*आत्या* ♦️
©️ नंदिनी म. देशपांडे.
हो,आत्याच!
प्रत्येक माहेरवाशिण,ही अपल्या माहेरघरी लक्ष्मीरुपानं आलेली लेक असते....
आणि त्या घरच्या पुढच्या पिढीच्या बालगोपाळांची ती आत्या होते....
आत्यासाठी
आपली भाच्चे कंपनी हे तिच्या माहेरचं वैभव असतं...एक वेळ तिच्या स्वतःच्या मुलांनी केलेली मस्करी आत्याला जिव्हारी लागेल, पण भाच्यांनी केलेली गम्मत ती हासण्यावरी नेते...कारण आपल्या भाच्च्यां मध्ये ती आपलं बालपण शोधत असते...आपल्याच प्रतिबिंबाचं परावर्तन न्याहळताना दिसते...
माहेरचं घर म्हणजे तिला तिच्या पायाखालचं अंगवळणी पडलेलं....तेथील बारीक बारीक गोष्टींशी तिच्या बालपणीच्या आठवणी गुंफलेल्या असतात....त्या आठवणी भाच्च्यांना उलगडवून सांगण्यात तिला आनंद मिळतो...म्हणूनच केवळ माहेरच्या माणसांशीच नव्हे तर त्या घरातल्या इतरही गोष्टींमध्ये तिचा जीव गुंतलेला असतो....सासरी गेली आत्या,तरीही आपलं अर्ध लक्ष माहेरी ठेवून जाते.... निघताना तीन तीन वेळेला काळजी घ्यायला सांगते....
अशा या आत्या भाच्च्याच्या नात्यात अपार गोडवा भारुन राहिलेला असतो....
आत्याला जेवढा भाच्च्यांचा लोभ येतो, तसाच भाच्चे मंडळींना आपली आत्या म्हणजे एक हक्काचं ठिकाण असतं...एखाद्या गोष्टीची आई-बाबांकडून परवानगी हवी असेल तर आत्याचा 'लग्गा'लावला म्हणजे ती हमखास पदरात पाडून घेता येते हे गणित त्यांना उमगलेलं असतं....हव्या असणाऱ्या गोष्टीं साठी आत्याचं माध्यम म्हणून कसा उपयोग करायचा हे वकुबीनं जाणणारी मंडळी, म्हणजे भाच्चे मंडळी....कितीही मोठी झाली ती, तरीही आत्या भाच्च्या मध्ये मनोमन नातं स्थिरावतं ते प्रमुख्यानं मैत्रीचंच...एक निर्मळ निरागस....
आत्यानं समज दिल्याचा राग भाच्च्यांना येत नाही कधी,जेवढा ईतरांनी रागावल्यास येतो....
भाच्च्यांसाठी आत्या म्हणजे "त्यांचं" असं एक खास ठिकाण असतं...
कुणा विषयी तक्रार असो वा सुचना देणं असो,आत्याला सांगितलं की त्यावर मार्ग निघतो नक्कीच ही भाच्च्यांची धारणा आत्याही पुर्णत्वाला नेते...
तर हे आत्या भाच्च्यांचं नातं,प्रेमाचं,मैत्रीचं,अंतःकरणाचं,
हक्काचं,आपलेपणाचं असं मोठं सरमिसळीचं पण मोठं गोड असतं...
मलाही पाच आत्या होत्या...
त्यांपैकीच एक आमची मोठी आत्या....गोदावरी नाव होतं तिचं...पण लहान भावंडं आक्का म्हणायचे... त्यानंतरही ती "आक्काच" राहिली....कुणाची आक्का आत्या,कुणाची आक्कामावशी!
ही आमची आक्का आत्या उंचीला कमीच पण गोरी गोरी पान,केशरी नितळ चमकदार कांतीची,नाकी डोळी निटस, ठसठशीत होती....
त्या वेळच्या प्रथेप्रमाणं दहाव्या,अकराव्या वर्षीच लग्न झालं होतं तिचं...आजही तिचा तेंव्हाचा फोटो बघितला की वाटतं,लग्न म्हणजे काय?याचा बोध तरी असेल का तिला त्या वयात?
बालपण सरलंही नाही की सासरी रवानगी झालेली....तिच्या पेक्षा बारा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नवरदेवा बरोबर....
असेल सासर माणसांनी भरलेलं, गर्भश्रीमंत,जमिनदार घराणं....असेल तिला सोन्यानं मढवून टाकलेलं,एक सुन म्हणून,पण त्या साठी किती तडजोडी स्विकारल्या तिनं....
बालपणातलं हक्काचं ठिकाण माहेर दुरावलं,सहाजिकच बालसुलभ वयात आईवडिलांच्या प्रेमाला पारखी झाली...काय शिकली होती माहित नाही,माझ्या माहितीप्रमाणे शाळेत कधी गेलेलीच नव्हती ती...पण आजोबांनी तिला संस्कृत,मराठी,लिहिता वाचता यावं म्हणून घरी येऊन शिकवणाऱ्या एका शिक्षकाची नेमणूक केली होती... त्यामूळे सुंदर हस्ताक्षराची आणि सहज वाचनाची आक्का आत्याची सवय आम्हा सर्वांच्या परिचयाची होती... तिची स्वहस्तक्षरातली बरीच पत्र मीपण वाचली होती....
खूप हुशार होती आत्या,हे आम्हाला तिच्या सहवासानं दाखवलं....लिहिता वाचता येण्या ईतपत शिक्षण झालेलं....पण वाचनाची प्रचंड आवड असणारी....आणि वाचनातून आत्मसात केलेलं ज्ञानाचं तेज चेहऱ्यावर प्रतिबिंबीत झालेलं...
तिला आपले वडिल आणि त्यानंतर भाऊही वकिल असल्याचा फार अभिमान होता.....
खरं म्हणजे संधी मिळाली असती तर,एक विचारवंत विदूषी अशी तिची ओळख निर्माण झाली असती....पण,इ.स.१९२५ सालचा तिचा जन्म! माहेर शहरातलं,परभणी हे गाव होतं पण सासर मात्र खेडे गाव लातूर जवळ निलंगा तालुक्यातील निटूर....त्या काळच्या सामाजिक रुढी परंपररांना महत्वाचं मानणारं...घरातलं बाळबोध पारंपारिक वातावरण त्यातही एकत्र कुटुंब पध्दती...कर्मठ विचारांची घरची माणसं...मग काय,शिक्षणाचा बट्याबोळच होणारच....शिकायचे आहे मला हे मतही मांडणं दुरापास्तच....
पण तरीही तिची वाचनाची आवड तिनं कायमच ठेवली...एकत्र कुटुंब पद्धती असल्यानं जबाबदारी अशी फारशी नव्हती...दिमतीला गडी माणसं होतीच... वाचनासाठी भरपूर वेळ असायचा... धार्मिक ग्रंथ,गीता,ज्ञानेश्वरी यांचं नित्यपठण करत असायची आत्या.... मुलांनाही शिकवायची...
वर्षातून एकदा दरवर्षी माहेरी परभणीला येत असायची...अंगावर नेहमी वापरण्याचे दागिने एवढे की उंची कमी असल्याने जमिनीवर बसलेली असताना ते जमिनीला टेकायचे! असे आमचे बाबा सांगतात....माहेरी आली की तीन चार महिने आरामात रहायची....बालसुलभ वयात लहानपणीच माहेर घरापासून दूर गेलेली आत्या, अशा प्रकारे मग माहेरी राहून आपली माहेरपणाची हौस भागवून घ्यायची...
त्या मानाने माहेरी वातावरण आणि जीवनशैलीही आधुनिक पध्दतीची होती...शिवाय मोठी अक्का सर्वांची लाडकी...भावंडांना हवीहवीशी...
गोदू आत्या स्वभावानं फार प्रेमळ...लहानांना लाड करुन घेण्याचं एक आवडतं ठिकाण!जेवढी प्रेमळ तेवढीच स्पष्टवक्तीही....जे तिच्या मनाला पटायचं नाही ते तिनं स्पष्ट बोलून दाखवावं... शिवाय एखाद्याची झालेली चूक त्याला त्याच्या समोर दाखवून,बोलून सोडायची..... एवढेच नव्हे तर त्याची कान उघाडणी केल्याशिवाय चैन पडायची नाही तिला...
आत्या माहेरी येताना सोबत दळलेला ओल्या लाल मिरचांचा ठेसा आणि सपिटाचे शुभ्र लाडू आणत असे...आम्हाला फार आवडायचे ते!श्रीखंडाची वडी बनवण्यातही हातखंडा होता तिचा...
तिची मुलं फार खोडकर होती आणि त्यांच्या मागेपुढे धावण्यात तिला आपलं माहेरपण नीटसं उपभोगता येत नाही असं आमच्या आजोबांना वाटे... त्यामूळे,"गोदे तू येथे येताना पोरांना तिकडेच ठेवून येत जा बरं" असं आजोबा गमतीनं म्हणायचे ही आठवण बाबा सांगतात...
आमचे बाबा तिच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान त्यामूळे माझ्या आई वडिलांना ती आईच्याच ठिकाणी होती....
पण तरीही ती मैत्रीण बनून रहात असे...
अगदी आम्हा भाच्चे कंपनीचीही....
आम्हालाही तिचा सहवास आवडत असे...तिच्या गमतीशीर,प्रेमळ बोलण्याची लकब आम्हा साऱ्यांनाच फार आवडयची...त्यात विलक्षण आपलेपणा,लावकेपणा होता...
आक्का आत्या जशी मोठी होत गेली तशी तिचं मुळचंच देखणं रुप आणखी सौंदर्यानं खुलत गेलं...वाचनानं तिच्या वृत्ती आणि विचार प्रगल्भ बनत गेले असावेत असे वाटते...
जुन्या काळातली पारंपरिक रुढी परंपरांच्या दबावाखाली असूनही तिचे विचार आधुनिक होते....
फारशी देवभोळी नसणारी, किंबहूना कधीही देवांची पुजा बिजा न करणारी पण श्रध्दा बळगणारी होती...जात,धर्म,पंथ यांना फारसे महत्व न देता माणसातील चांगुलपणा जाणणारी,माणुसकीला प्राधान्यक्रम देणारी होती.... त्यामूळे ती खूप जुन्या काळातली आहे असे तिनं तिच्या वागण्या बोलण्यातून आम्हाला जाणवू दिलंच नाही कधी.... पण विचारांना शेवटपर्यंच आधुनिक पणाची चौकट होती आत्याच्या....
लहानपणापासून सुखातच राहिलेली दोन्हीही घरी, त्यामूळे असेल कदाचित पण स्वतःची आबाळ तिनं कधीही होऊ दिली नाही...करवून घेतली नाही...
आपल्या मुलांचा आणि भाच्चे मंडळींचा उत्कर्ष होताना तिने बघितला होता...सगळ्या भाच्चेमंडळींकडे जाऊन दोन दिवस राहून तिनं प्रत्येकाचा संसार बघितला....समाधानानं मन भरुन कौतूक केलं तिनं...मला आठवतं,माझ्याकडे दोन दिवस रहाण्यासाठी मी घेऊन आले असता,माझ्या संग्रही गृहशोभिका मासिकाचे वर्षभराचे अंक होते त्यावेळी...ते सर्वच्या सर्व अंक तिनं एका दिवसात वाचून काढले होते...अगदी वयाच्या सत्तरी नंतरही...मला त्यावेळी फार कौतूक आणि अभिमान वाटला होता तिचा...
तिचा विनोदी स्वभाव फारच भाऊन जायचा सगळ्यांना....
अशी ही आमची आक्का आत्या,स्वाभिमानानेच जगली अखेर पर्यंत...
वय झाल्यानंतर ८१वर्षे पर्यंत जीवनानंद घेऊन,२३ मे २००६ रोजी परलोकात गेली...पण आजही तिच्या आठवणींनी मन हळवं होतं...त्या आठवणींचा ताजेपणा आजही तेवढाच ताजा वाटतो...
आज २३ मे...आमच्या आक्का आत्याचा १४ वा स्मृतिदिन.... तिच्या आठवणींना उजाळा द्यावा असं प्रकर्षानं वाटलं....आणि तिच्या स्मृतिंना अभिवादन करत लिहिती झाले...🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा