रविवार, १४ जानेवारी, २०१८

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

"तिळगुळ घ्या , गोड गोड बोला.",
   "चि. सौ......,
           ‌अनेक‌ उत्तम आशिर्वाद.पत्रास कारण की, काहीच दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊ घातला आहे.या निमित्ताने या पत्रा सोबत आम्हा दोघांतर्फे तिळगुळ पाठवत आहे,त्याचा सर्वांनी  प्रेमाने स्विकार करावा......"
        अशा पोस्टाने आलेल्या पॉकेट मधील चारच हलव्याच्या दाण्यांतून अर्धा अर्धा दाणा करत, वाटून तोंडात टाकताना एक तिळ सात जणांनी कसा वाटून खाल्ला ही आईनेच सांगितलेली गोष्ट आठवायची...काय मजा यायची!!
       आज, संक्रांतीच्या दिवशी हमखास अशा पत्रांची,तर यातील तिळसाखरेच्या दाण्यांची आणि त्यातील प्रेमळ मायन्यांची आठवण झाली.
    तिळगुळ ,राखी पौर्णिमा,लग्न, दिवाळसण यांसाठी निमंत्रण वगैरे गोष्टीं साठी येणारी अशी पत्रे इतिहासात जमा झाली आहेत. येथून पुढे लहान मुलांना पत्रांच्या गोष्टी सांगताना 'खूप खूप वर्षां पूर्वी ' अशी सुरुवात करावी लागेल....
     व्हॉट्स ॲप आणि फेसबुकवर  सणावाराच्या त्याच त्याच मेसेजेसचा अजिर्ण होईल इतपत होणारा वर्षाव पाहताना नि वाचताना आज पत्र लिहिण्याची महती पटते....
    ‌पत्रांतील त्या ओळीं मधील ते प्रेम, त्यातून डोकावणारी ती प्रेमळ नजर ,त्यांनी केलेले कौतुक अशा कितीतरी गोष्टींना मुकलोय आपण.... पत्रांचा हा अनमोल ठेवा हृदयापासून जपून ठेवण्याची वाटणारी आस आपण हरवून बसलोय ही हूरहूर  कवटाळत उसासे टाकण्या खेरिज काही करत नाही आपण....
   ‌एक औपचारिकता म्हणून इकडचा मेसेज तिकडे आणि तिकडचा आणखी कुठे तरी असा बोटांनी यंत्रवत पुढे पाठवला जातो आपल्या मार्फत....त्यांचे वाचन करावे का?असा साधासा प्रश्र्न शिवत सुध्दा नाही आपल्या मनाला.....
     आपण यंत्रांच्या संपूर्ण स्वाधिन झालो आहोत हे लक्षात येऊ लागले आहे आता हळूहळू.....
     खरंच आपण 'रोबोट' यंत्र मानव बनलो आहोत अक्षरशः त्यात आत्मा आणि भावना यांना थाराच  उरलेला नाहीए काहीच.... अशीच धारणा या मानव रुपी देहाची बनत चालली आहे आताशी....
   ‌ पण असो,या जगरहाटीत फिरत रहायचे असेल तर या सारख्या बाबी अनिवार्यच म्हणायचे ....चालत रहायचे..... यंत्रवत....बाकी काही पर्याय आहे का?
  ‌ ‌चला,मी पण देते सर्वांनाच तिळगुळ ,
    ,*तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला,
   माझा तिळ सांडू नका नि माझ्याशी भांडू नका.....*
       *नंदिनी म. देशपांडे.*
         nmdabad@gmail.com
❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा