🎍आमची नॉर्थईस्ट, थ्री.
सिस्टर्स सहल 🎍
©️लेखिका---
नंदिनी म. देशपांडे.
पुणे ते गोहाटी प्रयाण....
-------------------------
पुण्याच्या विमानतळावरुन रात्री अडीच वाजता निघालेलं आमचं फ्लाईट अडीच तासात,म्हणजे सकाळी साडेपाच वाजता गोहाटीत पोहोंचले...गम्मत म्हणजे,सकाळी पावणेपाच वाजताच आकाशात तांबडं फुटलेलं होतं...
अरे बापरे!आता तर चक्क उजाडलंयं की...रात्रभर न झालेली झोप आता कशी भरुन काढणार?अशक्यच होतं...
वाहन कोणतंही असो, प्रवासात झोप न येणं किंवा आलीच ती,तर तिला पिटाळून लावणं हे मला कसं काय जमतं हे कोडं आणखी मलाच सुटलेलं नाही...
नवीन ठिकाणी जाण्याची उत्सुकता, भवताल निरखण्याची क्षमता आणि सोबतच चालू असणारं विचारांचं चक्र या गोष्टी कारणीभूत असाव्यात यासाठी असं वाटतं...
आता रात्रीच्या वेळेस मिट्ट काळोखात काय डोंबल दिसणार भोवतीचे?असा प्रश्न बाकीच्यांना पडणं अगदी स्वाभाविक आहेच...पण मला त्या मिट्ट काळोखात सुध्दा खूप काही दिसत होतं...सुरुवातीला उड्डाण घेईपर्यंत विमानतळावर रेखाटलेली रंगीबेरंगी दिव्यांची शिस्तीत काढलेली रांगोळी, वैमानिकाचे विमानाची दिशा बदलत नेण्याचे कसब,सवयीनं लक्षात येणाऱ्या आवाजावरुन आता विमान उड्डाण घेईल असे सांगणारे क्षण आणि एकदा उड्डाण घेतल्यानंतर शहरभर पसरलेलं लाईटच्या दिव्यांची निरनिराळी लहान होत बारीक बारीक होणारी मोहक आरास!काय सुंदर दिसतं हे दृश्य!
आपण अधांतरीच आहोत आता ही मनाला झालेली जाणीव थोडी कावरी बावरी करते आपल्याला, पण सुंदर,हसतमुख आणि गोडगोड बोलणार्या हवाईसुंदरींची शिस्तीत चाललेली लगबग लगेच आपले लक्ष वेधून घेतेच...
तर,आसाम,मेघालय आणि अरुणाचल प्रदेश अशी आखणी होती आमच्या टूरची...
गोहाटीतून सुरु झालेल्या प्रवासाच्या चकचकीत रस्त्यांवर दुतर्फा उंचच उंच आणि सरळसोट वाढत चालेल्या उत्तम प्रतिच्या बांबूची झुडपं गर्दी करत बांबूचं जंगल बनवत आहेत हे लगेच लक्षात येत होतं...हिरवेगार अगदी सरळसोट बांबू आणि त्याची अणिकुचिदार पानं मनाला भुरळ घालत होती...त्यावर डोलणारी पिसासारखी तुरे म्हणजे आपल्याला घर स्वच्छतेसाठी झाडू बनून मदत करणारी केरसुणी हे लगेच लक्षात आले माझ्या...
आसामातील
बांबू भारतात सर्वदूर पर्यंत आणि परदेशातही निर्यात होतात अशी त्यांची ख्याती आहे....
ठिकठिकाणी बांबूपासून बनवलेल्या सुंदर अशा आकर्षक वस्तू मनाला मोहित करत रहातात...बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंमूळे आसाम राज्यातील लोकांना मोठ्या प्रमाणावर कुटिरुद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत हे मात्र खरे...
🌹🌹
गोहाटी ते शिलॉंग
-------------------------
दुपारच्या जेवणानंतर गोहाटीत पाणी पिल्यानंतर आपण खूप मोठ्या अशा एक महत्वाच्या,म्हणजे 'ब्रह्मपुत्रा' नामक सरितेचं पाणी प्यालो आहोत,ही जाणीव समाधान देऊन गेली...शहरातून प्रवास करत करत आम्हाला मेघालय ची राजधानी शिलॉंग गाठायचे होते...चार तासांचेच अंतर एका राज्यातून दुसर्या राज्यात प्रवेश करण्यासाठी!
खेळीमेळीत प्रवास चालू असताना आल्हाददायक अशा पर्वतीय पहाडांची प्रवासात साथ चालू झाली,आणि लगेच आपण मेघालयात प्रवेश केलाय याची ग्वाही मिळाली....
वातावरणात होणारा बदल लक्षात येऊ लागला होता...
एव्हाना बांबूच्या झुडूपांची संगत कमी कमी होत होती...पहाडांवर इतरही अनेक प्रकारची हिरवीगार झाडं गुण्यागोविंदाने डोलत होती...
शिलॉंग,मेघालयाच्या राजधानीचं शहर....
येथे प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यातच आम्ही कृत्रिम पध्दतीने बनवलेल्या सर्वात मोठ्या अशा "उमिअम"लेक, मध्ये जो डोंगरांच्या कुशीमध्ये विजनिर्मिती साठी बनवला गेलाय...तर या तलावात नजिकच आलेल्या सुर्यास्ताच्या साक्षीनं शांत वातावरणात मस्तपैकी बोटिंग करत झुळूझुळू पाण्यावर हळूवार तरंगत आनंद घेतला...सोनेरी उन्हाची पाण्यावर शिंपण करत,अस्ताला जाणारा दिनकर डोळ्यात साठवून घेतला...
रात्रीच्या जेवणानंतर आदल्या रात्री न झालेल्या झोपेने आम्हाला तिच्या अधिन करवून घेतले...
'मेघालय' मेघांचं ढगांचं भांडार असणारा प्रदेश, भारताच्या अती पूर्वेकडील राज्यांपैकी एक....कित्तेक वर्षे या राज्यांमध्ये पर्यटनाला येण्याची हिम्मत कोणी करत नव्हते...भौगोलिक दृष्टिने लहरी, बऱ्याच लांब आणि अधुनिक सुविधांशी फारशी हातमिळवणी न केलेल्या या प्रदेशात यावयास कोणी धजावत नसावे बहूतेक....
हिमालयिन डोंगरांच्या रांगांमध्ये वसलेला आणि काळ्याशार मेघांचे पांघरुण लपेटून राहाणारा हा प्रदेश...येथील माणसं अतिशय साधी, सोज्वळ सभ्य असावेत असेच जाणवले...
सुपारीच्या उंचच उंच झाडांनी वेढलेला हा प्रदेश भरभरुन नयनसुख देणारा असाच...पाऊसाला केंव्हाही झेलणारा आणि पाऊस पडला की थंडीशीही गट्टी करणारा असा....
प्रवास चालू असताना, मेघालयात, लग्न जुळवण्यासाठी मुलाकडची मंडळी मुलीसाठी सांगून येते, किंबहूणा मुला कडचे मुलीकडच्यांना हुंडा देतात आणि मुलगा मुलीच्या घरी जाऊन घरजावई बनून रहातो...छोटा मोठा व्यवसाय करतो असे समजले...मुलगी मात्र या घरची कर्ती स्त्री असते...हे ऐकून आश्चर्य वाटलं!
मनसोक्तपणे आपल्याच नादात वाकडी तिकडी वाढलेली हिरवीगार झाडं वेली, मोठमोठी वृक्ष आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारी भुमी, मेघालया च्या रुपानं पृथ्वीतलावर अवतरली आहे असे म्हणता येईल...
मेघालयाच्या मातीची पायधूळ आपण अनुभवली की, निसर्गाच्या तांत्रिक रुपाची प्रचिती येते...
"माणसानं यशाची कितीही शिखरं काबिज केलेली असो पण त्याने आपले पाय मात्र आपल्या मातीतच घट्ट रोवून ठेवावेत", अशी एक म्हण आहे मराठीत...
मेघालयातील मोठमोठी पण अस्ताव्यस्त पसरलेली,वनराजी बघून ही म्हण तेथील वृक्षांनी शब्दशः आमलात आणली आहे असे म्हणता येईल...
"लाईव्हरुट्स ब्रिजेस" हा शब्द आपल्या कानावरुनही गेला नाही कधी...पण या राज्यात घनदाट वनराजींमध्ये माणसांसाठी सोय म्हणून की काय, निसर्गातूनच असे वर्षानूवर्षांपासून जीवीत असणाऱ्या झाडांनी,वृक्षांनी आपली मुळं पसरवत,नैसर्गिक पुलांची केलेली बांधणी दिसून येते.....कितीतरी संख्येनं तयार होत, आजही ती जीवीत अवस्थेतच वापरली जातात...
निसर्गाने मानवाला दिलेला हा अनमोल ठेवा तेथील शासनानेही जसा आहे तसा जपलाय...
काही दुमजली पुल आहेत तर बाकीची एकेरी, पण आपण त्यावरुन चालत जाताना खरोखरच थक्क व्हायला होते...
आमचं दुसर्याच दिवशीचं आकर्षण हे होतं आणि तो बघण्याची उत्सुकता ताणलेली होती...
ठरल्या प्रमाणे सकाळच्या उत्साहवर्धक मनानं, निसर्गाच्या कुशीतून फेरफटका मारण्यासाठी आम्ही दाट जंगलामध्ये प्रवेश केला...नैसर्गिक स्वरुपात पाऊलवाटेने तयार झालेल्या ओबडधोबड रस्त्यावरुन खरं म्हणजे माणसालाच हल्ली सवय राहिली नाहीए अशा रस्त्यांची...
पण, पण येथे मात्र, "अरे आम्ही या जंगलाचे राजे,येथे आमचेच राज्य असणार ना?"असा प्रतिप्रश्न करत डौलाने आपल्या पानांची सळसळ वाजवत आमच्यावर दाट सावली धरणारी, मोठी मोठी उंच वाढत गेलेली झाडंच आम्हाला चालताना तोल सावरायला आधार देत होती...
समुहाने आलो होतो याठिकाणी म्हणून बरे झाले, पण एकट्या दुकट्याला हिंमत नसती झाली ईकडे येण्याची!असे वाटून गेले क्षणभर!
आणि चालत असतानाच जाणवले, अरे खाली खोल ओढा असावा...थोड्याफार साठलेल्या पाण्याच्या खूणा दिसल्या तेथे... पावसाळ्यात पाण्याच्या माऱ्याने निरनिराळे आकार धारण करत, पहुडलेल्या काळ्या कुळकुळीत दगडांमधून कसरत करत उतरायचे होते आम्हाला...हा विचार मनात घोळत असतानाच आम्ही दोन्ही बाजूंनी झुकत परस्परांत मिसळून घनदाट सावली धरणाऱ्या एका पुलावरतून चालत आहोत आपण आणि हाच तोच झाडांनी (निसर्गाने) माणसाच्या सोयीसाठी बांधलेला पूल आहे हे लक्षात आले...
या निसर्गासमोर अक्षरशः नतमस्तक व्हायला झाले...
निसर्गाची ही किमया डोळ्यात साठवून ठेवताना मोबाईल मध्ये साठवण्याचा मोह अजिबात आवरता आला नाही...
निसर्गाशी अतिशय जवळीक साधणाऱ्या या राज्यात, मेघालयात "मॉलिंनॉंग" नावाच्या एका छोट्याशा खेड्याला भेट दिली आम्ही.....
या मॉलिंनॉंग चे महत्व यासाठी की, हे एशियातील सर्वांत जास्त स्वच्छता राखलेले खेडे म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे...आणि ते तसेच होतेही...निसर्गाच्या याच सान्निध्यात घरगुती पध्दतीने बनवलेले दुपारचे जेवण घेऊन आमची रसना तृप्त झाली...
तेथेच थोडी भटकंती करत शतपावली साधली...
या नंतर मग "डावकी"नावाचे दुसरे एक खेडे आम्ही गाठले...तेथे "ऊमन्गॉट", नावाची अतिस्वच्छ,नितळ पाणी घेऊन वाहणारी आणि आपला सुंदर तळ स्पष्टपणे दाखवणारी नदी वाहते....तेथे पोहोंचलो...तेथे
बोटींग करण्याची आमची हौस पुरी करणार होतो आम्ही!
बोटीत बसून रपेट करताना नदीच्या तळाचे सौंदर्य उलगडत गेले...गार पाण्याला स्पर्श करत ते ओंजळीत भरून क्षितीजाआड लवकरच जाईल हा ...असे वाटणार्या सुर्यनारायणाला नकळतपणे अर्घ्यच दिले म्हणा ना!!
आजच्या दिवसाची सहल एव्हाना शेवटच्या टप्प्यात आली होती....पण उत्सुकता होती ती भारत - बांगलादेश सीमा, त्यावर भारताकडून बांधण्यात आलेले तारेचे काटेरी कुंपण आणि मोठ्ठे गेट बघण्याची....
अस्ताच्या समीप जाणारा सुर्य, लांबच लांब निर्मनुष्य रस्ता, दोन्ही बाजूंनी रिकामी सोडलेली विस्तीर्ण जागा आणि 'ते' प्रचंड मोठे गेट बघितले आणि आपल्या भारत मातेची सेवा करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे (जवानांचे)
मनःपुर्वक आभार मानले....त्यांना "जयहिंद"म्हणत ही सीमा रेषा डोळ्यात भरभरून साठवून घेतली...
वडिलोपार्जित घराचे दोन सख्ख्या भावांत होणारे पार्टिशन (वाटणी)असावी अशीच ती सीमारेषा होती....लांबच लांब नजरेच्या टप्प्यात न मावणारी....
उदासवाणी...पण भारतीयांचा देशाप्रती स्वाभिमान जागवणारी....
तिला पुनःश्च एकदा नमन करत आम्ही आमच्या मुक्कामी, शिलॉंग येथे परतावयास सुरुवात केली....
भाग पहिला. 👆
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा