शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

हसती खेळती सकाळ.

आली हासत खेळत सकाळ
उधळत पानांतून रंग बहार
आली हासत खेळत सकाळ

हिरवा कंच तो रंगबावरा
पोपटी सुंदर खूप देखणा
पिवळा हळदीचा  नाजूक कोवळा
आली हासत खेळत सकाळ...

अमसुली असे रसभरीत
छानसा
या सर्वांवर मोहोर अलौकिक
लाल गुलाबही हासून देई
हसरी नाचरी रंग पसरवी
आली हासत खेळत सकाळ....

मनांस अवघ्या प्रफुल्लित बनवी
आणि देई नयन सुखही
अपरंपार
आली हासत खेळत सकाळ....

__ नंदिनी.

🌹🌿🌹🌿🌹🌿

गंगाजळी फुलं.

पीत अन् केशरी फुलांनी
हिरव्या पानां सवे हासोनी
शुभप्रभात आली
ताजी तवानी
पीतवर्ण तो चमचमणारा
उगवतीच्या छटा घेऊन
अवतरला या फुलाफुलांतून
केशरी सुंदर सांगतसे
मनातून
मावळतीची आभा गोजिरी
हिरवे पिवळे पर्ण
तटस्थ
तरुवेलींच्या साथीला अविरत
प्रसन्न जाहले मन्मथ
पाहोनी
विराजमान ही फुले
गंगाजळी.

*नंदिनी*

🌺🌻🌺🌻🌺🌻

कुसुम हास्य.

भरगच्च पानांमधून डोकावती
   फुले केशरी नाजूक पाकळीची
प्रसन्न हास्य या कुसुमांचे
मन आपले मोहित करिती
गर्द हिरवा रंग पानांचा
भूलभुलैया या सुमनांचा
करोनी बरसात दव बिंदूंची
गोड फुलांना हसते करिती
पाने फुले ही असे संपत्ती
अवनीची ही आभुषणे कंठीची
करुया सांभाळ या खजिन्याचा
फुलवू आनंद या वसुंधरेचा

*नंदिनी*

🌺🌱🌹🌿🌻🍃🌴

स्वस्तीक पुष्प.

हिरव्यागार प्रशस्त छान
सिंहासनावर मी विराजमान
बाप्पाने रेखला तिलक
 भाळी माझ्या सन्मानपूर्वक
छंद असे माझा अद्भुत
सान्निध्यात बाप्पाच्या रहाण्याचा 
रंग तांबडफुटीचा घेऊन
सजलेला पाच पाकळ्यांचा
आकारले स्वस्तिक चिन्ह
कोरले निसर्गदेवतेने सुंदर
म्हणतात मला जास्वंदी
मी बागेची पट्टराणी
सदा वास माझा
असे बाप्पांच्या चरणी

*नंदिनी*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

सोनेरी पानाचं भान.

सोनेरी पानाचं हरपलंय भान
लावून दोन लांबलांब कान
सजलंय बघा किती छान
चांदण झुल्यात ठेवत शान
गिरकी घेतंयं वळवून मान 
गालात हसतंय  हळूच खुदकन
अंगणी माझ्या उतरुन पटकन...

*नंदिनी*

🍃🍃🍃🍃🍃🍃

पुष्पांचा एकोपा.

फुलवून आपला पानपिसारा
वेगवेगळी फुले बहरली
रंग निराळे गंध निराळे
एकोप्यानं सुंदर सजले
हासून करीती सुमने सारी
परस्परांचा आदर सन्मान
अरे माणसा तूही शिकावे
फुलांकडूनही काही भान
जन्मुनी अनेक झाडांमधूनी
मुशीत एका किती रमशी
हात हाती घेऊनी सुंदर
फेर धरोनी हसती गाती 
प्रेम मैत्रीची कवने अधिकच
गर्वाने ती नित्य आळवती
मैत्रीच्या नात्यांचा गर्भितार्थ
त्यातूनी उकलून दाखविती....

*नंदिनी*

🎍🎍🎍🎍🎍🎍🎍

गणनायक पुष्प.

गडद गुलाबी कर्ण कुंडलं
इकडून तिकडे हालत डोलत
शुभ्र पांढरा मुकुट मोहक
पुष्कराज तो बैसला ऐटित
वक्रतुंड गणनायक सुंदर
हास्य प्रसन्न ‌सवे घेऊन
भूलोकीचे करीत अवलोकन
ठेवती गणांवर वरदहस्त नीत्
  श्रींच्या चरणी भोळा भक्तगण
 मंगल अनुग्रहे तृप्त अविरत
दंडवत घाली होई नतमस्तक

*नंदिनी*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺