*सहस्त्रचंद्र दर्शन*
*सोहळा*
🌹🌹🌹🌹🌹
"मेल्या,थांब, तुला बघते, नंतर..."असे म्हणत, कौतुकाची नजर एखाद्याकडे टाकत,पण हसत त्याच्याकडे बघणं....ही माझ्या आत्याची, कुंदा आत्याची फार जुनी सवय...माझी कुंदा आत्या म्हणजे,
*सौ.कुंदा रामचंद्रराव* *आसोलेकर*.
माझ्या लहानपणापासून तिची ही सवय मी बघते आहे....मला खरंच आश्चर्य वाटायचं, कौतूक करतानाही कुणी एखाद्याला शिवी का घालतं असं ? हा माझ्या बालमनाला नेहमीच प्रश्न पडायचा....पण मग माणसाचा चेहरा वाचायचं समजायला लागलं आणि आत्याच्या बोलण्याचा रोख, तिच्या त्या कमलपाकळी अशा मोठ्या मोठ्या डोळ्यातून ओसंडणारं कौतूक, आणि खणखणीत पण प्रेमभरा आवाज ऐकला की मला त्या मागचे भाव समजायला लागले....
अशी माझी कुंदा आत्या...अगदी आम्हा भावंडाचीच, हक्काची अशी...कारण तिला आत्या म्हणणारे भाच्चे मंडळी फक्त आम्हीच भावंड!
त्यामूळे बाबांपेक्षा मोठी असली तरीही आम्हा भावडांना सगळ्या आत्यांमध्ये लहान असणारी हिच आत्या....
"आत्या" हे नातं कायमच हक्काचं, लाड करवून घ्यायचं, हट्ट पुरवून घ्यायचं आणि आईबाबांकडे आपली मागणी पुरी करुन घेताना माध्यम म्हणून उपयोगी पडणारं!
गव्हाळ गोरापान रंग, मध्यम ऊंची, मध्यम बांधा, बऱ्यापैकी लांब सडक केस, कपाळावर मोठं लाल कुंकु.साडीचा पदर मागून घेत कमरेला खोचणं ही तिची लकब अगदी खास आहे....हे सारं तिला खूप शोभून दिसणारं असंच...
तिच्या या साऱ्या गोष्टी तिचं जात्याच असणारं सौंदर्य आणखी खुलवत ठेवतात आजही....
अशी माझी कुंदा आत्या आज २६ मार्च, २०२१ या रोजी तिच्या वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहे....आज ती तिच्या वयाच्या
८१ व्या वर्षात, *'सहस्त्रचंद्र दर्शन वर्षात'*
प्रवेश करत आहे...
या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या आरंभी कुंदा आत्याचे,माझ्या शब्दरुपी ज्योतींनी लावलेल्या निरंजनांनी औक्षवण करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न!
त्या वेळच्या प्रथेप्रमाणे सातवी पर्यंत शिक्षण झाले, आणि आत्या लग्नाच्या बेडीत अडकवली गेली...तिच्या लग्नाविषयी घरात चर्चा चालू झाली असताना घडलेला एक किस्सा मला माझ्या मोठ्या आत्याने सांगितलेला...
कुंदा आत्यापेक्षा मोठी असणारी एक बहिण,तिच्या स्वतःच्या लग्नानंतर तीन वर्षांत काही आजारपणानं जात राहिली...
तिच्याच यजमानांबरोबर आपल्या ह्या मुलीचे(कुंदाचे)लग्न लावून देऊ अशी घरात चर्चा चालू झाली... आणि कुंदा आत्याने मात्र या गोष्टीला ठासून नकार दिला....तिने मोठ्या बहिणीला तिच्या गावी 'मला घेऊन चल',असा लकडा लावत तिच्या घरी (निटूरला) ही चार दिवस रहाण्याच्या निमित्ताने गेली...आणि तेथून तिने स्वतः आजोबांना स्वतःच्या लग्नाबाबत चा निर्णय स्वहस्ते मोठ्ठं पत्र लिहून कळवला....
हा तिचा विलक्षण करारी बाणा आजही तिनं जपून ठेवलायं!प्रचंड आत्मविश्वास, अभेद्य निर्णय क्षमता,परिस्थितीशी जुळवून घेणं आणि एवढंच नाही तर प्रतिकूल परिस्थितीही आपल्याला अनुकूल बनवणं तिच्यातील हे गुण खरोखरच वाखाणण्या सारखे आहेत!
हस्ताक्षर तर अतिशय वळणदार सुंदर!तिच्या हस्तक्षरातील कितीतरी पत्र आजही असावित माझ्या माहेरी!
किती गम्मत असते ना, भाचीचं माहेर तेच तिच्या आत्याचं माहेर!दोघींचेही 'माहेर घरची लेक' या नात्याने सारखेच लाड!त्यामूळे तर आत्या बद्दल आणखीनच आपलेपणा वाटत जातो....आपणही तिच्याच रक्ताचा पण पुढच्या पिढीचा अंश आहोत ही जाणीव फार सुखाऊन जाते...
शिक्षणाची संधी मिळाली नाही पण, आमची कुंदा आत्या फार हुशार!काळाची पावलं बरोबर ओळखणारी आणि आपल्या एक मुलगा व तीन मुली यांना उच्च शिक्षित करताना जीवाचं रान करणारी!त्याच बरोबर नातेवाईकांच्या मुलांनाही आपल्या जवळ ठेवत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करवून देणारी....
देवावर श्रध्दा बाळगणारी पण देवभोळेपणा झुगारणारी, स्पष्टवक्तेपणा बाळगणारी, पण अत्यंत सेवाभावी वृत्तीनं,कृतार्थतेनं नाती जपत त्यांचे आदरातिथ्य करणारी!
संसारात गृहिणी म्हणून यथार्थ पणे हातभार लावत, मामांबरोबर आनंदानं संसार पेलणारी....अशी माझी ही आत्या!
मला नाही वाटत तिनं कधी आमच्या आसोलेकर मामांकडे (तिचे यजमान) कधी एखाद्या साडीसाठी, वस्तू साठी, किंवा एखाद्या दागिन्या साठी हट्ट धरला
असेल....माहेर आणि सासर शिवाय कधीतरी प्रसंगानुरुप इतर दोन बहिणींच्या घरी म्हणून प्रवास करणारी आत्या, कधीच पर्यटन किंवा बदल म्हणून सुध्दा, चार दिवस बाहेरगावी जाऊन राहिली नाही...तिला त्याची कधीच खंतही वाटलीच नाही...
अतिशय समंजसपणा,
तडजोड करण्याची वृत्ती ठेवत, काटकसरीनं संसार करणाऱ्या या कुंदा आत्या कडून आमच्या पिढीला खूप काही शिकावयास मिळाले...आजही मिळत आहे....
अधुनिक विचारांची कास धरलेली, एक यशस्वी गृहिणी, अर्धांगिनी, एक उत्तम सून,उत्तम आई, सासू,आजी,आणि पणजी आजी सुध्दा... अशा विविध पातळ्यांवर च्या नात्यांवर तिने आपला ठसा उमटविला आहे...
गाण्याची आवड जोपासत सुरेल आवाजात गाणं म्हणणं हा तिचा छंद! सुगरणपणा ही दैवी देणगीही तिच्याजवळ आहेच...
गेल्या तीन वर्षांपासून वृध्दापकाळाने घराबाहेर पडू शकत नाहीए ती, पण सर्वांची खबरबात ठेवून असते....
आदर्श सहजीवनाचा पायंडा पाडून या उभयतांनी एक उत्तम आदर्श संसाराचं उदाहरण आपल्या पुढच्या तीन पिढ्यांसमोर एक आदर्श म्हणून उभं केलं आहे....याचा एक भाच्ची म्हणून मला स्वतःला कुंदा आत्या आणि (दादा)श्री रामचंद्रराव आसोलेकर या उभयतांचा निश्चितच खूप अभिमान वाटतो.....
आज मामांचे वय वर्षे ९०आणि आत्याचे वय वर्षे ८० आहे....
आयुष्याच्या शतायुषाकडे चालू असणारी या दोघांची वाटचाल मृदू मुलायम मखमली वाटेवरुन चालू रहावी.... सहजीवनातील आनंद व्दिगुणीत करणारी असावी,या साठी आत्या आणि मामांना माझ्या मनाच्या अगदी गाभार्याच्या आतून भरभरून आरोग्यपूर्ण हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
आणि आत्याला सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच्या उदंड उदंड शुभेच्छा,
हार्दिक अभिनंदन आणि आत्या व मामा या उभयतांना माझा मनःपुर्वक नमस्कार...
🙏😊🙏
©️
नंदिनी म. देशपांडे.
942241695.
औरंगाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा