आमची नॉर्थईस्ट,
थ्री सिस्टर्स सहल....
-------------------------
लेखिका---
©️
नंदिनी म. देशपांडे.
.....क्रमशः पुढे चालू...
अतीपूर्वेकडील भारतीय राज्ये आत्तापर्यंत बरीचशी 'दुर्लक्षित प्रदेश' याच पठडीत मोडत होती...पण गेल्या काही वर्षांत या भागातील शासनाने पर्यटनाला प्रोत्साहनपर कितीतरी योजना कृतित उतरवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता...
त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे रस्ते (चांगले)बनवणे, विजपुरवठा आणि हॉटेल व्यवसायाला प्राधान्यक्रम देणे....या त्रयींशिवाय पर्यटनाची मजा नाहीच....या साऱ्यांची पुर्तता निश्चितच पर्यटनाला वाव आणि त्यातून उत्पन्नाचे साधन बनवणे हेच आहे...
वळणावळणांच्या डोंगरमाथ्यावर राज्य करणारे रस्ते, प्रवास करताना आपण तेथील निसर्गाच्या प्रेमात कधी पाडतो हे समजतही नाही आपल्याला...
शिलॉंग शहरही तसेच होते...मला येथे हिमाचल मधील शिमला शहराची राहून राहून आठवण येत होती...थोडासा झोंबणारा हवेतील गारवा ,हवाहवासा वाटणारा असाच होता....मेघांची अंबरातून गच्छंती झालेली होती, म्हणून आम्हाला तेथील लहरी निसर्गाचा काहीच त्रास झाला नाही...
मार्च महिन्यातील दोन आठवडे संपलेले होते पण ऊन असे काहीच नव्हते...एप्रिल च्या शेवटास येथे पावसाच्या ॠतूची सुरुवात होते असे समजले....
शिलॉंग--चेरापुंजी...
शिलॉंग मधील चार दिवसांच्या मुक्कामातील आमचा आजचा तिसरा दिवस होता...आजचे आकर्षण होते, "चेरापुंजी" या शहराला आणि परिसराला भेट....
'चेरापुंजी' म्हटले की मला वाटतं पाचवी सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात होता तो उल्लेख आठवला...
"अख्ख्या जगात 'चेरापुंजी' या शहरात सर्वांत जास्त पाऊस पडतो".....
कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देवू!
शिलॉंगहून नाश्ता करुन निघालेली तृप्त रसना आणि प्रसन्न वातावरणाने ताजेतवाने झालेले मन चेरापुंजी कडे धाव घेऊ लागले...दोन तासाचेच अंतर पण घाटाघाटातून जाताना जास्त वाटत होते...सोबतीला हिरव्या हिरव्या पहाडांची आणि मोठ्या झाडाझुडुपांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होतीच...मनसोक्तपणे निसर्ग न्याहाळत आमचा प्रवास चालू होता...
हिमालयिन पहाडांचीही अव्याहत सोबत होती, पण सारेच कसे हिरमुसलेले ओकेओके वाटत होते हे पहाड....चेरापुंजीचे मी मनात रंगवलेले चित्र आणि माझ्या डोळ्यांना दिसणारे चित्र अगदीच विरुद्ध टोकाचे होते...
माहितीअंती असे समजले की, चेरापुंजीला येण्याचा सिझन खरे म्हणजे हा नाही...तेथील निसर्ग डोळेभरून बघण्यासाठी जून ते ऑक्टोबर मध्ये यायला हवे....
शिवाय गेली बरीच वर्षे चेरापुंजीत सामान्यपणे इतर ठिकाणी होतो तसाही पाऊस पडलेला नाही....आणि आता जगातील सर्वांत जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण,केंद्र चेरापुंजी ऐवजी बांगला देशाच्या एका गावी(माऊसीनरॅम) सरकले आहे....
हे ऐकले आणि आमचा तर फारच हिरमोड झाला...कारण तेथील निसर्गात हिरवाईचे प्रमाणही नगण्य होते....खूप दिवसांपासून हा प्रदेश पावसाच्या प्रतीक्षेत असावा हे जाणवत होते...याचा सारा परिणाम तेथील निसर्गावर होणे अगदी स्वाभाविक आहे....
तेथील एलिफंटा वॉटरफॉल ला पाणीच नाही हे समजले....तेथे जाण्याचा प्रश्नच नव्हता...पण सेव्हन सिस्टर वॉटरफॉल सुध्दा अगदीच नगण्य पाणी फेकतोय हे समजले म्हणून तेही रहित करावे लागले...
पण,भारतातील सर्वात अधिक उंचीवरून (340 मी.) कोसळणारा "नोहकालीकाई" वॉटरफॉल मात्र आम्ही बघावयाचे ठरवले...
या व्ह्यू पॉईंटवर आलो आणि निसर्गाचे अप्रतीम सौंदर्य मनात, नयनांत साठवून घेतले....
प्रचंड मोठा गोलाकार आकाराच्या पहाडांचा विशाल द्रोण निसर्गाने बनवलेला दिसत होता...सर्वदूर पर्यंत आपली नजरही पोहोचत नव्हती....पण अगदी लांबून दिसणारा धबधब्याचा ऊंचावरुन पडणारा प्रवाह फारच नजाकतीचा होता....खूप ऊंचावरुन खोल दरीत एका मोठ्या विहिर वजा खड्ड्यात हे फेसाळ पाणी खाली आदळत होते...एवढ्या लांबून पाण्याचा आवाज येणे अशक्य होते ,पण खाली जमा झालेले पाणी मात्र शांत,शितल निळेशार दिसत होते...फारच सुरेख नजारा होता तो!
नोहालिकाई नावाच्या स्त्री चे नाव या धबधब्याला दिले गेले आहे असे समजले...
नवऱ्याने संशय घेतलेल्या या नावाच्या सासुरवाशिणीने येथे आपल्या प्राणाची आहूती दिली होती
....ही माहिती मिळताच या धबधब्यावर एक उदास छाया पसरली आहे असे वाटले मात्र...
पण निसर्गाविष्कार अप्रतीमच!!
यानंतर आम्ही स्वामी रामकृष्णमिश न आश्रमाला भेट दिली...पहाडी प्रदेशात वंचितांसाठी शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन, त्यांना व्यावसायिक शिक्षण देत स्वावलंबन शिकवण्याचा वसा या संस्थेने घेतलाय यांनी चेरापुंजीत (सोहरा) येथे फार सकारात्मक कार्याची सुरुवात 1931 पासून सुरु केलेली आहे...ह्या प्रेरणात्मक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकही या संस्थेला आवर्जुन भेट देतात...मेघालयातील लोकांच्या कलाकुसरीतुन तयार होणाऱ्या कितीतरी वस्तूंचे नमुने येथे बघावयास मिळतात...खरेदीसाठीही एक छान दालन येथे उघलेले आहे...गरम कपड्यांची खरेदी करुन आपणही भरुन पावतो...
एव्हाना दुपारच्या जेवणाची आठवण पोटोबा करवून देत होते..तेथील एका स्थानिक हॉटेल मध्ये आम्ही जेवण घेतले...चवदार होते पण सहलीच्या पहिल्या दिवसापासून बटाटे,बिन्स गाजर यांची सुकी मिक्स भाजी आणि पनीर मसाला आमची पाठ सोडत नव्हते...जेवणात ग्रीन सॅलड,यात हिरव्यागार ईडिलिंबूच्या चकत्यांचा समावेश असायचा....पण रस मात्र अगदीच नसायचा...दातांनी तोडून खाल्लं तर अतिशय आंबट चव...मी शेवटी त्याचा नाद सोडलाच.... सहल संपवून घरी आल्यानंतरच आपल्या जेवणात लिंबू या फळाची जागा किती महत्वाची!याची प्रचिती आली...
याशिवाय जेवणात
दाळ ,भात दुधीसारख्या किंवा भोपळ्या सारख्या फळाच्या चकत्यांचे गरमागरम पकोडे आणि गोडाचा गुलाबजाम, रसगुल्ला यांपैकी एक असंच असायचं....असो...
चेरापुंजीच्या भेटी दरम्यान झालेला हिरमोड मात्र जवळच असणाऱ्या, असणऱ्या म्हणण्यापेक्षा नैसर्गिकपणे तयार झालेल्या लेण्या बघून कुठच्या कुठे पळाला....उलट पावसाळ्यात आलो असतो या ठिकाणी तर, या दृष्टिला पडल्याच नसत्या कारण बोगद्यात पाणी साचलेले असते....
पण खरोखर एका पहाडाच्या छताखाली निसर्गात उद्भवलेल्या कांही बदलांमूळे तयार झालेल्या या लेण्या अप्रतीमच!
या तयार होण्यामागे दोन विचारधारा दिसून येतात....काहींच्या मते, वर्षानुवर्षे जोरदार पाऊसाच्या मार्यामूळे या पहाडाचे अंतर्गत स्वरुप बदलले असावे...तर काहींच्या मते, तेथे हजारो वर्षांपूर्वीच लाव्हारसाचा उद्रेक झाला असावा...त्यामूळे तो थंडावल्या नंतर त्यातून तयार झालेल्या या लेण्या असाव्यात!
मला तरी दुसर्या क्रमांकाची विचारधारा संयुक्तिक वाटते....
महाराष्ट्रात प्राचीन असतील तरीही विशिष्ट हेतूने जाणीव पूर्वक मानवनिर्मित लेण्या बघण्याची सवय असताना, ह्या लेण्या बघणं मला खूप अप्रुपाईचं वाटलं...थोडसं 'ॲडव्हेंचरस' ही नक्कीच होतं हे काम! पण बघताना चेरापुंजीत आल्याचं सार्थक वाटून;खूप काहीतरी वेगळंच बघितलंयं आपण हे समाधान मिळालं....
एक मोठी गुहा वाटावी असा बोगदा असावा असं ठिकाण होतं ते! आणि "आत उतरुन हळू हळू पुढे चालत रहा, पण आपलं डोकं सांभाळत सांभाळतच", असे सांगण्यात आले आम्हाला.....
बाहेरुन अंदाज घेतला तर आत जाण्यास रस्ता असेल का?उजेड तर नसावाच अशी शंका होती...शिवाय छोट्या,मोठ्या, उभ्या आडव्या लोंबत्या काळ्याशार पाषाणांनी गर्दी करत भरुन गेलेल्या या बोगद्यातून चालावे कसे?आणि बाहेर येता येईल का सुखरुप?अशा नाना शंका मनात पिंगा घालत होत्या..पण
पण नव्हे आपण आत जाऊनच बघू या तर खरे...नाही जमले तर फिरु या परत असा निश्चय केला...
आतमध्ये शिरल्यानंतर चार पावलंही टाकणं कठिण अशीच गुहा होती ही...खाली-वर, उभे-आडवे कुठेही बघा काही अणीकुचिदार, काही मोठ्ठ्या मोठ्ठ्या आकाराचे पण सारेच काळे कुळकुळीत आणि सिल्की झालेले दगड ,आत मध्ये व्यवस्था असणाऱ्या दीव्यांच्या प्रकाशात चकाकत होते...लेण्या म्हणण्या पेक्षा वेगवेगळे आकार धारण केलेली,काळ्या पाषाणाची खाणच होती ती!
प्रवेश एका बाजूने घेतल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग होता....
या खाचखळग्यांतून आपले डोके सांभाळत, एकमेकांना आधार देत, काही ठिकाणी अक्षरशः सरपटत सरपटत आम्ही हा जवळ जवळ एक कि.अंतराचा बोगदा पार केला....आत मध्ये जाताना डाव्या बाजूला केवळ एक झरोका होता, तेथून काय तो थोडा सुर्यप्रकाश आत येत होता...
आतून बाहेर पडलो आणि काय आनंद झाला म्हणून सांगू!मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता आपण हा पार करुन आलोय यावर!पण एकूण अनुभव आणि ते ठिकाण आम्ही मस्त एन्जॉय केले...आणि चेरापुंजी ची सहल सफल झाली आहे असे जाणवले...
परतीचा प्रवास सुरू होईपर्यंत सुर्यास्ताची वेळ झाली...
अती पूर्वेकडील या राज्यांमध्ये सुर्योदय लवकर होतो तसाच सुर्यास्त ही आपल्या महाराष्ट्रात होतो त्या पेक्षा खूप अलीकडे होतो...साडेपाचला तीन्हीसांजा झालेली असायची!
शिलॉंग गुलाबी थंडीचे शहर...निसर्गा बरोबरच मनंही कायम टवटवीत रहात होतं या ठिकाणी...'दमछाक होणं' फार लांब अंतर ठेवून होतं आमच्या पासून! निरनिराळी रंगीबेरंगी फुलं असणारी रोपट्यांची कुंडीतील आकर्षक रचना स्वागताला असायची सगळीकडेच...प्रसन्न फुलं लगेच आपले लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचीच...
दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही शिलॉंग शहराचा निरोप घेणार होतो...चार दिवसांत खूप लळा लावला होता या शहराने!
प्रसन्न सकाळ घेऊन उजाडलेली सकाळ आम्हाला पुढच्या प्रवासासाठी खुणावत होती...
शिलॉंग -- तेजपूर....
असा प्रवास होता तो...मेघालयातून आम्ही परत आसामात ब्रह्मपुत्रेच्या किनार्यावर जाणार होतो...दोन तासाच्या या प्रवासात आम्ही जाताना मेघालयातील "सुप्रसिद्ध डॉन बॉक्सो म्युझिअम", या अतिशय सुरेख अशा प्रदर्शनाला भेट दिली...चार मजल्यांवर सात मोठी मोठी दालनं असणाऱ्या या प्रदर्शनात अती पूर्वेकडील सातही राज्यांची भौगोलिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी, उद्योगधंदे,पोशाखापासून इत्यंभूत माहिती, चित्र रुपाने, कलाकुसरीतून, वस्तूंच्या रुपात, लिखित माहितीच्या रुपात आणि चित्रफितीव्दारे अत्यंत परिपूर्ण आणि महत्वाची माहिती आम्हाला मिळाली. ...
या लोकांची निसर्गाशी असणारी बांधीलकी आणि आदिवासीपण यांचे सचित्र रेखाटन फारच अप्रतिम पध्दतीने सादर केलेले दिसून आले...
आदिवासी लोकांच्या संदर्भात पीएचडी कणारी मंडळी मुद्दाम अभ्यासासाठी येथे भेटी देतात...
याच वास्तूच्या टेरेसवर स्कायवॉक चा आनंद घेत संपूर्ण शिलॉंग शहराचा अप्रतीम नजारा बघता आला..फारच छान अनुभव होता हा पण ...
तेजपूर ला जाताना रस्त्यातच विशाल असे महामृत्यूंजय मंदिर बघितले आम्ही....पर्यटनाला प्रोत्साहनपर आकर्षक ठिकाण म्हणून गेल्या कांही वर्षात नव्यानेच उभारण्यात आलेले हे मंदिर त्या मागचा हेतू साध्य करत आहे...मंदिराचा बाह्य भाग महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा होता....अजूनही तेथील काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून आले...
ही वास्तू डोळ्यात साठवून आम्ही आमच्या मुक्कामी पोहोंचलो....
भाग दुसरा 👆
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा