एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व,
#श्री #रामचंद्र
#आसोलेकर
💥💥💥
"दादा आधार देऊ का तुम्हाला? उठण्यासाठी?"
असं म्हणत मी पटकन उभी राहिले.... सोफा थोडा खालच्या लेव्हलला होता, म्हणून काळजीनं विचारलं मी दादांना...पानं वाढलेली होती,त्यांना उठून जेवणाच्या टेबला जवळ जेवणासाठी जावयाचं होतं...पण दादांनी खुणेनेच तळहात हलवत मला नकार दिला....आणि मागनं उमाचा त्यांची (सूनबाई) तिचा आवाज आला तीनही मला सुचना केली,'त्यांना आवडत नाही आधार घेणं,'मी मात्र दोन मिनिट निःशब्दच झाले....
साधारण सात-आठ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईला त्यांच्या घरी आयआयटीच्या कॅम्पसमध्ये,पवईत गेलो होतो....दादांच्या आणि आमच्या आत्यांच्या भेटीसाठी... तसे नात्याने,दादा माझे मामा... आत्यांचे यजमान... पण आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' या नावाने संबोधितो... अगदी त्यांच्या भावंडांपासून, मुलांपासून आम्ही बाकीचे सर्व नातेवाईक...
दादा, *रामचंद्र असोलेकर* या नावाने सर्वांना परिचित आहेत... माझ्यासाठी तर ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व...
माझ्या वडिलांच्या नंतर आदरयुक्त असणारं असंच त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान....
२१ सप्टेंबर १९३१ रोजी जन्मलेले आमचे दादा, आज त्यांच्या वयाच्या नव्वदी मध्ये प्रवेश करत आहेत... आणि आजही हे व्यक्तीमत्व बघून पंचविशी तीशीचा तरुण लाजेल असेच हे कार्यरत असतात... प्रत्येकासाठी अत्यंत अनुकरणीय, आदर्श, सोज्वळ,अतिशय साधी रहणी, भौतिक सुखाची कधीही आसक्ती नसणारं,कायम दुसऱ्यांचा विचार करणारं,अतिशय स्वावलंबी आणि कुटुंबासाठी,आईवडिलांसाठी ,
आपल्या माणसांसाठी अविरत कष्टणारं असंच...
किंबहूणा, "कुटुंबाप्रती कर्तव्य" हेच आपल्या आयुष्याचे ब्रिद ठेवणारे असे....
नाकी डोळी नीटस, हसतमुख गोरापान तेजःपुंज चेहरा, मध्यम उंचीचा बांधा आणि बघणार्याला आदरच वाटावयास हवा असंच हे व्यक्तिमत्व....
आजही श्री रामचंद्रराव आसोलेकर नव्वदीत आले आहेत,यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही... दोन-तीन दिवस त्यांच्या सहवासात घालवले तर, 'हे ज्येष्ठ नव्हेतच, तर नव्वदीतील तरुणच'! असेच उद्गार निघतील कोणाच्याही मुखातून...
आई-वडिलांचं हे ज्येष्ठ आपत्य... वडील प्राथमिक शिक्षक शेतीशिवाय दुसरा बाकी आधार नाही.... पण पाठची पाच भावंडं... एवढा मोठा डोलारा सांभाळताना एकट्या वडिलांची कसरत व्हायची.... माफक शिक्षण झाल्याबरोबर नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता ,दादांजवळ.... बीएस्सी नंतर खूप इच्छा असूनही शिक्षणाला अर्ध विराम देऊन औरंगाबादच्या शासकीय (घाटी) रुग्णालयात क्लार्कची नोकरी स्विकारली त्यांनी... त्यामुळे वडिलांना आधार होऊन भावंडांची लग्न, बहिणींची बाळंतपण, शिवाय घाटी ची सोय म्हणून नातेवाईकांची आजारपणं, त्यांची शुश्रुषा ह्यांची कायम जबाबदारी त्यांनीच घेतली... औरंगाबाद शहराचं ठिकाण म्हणून गरजवंत नातेवाईकाला शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवून घेणं... असे कितीतरी नातेवाईकांना, स्नेह्यांना आपल्या आहे त्या परिस्थितीत सामावून घेत असताना कोणताही अभिनिवेश नाही की उपकाराची भाषा नाही....कायम इतरांप्रती मदतीचा हात त्यांनी दिलाय....
त्यांच्या स्वतःच्या संसारात या दोघांशिवाय तीन मुलींसह एक मुलगा.... या चौघांनाही त्यांनी शिक्षणाच्या परिपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्या...त्यांनी प्रत्येकाला उच्चशिक्षीत बनवलेले आहे... आज प्रत्येक जण ताठ मानेने आपल्या पायावर भक्कमपणे स्थिरावलेली दिसतात... मुलाला इंजिनियर बनवत,पी.एच. डी.बनवले... परदेशगमनाची संधी उपलब्ध करून दिली...आज पवई आय आयटीत तो पर्यावरण विभागाचा एच.ओ.डी.असून प्रोफेसर आहे...एक मुलगी शिक्षिका, इतर दोघी डॉक्टर म्हणून यशस्वी झाल्या आहेत... असं सगळं सांभाळत, आपली शिक्षणाची सुप्त इच्छाही त्यांनी नोकरी करत करतच पूर्ण केली...एल.एल.बी. केले... शिवाय वयाच्या ४५ व्या वर्षी एम. एस. सी. बायोकेमिस्ट्री करुन घाटीमध्येच प्राध्यापक पदावर रुजू झाले... आज औरंगाबाद येथील कितीतरी डॉक्टर्स त्यांचे विद्यार्थी आहेत...
या सर्व आघाड्यांवर बरोबरच कौटुंबिक जबाबदारीत तसूभरही कमी पडले नाहीत दादा... अर्थात घरातल्या आघाडीवर आमची आत्या, सौ. कुंदा रामचंद्र आसोलेकर हिची यथार्थ साथ होतीच... आजही आहेच...आमच्या आत्यांना तिच्या लग्नानंतर जवळजवळ पंचवीस वर्षे बाहेरचे कोणतेही व्यवहार करावे लागलेच नाहीत...एक तर घकामाच्या मांदीयाळीत तिला वेळही मिळायचा नाही, आणि काटकसरीनं संसार करत, घरातील सदस्यांच्या कपड्यांचं शिवणकाम करत वाचवता येतील तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला...दादा, बाहेरची सारी कामं खंबीरपणानं
करुन संसारातील समतोल साधत....शिवाय आत्यावर असणाऱ्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवत घर कामातही शक्य तेवढी मदतच केली दादांनी...घरात नेहमीच पाहूण्यांचा राबता असायचा...
शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुध्दा दादा, पुण्यात भारतीय विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेलवर रेक्टर पदावर कांहीवर्ष कार्यरत होते...
मुंबईसारख्या ठिकाणी सुध्दा आसोलेकर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र राहत असत... दादांचे वृद्ध आई-वडील, ही दोघं नवरा-बायको, मुलगा-सून आणि एक नातू... अक्षरशः या सर्वांना समाधानाने एकत्र नांदताना बघून लोकांना आश्चर्य वाटायचं... आपल्या वयाच्या सत्तरी,बहात्तरी पर्यंत रामचंद्रराव आसोलेकरांना मातृपितृ सुख मिळाले...खरंच, त्यांच्यासारखे भाग्यवान तेच!
दादा आपल्या सत्तरी मध्ये स्वतः आपल्या अतिवृद्ध आईला उचलून घेत त्यांची शुश्रूषा करत असत...
गेली दोन वर्षे झाली, माझी आत्या बेडरिडन आहे... २४ तासांसाठी मेट्रन ठेवावी लागते.... पण या 'करोना'काळात ती सोयही थांबवावी लागली आहे... आज नव्वदीतही हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, रामचंद्रराव आसोलेकर, आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या आपल्या अर्धांगिनी ची काठी बनून तिला मानसिक आधार तर देत आहेतच, पण तिला शारीरिक आधार देत,अगदी भरवण्या पासून तिची शुश्रुषा करत आहेत ! अगदी न थकता...विना तक्रार...अजूनही आपली बँकेचीे कामं ते गाडीतून जातात, पण स्वतः करतात.... उच्चप्रतीची स्मरणशक्ती लाभलेले, आणि भूगोल या विषयाचे सखोल ज्ञान असणारे रामचंद्रराव आसोलेकर कायम अवतीभवती काय चालू आहे याचे अपडेट्स ठेवून असतात....
असा सगळा आनंदीआनंद असताना, समाधान असताना कुठेही दादांच्या वागण्या-बोलण्यात बडेजाव नाही... कायम जमिनीवर पाय घट्ट रोवलेले असतात...
दुर्देवानं आजारपणामूळे एका जावयानं अर्ध्यातून संसार टाकत एक्झिट घेतली या जगातून...पण, दादा आणि आत्याने आपल्या मुलीला आणि नातवंडांना अगदी समर्थपणे मानसिक आधार देत खंबीरपणे उभं केलं आहे....नातवंडही आपापल्या पायावर स्थिर होत आहेत....
तरुणपणातील कष्टांचा शीण कुठल्या कुठे पळून गेलाय आज दादांचा... असाच प्रसन्न तृप्तीचा आनंद, समाधान ईश्वराने त्यांच्या आयुष्यात कायम ठेवावा... या अतिशय साध्या आदरणीय व्यक्तिमत्वाला शतायुषाचा उंबरठा ओलांडण्यास ईश्वरानं साथ करावी...हिच सदिच्छा व्यक्त करते,मी आज त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने....
दादांना, या पुढच्या वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा देऊन त्यांना अभिवादन करते....🙏🙏
*त्वं जीव शतम् वर्धमानः।।*
©️
*नंदिनी म. देशपांडे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा