#आठवणीतील कविता#
आठवणीतील कविता या साखळी उपक्रमातील एक कडी बनण्याची संधी,मला माझी मैत्रिण अर्चना कुलकर्णी,हिनं दिली आणि मी आनंदून गेले....या साखळीचा एक हिस्सा आपण बनत आहोत,या जाणिवेनं....अर्चनाचे मनस्वी आभार....
आठवणीतील कविता आठवण्यापूर्विच, त्या कवितांचे कवी प्रथम आठवत गेले....त्यांपैकीच एक;
बालकवी-त्र्यिंबक बापूजी ठोंबरे हे एक!
अवघ्या सतराव्या वर्षी, साहित्य संमेलनात यांनी जागेवरच कविता रचून, तिचं निवेदन केलं आणि कौतुकानं संमेलनाध्यक्ष कर्नल डॉ.किर्तिकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी स्वयंस्फुर्तिनं बहाल केली....
अर्वाचीन काळातील एक प्रतिभावंत कवी अशी ख्याती असणाऱ्या बालकवींना,
"निसर्गकवी"असेही संबोधले जाते...केवळ सत्तावीस वर्षे आयुष्य लाभलेल्या या कवीनं पावणेदोनशे कविता रचून ठेवल्या आहेत!
त्यांच्या, श्रावणमास, आनंदी आनंद गडे, औदुंबर,निर्झरास,
फुलराणी,पाऊस इ. कवीतांनी शतकोत्तर काळ लोटलायं,पण आजही मनावर गारुड केलं आहे....
कविता म्हणजे काय?कविता वाचनाची गोडी,
निसर्गाकडे बघण्याची सौंदर्यपूर्ण नजर ही आमच्या पिढीला बालकवी
कडंन मिळालेली देणगी आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही....
त्यांपैकी,"पाऊस"
ही कविता मी आज येथे उपकृत करत आहे...
सध्या पर्जन्य राजानं,साऱ्या सृष्टीवर आपला वरदहस्त ठेवलेला दिसतोय...
अशाच पाण्यांनं भरभरुन ओंथबणाऱ्या आकाशातील मेघांचे वर्णन काय सुंदर केलंय,या आपल्या कवितेतून बालकवींनी!
तुम्ही प्रत्यक्ष वाचूनच तो आनंद मिळवा....पावसाच्या जलधारांसवे पाऊस वाचत.....
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
# पाऊस #
___________
थबथबली ओथंबून खाली आली
जलदाली मज दिसली सायंकाळी
रंगही तिचे नच येती वर्णायाते!
सुंदरता त्यांची मम भुलवी चित्ता
व्योमपटी जलदांची झाली दाटी
कृष्ण कुणी काजळिच्या
शिखरावाणी!
नील कुणी ईंद्रमण्याच्या कांतिहुनी!
गोकर्णी,मिश्र जांभळे जसे कुणी;
तेजात धुम्राचे उठती धोत,
चमकती पांडुरही त्यापरिस किती!
जणू ठेविल माल भरुनी वर्षादेवी
आणुनिया दिगंत राहुनि या ठाया!
कोठारी यावरला दिसतो न परी!
पाहूनि ते मग मारुत शिरतो तेथें!
न्याहळूनी नाहिं बघत दुसरे कोणी
मग हातें अस्ताव्यस्त करी त्याते!
मधु मोतीं भुवरती भरभर ओती!
बालकवी.
(बालकवींच्या निवडक कविता).
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा