कहाणी एका चॅनलची....
*********
"अगं,आत्या, मला फार 'बोअर' होतंयं आत्या....तुझे आपण यूट्यूब चैनल बनवूया", "सांग केंव्हा बनवायचे?" "अरे,मला काही जमत नाही बाबा.... ते बनवणे, ऑपरेट करणे, व्हिडिओ तयार करणे...." "मी आहे ना गं,मी बनवून देतो....तू फक्त हो म्हण".....
लॉक डाऊनच्या काळात, हा आमच्या आत्या- भाच्या मधला अधून-मधून सुरू असणारा संवाद....
१३-१४ वर्षांचा शाळकरी मुलगा हा, आणि किती आत्मविश्वासाने म्हणतोय, मी बनवतो सारे! मला थोडीशी धाक धुक होती.... चॅनल बनवणं म्हणजे काही सोपं आहे का ते? नेटवरून सर्वांना दिसेल... एकदा चालू केल्यास सातत्य ठेवावे लागेल....उद्या शाळा चालू झाल्यानंतर जमणार आहे का याला.... आणि मला तर त्यातले
र ट फ काहीच येत नाही....शंकेने घर केलं होतं, पण पुन्हा विचार केला,मागे लागलयं लेकरु, टेक्निकल विषयात त्याला गोडी निर्माण होत आहे,पण हाताखालून सराव होण्यासाठी त्याच्या हातून काम व्हावयास हवेच.... चुकले तरी काही म्हणणार नाही,असे त्याच्या हक्काचे ठिकाण होते मी त्याच्यासाठी.... म्हणूनच मी माझ्या १४ वर्षांच्या भाच्याला, ईशान,त्याचं नाव....
माझे चॅनल बनवण्याची संधी द्यायची ठरवली.... माझा होकार मिळताच, अवघ्या पाचच मिनिटांत खटा खटा मोबाईलचे बटन क्लिक करत, त्यांनं माझं "शब्दगंध" हे यू ट्यूब चॅनल बनवलं सुद्धा....मी चाटच पडले... एवढ्या लवकर! घाईघाईतच ईशानने मला त्यासाठी नाव विचारलं...त्या वेळी जे सुचलं ते मी पटकन सांगितलं त्याला,
"शब्द गंध".... खरं म्हणजे तो इंग्लिश माध्यमातून शिकणारा विद्यार्थी.... मराठी भाषा त्याला बोलता येते,कामापुरती लिहिता येते.... बऱ्याच गोष्टींचा अर्थबोध होत नाही, मग अशावेळी ती गोष्ट तो मला विचारतो, मी त्याला मराठीत किंवा इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगते... त्यामुळे त्याचाही मराठीतील शब्दसंग्रह वाढत चाललाय हे लक्षात येऊ लागलंय.... पण तो व्हिडिओ कसा, कुठून बनवायचा, त्याची एडिटिंग
प्रक्रिया कशी करावयाची, निवेदनाच्या संदर्भात असणारी चित्रं, फोटो कशी टाकावीत? सुरुवात, शेवट, टाइमिंग पार्श्वसंगीत वगैरे वगैरे तांत्रिक बाजू तो अगदी जबाबदारीने,
एवढ्या एकाग्रतेने करतो, की आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटते मला....मी फक्त स्क्रिप्ट लिहित असते.... बाकी साऱ्या कल्पना त्याच्याच.... गेल्या चार-पाच वर्षात ॲन्डरॉईड फोन मी जसा वापरते तसा, केवळ लिहिणे, शोधणे, फोन करणे आणि घेणे या शिवाय पुढच्या वर्गात मी आणखीनही जाऊ शकले नाही.... तेथे ही एवढीशी मुलं लीलया किती सहजपणे वापरतात आपलं
टॅलेंट!खरंच चाट पडायला होतं.... हल्लीची पिढी स्मार्ट आहे, त्यांची ग्रास्पिंग पॉवर कमालीची वेगवान आहे, या म्हणण्यात खूपच तथ्य आहे, याची प्रचिती आली.... त्यामुळे, आणि त्याला आपण संधी देत ती आणखी फुलवत न्यायची हे मी त्याची या क्षेत्रातील आवड बघून ठरवूनच टाकलं.... ह्या प्रयोग करण्यामुळे, याबाबतीत त्याच्या नवनवीन कल्पना त्याला प्रत्यक्षात उतरण्याची संधी मिळते.... यातूनच मुले शिकत जातात आणि परफेक्ट बनतात.... उद्या या छंदाचे रूपांतर असाच दूरदर्शीपणा समोर ठेवत,कदाचित त्याच्या प्रोफेशन मध्येही होऊ शकेल....आपण मुलांना नाउमेद करता कामा नये असे मला वाटले...
ईशानने आत्तापर्यंत शब्दगंध चॅनलचे सहा व्हिडिओज बनवले...प्रत्येक व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे....
यामध्ये,
* शब्दगंध एक ओळख.
* श्रावणधारा.
* काव्यशब्दांच्या सरी.
*संस्कृती.
* एक धमाल सफर. आणि *शब्द माधुर्य.
माझ्या दृष्टीने सर्वच व्हिडीओज चांगलेच बनले आहेत... दरवेळी त्याच्या मनातील उदयाला येणार्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला त्याची स्पेस,चालना मिळत जाते....त्याची या क्षेत्रातील गोडी, सातत्य परफेक्शन अट्टाहास एकाग्रता या साऱ्या गोष्टी तो या विषयात तयार होण्यास मदत होत जाते....हे बघून मलाही समाधान वाटतं... आणि त्याच्या या क्षेत्रातील कामाचे कौतुकही वाटतं.... म्हणतात ना,
"केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे".
©️
नंदिनी म.देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹
https://youtu.be/XRf9-GzP1kM
https://youtu.be/sV6VDQdgANs
https://youtu.be/IzZ-C-cNFSk
https://youtu.be/F_zstroOPPc
https://youtu.be/GYPaRcEhF1k
https://youtu.be/aDWqsvNizv0
व्हिडिओज च्या लिंक्स...
🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा