बुधवार, ३ जानेवारी, २०२४

हम्पी....

कर्नाटकातील हम्पी आणि बदामी ही सहल करावी असे सारखे वाटत होते...ऐतिहासिक ऐवज असणारी ही सोनेरी खाण डोळेभरुन बघावी आणि त्या सुवर्ण काळाच्या साक्षीदारांशी हितगुज साधावे आपण,असे फार मनापासून वाटत होतेच...
     पण, तेथील तो ट्रेक, त्या दोन दोन दोन तीन तीन फूट असणाऱ्या पायऱ्या चढणे आपल्याला कितपत झेपेल?ही शंकाही अंतर्मनात घोंघावत होती...शेवटी मनातील प्रखर ईच्छाशक्तीचाच विजय झाला आणि तेथील सहली साठी अनुकूल कालावधी बघून आम्ही हम्पी ,बदामी या सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट दिली...

      *हम्पी*
***************
अगदी प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. च्या सहाव्या शतकापासून भारतीय संस्कृती परंपरा, शासन पध्दती किती तरी पुढारलेली,आपला स्वतःचा एक वेगळाच बाझ जपणारी होती...तसेच शासन आदर्शत्वाच्या मार्गाने चालणारी शासन व्यवस्था होती याची साक्ष देणारी विशालकाय मंदिरं, त्यांवरील कोरलेली असंख्य शिल्प आणि पावलोपावली मिळणाऱ्या प्राचीन इतिहासाचं आगार भांडार असेच वर्णन करावे असे हे हम्पी शहर...

लाखो वर्षांपूर्वि भूगर्भातील प्रचंड मोठ्या हालचालींमुळे, बहूतेक ज्वालामुखीच्या उद्रेकामूळे पाण्याखाली असणारा जमिनीचा भाग अगदी कोरडा ठक्क होवून तेथे जमीनीच्या पोटातून आलेल्या प्रचंड मोठ्या खडकांचा, दगडांचा, पाहाडांचा उष्ण प्रदेश म्हणजे हम्पी असा अंदाज व्यक्त केला जातो...

        दक्षिणेकडील म्हणजेच कर्नाटकातील  शेवटचा हिंदू राजाच्या कार्यकाळात विजयनगरच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दर्शवणारे कितीतरी पुरावे आजही येथे अस्तित्वात आहेत...
     कित्तेक देवालंयं जी मुर्तिविना मुक रुदन करत आहेत असा भास होतो...कित्तेक किल्ले, बाजारपेठा, ईमारती, राजवाडे, जलकुंभ, भग्न मुर्तींचे असंंख्य अवशेष या साऱ्या खुणांचे शहर हे हम्पी शहर...आजचे खेडे पण त्या काळचे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर, अर्थात पूर्विचे " विजयनगर ".
   
        म्हणावे तर भग्न अवशेषांचे शहर, म्हणावे तर, दगडांच्या खाणीचे शहर म्हणावे तर सुवर्णकाळ कथन करणारे शहर आणि मानले तर प्रत्यक्ष रामायणातील राम-रावण युध्दाची कल्पना जेथे प्रत्यक्षात  मांडली गेली ,आणि त्या दृष्टिने जेथून पावले उचलली गेली तीच ही किश्किंधा नगरी! आपल्या बाहूत रामायणातील कितीतरी प्रसंगांचा थेट पुरावा देते आपल्याला!..
हम्पी देवालयांपैकी सुप्रसिद्ध असणारे "विरुपाक्ष मंदिर"...
या परिसरात केवळ हे एकच मंदिर असे आहे की, जेथे मंदिरातील मुर्तीची, विरुपाक्ष, महादेवाच्या पिंडीची आजतागायत पुजा केली जाते...कारण केेवळ ही एकच मुर्ती आदिलशाही निजाम
शाहीच्या वक्रनजरेतून सुटली आणि अभंग राहिली....
इतर अनेक मुर्ती खूप सुंदर, रेखीव प्रचंड मोठ्या आहेत...काही एकाच दगडात अखंड कोरलेल्या आहेत...शिल्पकलेचा उत्तुंग अविष्कार असणारी ही शिल्प कुठे ना कुठे भग्न आहेत तर काही मंदिरांच्या गाभाऱ्यात देवच  नाही....भंग पावलेल्या मुर्तिंची पुजा करणे निशिध्द मानले जाते, म्हणून तेथे पुजा होत नाही...आणि आज ती सुवर्णकाळ दाखवणारी ऐतिहासिक साधनं बनली आहेत...
     एक एक मुर्ति घडवण्यासाठी कितीतरी शिल्पकारांनी आपले अख्खे आयुष्य खर्च केलेले असेल याची प्रचिती आपल्याला प्रत्यक्ष बघताना नक्कीच येते...
हा वैभवशाली इतिहास जगासमोर आणणं फार महत्वाचं आहे...आपल्या भारताचं हे भुषण युनेस्के जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय ते अगदीच योग्य आहे...

   इतिहासाचा एवढा महत्वपूर्ण ठेवा प्रत्येक भारतीयाने आवर्जुन डोळेभरुन बघावा असाच आहे... 
आपल्या पुढच्या पिढ्यांना हा ऐतिहासिक ठेवा आवर्जुन दाखवावा आणि शक्य तेवढा जतन करावा असाच आहे...

            वर उल्लेख केल्या प्रमाणे हम्पी येथील मंदिर समुच्चयात केवळ विरुपाक्ष मंदिरात प्राचीन काळापासून ते आजतागायत मुर्ति ची पुजा केली जाते...
      महादेवाची स्वयंभू पिंड असणाऱ्या या देवालयात मुर्तिपुजेचं मांगल्य आणि पावित्र्य संपूर्ण परिसर व्यापून टाकतं आणि पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटतं...
        या विशाल मंदिराच्या कळसाला गवसणी घालताना तब्बल नऊ मजले पार करावे लागतात...आतल्या आत वरपर्यंत पोहोंचावयास जिन्याची व्यवस्थित बांधणी केलेली आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव हल्ली हा मार्ग पर्यटकांसाठी बंद केलाय...नऊ माळ्यांच्या गोपुराची रचना अगदी वरच्या टोकावर बघाल तर, लांंबूून गायीच्या दोन कानांसारखी वाटते...वास्तविक हे दोन्ही टोकाचे (कानांमधील) अंतर बरेच जास्त आहे पण शिल्पकाराचे कसब पणाला लावून यातील एक एक शिल्प घडवलेले दिसते...
       येथील आणखीन  एक वैशिष्ट्य म्हणजे,महादेवाचे वाहन नंदी आपण प्रत्येक मंदिरात बघतो पण या मंदिरात मात्र मुळ नंदी तीन तोंडाचा बघावयास मिळतो...तो भग्न पावलाय म्हणून ओळीने तीन नंदी याला पर्याय म्हणून बनवले गेले आहेत...

        त्याही काळात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मंदिराची बांधणी केलेली दिसून येते त्याचा पुरावा म्हणजे जेंव्हा आपण या मंदिरात एका बारीकसारीक छिद्रातून या ठिकाणी सूर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत गोपुराची थ्रीडी इफेक्ट बघाायास मिळणारी सावली बघतो आणि थक्क होऊन जातो...
       मंदिर परिसरात गजलक्ष्मी हत्तीणीचे दर्शन घेताना समाधान मिळते...
      मुख्य मंदिरातील उत्सव मुर्तिचा फोटो घेण्यास मनाई आहे त्या मूळे ती सोडूण काही फोटो शेअर करत आहे...
        हम्पी राजधानीचे ठिकाण असल्याने मोठ्ठी बाजारपेठ येथेच होती...मंदिराच्या दोन्ही बाजूस लांबच लांब असे अधुनिक शटर्स सारखे दगडीशिळांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स तेही दोन मजली बघून आचंबित होण्याची पळी आपली असते...
       व्यापारासाठी वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे व्यापारी महिनोन महिने मुक्कामास यायचे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, निवासाची आणि पाणवठ्याची व्यवस्था अगदी चोख होती हे आजही या खुणा बघून खात्रीच पटते आपली...
      
   पण,प्रत्यक्षात भेट देवून बघण्याजोगे हे ठिकाण एकदा आवर्जुन बघावे असेच...
 आज एवढेच पुरे...
बाकी मंदिरांविषयी  यथावकाश लिहिनच...

©️ॲड.नंदिनी म.देशपांडे.
छ.संभाजीनगर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा