*कोरोना*
एवढासा जीव पण दहशत किती देवू.... असं झालंय खरं त्या बारीकशा विषाणूला....
जेमतेम १४-१५ तास त्याचं आयुष्य....पण शतायुषी मजल मारणाऱ्या अती बुध्दीमान प्राण्याला, माणसाला अगदी कःपदार्थ ठरवलंयं त्यानं आपल्या समोर....
व्यवहार सगळेच ठप्प!सगळीकडे भयाण शांतता,भरीस रणरणतं ऊन....आंतरबाह्य भयाण शांतता...ना कोणाचे खाण्यात लक्ष ना टीव्ही बघण्यात....टीव्ही वरही त्याच त्या कोरोनाच्या बातम्या...अख्खा टीव्ही व्यापून गेलाय कोरोनानं.... त्यावरती येणारे आकडेही धडकी भरवणारे....घरातील भिंतीवरच्या घडाळ्याची टिकटिक सुध्दा भयानक वाटतीए... रस्त्यांवर शुकशुकाट...कुत्री सुध्दा म्लान होऊन निपचित पडलेली....झाडं मलूल झालीएत...एखाद दोन छोटे पक्षी हिंमत करताएत माणसाला साद घालण्याची ....तर फुलां भोवती गुंजारव करणारा भुंग्याचाही नाद नकोसा झालाय...कॉलनीतल्या एखाद्या घरातून ऐकू येणारा लहान मुलाचा आरडा ओरडा फारच कर्कश्श वाटतोय....
एखादा पादचारी चुकून माकून दिसलाच रस्त्यावर,तर तो कोरोना तर वाहून नेत नाहीएना?अशी धास्ती वाटतेय...कुणाकडे जाणं नको,कुणी आपल्याकडे येणं नको असं झालंय खरं...लगेच आंर्तमनातून आवाज येतो....तू तरी कुठे सेफ आहेस ? दोन दिवस घरात बंद होऊन बसलाएस,पण 'तो' विषाणू कधीच प्रवेशणार नाही याची तरी काय शाश्वती?....
केवळ प्रयत्न,संयम,स्वच्छता,प्रतिकार क्षमता नि, सहनशक्ती हीच खरी आपल्याजवळची शस्त्रं.... तीच कायम उपयोगात आणावी लागणार आपल्याला...तो,तो विषाणू वरचढ ठरतोय माणसाला...औषधालाही दाद देत नाहीए...म्हणून काय शांत बसायचंयं? अजिबात नाहीच...लढा द्यायचाच त्याच्याशी....त्याला पराभूत करुन सोडायचंच...सर्व जनशक्तीनीशी....युक्तीनीशी.. त्यासाठीच तर हे आजचं पहिलं पाऊल....नक्कीच यशस्वी होणार म्हणजे होणार म्हणजे होणारच...
नंदिनी म.देशपांडे
दि..२२ मार्च,२०२०.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा