*चोचले जीभेचे*
_______________
*चणे*
© नंदिनी म.देशपांडे.
लहानपणापासून परभणी -औरंगाबाद-
परभणी असा रेल्वेचा भरपूर प्रवास घडला...म्हणजे सारे नातेवाईक याच दोन ठिकाणी एकवटलेले मग काय, निमित्ताने तो अगदी वर्षभरात चार पाचदा तरी व्हायचा....किंवा औरंगाबादहून परभणीला तरी दर एक दोन महिन्यात कोणीतरी यायचंचं...
फार आतुरतेनं वाट बघायचो आम्ही मुलं अशा येणारांची....मुलंच काय पण मोठी माणसंही वाटेकडे डोळे लावून असायची....
का?अहो का म्हणून काय वाचारता,रस्त्यात लागणाऱ्या 'सेलू' गावच्या रेल्वेस्टेशनवर मिळणाऱ्या खमंग चण्यांसाठी....
ओल्या (भिजत घातलेल्या)साध्या हरभऱ्यांच्या उसळीलाच "चणे"असे संबोधन आहे हे त्यामूळे उमगलं खरं तर....
पण सेलूच्या स्टेशनवर मिळणारे चणे खरोखरच चवीला एक नंबर होते....मला वाटतं या बाबतीत एकखांबी तंबू होता त्या विक्रेत्याचा, त्याच्या हातच्या चवीला नंतरची कित्येक वर्ष अजिबात पर्याय नव्हता....केवळ रेल्वेस्टेशनवरच,शिवाय जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेच्या वेळातच ते उपलब्ध असायचे....
बरं हा माणूस एका लोखंडी स्टॅंडवर आपलं चण्याचं घमेलं ठेऊन एकाच जागेवर उभा असायचा! त्याची जागाही ठरलेलीच!
स्टेशन आता येणार आहे म्हटलं की,अगोदरच लवकर उतरण्यासाठी प्रवासी गाडीच्या दरवाज्याजवळ येऊन थांबायचे....आले स्टेशन की,भरभरा खाली उतरत त्याच्या दिशेनं पळायचे...या चणे वाल्याच्या भोवती अश्शी गर्दी जमायची ना! पण हा पठ्ठ्या एकटाच पेपरच्या अगोदरच करुन ठेवलेल्या तुकड्यावर गरमागरम खमंग चणे,त्यावर कच्चा भुरभुरलेला कांदा,चतकोर लिंबाची फोड,कैरीच्या दिवसात एखादी कैरीची फोड आणि झणझणीत फ्राय मिरची!अहाहा!झणझणीत होतं सारंच प्रिपरेशन म्हणूनच तोंडाला पाणी सुटायचं,सेलूच्या चण्यांचं नाव काढलं तरी....
ईकडे गाडीत दात घासून बसलेली मंडळी आपलं माणूस चणे घेऊन कधी येतयं याची वाट, खिडकीतून सारखं डोकावत बघत बसायचे....
पण खरंच, या सेलूच्या चण्यांना अख्ख्या पंचक्रोशीत तोडच नव्हती....त्याची चव,त्याची क्वालिटी जी होती ती सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत अगदी एकच.... म्हणूनच हवीहवीशी!
त्यानंतर कांही वर्षांनी आम्हीही वास्तव्यास होतो तेथे पण माणूस पाठवून मुद्दाम चणे मागवून घेत असू स्टेशनवरचे!
एरवी रेल्वेस्टेशन,बसस्टॅंड वरचं काहीही खाण्यास मज्जाव करणारी मी,याला मात्र अपवाद ठरायची....माझंच मला आश्र्चर्य वाटतं कधीकधी...असो...
पण कालांतराने हा सेलूच्या चण्यांचा कारभार इतर कोणाच्या तरी हाती गेला आणि सारंच बदलून गेलं असं समजलं....ईतरही चणेवाले सेलू स्टेशन आलं की गाडीत येऊ लागले आणि मग मात्र चण्यांना बाजारात बसल्यासारखं वाटलं असणार नक्कीच...
मुखातून "चणे घ्या चणे", असं नावही न कढता,प्रचंड मागणी व खप असणारे चवदार चणे मग आपली पत सांभाळू शकले नाहीत असे जाणवले....
हल्ली,सेलूच्या स्टेशनवर चणे मिळतात किंवा नाही याची माहिती नाही, पण एके काळी सेलू शहर,त्यातही स्टेशनच केवळ तेथील खमंग चण्यामूळे ओळखले जायचे....
तीच चव आजही जीभेवर रेंगाळते आहे...कधी चणे खाण्याची हुक्की आली म्हणजे मी पण आवर्जुन बनवतेच....आणि सेलूच्या चण्यांशी,त्याच्या चवीशी आंतर्बाह्य साधर्म्य दाखवणारे चणे मला बनवणं जमतंय....हे सांगताना मला खूप आनंद वाटतोय....
अबालवृध्दांना आवडणारी ही डिश खरंच तोंडाला फार चव आणते! 😋😋
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा