सोमवार, २९ मार्च, २०२१

होळी रे होळी पुरणाची पोळी.

*होळी रे होळी पुरणाची पोळी*😋

  काय मंडळी,खाल्ली का मग शिळी पुरणपोळी? किंवा शिळया पुरणाची ताजी पोळी?संगतीला दुधातला चंद्र घेऊन?
      हे काय बोलतीए मी? संभ्रम आला ना मनात?पण असू दे, जातीवंत पुरणपोळी भक्तांना बरोबर समजलंयं बरं का माझं म्हणणं....😀
       महाराष्ट्रातील संस्कृती जेवढी प्राचीन तेवढीच या लोकांची खवय्येगीरीही प्राचीनच!
थोडक्यात माणसाचा पोटोबा शमवण्याचा मार्ग या सणावारांच्या निमित्ताने जास्त सुकर होतो असेच म्हणा ना!....हवे तर...
  कारण ऋतूचक्र हवामानातील बदल यांना जुळवून घेण्याचे कसब माणूस आपल्या खाद्यसंस्कृती मधून शिकतो असे म्हणता येईल....
     प्रत्येक मोठ्या सण उत्सवा बरोबर आपल्या एखाद्या पदार्थाचे घट्ट नातं जुळलेलं आहेच...
     अगदी गुढी पाडव्या पासून ते होळी पौर्णिमे पर्यंत....
    कधी श्रीखंड, बासुंदी, निरनिराळ्या खीरी तर कधी जिलेबी,लाडवाचे विविध प्रकार आणि वर्षाचा शेवट आणि सुरुवात मात्र,पक्वान्नांच्या महाराणी सोबतच!
     ही परंपरा कितीही मोडावी आपण असे वाटले तरीही आपल्या जीभेचे चोचले ती चुकवू देतच नाहीत... बरोबर त्या त्या सणाला तेच वैशिष्ठ्यपूर्ण पदार्थ बनवण्याकडेच कल असतो आपला.....
      आता होळी आणि पुरणाची पोळी यांचं नातं तर फारच घनिष्ठ!
पिढ्या न् पिढ्या जपले गेलेलं....
    'पुरणपोळी आवडत नाही' असे म्हणणारा माणूस सहसा पटकन सापडणं कठिणच!
   ‌‌मस्तपैकी गरमागरम पुरणपोळी त्यावर,किंबहूणा वाटीतच लोणकढं तूप!असा घास जीभेवर ठेवला रे ठेवला की,खरंच स्वर्गीय सुख ते हेच तर! असे म्हणावेसे वाटते...मग तुम्ही त्याच्या सोबतीला भले दहा पदार्थ बनवा, पण सारी फीकीच त्यापुढे!
     मग ती भजी असो,पंचामृत असो,आमटी असो,कढी असो किंवा होळीच्या पुरणपोळी बरोबरचा कायरस असू दे!
काही जण कुरडी,पापड वडा अशीही संधी साधतात पुरणपोळी बरोबर.....
मुखरस चाळवला गेला ना, मंडळी!
   हरकत नाही कालच होळी पौर्णिमा झालीए...फ्रीज मध्ये
थोडे तरी पुरण ठेवले असेलच ना शिलकीत?मस्त वेलची जायफळाचा घमघमाट येत असेल... 
मला माहित आहे,
ती एकदाच खाऊन पोट भरेल,तृप्त होईल असे घडणे केवळ अशक्यच!
     अहो दोन दोन दिवस फ्रीज मध्ये ठेवून आवडीने पोळी खाणारा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.... किंवा पुरण ठेवून पोळी बनवणारेही!
     कधीतरी एखादा 'पुरण पोळी आवडत नाही',असे म्हणणारा सापडला तर कीव येते त्याची!हे म्हणजे कोकणात राहून हापूस आवडत नाही म्हणण्या सारखं आहे....
     पुरणपोळीची श्रीमंती काय वर्णावी?
हे जेवणाचं ताटही कसं दृष्ट लागण्या सारखं दिसतं....
जणू त्या गरमागरम पोळीचं त्या तुपाच्या धारे बरोबरच्या मिलनाचा हृद्य सोहळा होतोय आणि बाकी पदार्थांची मांदियाळी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमली आहेत....
    शिळ्या पोळीला दुधातला चंद्रच भावतो मात्र....पण पुरणपोळी आणि आमरस काय चवदार लागतं म्हणून सांगू....
प्रत्येकाची चवीष्टपणाची तह्राच न्यारी!
म्हणूनच तर पुरणपोळी माझी पक्वान्नाची राणी! मऊ मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी तोडून खावी आणि जीभेवर तत्काळ विरघळणारी!
     ‌हळू हळू आपले हातपाय जगभर पसरते आहे ती...अगदी परदेशातही मिळू लागलीए हल्ली!
    पण ताज्या ताज्या पोळीची गम्मतच भारी!
अशी ही पुरण पोळी
जिला येते ती जातीवंत सुगरण गृहिणी आणि राजाची आपल्या आवडती राणी!🤗
म्हणूनच सरत्या वर्षाला निरोप देताना होळी रे होळी अन् पुरणाची पोळी!

©️
 नंदिनी म. देशपांडे.
होळी,२०२१.
औरंगाबाद.

🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा