गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

🌹वेणी🌹

🧛‍♀️ *वेणी*.🧛‍♀️
~~~~~~~~~
   आज सहज आरशात बघून केसांना कंगवा करताना, जाणवले खूप वर्षांनी केसांची लांबी थोडी वाढली आहे का? लॉक डाऊन आणि अजूनही या करोना दहशतीने पार्लरमध्ये जाऊन केसांना कात्री लावण्याची हिम्मत होत नाहीये मला.... पण गंमत म्हणून पेडाची वेणी घालावी का?किती किती वर्ष झाली,अशी वेणी गुंफायला....    
   एकदा मनाने ठरवल्यावर मग काय, लगेच कृतीत उतरवले.... आणि नकळत मन चाळीस-पंचेचाळीस वर्ष मागे, अगदी माझ्या बालपणात जाऊन पोहोचले.... बालपणी पाचवीत प्रवेश केला, आणि," आता मी मोठी झालेआहे आई...मी आता बॉबकट करणार नाही.....मी यापुढे केस वाढवणार आहे...."असा हट्ट धरून  त्यावेळी वेणी घालण्यासाठी केस वाढवले होते.... पण आपली आपल्याला ही वेणी घालता येत असेल तर शपथ! अजिबात जमायचे नाही....
    मग सकाळची शाळा असताना आईने तेल लावून चापून-चोपून वेणी घालून द्यावी.... कधी घाईघाईत ती उंच व्हावी तर कधी अगदी मानेवर मग मात्र माझी आईकडे अशीच घातलीस तू वेणी ,अन् तशीच घातली...अशी भुन भुन चालू असायची....कधी ती थोडी उंचच जायची तर कधी अगदीच मानेवर...
कधी थोडी सैल होऊन केस बाहेर निघायचे...मग, "पुन्हा 
 घालून दे बघ गं आई... बघ कसा 'बुचका' आलाय?"असं टुमणं लावायची मी आईजवळ..... तर कधी एका कानावरच आलीए नाहीतर वाकडीच पडते आहे.... अशा अनेक तक्रारी हमखास असायच्याच... अशा काहीतरी सबबीखाली ती वेणी एकदा तरी उकलून घालावीच लागायची आईला....
     "बुचका", हा शब्द कितीतरी वर्षांनी या संदर्भाने आठवलाच... एरवीही कधीच उपयोगात आणला जात नाही हा, पण मला आठवला अचानक! ह्याचे माझेच मला कौतुक वाटले....
    वेणीचे असंख्य प्रकार होते... एक  वेणी, दोन वेण्या, रिबीन लावून,दोन वेण्यांना रिबनी लावून वर बांधून.... कधी वेणी चा पाळणा सुद्धा!तर कधी चार पेडाची.... कधी उलट्या पेडांची.... अशी विविध रूपं... कशीही घातली तरी केस बांधलेले असावेत.... डोळ्यांवर कपाळावर रेंगाळू नयेत हा त्यामागचा उद्देश असे.... शाळेमध्ये केस मोकळे सोडावयास बंदीच होती....
   काही शाळांमध्ये तर पेडाची वेणी दोन वेण्या घालून वर सांगितली त्या प्रमाणे कानावर फोल्ड करुन घालणेच आवश्यक असायचे....  
    मला आठवतं, मी औरंगाबादेत एक वर्ष आत्याकडे शिकले... तिच्या तिघी मुली आणि चौथी मी... शाळा सकाळची, विश्वास नगर लेबर कॉलनीतून शारदा मंदिर शाळा फार लांब...  तेव्हा सिटी बसेसही मोजक्याच असायच्या.... सकाळी साडेसहाला तयार होऊन शाळेसाठी निघावे लागायचे....आम्ही रात्रीच आत्याच्या उशाशी कंगवा, तेलाची बाटली आणि छोटा आरसा आणून ठेवत असू... बाकी तयारी आम्ही आमचीच शाळेत जाताना करायचो....त्या वेळी सकाळी उठलेली आत्या तेथे जागेवरच बसायची आणि आम्ही एक एक जणी तिच्या समोर वेणी साठी नंबर लावायचो.... चौघींच्या वेण्या त्याही दोन घालून वर बांधणे हे चांगलेच मोठेच काम होते....
    त्याकाळी तरुण मुलींनी केस मोकळे सोडणे म्हणजे वाहिय्यात पणाचे लक्षण समजलं जायचं...नंतर हळू हळू केसांची लांबी कमी होत गेली...पेडाची वेणी घालणं लुप्तच झालयं जवळ जवळ.....कायमच गायब होईल की काय? अशीही पाल चुकचुकते मनात... या निमित्ताने मी मात्र माझ्या बालपणात गेले आणि व्यक्त झाले हे मात्र खरंय....

©️ 
*नंदिनी म. देशपांडे*.

🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा