रविवार, ८ मार्च, २०२०

माझी आजी.

*माझी आजी*

       गोरी गोरी पान,तकतकीत सुरकुतलेली कांती,मध्यम ऊंची पण ताठ कणा...माझ्या आईची आई...माझी आजी....माहेरची शारदा तर सासरची पार्वती!
   आमच्या कुटुंबात दर वेळी आंबट वरण आणि गोळेभात आणि बटाट्याची चिंच गुळ घातलेली भाजी बनवण्याचा बेत झाला की, हमखास आजीची आठवण आजही येते...हे तीनही पदार्थ अतिशय साधे,सोपे अगदी सहज बनवले जाणारे, पण तिच्या हातच्या चवीची अशी आम्हाला आजही जमत नाहीत...कितीही प्रयत्न केला तरीही...
    ९३ वर्षांचे आयुष्य तिला मिळालं. पण तिला सधवा बघितल्याचे खूप पुसटसे आठवते...मी सहा वर्षांची असतानाच आजोबा गेले आणि आजीनं केशवपन केलं..त्या नंतरचीच आजी आजही मनाच्या एका कप्पयात तिची अशी एक जागा कायम करुन आहे...आजीला जाऊनही वीस वर्षे झालीएत आता... पण तिच्या आठवणी,तिचा करारीपणा,खंबीरपणा,तिची कणखर वृत्ती आजही आठवत रहाते... निमित्ताने....
   आजीचा सतत कांहीतरी कामात अण्याचा स्वभाव तर सवयीचाच झाला होता...आजोबांकडे भोवतीच्या बऱ्याच गावांचं पांडेपण होतं....त्यांचा लोकसंपर्क आणि घरी पाहूण्यांची वर्दळ नेहमीच असायची...‌
     औंढा नागनाथ हे माझं आजोळ...म्हणून तेथील प्रत्येक घराचं नागनाथ हे अराध्य दैवत....दररोज सकाळी सोवळ्यात स्वयंपाक आटोपून आजी देवाला,म्हणजे नागनाथाला जाऊन यायची.हाती पितळेची जाळीची कलाकुसर असणारी जड फुलदाणी घेऊन...त्यात परसबागेतीलच पांढरी, लाल कन्हेरीची फुलं आणि बेलाची काही पानं... त्यावेळी तेथील स्थानिक रहिवासी मंदिरात दर्शनासाठी जाताना अनवाणीच जात असत...बाराही महिने...गावातील बहुतेक स्त्रीयांचा असाच नियम असायचा...मग रस्त्यात परस्परांची विचारपूस व्हायची...पण तरीही अर्ध्या तासाच्या आत आजी घरी परतायची....
    वयाच्या नव्वदीपर्यंत आजी कुठेही गेली,अगदी आमच्या घरीही म्हणजे तिच्या लेकीकडे,नातीकडे,एखाद्या बहिणीकडे,भाचीकडे तरी, साऱ्यांचा स्वयंपाक तीच करायची...तिला सोवळ्यात होऊन तिचा करायचाच असायचा पण साऱ्यांचा करण्यात तिला आनंद वाटायचा... 
    आमच्याकडे आली आजी,की घरातील प्रत्येकाच्या आवडीनुसर दररोज एक फर्माईश ती पूर्ण करायचीच....आजी आली की आईला आराम होई...दुपारीही तीनं फार तर अर्ध्या तासापेक्षा जास्त कधी वामकुक्षी घेतलेली आठवत नाही मला....तिचा हात चालूच असायचा सारखा....कधी जात्यावर स्वतः मेतकूट दळून ठेव तर कधी सातूचं पीठ....काहीच काम नसेल तर सपीट काढून गव्हले (वळवट) तरी बनवून ठेवायचीच....एवढे बारीक,शुभ्र आणि पांढरे की बस्स !! खीर खाताना किती मेहनतीचं जिन्नस आहे हे!याची आम्हाल जाणीव व्हायची...
   तिच्या काळात महिलांच्या शिक्षणाला फारसे महत्व नव्हते,पण ती शिकली असती तर नक्कीच बुध्दिमान विद्यार्थ्यांमध्ये तिची गणना झाली असती....
ती किती शिकलीए याची चौकशी मी पण केली नाही कधी,पण दररोज तुळशीपुढे "श्रीराम प्रसन्न" ही अक्षरं रांगोळीनं सुरेख काढायची...
कामाचा उरक आणि टापटिपपणा तर एखाद्या तरुणीला लाजवेल असाच शेवटपर्यंत होता...आपले काम आपणच करायची...कधीही परस्वाधिनत्व पत्करण्याची वेळ तिच्यावर आली नाही...
आपलं पातळ दररोज स्नान झाल्याबरोबर स्वतःच धुवून टाकायची...कायम पांढरं पांढरं शुभ्र असायचं ते...आई कधीतरी गडद पिवळ्या किंवा गुलबक्षी रंगाचं नेसावयास लावायची तिला ते फार खुलून दिसायचं....म्हातारपणातही तिच्या अंगावर...
    आजीसह त्या सहाजणी बहिणी आणि दोन भाऊ होते...या भावंडांमधील परस्परांचे प्रेम फारच वाखाणण्यासारखं होतं...सारीच नाती शेवटच्या क्षणापर्यंत तिनं जीवापाड जपली होती...
    तिनं कधीच कोणाला रागवून बोलल्याचं ऐकलं नाही मी...पण आपला नातू लहान वयात स्वतः एकटा चारचाकी चालवत मध्यरात्री आलेला बघून आईची मात्र चांगलीच कान उघडणी केली होती तिनं...त्यावेळी दुधापेक्षा दुधावरची साय तिच्या मायेला सरस ठरली होती...
    आलेल्या परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याची कला तिला आत्मसात होती...तिच्या आयुष्यात प्रत्येक अडचणीच्या परिस्थितीवर तिनं यशस्वीपणे मात केली...आपल्या सुनेला आणि नातवंडांना खंबीरपणे उभं रहायला शिकवलं तिनं....स्वाभिमानानं जगायला शिकवलं...
अत्यंत वैभवाचे दिवस तिनं उपभोगले तसे उतारवयात काही हलाखीचे दिवसही सोसले...खंडीभर गाई वासरं म्हणजे कशी असतात?ते तेथल्या गोठ्यांमध्ये अनुभवाला आलं होतं आम्हाला....पण नातवांसाठी घर आणि शेती जीवापाड सांभाळून ठेवली...त्याची फळं आज नातवंड,पतवंड चाखत आहेत...आईनं प्रेमानं एखादी भेटवस्तूही देऊ केली तर कधीच घ्यायची नाही तिने....जावयाचं काही घेत नसतातच...या सबबीखाली...
    ती एक वेळेलाच जेवायची...रात्री अर्धी ज्वारीची दशमी आणि मीठभुरका किंवा मुरमुऱ्याचा एक प्लेट चिवडा एवढाच आहार घ्यावयाची...मला वाटतं तिच्या दिर्घायुष्याचं हेच रहस्य असावं...नेहमी पेक्षा दोन घासही ती कधीही जास्त खायची नाही पण शेवटपर्यंत काटक होती...
आजी आली की तिच्या दशमीवर आमचा डोळा असायचा...त्यातील थोडी मला मिळायचीच....तिला त्याबरोबर माझ्या हातचा मिठभुरका आवडायचा....मी त्यात किंचित साखर घालत होते त्यामूळे तीखट लागायचाच नाही..त्याचे तिला फार आश्चर्य वाटायचं...पण मी माझं गुपित तिला कितीतरी वर्ष कळूच दिलं नव्हतं...पण ती जेंव्हा स्वतःहोऊन मला तो करावयास लावायची ना,त्यात फार धन्यता वाटायची मला... कारण तिची तेवढीच काय ती सेवा घडण्याची संधी मला मिळयची....
   आमच्या घरी आली आजी की,कधीही जावयाच्या समोर बसलेली किंवा त्यांना प्रत्यक्ष बोललेली मी बघितली नाही...
    आम्हा नातवंडांशी,आईशी गप्पागोष्टी रंगात आल्या की बाबा सामिल होण्यासाठी येत, पण आजी लगेच काढता पाय घेत असे...
कोणत्याही परिस्थितीत तिनं आम्ही आजोळी गेल्यानंतर आम्हा नातवंडांची,लेकीची किंवा जावयाची गैरसोय शेवटच्या श्वासापर्यंत होऊ दिली नाही....तिला आपल्या जावयाचं फार कौतूक आणि अभिमान वाटायचा....
   साऱ्या नातवंडांचे दोनाचे चार हात झालेले तिने बघितले...प्रत्येकाचा संसार बघून सुखावून गेली....शेंडेफळ नातवंड माझा भाऊ...त्याच्या लग्नाला मात्र ती हजर राहू शकली नाही...कारण तेवढा प्रवास झेपण्यासारखं तिचं वय नव्हतं...आम्हा सर्वांना तिची त्यावेळी फार उणीव जाणवत होती...कारण दर कार्यात,कोठीघर आणि देवधर्माचा विभाग ती अत्यंत कुशलतेनं हाताळायची... आईनं तिला लग्नानंतर लवकरच नवदाम्पत्याला तुझ्या आशिर्वादासाठी घेऊन येते.असे आश्वासन दिलेले होते....ती दोघं फिरुन आली की तीन आठवड्यातच आम्ही सारेच तिच्या भेटीला औंढ्याला गेलो...अत्यंत वृध्दावस्थेमूळे तब्येत तोळामासा झाली होती...पण डोळ्यात प्राण आणून नातवाला व नातसुनेला आशिर्वाद देण्यासाठीच जणू त्या प्राणपक्षाला तिनं जिद्दीनं आपल्यातच थोपवून धरलं होतं...स्वतःला शक्य नव्हतं, पण मामीकडून तिनं दरवेळी प्रमाणे याही वेळी  तुकडा ओवाळून पायावर पाणी घालत आम्हा सर्वांचं स्वागत केलं...यथोचिच स्वयंपाक बनवावयास लावून व्यवस्थित पाहूणचार केला...राखी पौर्णिमेचं आईला मामाला औक्षवण करावयास लावलं....आम्हा सर्वांना हसतमुखानं वाटी लावलं (निरोप दिला)‌आणि दुसरे दिवशी पहाटेच पाच वाजता अगदी तृप्ततेनं शांतपणे आपल्या अडवून ठेवलेल्या प्राण पक्षालाही निरोप दिला....कायमचा....
    
   आज जागतिक महिला दिन...शब्दांतून आजीला आदरांजली वहावी असं मनापासून वाटलं आणि लिहिती होत तिच्या आठवणीत रममाण होत नतमस्तक झाले...तिच्या जिद्दीला,काटकपणाला,कणखरपणाला,स्वच्छता,टापटिपीला,सुगरणपणाला,तिच्या माणसं जोडून ठेवण्याच्या स्वभावाला,शिस्तीला त्रीवार अभिवादन करत !!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  *नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा