उगवले नारायण सवे सोनियाचा दिन
दिवाळीच्या शुभ मुहूर्ती जोडी पाडवा-भाऊबिज
॥१॥
पाडवा देतसे देतसे जन्मदात्याची गं सय
ओढ माहेराच्या गं भेटीची तव होई अनावर ॥२॥
लेकीच्या शिरावर
थरथरे गं आशिर्वादाचा हात
लेक होतसे हळवी
हळवी मायेच्या गं त्या स्पर्शानं ॥३॥
पाडव्याचा योग आणतसे जोडीदारा औक्षवण
त्याच्या नजरेतील कौतूक गं देई जगण्याची उमेद ॥ ४॥
माझ्या आयुष्याचा साथीदार होवो उदंड आयुष्यवंत ॥४॥
देवाकडे माझं आज गं मागणं एवढंच
सौभाग्याचं लेणं असो भाळी माझ्या गं अखंड
॥५॥
पाडव्याच्या हाती हात घेऊनी आली आली गं भाऊबिज
भावाच्या मायेला सदा आसुसलेली गं बहिण ॥६॥
बघूनी भावाचे वैभव होई तिला गं अभिमान
त्याच्या कर्तृत्वाचा तिला होई आनंद अपार ॥७॥
सुखी राहो भाऊ माझा त्याच्या संसारी फुलत
भाचरांना यावी नित्य आत्याची गं सय ॥८॥
होई मनाचा गहिवर येता आईचा आठव
जीव व्याकूळ व्याकूळ
क्षण ओलेते स्मरून ॥९॥
मन म्हणे आपोआप
आई असू दे असाच
लेकरांवर तुझ्या नित् आशिर्वादाच्या मायेची अशीच मऊ दुल ॥१०॥
©️
नंदिनी म. देशपांडे.
औरंगाबाद.
९४२२४१६९९५.
🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा