शनिवार, ६ जानेवारी, २०२४

हम्पी, २.

*हम्पी*
__________

       दगडधोंड्यांच्या राज्यात तापलेल्या पाषातून पुरातन इतिहासाच्या खूणा बघताना, तोंडात बोट घालण्याची पाळी आपली येते,जेंव्हा आपण हम्पी येथे मोठ्या नव्हे अतिप्रचंड पाषाणातून, आणि किंबहूणा पहाडी पाषाणातून भव्य दिव्य अशा धार्मिक मुर्ति बघतो ना त्यावेळी...

        एक ना अनेक अशी कितीतरी शिल्प आहेत जे बघताना आपली नजरही कमी पडेल....घडवलेली मुर्ती बघताना खरंच वर्णनास शब्दच सुचत नाहीत पण त्या अनामी शिल्पकारास लोटांगण घालावेसे वाटते....
      त्यांपैकी काही शिल्पाविषयी आज सांगते...

          *चनागणपती*
________________________

       हे गणपतीबाप्पाचे भले मोठे शिल्प, "महागणपती" ,या नावानेही ओळखले जाते...एका अखंड विशालकाय पाषाणात विजय नगरच्या साम्राज्यात शिल्पकाराने बनवलेली ही मुर्ती....
      जमीनीच्या पोटात प्रचंड उलथापालथ होवून पृष्ठभागावर आलेल्या या पाषाणातून एक एक  मुर्ति आकाराला आलेली आहे...
          शिल्पकला किती प्रगत होती त्या ही काळात याचेच हे द्योतक आहे...कलाकारांना, शिल्पकारांना राजाश्रय होता आणि शिल्पकलेतून प्रत्येक राजाने आपापल्या काळाचा ठसा उमटवून ठेवला आहे असे निश्चित सांगतायेते....असो...

    तर ह्या महागणपतीचे पोटाचा आकार "चन्या" (हरभर्या सारखा) आहे म्हणून यास "चनागणपती" असेही संबोधले जाते...

*उग्रनृसिंह*
_______________________

       मुर्तिरुपात नृसिंह आपण बहूतेक उग्र रुपातच बघितला आहे...याला अपवाद मला आपल्या वाईच्या जवळ असणाऱ्या नृसिंह मुर्तित सापडला...वाईजवळ एकाच पाषाणी चौथऱ्यावर एका बाजूने नृसिंहाची उग्र मुर्ति आहे आणि त्याच्या पाठीच एक मुर्ति शांत स्वरुपात आहे...मला खूप आवडलेल्या मुर्तिंपैकी या कायम मनात घर करुन राहिलेल्या मुर्ति! असो...  
      तर हम्पीमधील नृसिंहाची ही विशाल मुर्ति सुध्दा एकाच भव्य पाषाणात अतिशय उग्र स्वरुपात शतकानुशतके विराजमान आहे... पण,शेजारीच लक्ष्मीचीही मुर्ति होतीच असे ठामपणे सांगता येते....कारण आदिलशाहीच्या माथेफिरु लोकांनी यातील लक्ष्मीची मुर्ति फोडलेली दिसून येते...पण तिचा सालंकृत हात आजही मुर्तित स्पष्ट दिसतो....म्हणूनच हिला "लक्ष्मीनृसिंह"असेही म्हणता येईल....
     
         *बडवीलिंग*
________________________

याच परिसरात आणखी डोळे विस्फारत बघावी अशी विशाल अशी महादेवाची पषाणाची पिंड आहे....विशेष म्हणजे ही वर्षानुवर्षे पाण्यात ऊभी आहे....समोरच नंदीही आहे... आजही त्या पिंडीभोवती पाणी असून ते कधीच आटलेले नाही....असे सांगितले जाते...तेथे पाण्याचा नैसर्गिक स्रोत असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो...मी पण या मताला पुष्टीच देईन, कारण आम्ही बघत होतो तो सगळा पाषाणी पठाराचा भाग होता...तेथून काही कि.मी. अंतरावर खाली उतरले की, दगडधोंड्याच्या साथीने, त्यांना कवेत सामावत, तुंगभद्रा नदी खळाळून वाहताना दिसते....
     तिचे स्वच्छ, सुंदर खळाळते रुप दगडगोट्यांच्या संगतीने फारच मोहक दिसते...पाण्याचा प्रवाह त्यामूळे अजिबात भितीदायक वाटत नाही...
या पात्रात वेताच्या मोठ्ठया टोपलीवजा तराफ्यात बसुन जलविहार करताना मजा आली...
       नदीतून विहार करतानाही दगडांच्या कितीतरी कपारी दिसतात....त्यातही वेगवेगळ्या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत...ती लांबून बघितल्याने स्पष्ट दिसत नाहीत...पण त्या भगवान परशुराम, पांडव वगैरे आहेत...कांही कपारी पाण्याच्या मार्याने बनल्या असाव्यात असे जाणवते...

      एकूणच या मुर्ती भग्न पावलेल्या असल्याने त्यांची पुजा होत नाही...
      अशा भल्या मोठ्या मुर्ती,आणि त्यातही त्यांचं देवपण लोप पावलेले बघून सुरुवातीला अंगावर शहारे येतात...भितीही वाटते...पण त्यांच्या निर्मितीमागे कितीतरी श्रम,मेहनत आणि जिद्द पणाला लागलेली आहे हे बघून त्या आपल्याला शिल्पकाराच्या कलेसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात...त्या वेळच्या या हिंदू राजांच्या कलासक्त स्वभावधर्माला प्रणाम करावयास लावतात हे निश्चित....

©️ॲड.नंदिनी मधुकर देशपांडे.
छ. संभाजीनगर. 

🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा