शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

*नव्याची नवलाई*

        कुटुंबात येणार्या नव्या पाहूण्याचे स्वागत अर्थात नवजात शिशूचे स्वागत करत असताना आपल्या सर्वांनाच निर्भेळ, निरागस , निखळ आनंद अनुभवायला येतो.तोच हर्ष आपण लावलेल्या रोपट्याला आलेले पहिले फूल बघताना होतो.तसाच आनंद दर वर्षीच्या पहिल्या पावसा नंतर येणार्या मृदगंधे मुळे तृप्त  झाल्यावर देखील येतोच.पेरते झाल्यानंतर नव्याने अंकूरणारे पीक शेतात बघताना बळीराजाच्या चेहर्यावर दिसणारा हर्षोल्हास असो , किंवा प्रतीभावंताच्या प्रतिभेतून साकारल्या गेलेल्या पहिल्या काव्य पंक्तीतून त्याला होणारा मोद असो. किंबहुना पाषाणाला आकार देत देत त्यातून तयार होणारे परिपूर्ण शिल्प बघताना शिल्पकाराच्या मनात दाटून येणारा भाव असो.
        ही सारी उदाहरणे म्हणजे नाविन्याचा ध्यास असणार्या मानवी मनाच्या जन्मजात नैसर्गिक प्रवृत्तीचे द्योतकच आहेत.
           आपण आपल्या स्वत:साठी सुध्दा काही खरेदी केली किंवा कोणी गिफ्ट म्हणून काही दिले आपल्याला तर ती केव्हा एकदा उघडून, उकलून बघतो असे होत असते अगदी.त्या शिवाय चैन पडत नाही. अशा वेळी वयाचे भानही न रहाता आपल्यातील बालक जागा होतोच होतो.
      नवीन घरात राहावयास जायचे असेल, तरीही ते कसे असावे?कसे असेल? तेथे आपले सामान आपण कसे लावणार? वगैरे गोष्टींचे मनोमन काल्पनिक चित्र आपण रंगवत असतो. म्हणजेच नाविन्याची आस असतेच मनात.
       आपण पारंपारिक वस्तू,प्रथा, चालीरीती इत्यादी अनेक बाबींचे कितीही भोक्ते असलो तरीही कधी ना कधीतरी कोणत्या तरी कारणामूळे प्रभावीत होत असतो.पाश्चात्तिकरणाच्या या जगात  आपल्याला सुध्दा त्याचा वेध घेत अनुकरण करण्याची प्रबळ इच्छा होऊच शकते.कितीही नाही ठरवले तरीही आपले मन काही स्वस्थ बसू देत नाही आपल्याला.याचे सर्वांत परिचित उदाहरण म्हणजे पोशाख. पोशाखाचे अनुकरण अगदी सहजपणे पटकन केले जाते.अगदी आपल्याही नकळत. हा झालेला फरक लक्षात येत नाही लवकर, आपण त्याला 'फॅशन' असे गोंडस नाव देतो !
        असेच काहीसे ब्रॅण्डेड वस्तूंच्या अट्टहासा पायी पाश्चात्य अशा बर्याच वस्तू खरेदी करतो आपण! हल्ली तर खूप मोठ्या प्रमाणावर '  वेस्टर्न कॉश्चूम आणि ब्रॅण्डेड वस्तू उपयोगात आणण्याची स्पर्धाच आली आहे असे वाटते.मोठे मोठे माॅल्स अशा अनुकरण प्रिय मनुष्य प्रवृत्तीला खतपाणीच घालण्याचे चोख काम बजावताना दिसून येतात.
     आपण केलेले अशा पद्धतीचे पाश्चात्यांचे अनुकरण आपण राजरोसपणे विसरतो की काय ?अशी पुसटशी शंका सुध्दा शीवत नाही मनाला, जेंव्हा आपण दिमाखाने म्हणतो की, आमचे नवीन वर्ष चालू होते ते गुढीपाडव्यापासून.जानेवारी पासून चालू होणारे नववर्ष आमचे नव्हे. आम्ही अजिबात शुभेच्छा देणार नाही वगैरे वगैरे....
      आपल्या संस्कृतीचा आदर आणि रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे हे निर्विवाद. पण दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीला कमी लेखावे असे अजिबात नाही.हे चालू झालेले २०१८चे  नववर्ष म्हणजे पाश्र्चात्य नववर्षारंभ ,पण म्हणून काही ते नवे नाही का? आपणही त्यांनाच फॉलो करत नाही आहोत का?व्यावहारिक भाषेत आपण त्याचा उल्लेख नाही का करत? त्यामुळे कोणाचे काही नुकसान झाले आहे का? आपल्या महाराष्ट्रीयन नववर्षा प्रमाणे दररोजच्या व्यवहारात दिन विशेष किंवा तारीख लिहिणारी माणसं हाताच्या बोटांवर किंबहुना तेवढी तरी शोधूनही सापडतील का? या बाबत दाट संशय आहे.
       पाश्र्चात्त्यांचा असेल तरी हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग नव्हे का?हे नाकारणे केवळ अशक्य आहे.म्हणूनच आपले तेवढे चांगले , किंवा 'आपला तो बाळ्या,नि दुसऱ्याचं ते कार्ट' ही भुमिका घेणे योग्य आहे का?
      महाराष्ट्रा प्रमाणेच इतरही अनेक राज्यांत असे नवीन वर्ष त्या त्या परंपरे नुसार सुरू होते त्यांचा तिरस्कार आपण करतो का कधी?
       मुळात 'तिरस्कार' या शब्दामध्येच पुरेपूर नकारात्मकता भरलेली आहे.हा तिरस्कार करत करत तो आपण आपल्या अंगी रुजवतो आहोत हे आपण विसरतो पण ही फार ‌घातकच भावना आहे हे विसरून चालणार नाही.कोणतीही संस्कृती, पोशाख, प्रदेश ,आहार, जीवनशैली इत्यादी पातळींवर एखाद्याला विरोध दर्शविण्याने त्यात बदल होणार आहे का? तिचं अस्तित्व लयाला जाणार आहे का?असे घडण्याची शक्यता नगण्यच म्हणता येईल.पण म्हणून आपले निषेध युक्त मत मांडून फार महत्त्वाचा फरक पडू शकेल असेही म्हणता येणार नाही.आणि म्हणूनच एखाद्या गोष्टीवर कायम तिरस्काराची भाषा बोलणेही संयुक्तिक नाहीच.तुम्हाला आवडत नाही ना, मग नका करु व्यक्तिगत पातळीवर तुम्ही तिचा स्विकार,पण आपले मत मांडून इतरांना का आपण तसे करावयास भाग पाडायचे?
     ‌‌ विविधतेने नटलेल्या , सर्व धर्म समभावाचे तत्व पाळणार्या भारतीय नागरिकाला असे वागणे शोभते का? असा एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न आपण स्वत:लाच करण्याची गरज वाटत आहे.मनोमन विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारात्मक असे ल.
     म्हणूनच पाश्र्चात्य संस्कृतिचे वैशिष्ट्य असले तरीही १ जानेवारी पासून चालू होणारे नवीन वर्ष हे कायम नवीनच रहाणार आहे.त्याची नवलाई आपल्या सर्वांनाच वाटणार आहे.नवीन वर्षासाठी आखलेले असंख्य संकल्प पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्नही प्रत्येक जण करणार आहेच.नववर्षाचे स्वागत दरवर्षी प्रमाणे तेवढ्याच उत्साहाने व जल्लोषात साजरे झाले आहे.सार्यांनी परस्परांना भरभरून शुभेच्छा देणे या गोष्टी ओघाने घडल्याच.....यांमूळे मानवी मनाला आलेली मरगळ दूर होत नव्या जोमाने वातावरणात उत्साह, चैतन्य,नाविन्य पसरणार हे नक्की.
       नव्याची नवलाई, ध्यास हा प्रत्येक मनाला व्यापून टाकणारा असतोच.त्यामूळे दरवर्षी नव वर्षाच्या स्वागताच्या साजरीकरणात अजिबात फरक पडत नाही हे ही तितकेच खरे.उलट आपल्या ज्ञानेश्वर माउलींनी म्हटल्या प्रमाणे 'हे विश्वचि माझे घर' या कल्पनेला मनात रुजवत अशा निमित्ताने संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी शुभेच्छा देत येणार्या प्रत्येक नाविन्याचा नव्याने शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.त्या नवेपणातील चांगले तेवढे स्विकारावे वाईट त्यागावे अशा दृष्टिकोनातून विचार करत नव्याचे स्वागत करावयास हवे.नव्यातील नवेपणाचा शोध घेत तो पुर्णत्वाला नेण्यासाठी हातभार लावण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच  म्हणावेसे वाटते,
       न भारतीयो नवसंवत्सरोऽयं
        तथापि सर्वस्य शिवप्रद:स्यात् ।
        येतो धरित्री निखीलैव माता
        तत:कुटुम्बायितमेव विश्वम् ।।
     ‌‌यद्यपि यह नव वर्ष भारतीय नहीं है।
    तथापि सबके लिये कल्याण प्रद हो।
     क्योंकि संपूर्ण धरा माताही है।
     "माता भूमि: पुत्रोऽहं पृथ्वीण्या:"
      अंत एवं पृथ्वी के पुत्र होने के
  कारण समग्र विश्व ही कुटुम्ब स्वरुप है
       पाश्चात्य नववर्षारस्यहार्दिका:
       शुभाशाया: समेषां कृते ।।
         नंदिनी म. देशपांडे
          nmdabad@gmail.com
‌
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा