गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

🌹घे भरारी🌹

🌿 घे भरारी! 🌿

     एक छोटेसे पिल्लू घरात आले की,संपूर्ण घर, वास्तू आणि घरातील माणसांची मनंही  चैतन्यानं भारून जातात.... सारं घर सारखं या पिल्लाच्या सानिध्यात, त्याच्या अवतीभवती रेंगाळत रहातं.... मोठी माणसं स्वतः एक पिल्लू बनून आपल्यात ते पिल्लूपण उतरवतात...या पिल्लाचे बोबडे बोल किंबहुना त्याचं रडूही प्रत्येकाला आनंद देऊन जातं... प्रचंड ऊर्जेचा हा बालरूपी स्त्रोत घरातील साऱ्यांचीच ऊर्जा व्दिगुणीत करत असतं....
    
     हेच बाळ जसं मोठं होत जातं तसं त्याचं आकाशही विस्तारत जातं....त्याची स्वतंत्र मतं उदयाला येतात...या मतांचा इतरांकडूनही आदर होऊं लागतो...कारण,ती त्याची 'स्वतःची'अशी त्याच्या मनाच्या प्रगल्भतेतून बनलेली मतं असतात... त्याच्या मतांना एक ठामपण प्राप्त होत जातं.... आणि मोठ्या होत जाणाऱ्या या बाळाच्या मतांची दखल घेत, घरातले निर्णय पूर्णत्वास येत जातात. जन्मापासून कुमारावस्था पार करुन,बाळ तारुण्यात पदार्पण करतं, पण तरीही घरातील मोठ्यांसाठी हे बाळ आजही बाळच असतं...अतिशय सुरक्षित वातावरणात वाढलेलं;आई-बाबांच्या पंखांच्या सावलीत सुखनैवपणानं बहरलेलं;सुरक्षित कोषात संचार करणारं असंच.... साऱ्यांचंच लाडकंही असतंच.... 

   परिस्थितीनुरुप  कालौघाच्या प्रवाहाबरोबर चालण्याचा त्याचा आपला स्वतःचा असा एक निर्धार असतो... त्याची निर्णयक्षमता परिपक्व झालेली असते.... मनोमन ठरवलेला निर्णय वेळीच प्रत्यक्ष उतरवण्यासाठी हे बाळ आपले प्रयत्न चालू ठेवते....मनापासून केलेले प्रयत्न नक्कीच त्याच्या मेहनतीला फळ देऊन जातात... त्याच्या या जिद्दीला घरातील ज्येष्ठांची साथ मिळत जाते...आयुष्यात केव्हा तरी आपल्याला या घरट्याच्या कोषातून बाहेर पडावेच लागणारच याची पुरेपूर जाणीव या मोठ्या झालेल्या पिलाला  असते... 

    आणि तो दिवस येतो, घरट्यातून आकाशाकडे झेपावण्याचा, पंखांमध्ये आलेलं बळ आजमावण्याचा.... 'आपल्या माणसांपासून कितीतरी दूर जायचे आहे आपल्याला',ही जाणीव क्लेशदायक असेल तरीही,निर्णयावर ठाम राहून भरारी घेण्याचा,आपल्याच मनाने दिलेली साद ऐकण्याचा हा दिवस.... बाळाच्या आयुष्यात त्याला यशश्री कडे खेचून नेतो... हे नवीन स्वप्नांना नवीन ध्यैय्यांना साकार करण्यासाठीचे असे पहिले पाऊल यशस्वीतेच्या दिशेने ज्या दिवशी पडते, तो क्षण त्या बाळाच्या आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच असतो....

   कधीही आपल्या घरट्यातून बाहेर न पडलेल्या या पिल्लाला आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच उंच भरारी घेऊन सातासमुद्रापार जाण्याचा दिवस; एक नवी उमेद,नवी जिद्द,नवीन उन्मेश, नवीन जोश, नवीन माणसं ,नवीन वातावरण आणि नवीन देश धरती यांकडे घेऊन जातो.... केवळ बाळाने आपले आकाश विस्तारत असताना घेतलेल्या निर्णयाचे ध्येय गाठण्यासाठी,स्वतःला सिद्ध करताना एक पाऊल आणखी
टाकण्यासाठी.... ते प्रत्यक्षात  उतरवण्यासाठी... त्यातून स्वतःला आनंद, समाधान मिळवण्यासाठी आणि इतरांनाही या समाधानात न्हाऊन निघण्यासाठी... म्हणूनच, मोठ्यांच्या अंतःकरणातून या बाळासाठी आपोआप शब्द उमटत जातात, 

यशस्वी भवः
यशस्वी भवः
यशस्वी भवः

©️ नंदिनी म.देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा