सहज म्हणून मनात आले,अरेच्चा,आज २३ डिसेंबर २०१७.म्हणजे या वर्षाला निरोप द्यायला केवळ एक आठवडा सातच दिवस उरलेत तर....किती पटकन संपले ना हे वर्ष ! हल्ली दर वर्षीच सरत्या वर्षाला निरोप देताना असेच जाणवते हे तेवढेच खरे...प्रत्येक वर्षीचे महिने,दिवस,तास,मिनीट,सेकंद तेवढेच असतात पण,आपण जास्त बिझी झालो आहोत म्हणून असे वाटते तर...
मागे वळून बघण्या साठी वर्षभराचा आढावा घेऊ यात असे आले मनात,पार २०१६ च्या नोव्हें .मध्ये ठाण मांडले या मनाने आणि तेथून मग फ्लॅश बॅक ला सुरुवात झाली....
माझे, "आठवणींचा मोरपिसारा" हे ६ नोव्हें,२०१६ ला प्रकाशित झाले.वाचकांच्या पसंतीस जसे जसे हे पुस्तक उतरु लागले होते तसे तसे फोन च्या माध्यमातून ,प्रत्यक्ष वाचकांच्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडावयास सुरु झालेला....आपली पहिलीच साहित्यकृति जी अगदी सहजपणे लिहिली गेली आहे ,ती वाचकांच्या मनाला भावली आहे ,या प्रफुल्लीत करणार्या जाणिवेने या वर्षीच्या सुरुवाती पासूनच मनाचे पाखरु आनंदाच्या बागेत भिरभिरत,समाधानाच्या ,झाडांवर बागडत डोलत स्थिर होत होते. मन याच आनंद लहरींवर तरंगत असतानाच किंचित काळजीची किनार लावणारी घटना घडली.....
आमच्या घरचे दोन मेंबर्स या वर्षी दहावीला होते,दोघांनीही वर्षभर खूप एकाग्रतेने सातत्यपूर्ण अभ्यास केलेला....त्या दोघांच्या परिक्षेप्रती त्या दोघां पेक्षा बाकीचे आम्ही सारे फार उत्साहवर्धक होतो....या दोघांपैकी एकाला अॅन्युअल फंक्शन च्या दिवशी परफॉर्मन्स स्टेजवर पायाला मोठा अपघात होऊन,मोठ्या आॅपरेशन ला सामोरे जावे लागले होते....पायाला पडलेले टाके आणि प्लास्टर यांमूळे हाता तोंडाशी आलेला परिक्षेचा घास कुठे सोडावा लागतो की काय ?अशा शंकेने मन पोखरत चालले होते....
पण म्हणतात ना ,'ईच्छा तेथे मार्ग' आणि 'केल्याने होत आहे रे,आधी केलेचि पाहिजे' या तत्वाला खरे करुन दाखवणारा आमचा चेला,अशाही परिस्थितीत परिक्षेला सामोरे जात,त्यात चांगल्या प्रकारे यशस्वी पण झाला.काय आनंदाचा क्षण होता तो आम्हा सर्वांसाठी ! त्याच्या रिझल्टच्या त्या दिवसाचा.....त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच ! असे वाटावयास लावणारा दिवस ठरला तो जून महिन्यातला.त्याच्या सहन शक्तिला आणि प्रयत्नांना सलाम करावासा वाटला त्या दिवशी....
पण म्हणतात ना ,'ईच्छा तेथे मार्ग' आणि 'केल्याने होत आहे रे,आधी केलेचि पाहिजे' या तत्वाला खरे करुन दाखवणारा आमचा चेला,अशाही परिस्थितीत परिक्षेला सामोरे जात,त्यात चांगल्या प्रकारे यशस्वी पण झाला.काय आनंदाचा क्षण होता तो आम्हा सर्वांसाठी ! त्याच्या रिझल्टच्या त्या दिवसाचा.....त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच ! असे वाटावयास लावणारा दिवस ठरला तो जून महिन्यातला.त्याच्या सहन शक्तिला आणि प्रयत्नांना सलाम करावासा वाटला त्या दिवशी....
दुसरा आमचा मेंबर सुध्दा हार्ड वर्क करत सतत यशोशिखरं पादाक्रांत करणारा असाच होता.त्याचा दहावीचा रिझल्ट सुध्दा अपेक्षित असेच यश मिळवून देणारा पण आम्हा सर्वांनाच तोंडात बोट घालावयास भाग पाडणारा ठरला....९८% मार्क्स आत्ता पर्यंत आमच्या घरात कोणीच घेतलेले नव्हते...परिक्षार्थीने हे आवाहन लिलया पेलले होते.पण खरंच तिचे कौतूक करण्यासाठी शब्दही अपुरे पडत होते त्या अविस्मरणीय दिवशी !
या आनंदी क्षणांच्या आगोदर कांहीच दिवस,आमचा एक फॅमिली मेंबर नियमानुसार आपली शासकीय सेवा पुर्ण करत सेवानिवृत्त झाला....सलग३३ वर्षे कार्यतत्पर प्रामाणीकपणे केलेल्या सेवेचा शेवटचा निरोपाचा दिवस खूपच अविस्मरणीय बनवला त्यांच्या इतर सहकार्यांनी....
आपली सेवा हेच आपले दैवत या तत्वाला धरुन सुरु झालेली 'आॅफिस' नावाची ही सेवा मैत्रिण निरोपाचा दिवस जवळ येऊ लागला तसा, मनात गहिवर दाटून आणणारा होता....पण चांगल्या कामाचे फळ नेहमी चांगलेच मिळते असे म्हणतात तसे सार्यांच्या प्रशंसा पुर्ण उद्गारांनी दिलेला निरोप म्हणजे आपल्या निःस्वार्थ सेवेला मिळालेली पावतीच होय असे वाटल्यास मुळीच अतिशयोक्ती ठरु नये असे वाटावयास लावत कृतकृत्यता मिळवून देणारा दिवस ठरला तो.....
मनःशांती मिळवून देणार्या या दिवसानंतर एका वेगळ्याच व वेळेच्या बंधनापासून थोडेसे लांब ठेवणारा दिनक्रम चालू झाला.या बदलत्या दिनक्रमाचे मनातून स्वागत करत, आम्ही हा आनंद मनसोक्त पणाने लुटत आहोतच.....कार्यबाहूल्या मुळे मुरड घालावी लागणार्या आवडीच्या कामांना प्राधान्य देत या पुढची सेकंड इन्निंग चालू ठेवायची हे 'ब्रिद' समोर ठेवत, निवृत्ती नंतरचा दिनक्रम मनाला खूप आनंद बहाल करत आहे....
ठरवल्या नुसार पर्यटनाला प्राधान्य देण्याचा मानस प्रत्यक्षात आणण्याची सुरुवात झाली सुध्दा जुलै महिन्यापासून.....
श्री व्यंकटेशाचे आशिर्वाद घेण्यासाठी पहिली ट्रीप ठरवली ती तिरुपति तिरुमला या रम्य अशा ठिकाणासाठी. तेथील पवित्र आणि मंगलमय वातावरणात चांगले आठ दिवस रमत रमत खूप समाधानाने घरी परतलो आम्ही त्या नंतर.
....दरम्यानच्या काळात आणखीन एक आनंदाची गोष्ट घडली.आमचा एक मेंबर,ज्याने नेमकाच इंजिनिअरिंग च्या चौथ्या वर्षाला प्रवेश घेतला होता ,तो कॉलेजच्या कॅंपस इंटरव्ह्यू मध्ये सलेक्ट होत ,एका चांगल्या कंपनीमध्ये तिचे प्लेसमेंट होऊन कन्फर्म ऑर्डर घेण्यात तिने बाजी मारली होती.हा क्षण आम्हा सर्वांना खूपच अविस्मरणीय असाच होता. पदवी हाती येण्या अगोदर छानशा नोकरीने पायघड्या घालण्याच्या या संधीचे ,आमचा हा भिडू नक्कीच सोनं करणार याची खात्री आहेच आम्हा सर्वांना.तिच्या मेहनतीने मिळवलेल्या या यशा मध्ये केवळ तिचाच वाटा आहे यात कोणतेही दुमत असूच शकत नाही हे सर्व मान्य सत्य होते.तिच्या या हक्काच्या कौतुकाची ती मानकरी आहेच नक्कीच.
'मोरपिसारा' नंतर माझ्याही लेखणीने चांगलाच वेग घेतला होता.आत्ता पर्यंत वहीच्या कागदावर अधिराज्य गाजवणारे माझे शब्दांकुराचे रोपटे हळू हळू व्हॉट्स अॅप, फेसबुक,ब्लॉग यांवरही चांगलेच रुजले जात होते.यावर तग धरून रहावयाचे असेल तर,प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही हे कळून चुकले होते....ही सारी इंटरनेटची हत्यारे छोटी छोटी मुले खेळणी सारखी कशी काय उपयोगात आणतात याचे कुतुहल मात्र वाटू लागले.पण 'प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट' या तत्वानुसार मी वरच्या सर्व आघाड्यांवर बर्यापैकी रुळत आहे याचे द्न्यान मला होऊ लागले होते.आणि माझ्या बिझी बनण्याचे हेही एक कारण आहे याचा उलगडा झाला मला....
'पर्यटनाला प्राधान्य' या घोष वाक्यावर सुरु झालेला वर्षाचा उत्तरार्ध तिरुपतिच्या धार्मिक टूर नंतर राजस्थान टूर साठी पर्यटन करावयास सज्ज झाला होता....सलग पंधरा दिवस पर्यंत अगदीच रिलॅक्स मुड मध्ये पर्यटनाचा आनंद घेणारी ही पहिलीच वेळ होती....नाही तर शासकीय सेवेत असे तोवर कायम आॅफिस कडे एक कान लावता ठेवत केलेले पर्यटन तेवढी मजा आणत नसायचे.....
मजबूत सोनेरी ,पांढर्या पाषाणांनी बांधलेले शाही राजवाडे,त्यातील एकाहून एक सरस जुन्या मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन, ,शुभ्र संगमरवर उपयोगात आणून अप्रतीम सौंदर्ययुक्त शिल्पकला आणि कलाकुसर यांनी सजवलेले गड किल्ले, महेल जैन मंदिरं ,यांनी डोळे विस्फारावयास भाग पाडले होते...किल्ल्यांमधील शिशमहेल,जयपूरचे हवा महेल यांनी आश्चर्याने आचंबित केले होते.... जयपूरच्या जंतर मंतरमध्ये सुर्यप्रकाशाच्या ऊनसावलीच्या खेळावर गणिती तद्न्यांनी उभी केलेली घड्याळे आणि ग्रह तार्यांचे पंचांग या सर्व गोष्टी अक्षरशः माणसाला चक्रावून टाकणार्या आहेत....या सार्या गोष्टी बघून प्रसन्न चित्ताने एक नवी उर्जा साठवत घरी परतताना भरुन पावल्यासारखे झाले.या सर्व धामधुमीत नोव्हेंबर कधी उजाडला समजलेही नाही....
नोव्हेंबरच्या मध्यानंतर एका शाळा मित्राच्या मुलीचे लग्न आणि दरवर्षी प्रमाणे शाळा मित्र मैत्रिणींचे स्नेहसंमेलन यांचा संपूर्ण दिवसभर आनंद घेत लहानपणी च्या आठवणींना उजाळा दिला ,विनोदबुध्दीच्या गप्पांमध्ये रममाण होत रिफ्रेश झालो सर्वच जण....
याच भेटीच्या गप्पाष्टकांमधनं परतलोही नव्हते सारे जण तोच,या स्नेहभेटीला आवर्जुन उपस्थिती लावणारा आमचा एक शाळा मित्र आमच्या डोळ्यां देखत दुर्दैवाने नियतीच्या हवाली होत असतानाचे चित्र खूप क्लेशकारक ठरले....
डिसेंबर महिना मात्र चैतन्याची पेरणी करतच उगवला.अनपेक्षितपणे एका सायंकाळी माझ्या 'आठवणींचा मोरपिसारा 'या ललितलेख संग्रहाला मराठवाड्याचा मानाचा असणारा सौ.सावित्रीबाई जोशी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे ही बातमी मला फोन वरुन सांगण्यात आली.....सहाजिकच कौटुंबिक आणि मैत्रैय पातळीवर आनंदयुक्त संवादांचा जल्लोश सुरू झाला.आम्हावर अभिनंदनाचा वर्षाव होत कौतूकाचा पाऊस बरसु लागला....मनस्वी कौतूक असणारे स्नेही प्रत्यक्ष भेट घेत,आनंद व्यक्त करू लागले.'आनंद गगनात न मावणे' म्हणजे काय याची प्रचिती अनुभवली....आठवणींचा मोरपिसारा लिहिल्याने आपल्या प्रतिभा कौशल्याचे सार्थक झाले आहे ही जाणीव सुखाऊन गेली....पुरस्कार वितरणाचा २०डिसेंबर हा दिवस निश्चित झाला आहे हे सांगण्यात आलेले होतेच....
२० डिसें.उजाडला तोच चैतन्याचे लेणे परिधान करत.सोहळा अगदी झोकात साजरा झाला.पुन्हा एकदा अभिनंदन रुपी कौतूकाच्या वर्षावात न्हाऊन निघायला झाले....ठरवल्या प्रमाणे उबदार थंडीच्या संगतीने गरमा गरम चवदार जेवणाचा आस्वाद घेत,आठवणींचा मोरपिसारा साकारत असतानाच्या आठवणींना उजाळा देत प्रसन्नपणे या दिवसाची सांगता झाली...
अत्तर दाणीतील अत्तराचा फाया काढून घेतला,तरीही त्या सुगंधाचा दरवळ जसा रेंगाळत रहातो,तसाच या दिवशीच्या आठवणींचा दरवळ आज आठ दिवस होऊन गेले तरीही येतोच आहे आणि मन व वृत्ती यांना प्रफुल्लीत करत नवीन वर्षाचे,२०१८चे स्वागत आम्ही उद्या करणार आहोत हे नक्कीच....
अत्तर दाणीतील अत्तराचा फाया काढून घेतला,तरीही त्या सुगंधाचा दरवळ जसा रेंगाळत रहातो,तसाच या दिवशीच्या आठवणींचा दरवळ आज आठ दिवस होऊन गेले तरीही येतोच आहे आणि मन व वृत्ती यांना प्रफुल्लीत करत नवीन वर्षाचे,२०१८चे स्वागत आम्ही उद्या करणार आहोत हे नक्कीच....
मागे वळून बघताना हे संपूर्ण वर्ष आनंदाचे सिंचन करत कौतूकाची पखरण करत करत पुर्ण झालंय हे लक्षात आले.मिळालेला पुरस्कार माझ्या स्वर्गवासी आईच्या स्मृतिंना अर्पण करत मी अत्यंत समाधानाने सरत्या २०१७ या वर्षाचे मनःपुर्वक आभार मानले.....
* नंदिनी म. देशपांडे *
nmdabad@gmail.com
♬♬☆☆♬♬☆☆♬♬☆☆♬♬☆☆
खूप छान लिखाण. ओघवते आणि प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारे. पुढील वर्षाच्या साहित्यनिर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा....
उत्तर द्याहटवा👍 👍. डिजिटल मिडीया.
उत्तर द्याहटवासुरेख शब्दांकन
उत्तर द्याहटवा