सोमवार, २२ जानेवारी, २०२४

आयहोळे, पट्डकल आणि बदामी...

आयहोळे आणि पडट्कल तसेच बदामीही....
-------------------------

         हम्पी वरुन बदामीला जाण्यासाठी केवळ अडीच तास लागतात पण रस्त्यात आयहोळे आणि पडट्कल ह्या ठिकाणचे मंदिर समुह बघण्यात आपण एवढे रमून जातो की सुर्यास्त केंव्हा झाला हे समजतही नाही.....
      पण हम्पी पेक्षाही पुरातन मंदिरं आहेत ही...कदाचित इ.स.च्या पाचव्या सहाव्या शतकातील!
       त्या वेळचे हिंदू राजे हे कलेचे भोक्ते होते...कलाकारांना राजाश्रय मिळत असे...हे राजे, देशातील कानाकोपर्‍यातून वेगवेगळ्या प्रांतांच्या शिल्पकारांना आमंत्रित करत असत आणि आपली शिल्पकला सादर करण्यासाठी अशी छोटी मोठी मंदिरं बांधण्यास प्रोत्साहन देत असत....
        आयहोळे आणि पडट्कल येथील मंदिर समुह याच काळातील आहेत...
         काही दाक्षिणात्य शैलीत, काही उत्तरेकडील शैलीत बांधलेली तर काही दोन्ही शैलींची सरमिसळ करत बांधलेली....
जैन आणि बौध्द शैलीही डोकावते काही मंदिरांतून....
        प्राथमिक अवस्थेतील या शिल्पांच्या दोषांचे निर्मुलन करत मग सुधारित शिल्पकलेतून साकारली गेली आहेत ती हम्पी येथील मंदिर समुह!
      थोडक्यात शिल्पकारांची वार्षिक परिक्षा म्हणजे हम्पीतील मंदिरं असे म्हणावयास हरकत नाही....

        आयहोळे आणि पडट्कल येथील शिल्पांचे सौंदर्य सुध्दा गाईड शिवाय समजणे अशक्यच....गाईड फार गरजेचा आहेच...

      आयहोळेतील सारीच मंदिरे छानच आहेत, बरीच भग्न होण्याच्या स्थितीत आहेत...

     सर्वांत सुंदर मंदिर म्हणजे "दुर्गा मंदिर".... या मंदिराची जडण घडण बघून आपल्याला जुन्या संसदभवनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही..
 किंबहूना संसदभवन
या मंदिराशी साम्य सांगते....
   अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून साकारलेले हे मंदिर सुंदर, नीटनेटके आकर्षक तर आहेच पण या मंदिराचा मागचा भाग हा ऊभ्या असणाऱ्या हत्तीच्या मागच्या पाठीच्या आकारात आहे...वरकरणी हे मंदिर महादेवाच्यापिंडीच्या आकाराचे आहे....
       असंख्य खांबांवर पेललेली ही वास्तू फारच मोहक आहे....
मल्लप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असणारी ही सारी मंदिरं प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम ठेवा आहे...

         सामान्यपणे सुर्यमंदिरात कधीच मुर्ति दिसत नाही...पण येथे भारतातील सुर्याची मुर्ती असणारे एकमेव मंदिर असल्याचा दावा केला जातो...

         यांपैकी काही मंदिरात मुर्ति नाहीत....काही मंदिरं अर्धवट अवस्थेत बनवलेली आहेत अर्थात मी पूर्विच उल्लेख केलाय की हा शिल्पकरांचा प्रायोगिक प्रयत्न आहे....पण काही फारच अप्रतिम आहेत!
        मंदिराच्या खांबांवर, छतावर, भिंतीवर, चौकटींवर आणि बाहेरील भिंतीवर सुध्दा फार सुंदर कोरीव काम केलेले आहे....
       त्या काळी राजांची संपन्नता त्यांच्या राज्यात असणारी मंदिरं आणि शिल्पकला बघून ठरवली जात असायची असे म्हणतात...अशी शिल्प म्हणजे त्या विशिष्ट राज्याची संपत्ती आणि वैभवाची साक्ष असायची...
        गजलक्ष्मी, उजेडासाठी खिडकीवजा झरोके, बारीक कोरीव नक्षीकाम जे आजही आपण आपल्या दागिन्यांवर घडवून घेतो,अशी एक ना अनेक कितीतरी शिल्पांचा उल्लेख करता येईल....
     काहींचे फोटो मी लेखासोबत पोस्ट करत आहे....
     
          याच मार्गावरुन बदामीकडे कूच करताना आम्ही जांबुवंत गुहा, शबरीची गुहा आणि श्रीरामांचे पाय तिच्या गुहेला लागली त्या पाऊलखूणा! 
हे सारे किष्किंधा नगरीत बघताना खरोखरच कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते...रामायणातील ते ते प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात....

             सगळीकडे मोठमोठ्या शिळा आणि दगडांच्या साम्राज्यातून सैर करताना आणि तेथील तीव्र उन्हाची काहीली सोसताना त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी हिरवळ, मोठे वृक्ष, छोटी छोटी झुडपं आणि फुलांचे ताटवे निर्माण केलेले दिसून येतात....मनाला आल्हाददायक असणाऱ्या या गोष्टी जाणीवपूर्वक उत्तम रितीने जोपासल्या गेल्या आहेत याचे खरंच खूप कौतुक वाटलेच...शिवाय संपूर्ण परिसर अगदी स्वच्छ, योग्य तेथे नावाचे, माहितीचे बोर्ड आणि भग्न सुट्या अवशेषांचे म्युझियम बनवून ते प्रदर्शित करणं ह्या सर्व बाबी तेथील शासनाची आणि नागरीकांची पुरातन शिल्पसौंदर्याची असणारी आवड जाणवून देते....हा ऐतिहासिक ठेवा जापावयास मदतच करते...

            सायंकाळपर्यंत आम्ही आयहोळे, पट्डकल करत बदामीला पोहोंचलो...
     बदामीलाही संपूर्ण पहाडी प्रदेशातून शिल्पकलेतून साकारलेली अप्रतिम मंदीरसमुह आहे....विशाल पुष्करणीच्या भोवती ही छोटी छोटी मंदिरं दिमाखात उभी राहून तेथील निसर्ग सौंदर्यात भरच घालतात...
 पण जवळच वानरसेनेची किष्किंधा नगरी असल्यामूळे म्हणा किंवा पहाडी प्रदेशामूळे येथे काळंया तोंडाची वानरसेना आणि मर्कटसेना विपुल प्रमाणात आहे आणि त्यांचा मुक्त संचार आपल्याला काहीशी धडकी भरवतो...असो...

      दुसरे दिवशी सकाळीच नाश्ता करुन आम्ही प्रथम बदामी येथील प्रसिद्ध असणाऱ्या शाकंभरी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो...नेमकीच आरती पुजा झालेली देवीची सालंकृत प्रसन्न मुर्ती आपल्या महाराष्ट्रातील तुळजाभवानीशी साधर्म्य सांगणारी वाटली...
मात्र तुळजाभवानी शांत संयमी रुपात दर्शन देते तर आई शाकंभरी थोडी उग्र रुपात ऊभी आहे असे वाटले...देवीचंच रुप ते कोणत्या स्वरुपाचा भास होईल सांगता येत नाही. 
पण दर्शनाने मन प्रसन्न झाले...मांगल्ययुक्त वातावरणात दिवसाची सुरुवात मनाला फार भावली...

       बदामीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे तिथल्या पहाडांमध्ये कोरलेल्या भव्य लेण्या !
थोडा ट्रेक करण्याशिवाय पर्याय नाही...सोबतीला मर्कट सेनाही असतेच...स्त्रीयांनी चुकूनही केसांमध्ये गजरा किंवा फुल लावू नये हे चढताना....खाण्याची कुठलीही वस्तू दिसेल अशी ठेवू नये कारण ही माकडं आपल्या केसात माळलेली फुले आपल्या खांद्यावर बसून अगदी क्लचर काढून घेवून जातात...मला असा अनुभव आलाय!....आपली नुसती घाबरगुंडी उडते मात्र...
एका स्री ची हातातील पर्स हिसकावून घेतली एका  माकडाने,  ती पण अशीच घाबरलेली....तरी तेथे हातात लांबलांब काठ्या घेवून सेक्यूरिटी पर्यटकांची काळजी घेताना दिसतात...

         बदामीच्या या भव्य लेण्यांपैकी एक लेणी विष्णू देवतेस, एक शंकराला, एक विष्णू आणि शिव या दोहोंना समर्पित आहेत तर एक लेणी गौतम बुध्दांना आणि एक भगवान महावीर यांना समर्पित आहेत...
      विष्णू लेणीत विष्णूंच्या दशअवतारांपैकी कही अवतार कोरलेले आहेत...शिवाच्या लेणीत शंकराची रुपं तर काही हरिहराची 
म्हणजे शरीराचा अर्धा भाग विष्णूंचा आणि अर्धा शिवाचा अशा आहेत...
छतावर, खांबांवर महाभारतातील प्रसंग आहेत...
बुध्द लेणीत गौतम बुध्दांची तर जैन लेणीत भगवान महावीर यांची विशाल शिल्प आहेत...
सारीच शिल्प आपण स्तिमित होऊनच बघत रहातो आणि त्या शिल्पकारांना मनोमन शतदा नमन करतो, ज्यांच्यामूळे आपण आज हे वैभव बघू शकतो...
     आम्ही गेलो तेंव्हा मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट  या महाविद्यालयातील ऐंशी विद्यार्थ्यांची अभ्याससहल आली होती आणि हे सर्व विद्यार्थी या शिल्पांचे स्केचेस काढण्यात मग्न होती....दरवर्षीच अशी सहल येते असे समजले...
        येथेही गाईड गरजेचा पण आम्हाला त्या दिवशी मिळू शकला नाही...कारण त्या वेळी सर्व गाईड लोकांची सात दिवसांसाठी प्रशिक्षण शिबीर चालू होते...
   
         पण ही भव्य शिल्पे बघून आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते आणि आपली हम्पी बदामीची सहल सुफळसंपन्न झाल्याचे समाधान आपल्याला भरभरुन मिळते हे अगदी खरंए...
      प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी बघावा आणि आपल्या पुढच्या पिढीला आवर्जुन दाखवावा असाच हा प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे....

©️ॲड.नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

आयहोळे आणि पडट्कल येथील मंदिर समुह....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा