती बनवायला येते का?"
मला खरोखरच येत नव्हती...पण मीही अश्वासन दिले त्यांना, मी शिकेन लवकरच आणि तुम्हाला बनवून वाढेल...
आणि ज्या वेळी पहिल्यांदा ते आमचा संसार बघावयास सेलू या गावी आले तेंव्हा, मी त्यांना माझ्या हातची भाकरी करुन वाढली....तर ते माझ्या सासुबाईंना कौतुकाने म्हणाले, "पोरीने केलेली ही भाकरी बघा किती पातळ आहे!पोळी आहे का भाकरी?कळत सुध्दा नाही"...
    गावी मी चूल पेटवून स्वयंपाकही बनवलाय हे बघून त्यांना फार कौतूक वाटायचे...जन्मापासून शहरातच वाढलेली मी, काही कामं येतील का हिला?यासाठी साशंक होते ते...
पुनःश्च एकदा आमच्या बदलीच्या गावी (सेलू ) येथे त्यांना काही दिवस येऊन रहावयाचे होते...लकडा लावला होता त्यांनी सारखा 
पण, नियतीला ते अमान्य होते...
   मार्च महिना,दुपारचे भर बारा वाजत आलेले,
कोणी परिचित आलाय म्हणून त्याच्याशी बोलत बसले....पर्यायानं स्नान, देवपुजा यांना उशिर झाला..."आजच्या दिवस राहू द्यात देवपुजा", असे म्हणताच चिडून म्हणाले,"माझ्या जीवात जीव आहे तोवर मी पुजा करणे सोडणार नाही" ...
सिंहगर्जनाच केली त्यांनी...मात्र दररोज सोवळे नेसून पुजा केल्या नंतर त्यांना लगेच  गरमागरम जेवण तयार लागायचं...
 ते स्वयंपाक घरात आले की जेवायला बसायचे...
त्या दिवशीही असेच घडेल असे वाटले होते....आमच्या ताई पुजेची सारी तयारी काकांना करुन देत, त्यांचे ताट वाढण्यासाठी स्वयंपाक गृहात दाखल झाल्या आणि सासूबाई चूलीजवळ गरम भाकरी करु लागल्या...
 देवासाठी लावलेली तेवती निरंजन एका कपाटा प्रमाणे असणाऱ्या देवघरात ठेवताना, त्यांच्या डोळ्यांच्या अधू झालेल्या दृष्टिने घात केला आणि,ती निरंजन त्यांच्या सोवळ्याच्या सोग्यावर ठेवली गेली....भराभरा सोग्याने खालच्या बाजूने पेट घेतला...पायाला चटके बसेपर्यंत त्यांच्या लक्षात आले नाही...तेथून तसेच बाहेर आले...आतल्या खोलीत जाऊन आपले पेटलेले सोवळे त्यांनी फेडून टाकले...पण... पण तो पर्यंत कमरेपर्यंत चा भाग अगदी भाजून निघाला होता....
सासूबाई आणि ताई तेथे येईपर्यंत बरीच हानी पोहोंचली होती त्यांच्या शरीराला...
असह्य वेदना होत असतानाही तशाच वेदना सहन करत स्थितःप्रज्ञ होऊन केवळ "डोंगराला आग लागली", असे म्हणाले आणि मुखी विष्णूसहस्रनामाचा पाठ त्यांनी सुरु केला....
    खेडेगाव, वाहनाची बस शिवाय दुसरी सोय नाही...बसही फक्त दोन वेळेस...त्या दिवशी योगायोगाने  नेहमी दहा वाजता येणारी बस दुपारी बारा वाजता आली...
गावकऱ्यांनी घडलेल्या अपघाताची कल्पना बसचालकाला दिली...त्या भल्या माणसाने काकांना आणि आवश्यक त्या लोकांना बसमध्ये घेतले आणि सरळ ती बस कंधारच्या हॉस्पिटल समोरच थांबवली....घरी असेपर्यंत सासूबाई आणि लेकीने त्यांना साठवलेल्या सायीमध्ये हळद मिसळून लेप लावला होता त्यांच्या  शरीरावर....
    हाच काय तो प्राथमिक उपचार झाला...कारण कंधारचे डॉक्टर ही पेशंटची अवस्था बघून उपचारास धजावले नाहीत...त्यांनी सरळ नांदेडला घेऊन जावयास सांगितले...
त्यात आणखी दोन तीन तास गेले...
पण, डोंगराएवढ्या काळजाचा,करारी वृत्तीचा हा देवमाणूस अजिबात डगमगला नाही...मुखी अव्याहत देवाचे नामःस्मरण चालूच होते...रक्ताची आवश्यकता त्यांच्याच धाकट्या मुलाने म्हणजे, मधुकरने त्यांना रक्त देवून पूर्ण केली...ऐंशी वर्षाच्या या महापुरुषाला आपली दोन्ही मुलं आपल्या जवळ आहेत याचे खूप समाधान वाटले आणि अपघातानंतर आठ दिवसांनी अगदी शांततेने दोन हात जोडत, २८मार्च,१९८७ या दिवशी जगाचा कायमचा निरोप त्यांनी घेतला...
 गंगाकिनारी आपला देह ठेवून गावकरी आणि आप्तजनांसाठी आपल्या कितीतरी समृतींचा गंध साठवून गेला....सारं गाव हळहळलं देवमाणसाविना पोरकेपणा आल्याच्या भावना व्यक्त करत साश्रू नयनांनी त्यांच्या आठवणी जागवत राहिलं....
असे माझे हे पित्यासमान सासरे, 
केवळ दीड वर्षांच्या सहवासातून माझ्या मनातील त्यांची प्रतिमा कितीतरी उंचावर नेऊन ठेवत, स्वर्गवासी झाले...नेमक्याच झालेल्या पितृदिनानिमित्त त्यांचे स्मरण करत, माझी ही शब्दसुमनांजली त्यांना वाहते....
🙏🙏
-- नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

बाप्पा.

🌹'कर्तव्याने घडतो माणूस'
  आमचे बाप्पा आजोबा.🌹
  ‐------------------------------         
 श्री आनंदराव शेषराव उमरीकर....
वकील. परभणी. 
हे माझे आजोबा. माझ्या वडिलाचे वडील...
 त्यांची मुलं,मुली,जावई,सूनबाई,आप्तस्वकीय, नातवंड ही सारीचजण त्यांना "बाप्पा"
असे म्हणत...घरी सर्वांचे बाप्पा असणारे आजोबा, बाहेर साऱ्यांचे आनंदराव,वकिलसाहेब  होते...
    मी अगदी चार वर्षांची असेल तेंव्हा आपल्या वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करुन बाप्पांनी या जगाचा निरोप घेतला...सहाजिकच त्यांच्या मला मिळालेल्या सहवासाच्या आठवणी मला आठवाव्यात हे अशक्यच...पण, माझ्या बाबांचं दैवत असणाऱ्या बाप्पांचा मोठा फोटो कायम आमच्या बैठकीत लावलेला असायचा, आजही तो आहेच...सोबत माझ्या मोठीआईचाही...
पण मोठीआई मी दहा वर्षाची असताना गेली.... म्हणून तिच्या थोड्यातरी आठवणी स्मरणात आहेत माझ्या....असो...

 बाप्पांची प्रतिमा बघत बघत त्यांचं अस्तित्व कायमच माझ्या माहेरी जाणवत रहायचं....बाबांनी आईने ते त्यांच्या आठवणी सांगत जागतं ठेवलं असं म्हणू या हवं तर...
आणि यामूळे ते मला पुसटसे आठवतात असा भास होतो...
    पण बाबांच्या सांगण्यातून बाप्पांच्या आठवणींना उजाळा मिळत जातो...तो आपण शब्दबध्द करावा असं प्रकर्षानं   वाटलं आणि लिहिती झाले मी...

...२७ मे,१९७० मध्ये बाप्पा गेले तेंव्हा ते ८० वर्षे वयाचे होते...म्हणजेच त्यांचा जन्म इ.स.१८९० चा...बालपण परभणी जिल्ह्यातच असणाऱ्या (माळाची) उमरी या गावी गेलेले...या छोट्याशा गावी एका टेकडीवर ईंद्रायणी देवीची प्रसन्न मूर्ति(तांदळा)वास करतो...
याच गावी त्यांची वडिलोपार्जित घर आणि शेती, म्हणूनच ते उमरीकर....

   पूर्विपासूनच हे सुखवस्तु कुटुंब...
    एकूण सहा भावंड. त्यांपैकी शिक्षणाच्या निमित्ताने दोघे भाऊ हैद्राबादेत गेले...तेथे वकिलीची सनद घेऊन दोघांनी सध्याच्या मराठवाड्यात,पण त्या काळी निजामाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या... परभणी शहरात श्री आनंदराव यांनी म्हणजे माझ्या आजोबांनी आणि सेलू या गावी त्यांचे भाऊ रंगराव यांनी वकिली चालू करत तेथेच आपले बिऱ्हाड थाटले...

   सुरुवातीला जम बसेपर्यंत आनंदरावांनी भाड्याच्या घरात राहूनच संसाराची घडी बसवली.... एक मुलगी झाल्या नंतर त्यांची पहिली पत्नी कृष्णाबाई दुर्दैवानं जात राहिली...या कृष्णाबाईंचं माहेर परळी होतं....

    तिच्या जाण्यानं त्या वेळच्या रुढी नुसार तिची जागा माझी आजी, मोठीआई अहिल्या राम उर्फ राजाजी कोठेकर,जी बाप्पांपेक्षा पंधरा वर्षांनी लहान होती.... यांनी भरुन काढली....पण कृष्णाबाई आनंदराव उमरीकर या नावानेच तीही उमरीकरांच्या घरी माप ओलांडून आली....

   मोठी आई बाप्पांच्या लग्नानंतर लवकरच 
 प्लेगची साथ आली होती, त्यावेळी बहुतेक जण गावाच्या बाहेर तंबू ठोकून राहू लागले... बाप्पाही कुटुंबासह तेथेच होते...
...बाप्पांनाही प्लेगची गाठ आली होती...या आजाराशी निकराने झुंज देत त्यांनी मातही केली होती  प्लेगवर...
पण, एक दिवस अचानक बाप्पा एकदमच निपचीत पडले ...
तेथे उपलब्ध वैद्यांनी"बाप्पा गेले", असे जाहिर केले...
त्यांच्या अंतीम प्रवासाची तयारी केली गेली...त्यांचा खाली घोंगडीवर ठेवलेला देह आता उचलणार एवढ्यात, नव्यानेच लग्न झालेल्या माझ्या आजीच्या चाणाक्ष नजरेनं बाप्पांचा पायाचा अंगठा हलतोय हे लक्षात आलं...तिने, "ते आहेत, गेले नाहीत"असे निक्षून सांगितले. एकच गोंधळ उडाला...वैद्यांना पाचारण करण्यात येवून लगेच उपचार चालू केले...आणि काय आश्चर्य, बाप्पा यातून लवकरच ठणठणीत बरे झाले..
    या नंतर माझ्या आजीशी कित्तेक वर्षे संसार होऊन  त्यांना सहा अपत्य झाली!
त्यांच्या कर्तृत्वाने आभाळाएवढी उंची गाठत 
कुटुंबाचा आधारवड बनले ते...
ही आठवण बाबांना,१९७० मध्ये बाप्पांचे निधन झाल्यानंतर बाप्पांचे मित्र श्री महतपुरीकर देशपांडेआजोबा,जे क्रांती चौकात रहावयाचे, यांनी सांगितली होती...

   अगदी केतकी असं चमकदार गोरेपण, नाकीडोळी निटस, उंच, धिप्पाड बांध्याचे आमचे बाप्पा फारच देखणे होते...
 त्यांचा विवाह झाला त्यावेळी ते वकिल झालेले होते...
परभणीत सुरुवातीला, सध्याच्या गांधी पार्क या भागात भाड्याने राहिले ते... आपल्या कुटुंबाला घेऊन ....
म्हणजे,पहिला विवाह झाल्यानंतर ही ते तेथेच रहायचे...
पण ती जागा नंतर पालिकेने ताब्यात घेतली आणि सर्वांनाच तेथील घरं रिकामी करावी लागली...त्यावेळी बाप्पांनी, गावापासून थोडे दूर, (आताचा स्टेशन रोड)
सलग अशी मोठ्ठी जागा घेतली ... आणि आपला मोठा वाडा, बंगला बांधला... 
    बाप्पांनाही बांधकामात आणि त्याच्या नुतनीकरणात फार रस होता...
आपल्या बंगल्याचे बांधकाम झाल्यानंतर राहिलेल्या जागेचे मोठे मोठे प्लॉट्स पाडून त्यांनी ते आपल्या ओळखीच्या लोकांना आणि वकिल मित्रांना विकून टाकले...
म्हणूनच एका ओळीत आनंदराव उमरीकर, खळीकर, शहाणे,शहाणे असे बंगले होते सर्वांचे! कालांतराने माझ्या वडिलांनी,प्रभाकरराव उमरीकर यांनी त्या बंगल्याचे नुतनीकरण करत, याच बंगल्याचे नामाभिधान,"आनंद सदन " असे केले...
   त्यावेळी या भागात नळ आलेले नव्हते..पण शेजारीच एक बांधलेली विहिर होती...ती व्यवस्था बघूनच त्यांनी हा बंगला बांधला होता...
अतिशय प्रशस्त असा समोर हा बंगला आणि मागे बरेच भाडेकरु असा मोठ्ठा डोलारा छान पैकी नांदत असायचा येथे....अगदी पंधरा एक वर्षां पूर्वी पर्यंत!
परभणीचा उमरीकरांचा वाडा तेंव्हापासून प्रसिध्द होता...कित्येक बिह्राडं राहून गेली या वास्तू मध्ये!

    बाप्पांचा वकिली व्यवसाय छानच चालायचा...पण तरीही त्यांनी सिगारेटस् मध्ये भरावयाची तंबाखू तयार करण्याची फॅक्टरी काढली ती तंबाखू तयार करुन हैद्राबादेत पाठवण्याचा एक छोटेखानी व्यवसायही चालू केला होता...
या फॅक्टरीची जड मोठे लोखंडी अवशेष नंतर कित्येक वर्षे होती आमच्या अडगळीच्या खोलीत...

    परभणीत चांगला जम बसवला बाप्पांनी आणि गावी,उमरी येथे असणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमीनीवरचा आणि घरावरचा हक्क मात्र बाकी भावंडांना देऊ केला...
अतिशय उमद्या मनाचे आणि समाधानी वृत्तीचे बाप्पा, फार कुटुंब वत्सल होते...
त्या काळात मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले जायचे नाही...पण आमच्या बाप्पांनी, आपल्या मुलींना घरी येवून शिकवणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती केली होती...माझी मोठीआईही साक्षर आणि हुशार होती...
त्यांच्या काळापासूनच आमच्या घरात अंधश्रध्देला कधीच थारा नव्हता...
पण ईश्वरी श्रध्दा नांदत असायची....बाप्पा दररोज मोठ्या अशा लाकडी देवघरात बसून दररोज पुजा नैवैद्य वैश्वदेव करायचे....

   बाप्पांचा मित्रपरिवार सुध्दा फार मोठा होता...दरवर्षी ते मित्रमंडळींसोबत सुट्ट्यामध्ये पर्यटनासाठी चार दिवस बाहेरगावी जाऊन येत...पण रझाकार सुरु झाला तेंव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह, काही नातेवाईक,त्यात माझ्या आजीचे मावसभाऊ सेलूचे वासुदेवराव टाकळकर आणि कुटुंबीयही होते...आणि कांही मित्र मंडळी व त्यांचे कुटुंबीय क्रांती चौकात रहात असणारे असे सर्वच जवळपास सहा सात महिने त्र्यंबकेश्वर येथे भाड्याने एक जागा घेऊन मुक्कामी राहिले होते...
   त्या वेळेस आमचा परभणीचा कारभार माझ्या आजीचे मोठे भाऊ श्री उध्दवराव कोठेकर यांनी आमच्या घरी राहून सांभाळला होता...त्यांना रझाकारापासून काही धोका नव्हता कारण  ते स्वतः अधिकाऱ्यांच्या बायकांना संगीत शिकवण्यासाठी त्यांच्या घरी जायचे...

  बाप्पांनी वडिलोपार्जित शेतीवरील हक्क सोडून दिला होता तरीही, परभणीत स्वकष्टार्जित अशी तीस एकर बागायती शेती घेतली होती...
आंबराई तर फारच नामी होती...आमराई थोडी उशिरा लावली, बरेच जण "तुम्हाला काय खायला मिळतील अंबे?कशाला लावताय"?असे म्हणाले पण "मी नाही तरी माझी मुलं नातवंडं खतील ना "असे ते म्हणाले ...आणि त्यांच्याच भाग्याने त्यांनी स्वतः तर खाल्लेच अंबे, पण कितीतरी लोकांच्या घरच्या रसाळी आणि लोणची या आब्यांनी साजरी केली.... वर्षानुवर्षे!
आम्ही लहानपणी चाखलेली आंब्याची मज्जा काही ओरच होती...आयुष्यभर पुराव्यात अशा या बाबतीतील गोड आठवणींची साठवण मनात रुजून बसलीए...
आमच्या या शेताला लागूनच उरूस भरायचा परभणीच्या तुरतपीराचा आजही भरतो तो...गावातच शेती झाल्याने नाईलाजाने बाबांनी साधारण वीस वर्षांपूर्वि शेती विकली....
    
   त्या काळच्या समाजमनाप्रमाणे बाप्पांचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होतं...वयाच्या आपला थोड्या पुढच्या टप्प्यात थोडं उशिरा पाच मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा म्हणजे त्यांचा जीव की प्राण. मुलींचं क्षेम क्षेम आहे ना याकडे कायम लक्ष असायचे...
स्वकर्तृत्वावर प्रगाढ विश्वास असणाऱ्या अशा आमच्या बाप्पांचा आत्मविश्वास फार प्रबळ होता...

    उर्दू माध्यमातून न्यायालयिन कामकाज चालू होते तो पर्यंत म्हणजे इ.स.१९५० पर्यंत...
मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर, कामकाजाची भाषा इंग्रजी झाली आणि आनंदराव उमरीकर वकिलांनी कोर्टात जाऊन कामकाज बघणे सोडले...
आमच्या घरी उर्दू भाषेतून कायद्याच्या कायद्याच्या पुस्तकांचा फार मोठा संग्रह मी स्वतः बघितला आहे...
आपल्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण करत निवृत्ती पत्करणार्या आमच्या बाप्पांनी स्वतःचा मुलगा आपल्या जवळच असावा म्हणून माझ्या बाबांना मुद्दाम वकिलच बनवले होते...
दोन तीन वर्षे मुलाचा वकिलीतील जम बसलाय हे बघत समाधानाने,
घरात माहेरपणाला लेकी जावई नातवंड आलेली असताना, मुलाला झालेली दोन कन्यारत्न  बघून,आंबराईची अढी लागलेली असताना अगदी भरल्या गोकुळातून आनंदाने, "माझा शेवट जवळ आलाय आता औषधांचं काम नाही ही सुचना डॉक्टरांना दिली...
आमचे कौटुंबिक डॉक्टर,श्री मधुकरराव चौधरी हे बाप्पांना ऑक्सिजन सिलिंडर लावत असताना, माझ्याशी फक्त थोड्या गप्पा मारा" असे म्हणाले...माझ्या आईकडून तिच्या सासुबाईंची यथायोग्य काळजी घेण्याचे वचन घेतले.. आणि आपल्या धाकट्या जावयाकडून,श्री रामचंद्र आसोलेकर यांच्या कडून मेहूण्याकडे (स्वतःच्या मुलाकडे)
लक्ष देणयाचा शब्द घेतला त्यांनी,आणि बारा तासातच दोन ह्रदयविकाराचे झटके आल्यानंतर,बाबांच्या मांडीवर डोके ठेवून 
कायमचा निरोप घेतला आणि स्वर्गलोकीची वाट धरली बाप्पांनी...तो दिवस होता, २७,मे १९७० चा...
आजही बाप्पांची प्रतिमेतील प्रसन्नमुख छबी बघितली की, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते हे मात्र खरंए...
माझ्या आजीच्या ईच्छेनुसार नातवाला आजोबांचेच नाव द्यावे ही तिची ईच्छा माझा भाऊ झाल्या नंतर आईबाबांनी पूर्ण केली आहे...त्यांच्या वकीली व्यवसायाचा वारसा उत्तम पध्दतीने चालवणारी ही उमरीकरांची तिसरी पिढी होय...
   स्व. बाप्पांच्या,आनंदराव उमरीकर यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन करत मीही आता पूर्ण विराम घेते...🙏🙏

©️ 
नंदिनी म. देशपांडे.
दि. १० जूलै,२०२१.
औरंगाबाद. 

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, २३ मे, २०२१

# चहा. #

☕ चहा  ☕
           _________

     खरे तर चहा, चहा मी स्वतः दहावीला गेल्यानंतर वार्षिक परीक्षेचा, रात्री जागून अभ्यास करायची ना, तेंव्हापासून घेणे चालू केलेले....हे मला निश्चित आठवते....
     नवीन टेपरेकॉर्डर घेतला बाबांनी, आणि दिवसभर आमच्या एका स्नेह्या कडून गाण्याच्या  तबकड्या आणून नवलाईने आवडीची गाणी टेप करायची, मी....आणि मग रात्री अभ्यास करत जाऽगत बसायचं....
त्यावेळी, अभ्यासासाठी जागायचं म्हणजे, चहा तर घ्यायला हवाच...हे समिकरण डोक्यात पक्कं बसलेलं...
   जागून अभ्यास करणारांचा तो मुलभूत हक्कच जणू, असंच नेहमी वाटायचं...
    
   त्या वेळीच प्रथम झालेली चहाच्या चवीची ओळख, हळू हळू दोन वेळच्या चहामध्ये कधी बदलत गेली समजलेच नाही....
वयाच्या तीशी पर्यंत दोन  वेळेला चहा घेणारी मी, चांगलीच चहाबाज बनले आहे,  हे प्रवास करताना लक्षात आलं...बरोबर चार साडेचार  झाले की दुपारचा आणि  सकाळी आठ वाजता चहाची आठवण यायचीच यायची....
प्रवासात बाहेरचा चहा तेथील स्वच्छता (? )बघता भावायचीच नाही कधीच आणि मग जाणवला हा माझा चहाबाजपणा मलाच पहिल्यांदाच....
या शिवाय पर्यटनासाठी परदेश दौऱ्यावर असताना तर चहाची आठवण प्रकर्षाने व्हायचीच....
       
    पण चहा सुध्दा बाहेर गेल्यानंतर कुणाच्या घरी झाला असेल,आपल्या वेळेतच झाला असेल तरीही त्याला आपल्या घरच्या, त्यातही आपल्या हाताने बनवून घेतलेल्या चहाची सर काही केल्या येत नाही....असेच वाटत रहाते...."ती" तल्लफ काही केल्या भागतच नाही...
   बरं घरीही चांगला भरपूर दुध घालून चांगला उकळवून दाट केलेला....थोडी साखर आणि सवाईने चहापूड टाकत बनवलेलाच चहा, शिवाय कपामध्ये तोही बऱ्या पैकी मोठ्या आकाराच्या काठोकाठ भरुन घेतल्या शिवाय चहा पिल्याचे समाधान मिळतच नसे...असा चहा घेऊन मग जेवणाला कितीही उशीर लागला तरी बेहत्तर असेच वाटायचे...
       
   चाळीशी पार झाली आणि डायबेटिस नावाच्या दोस्ताचा सहवास आता नेहमी साठीच लाभेल की काय अशी शंका निर्माण झाली...मग मात्र त्यावेळी पासून बिना साखरेचा चहाच गोड लागू लागला....कधी वेलची पूड घालून तर कधी आलं घालून हळू हळू साखरेच्या चहाची सवयच गेली ती कायमचीच!
     हल्ली तर चुकून सुध्दा घेतलेला साखरयुक्त चहा औषध घेतल्या सारखा कडवट
भासू लागतो.... 

    काळा चहा घेणर्यांचे तर मला फारच कौतूक मिश्रीत आश्चर्य वाटते...आणि हे कोणत्या परग्रहावरचे लोक आहेत की काय अशी शंका येते...
या शिवाय ग्रीन टी की काय आणि ते लेमन फ्लेवर टी ही अशा प्रकारची नावं कितीही फॅशनेबल असतील तरीही पुळचटच आहेत हे नक्की.....
    
  आताशा म्हणजे हा कोरोना चालू झाल्यापासून मात्र मस्तपैकी आलं घालून उकळवून तयार केलेल्या काळ्या चहात नंतर व्यवस्थित दुध घालून बनलवेला चहा अमृततुल्य वाटायला लागला....
छान पैकी आल्याच्या स्वादाने घशाला शेकून खाली उतरणारा चहाच जास्त भावायला लागलाय, नव्हे त्याचीच सवय झालीय,आता तीच कायम राहील असे वाटते....
   
हल्ली खास, छान छान स्वच्छ अशी वेगवेगळ्या चवीच्या आणि नावाची चहाची खास दुकानं दिसून येतात...अमृततुल्य काय,  मातीच्या भांड्यातील काय आणि आणखी कितीतरी नावांची बिरुदं लावून बनवलेला चहा 
असू दे ,पण आपल्या घरच्या चहाची सर कशालाच नाही हेच जाणवतं....
      
   पण गंमत म्हणून आणि कुठे तरी ऐकलंय म्हणून म्हणा, मी एकदा किंचित मीठ घालून चहा केला...पण असा चहा फारसा पचनी पडलाच नाही...
     चहा,हे पेय गरीबांचे जेवढे जवळचे तेवढेच श्रीमंतांचेही....
    जेवढा एखाद्या टपरीवर चांगला मिळेल चहा, तेवढाच हल्ली निघालेल्या पॉश दुकानातूनही...
  किमान माणुसकी दाखवण्याचे एक साधे सरळ साध्या लोकांचे माध्यम म्हणजे चहा....
गहन विषयावर चर्चाही घडवल्या जातात,  त्या याच चहाच्या साक्षीनं आणि हलके फुलके विनोद साधत डोकं ताजंतवानं करता येतं तेही याच चहाच्या साक्षीनं.... 

  तो सर्व शाष्टाचार पाळत, 'टी सेट' नामक भांड्यांमधून येणाऱ्या चहाची शपथ घेऊन सांगते, पण त्या चहाची रयाच गेलीय असेच वाटते....
      डोक्यातली तल्लफ भागवणारे एक अनुपमेय पेय आहे हा चहा....हल्ली त्याला आरोग्य रक्षणाचे दाखलेही मिळू लागले आहेत, पण अती प्रमाणात काहीही वाईटच बरं का....
     मला बाई रोज दोन वेळेस काठोकाठ कप भरलेला चहा मिळाला, की मग तिसऱ्या वेळी पुन्हा तो घ्यावा अशी साधी ईच्छाही होत नाही...
   पण हं कुणाच्या घरी गेल्यानंतर मोठ्या मोठ्या भारी कपांमध्ये तळाशीच बसेल असा चहा बघितला की, देणाऱ्याच्या मानसिकतेची कीव येते आणि अगदीच छोट्या कपात काठोकाठ असेल तो तरीही 'नकट्या' कपात काय दिलायं चहा म्हणून नाक मुरडावेसे वाटते...काय करणार स्वभावाला औषध नसतं असे म्हणतात ना.... 

  तर असो, पण आजचा दिवस खास चहासाठी राखून ठेवलेला, अगदी जागतिक स्तरावर!केवढा या अमृततुल्य  चहाचा सन्मान!

। इति श्रीचहा पुराणम् संपुर्णम्। 

©️
*नंदिनी म. देशपांडे*
मे, २१,२०२१ 

🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १० मे, २०२१

"आई "(मातृदिना निमित्त)

"आई "

      'आई ' हा शब्द उच्चारला की केवळ वात्सल्य वात्सल्य आणि वात्सल्यच आठवतं....आईच्या सहवासातील ते प्रेमभरे, वात्सल्यभरे क्षण अन् क्षण डोळ्यासमोरुन सरकत जातात...
आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने सारं जग मातृ उत्सव
साजरा करत असताना तुझी आठवण होणार नाही हे केवळ अशक्यच ना, आई?...
     आई, तुला जाऊन सहा वर्षे होऊन गेली, पण तू आमच्या अवतीभोवती नाही आहेस असे कधी वाटलंच नाही...
मुर्ती दृष्टिआड झाली असेल,पण तरीही तुझ्या आठवणी जागवल्या की आपोआप तुझी प्रेमळ मुर्ती डोळ्यासमोर उभी रहातेच...तू स्वतः संवाद साधत आहेस असाच भास होत रहातो...
   आई,तू आहेस नक्कीच आहेस, आमच्या ह्रदयात, आमच्या आठवणीत, तुझ्या घराच्या वास्तूत किंबहूणा वस्तूंमध्येही,त्यांच्याअस्तित्वात, स्पर्शात...त्यातील तू वापरलेली प्रत्येक वस्तू आजही तुझी आठवण देतात....एवढेच नव्हे तर, देवघरासमोर हात जोडून ऊभं राहिलं की, त्यातील प्रत्येक मुर्ती त्या प्रत्येकाला तुझा झालेला स्पर्श,देवघरासमोरची रांगोळी, तुझ्या अंगणातील रांगोळी, तुझ्या मनात अंबाबाईवर असणारी तुझी श्रध्दा
हे सारं सारं तुझीच आठवण देत रहातं...
     संक्रमणाने तुझ्याकडून आम्हा सर्वांमध्ये आलेले, तुझ्या नातवंडांमध्ये परावर्तित झालेले तुझ्यातील सद्गुण, सवयी, शिस्त या साऱ्यां मधूनही तू डोकावत असतेस आमच्याकडे...
तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ, तुझ्या सारखा मला न जमलेला पदार्थ या बाबी तुझीच आठवण करुन देतात...
तुझे संस्कार तर पदोपदी आठवण करुन  देतात आम्हा सर्वांना...
आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, आम्हा भावंडांचे अस्तित्व, माझे अस्तित्व हेच मुळी तू असण्याची सजीव साक्ष आहे....
मग तू नाहीस असं कसं गं म्हणू?
तू आहेस, तुझ्या आशिर्वादाचा हात आमच्या डोक्यावर आहे...आणि दूरून कुठून तरी तू आमच्यावर कायम लक्ष ठेवून असतेस यावर माझी श्रध्दा आहे....
    तुझं अस्तित्व जाणवत रहावं म्हणूनच तर मन प्रसंगानुरुप तुझ्या आठवणीतून अशी जाणीव करत रहातं बोलण्यातूनही तुझ्या आठवणी व्यक्त करताना मन प्रसन्न
होतं रहातं...तू आहेस आणि कायम असणारच आहे...
आई, तुला त्रिवार विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🌹🌹

 ©️
नंदिनी म. देशपांडे.
मातृदिन, 
९ मे,२०२१.