*चोचले जिभेचे*
________________
*शंकरपाळी*
© नंदिनी म. देशपांडे.
शंकरपाळी म्हटलं की,दिवाळी आठवते,चैत्रगौर आठवते,सहज म्हणून केलेलं परिवाराचं एकत्र जमणं आठवतं....ओघानेच लाडू करंजी अनारसे आणि चिवडा यांचीही आठवण येतेच....
मला वाटतं शंकरपाळी हा खरं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या खाद्यसंस्कृतीचं एक अविभाज्य अंग.....
ही शंकरपाळी माहिती नाहीत असं म्हणणारा माणूस शोधूनही सापडणार नाहीच!
लहानपणापासून या ईवल्याशा पदार्थाशी अशी गट्टी जमलीए म्हणून सांगू....
अगदी शाळेच्या डब्यातला खाऊ म्हणून तर कधी भुलाबाईच्या प्रसादाचा खाऊ म्हणून आईनं आवर्जुन शंकरपाळी बनवावितच... बहूतेक किंचित गोड चवीचीचं... कधी गुळाला तर कधी साखरेला कणकेत नाही तर मैद्यात घोळवून....
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांच्या मांदियाळी मध्ये तर हमखास यांची वर्णी लागतेच लागते...डिश ची शोभा वाढवण्यासाठी ह्यांच्या शिवाय मजाच नाही...
कुरकुरीत खुसखुशीत सहज जीभेवर विरघळणारे....
कधी कधी खमंग खारे तर कधी चटपटीत खट्टेमिठेही....अगदीच आळणी असतील तरीही कुरुम कुरुम खाण्यातली मजा काही ओरच!
फराळा बरोबरच दुपारचं खाणं म्हणून तर कधी चहासोबत बिस्काटा सारखं....एक सिप चहा चार दोन शंकरपाळी काय मस्त लागतं हे कॉम्बिनेशन!
बिस्किटं बिनदिक्कत पणे कोपऱ्यात जाऊन बसतात अशावेळी...
लांबचा प्रवास आणि शंकरपाळी यांचं नातंही फारच जवळचं....प्रवासात तोंड चालू ठेवण्यासाठी,पोटभरीची आणि वेगवेगळ्या चवीची शंकरपाळी म्हणजे अगदी हुकुमाचा एक्काच!शिवाय टिकावू पणा अभिमानानं मिरवणारा.... सहाजिकच या शिवाय प्रवास होत नाहीच.....
करावयाला सोपा,पटकन कुणालाही जमणारा, आयत्या वेळी होणारा नि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या चवीचा बनवता येणारा, असा हा आपला एक पारंपारिक पदार्थ....
बहुतेक लवकरच हे शंकरपाळे वैश्विक पदार्थ बनण्याकडे वाटचाल करतील हे भाकित नोंदवावयास काहीच हरकत नसावी असं वाटतंय....
सहज म्हणून दुपारच्या चहाच्यावेळी तोंडात टाकण्यासाठी म्हणून कालच बनवलीत मी पण त्यांचं कौतूक केल्याशिवाय रहावतच नव्हतं...म्हणून हा सारा लिहिण्याचा घाट.....
मग काय! बघू या
आज कोणा कोणाच्या स्वयंपाकगृहात यांचा प्रवेश होतोय ते!....
🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा